गुरुवार, २५ जून, २००९

सुचेनासे झाले म्हणून...

आत्ता खरं तर अजिबात बरं वाटत नाहीये मला. सकाळी जाग येऊनही निपचित पडूनच होते.. आता बहुतेक हे लिहून परत जाऊन झोपेनच. तसं काही खास झालेले नाही.. अशक्तपणाने तापल्यागत होऊन सांधे दुखतायत.. बस्स. तुम्ही म्हणाल मग मरायला इथे काय करतेयस? बरोबर आहे तुमचं विचारणं.. तुम्हाला पटणार नाही पण मॅथ्यूकाकूंच्या इडल्यांमुळे आले मी ऑनलाईन!

पुण्यात नवा फ्लॅट घेतला याचा जितका मला आनंद झाला नव्हता तितका शेजारी एक वयस्कर जोडपं राहते आहे हे कळल्यावर झाला होता. हे कळायला पण मजेशीर अनुभव आला. माझा फ्लॅट १०१ (१ बीएचके) तर त्यांचे १०५ (२ बीएचके) आणि १०६ (२ बीएचके). नवे बांधकाम असलेली इमारत आणि अजून कॉमन सोयींची दारोमदार बिल्डरच्या हातात अशी आमची अवस्था (अजूनही आहे). गॅस वगैरे गोष्टींचा जुगाड अजून झालेला नाही त्यामुळे साडेनवाच्या हापिसला पोहोचायला अगदी साडेआठला उठून आवरले तरी चालेल अशी ऐश कोणी ओरडायला नसल्याने सुखेनैव चाललेली. त्यादिवशीही अशीच मजा झाली. गोडगुलाबी स्वप्नातून मोबाईलच्या गजराने (योग्य वेळी उठण्यासाठी गजर अत्यंत जरुरी नसता गुलाबी स्वप्नातून लवकर सुटका होणे नाही! ) जाग येऊन उठले. मिटलेल्या डोळ्यांनी ब्रशवर पेस्ट लावून दात घासायला सुरूवात. तोंड धुवायला बेसिनचा नळ चालू केला तर पाण्याचा पत्ताच नाही!!! आता काय करायचं?!! बाथरूममध्ये असलेल्या थोड्या साठवलेल्या पाण्याने तोंड धुतलं पण आंघोळीचे काय?? धड कपडे घालून सिक्युरिटीवाल्या मगरकाकांना ओरडायला खाली पळाले तर त्यांनी सांगितले की एक बोअरींग बंद पडली त्यामुळे पाणी चढवता आलेले नाही. पाण्याचा टँकर सांगितला आहे.. १०:३० पर्यंत येईल.
"वरच्या टाकीतले पाणी असेकसे संपले? पूर्ण भरत नाही तुम्ही ती टाकी. इनमीन ४-५ कुटुंब रहायला आली नाही तरी सांगितलेल्या २ तासाच्या वेळेतसुद्धा पाणी येत नाही. माझे ऑफिस साडेनऊला आहे.. लवकर मागवा पाणी.. " असा मी सूर लावताच ते हसून म्हणाले, "ताई, मी काय करणार आता अशी पंचाईत झाली तर? मालकांनी सांगितलं १०:३० ला टँकर येईल तेच सांगून राहिलो तुम्हाला. " मला त्या बिल्डरचा इत्तका राग आला की खाऊ की गिळू असे झाले. तूर्ताचा प्रश्न सोडवणे भाग होते नसता हकनाक हाफ डे सुट्टी पडली असती. काय करावे असे विचार करता शेजाऱ्यांकडे बादलीभर पाणी मागायचे असे ठरवले. आता कोणत्या शेजाऱ्याकडे मागायचे? बिल्डर म्हणालेला की तरूण पोरांनीच फ्लॅट घेतलेत जवळपास सगळे.. अशा अवतारात कोणा बॅचलरच्या फ्लॅटची बेल दाबली गेली तर? छ्या! खालून वरती येताना सहज पहिल्या मजल्यावरच्या ओनर्सच्या नावांची पाटी वाचली. जोशी, छेत्री, जाधव, अली, मॅथ्यू आणि मॅथ्यू. काही उपयोग झाला नाही. डोक्यातले डेब्री विचार बाजुला ठेवून हातातल्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रीत करायचे ठरवून छेत्रींच्या फ्लॅटची बेल दाबली. एक बाई बाहेर आली (हुश्श! ) - "क्या चाहिए? "
"जी मैं सामनेवाले फ्लॅटमे रहती हूं। पानी नहीं हैं बिल्कुलभी। नहाके ऑफिस जाना था। आप एक बालटी पानी दे सकती है क्या? "
"मेरेपास भी पानी नहीं हैं. जो भरके रखा था वो तो रातभरमे खतम हो गया। ये बच्चे पुरा पानी खतम कर डालते हैं। वैसे कल शामसेही पानी नहीं हैं! "
माझ्या (अ)ज्ञानात आणखी भर पडली. आदल्यादिवशी हापिसातून परतायलाच १० वाजले होते. त्यानंतर जेवायलाच ताकद नव्हती तर पाणी आहे की नाही कुठले तपासत बसायला? बोलताना कळलं की त्या छेत्री नाहीत तर छेत्रीच्या भाडेकरू आहेत.. छेत्री २५ वर्षाचा पोरगा आहे म्हणे!!! मला मणभर बरे वाटले त्या मुलाने इतका सभ्य निर्णय घेतल्याबद्दल. इमारतीतल्या सर्वच मुलांनी असा निर्णय घेतला असल्यागत मी अगदी निर्भय होऊन जाधवांच्या फ्लॅटची बेल दाबणार तर छेत्रींच्या भाडेकरणीने (तिने तिचे आडनाव सांगितले पण माझ्या ते लक्षात नाही राहिले) सांगितले की ते अजून इथे रहायला आलेले नाहीत! असलम अलींकडेही तीच परिस्थिती! मला इतका राग आला ते रहायला न आल्याचाही की बस्स. मॅथ्यूंच्या घराची बेल दाबली तर नव्याने लक्षात आले की त्यांनी सेफ्टी डोअर बसवलेले होते. दरवाजाची रंगसंगती आणि वापरलेल्या लाकडाचा दर्जा पाहूनच जीव एकदम खुष झाला. 'यांच्याकडे तरी मला द्यायला बादलीभर पाणी असू दे' अशी मनोमन प्रार्थना करत असतानाच सेफ्टी दारापलिकडे - एक वयस्कर गृहस्थ आले.
"काका, नळाला पाणीच येत नाहीये आणि मला ऑफिसला जायची घाई आहे. बादलीभर पाणी देऊ शकाल का मला? "
"बाकी तो समझमे आया थोडाथोडा लेकीन ये बादलीभर क्या होता है? "
"बकेट अंकल.. "
"ओके ओके.. लेकीन तुम है कौन? "
"सॉरी अंकल.. मैं १०१वाले फ्लॅटमे रहती हूं। लास्ट वीकमें आयी यहा रहनेको। ये बिल्डर साला लुटारू है। "
माझ्या शेवटच्या वाक्यावर खुष होऊन काकांनी काकूंना बोलावलं आणि हिला काय पाहिजे बघ सांगितलं. काका आणि काकू दोघेही गप्पिष्ट (तशी मी काय कमी आहे?! पण परिस्थिती अशी होती की मला वेळच नव्हता बोलत बसायला. काकूंनी त्यांच्याच बादलीत मला पाणी दिले आणि ते घेऊन येऊन आंघोळ करून हापिसाला पळाले मी.

मॅथ्यूंची बादली परत करायच्या निमित्ताने मी घरी लवकर आले आणि मग तेव्हापासून जी ओळख झाली ती आजतागायत. काका ७५+ तर काकू ६५+ आणि त्यांच्या घरात (१०५) ते राहणारे दोघेच त्यामुळे मला जाम आवडले ते दोघे. आठवडाभरात वेळ मिळाला नाही तरी जेव्हाही शनि/रविवारी कंटाळा येईल तेव्हा त्यांच्याकडे जाऊन मस्त गप्पा मार असा प्रोग्राम सुरू झाला. तसे ते दोघे (खास करून काका) रिझर्व्हड म्हणावे अशा प्रकारातले पण त्याने मला फरक पडत नव्हता.. मी अगदी माझंच घर असल्यासारखी त्यांच्या घरात वावरत, बोलत होते. त्यांच्याकडे फर्निचरचे काम चालू होते तर मी त्यांना म्हणत होते की हे इकडे नाही तिकडे छान दिसेल. इकडे हा पसारा का पडलाय? काकांना ओरडले की ते काकूंना मदत करत नाहीत वगैरे. आपण तिघे संध्याकाळी खालच्या सो कॉल्ड गार्डनमध्ये फेऱ्या मारायला जात जाऊया असे मी त्यांना सुचवले मात्र ते म्हणाले - नहीं जमेगा। मी आश्चर्यचकित झाले. मी माझाच मुद्दा लावून धरला तेव्हा ते म्हणाले की त्यांना चालायला त्रास होतो आणि एक मजला उतरून (तेव्हा लिफ्ट तयार झालेली नव्हती) मग चालायला जमणार नाही. बॅलन्स ठेवायला आताशा जमत नाही म्हणाले. माझ्या मोकळेपणाने म्हणा किंवा त्यांना नकोशा झालेल्या त्यांच्या एकटेपणामुळे असेल रिझर्व्डपणा थोडाथोडा सोडून देत त्यांनि माझ्याशी मनमोकळे बोलायला सुरूवात केली. तब्ब्येतीच्या तक्रारींपासून सुरूवात झाली. दोघांना शुगरचा प्रॉब्लेम. काकूंना ऍलोपाथीच्या औषधांचा प्रॉब्लेम तर काकांना रसायनांच्या वासाचा प्रॉब्लेम, हाय ब्लडप्रेशर वगैरे वगैरे हजार गोष्टी. फोनची पण सोय नाही त्यामुळे पुण्यातल्या मुलाला संपर्क करायचा तरी त्रास होतो असे म्हणाले. मी माझ्या फोनच्या कनेक्षनसाठी बीएसएनएलच्या ऑफिसात जायचीच होते, तेव्हा यांचेही काम होईल तर पहायचे असे मनोमन ठरवून टाकले.

माझा फोनचा डबा आला तेव्हा मी त्यांच्याकडेही कनेक्षन येईल याची दक्षता घेतली. त्यांना खूप आनंद झाला त्या गोष्टीने. मला काही वेगळ्याने तोशीस घ्यावी लागली असे नाही पण कामात काम त्यांचेही होऊन गेले याचा मलाही आनंद झाला.
"अभी आप मुझसे आपका नंबर छुपा नहीं सकते, अंकल। मुझे पता है की मेरे नंबरमे २ मिलाओ तो आपका नंबर मिलता है।" आजवरच्या त्यांच्या रिझर्व्हडनेसवर केलेल्या या टिप्पणीने दिलखुलास हसून घेतले त्यांनी. म्हातारी माणसं आम्ही.. कोणी काय अर्थ काढून काय नाटक उभे करेल सांगता येत नाही म्हणून थोडे जपूनच राहतो असे म्हणाले. मी एकटी राहते कळल्यापासून त्यांचं माझ्यावरही नजर ठेवणे सुरू झाले. परवा शिर्डीवाल्या साईबाबांच्या पालखीसाठी देणगी मागायला मुलं आली तर त्याअगोदर काकांचा फोन.. अशी अशी २ मुलं आपल्या फ्लोअरवर आली आहेत. त्यांच्या डांबरटपणाकडे लक्ष देऊ नकोस आणि त्यांना हाकलून दे! मी २ मिनिट त्या फोनच्या रिसीव्हरकडे बघतच बसले. त्या मुलांना मी हाकलेतो काका त्यांच्या दरवाजात उभे होते! त्यांची काळजी पाहून डोळ्यात पाणीच आलं माझ्या.

हापिसातल्या राजकारणी कटकटींनी माझा जीव हैराण होऊन जायचा आजकाल. माझा मूड खूपच हटेला असतो अशावेळी. कशाला उगाच माझ्या किरकिरीचा कोणाला त्रास म्हणून मी घरातच बसून रहायला लागले. इच्छाही होत नव्हतीच म्हणा कुठे जायची. काकू येऊन मला घेऊन गेल्या त्यांच्या घरी (माझ्या घरी अजून पुरेशा फर्निचरचा पत्ता नाही!). आमची परिस्थिती अगदी उलट होती आता. पुर्वी ते गप्प असायचे आणि मी बडबड बडबड.. आता ते बोलत होते आणि मी जेवढ्याला तेवढं हूं हां.
"क्या हुआ? बोलता क्यूं नहीं है तुम?" काका.
"ऑफिसकी खिटपिटसे तंग आ गयी, अंकल।"
"क्या हुआ ऑफिसमे? "
"हमेशाका ही है.. मुझे बोअर हो गया अभी।"
"क्या हमेशाका?"
"मन लगाके काम करनेवालोंकोही क्युं हमेशा तकलीफ होती है?"
"गॉडके मन मे कुछ अच्छा होएगा इसलिये.. "
काकांना त्यांचं वाक्य पूर्णच न करू देता मी एकदम उसळले..
"ये गॉड वॉड कुछ नहीं होता अंकल.. ये सब धकियानुसी बातें है। और अगर होगा भी तो कुछ काम नहीं करता है वोह आजकल.." मी सात्त्विक संतापाने घामेजले होते पूर्ण.
एरव्ही इतकी विनोदी, शांत, हसूनखेळून बोलणारी मुलगी आज अचानक इतकी काय संतापलीये त्यांना काहीच कळायला मार्ग नव्हता. काकांची आणि माझी मग जुगलबंदी चालली होती २ तास गॉड या विषयावर. काकू मध्येमध्ये काकांना मदत करत होती त्यांचा मुद्दा समजवून सांगायला उदाहरणे पुरवून! गॉड असतो आणि तो मदत करतो अशी त्यांची भूमिका होती तर असं काही नसतं अशी काहिशी माझी भूमिका होती. ते त्यांची उदाहरणे देत होते तर मी माझी देत होते. असे चालू असताना ते म्हणाले,"हमे ३ लडके हैं.. एकभी बेटी नहीं। तीनो बेटे बहोत अच्छे है और बहुएंभी. बहुओंको तो हमने बेटीयों जैसाही प्यार दिया है। दो बेटे फॉरेनमे है तो तिसरा यहा पुनेमे। हरेक को अपना अपना संसार है.. पता नहीं क्यौं कुछ दिन पहले गॉडको प्रे करते टाईम मेरे दिलमे आया की मुझे एक बेटी होती तो कितना अच्छा होता..और उसी दिन तुम आयी थी बादलीभर पानी मांगने के लिये। मैं बोलता है ना.. गॉड होता है और वोह सुनता है।" असे म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला. जुगलबंदीत सहजी हार पत्करणारातली मी नाहीच पण त्यांच्या या उदाहरणाला मी काय म्हणू तेच मला कळले नाही. डोळ्यातलं पाणी गालावर कधी ओघळलं कळलंच नाही. मनातलं मळभ अचानक वितळून गेल्यासारखं वाटलं आणि मी मग भरभरुन बोलत बसले त्यांच्याशी. आध्यात्मिक, कौटुंबिक, सामाजिक वगैरे काय काय विषयांवर बोलत होतो आम्ही त्याला काही सुमारच नाही.. खूपच शांत वाटले एकंदरीत.

कालपासून अंगात कणकण वाटत होती आणि सांधे आखडल्यासारखे झाले होते. पोट बिघडले ते वेगळेच. मी म्हटलं की थोडे लंघन केले तर बरे वाटेल म्हणून तापावरची गोळी घेऊन पडून राहिले. थोड्या वेळापुर्वी बेल वाजली म्हणून आयपीसमधून बघितलं तर मॅथ्यूकाकू. शक्य तितका हसरा चेहरा ठेवून दरवाजा उघडला.. हो उगाच जास्तच आजारी आहे असे वाटून त्यांनी काळजी करत बसायला नको ना..
"क्या तुम? अभीतक सो राहा है? क्या हुआ? तुम्हारा बाल्कनी झाडू नहीं देखकेही मुझे लगा की कुछ तो गडबड है।"
"तबियत थोडी खराब है। उठनेका बिल्कुल मन नहीं कर राहा है।"
"नाश्ता? नहीं किया ना? पता था मुझे। ये लो इडली.. डायजेशनको अच्छा। शामको आना घरपे.. ठीक है? "
काय बोलावे तेच सुचत नव्हते. अजुनही सुचत नाहीये.

- वेदश्री