सोमवार, १२ जानेवारी, २००९

सहज आठवलं म्हणून...

"मौम, मैं जरा फटाकसे जाके ये डॉक्युमेंटसकी फोटोकॉपी करके आती हूं। मिनव्हाईल अगर प्रसाद मुझे ढुंढता है तो उसे बोल देना की ऑफिसका झेरॉक्समशीन ठीक करवाए। इंकमटॅक्स सबमिशनके लिये वो फायनान्सवाले सिरपे बैठे है और ये नामाकुल मशीनभी अभी बंद पडना था। उसे बोल देना.. ठीक है? "
मौमिता माझी प्रोजेक्टमधली खासंखास दोस्त. दोघी एकमेकींना विश्वासात घेऊन मदत करत पुढे जाणाऱ्या. प्रसाद माझा पीएल !
"ठीक है। लेकीन तू जल्दी आ। हमेशा देर होती है खाना खानेको तेरीवजहसे.. "
"हां हां.. " करत मी हापिसातून बाहेर सटकले आणि पळत जाऊन सीप्झच्या बाहेर असलेल्या झेरॉक्सच्या दुकानासमोर असलेल्या गर्दीत मिसळले.
"भैया, ये डॉक्युमेंटस जल्दीसे फोटोकॉपी करके दो। २ सेट बनाना। ठीक है? "
"मॅडम, १५ मिनिट थांबावे लागेल. " दुकानदार मराठीत सुरू झाला.
"१५ मिनिट???!!!! मौम जीव खाईल माझा.. तसेही तिला नॉनव्हेजच लागते जेवायला. प्लिज.. जरा पटकन करा ना हो.. "
मी अगदीच आटापिटा करतेय म्हणता तो माझ्याकडे पाहून हसायला लागला. तेवढ्यात त्याचे लक्ष माझ्या कंपनीच्या मंगळसूत्राकडे गेले. ( मंगळसूत्र म्हणजे लग्नवाले नाही.. नोकरीवाले ! कोणी कुत्र्याच्या गळ्यातला पट्टा म्हणतात तर कोणी मंगळसूत्र.. असो. ) त्याने लगेच एक दुसरे मंगळसूत्र ( जे आमच्याच कंपनीतल्या कोणाचेतरी दिसत होते ) काढले आणि विचारले, "तुम्ही यांना ओळखता का? "
मी हातात घेऊन पाहिले तर काय आश्चर्य.. ते मुफिजचे मंगळसूत्र होते. मुफिजनेच मला या नोकरीच्या मुलाखतीला बोलावले होते आणि मग तिथून ऑफर लेटर देण्याचे सत्कार्य करण्यापर्यंत तीच होती माझ्याशी वाटाघाटींमध्ये. एकदम जिंदादील आणि त्यामुळेच माझी दोस्त झालेली.
"हो.. अगदीच छान ओळखते की पण हे तुमच्याकडे कसे काय आले? "
"त्या माणसाने आणून दिले. त्याला सीप्झ गेटबाहेर मिळाले म्हणाला. त्याला आत जायची परवानगी नसल्याने त्याने माझ्याकडे आणून दिले."
दुकानदाराने बोट दाखवले तिकडे पाहिले तर एक अगदी खंगलेला, म्हातारपणाकडे झुकलेला अगदीच गरीब माणूस दिसला. आम्हा दोघांचे बोलणे ऐकून तो माझ्याकडे आला. माझ्या पोटात धस्स झाले. सामान्यपणे अशी मौलिक ( मौलिकच म्हणायला हवी की... नवीन मंगळसूत्र घ्यायचे म्हणजे खूप झोलदार, लांबलचक काम आणि महागडेही ) वस्तू परत देताना देणाऱ्याच्या आर्थिक अपेक्षा चांगल्याच भारी असतात. त्यात आणिक तो माणूस असा फाटका म्हटला म्हणजे....
"म्याडम.. " इतकेच म्हणून त्याने माझ्यासमोर हात जोडले.
सीप्झच्या गेटबाहेरील दृश्य कोणाला बघून माहिती असेल तर माझी स्थिती किती चमत्कारीक झाली असेल याची तुम्ही कल्पना करू शकाल. सगळे लोकं आम्हां दोघांकडे बघायला लागले होते. असं कोणी उगाचच मला सेंटर ऑफ ऍट्रॅक्शन असल्यासारखं केलं की मला अगदी अवघडल्यासारखं होऊन जातं. एकदम गायब होऊ शकलो तर किती बरे होईल असे वाटते. माझ्याकडे फक्त फोटोकॉपीला लागतील इतकेच पैसे होते पण तरीही मुफिजचे मंगळसूत्र म्हणजे...
"हे बघा, हात वगैरे काही जोडू नका. हात खरेतर मी जोडायला हवेत तुम्ही केलेल्या या चांगल्या कामाबद्दल." एक आवंढा गिळून मी, "किती पैसे हवे तुम्हाला?"
ते होते त्याहून जास्त व्यथित दिसायला लागले.
"माफ करा पण असे कोणाचे स्वाईप कार्ड हरवण्याचा आणि ते परत देणाऱ्याला बक्षिसी देऊ करण्याचा माझा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे मला मार्केट रेट माहिती नाही. तुम्ही जितके सांगाल तितके देईन मी. " हुश्श.. एव्हाना लोकांच्या नजरांनी मला अगदी दडपल्यागत झालं होतं. माझे फोटोकॉपीचे कागदही माझ्या हातात आले होते. दुकानदाराचे पैसेही देऊन झाले होते.
"म्याडम, मुझे आपसे पैसे नहीं चाहिये। मुझे अगर दिला सकते हो तो बस्स एक नौकरी दिला दो। मेरे बच्चे भुखे नहीं देखे जाते अब मुझसे। कोईभी काम करूंगा मैं। मुझे बस्स नौकरी दिला दो। "
ओह नो ! मी खूपच खजील झाले. मी किती चुकीचं समजले होते त्यांना. आता या मागणीला मी काय करू? कोणाला रेफर करणे किंवा कोणाकडून स्वतःला रेफर करवून घेणे हे तसे माझ्या तत्त्वात बसत नाही, त्यामुळे मी ते कधीच करत नाही. आता हा पेच कसा सोडवावा. तो माणूस तसे म्हटले तर काहीच अवाजवी मागत नव्हता मला. का माहिती नाही पण कोरडी तत्त्वे बाजुला ठेवून या माणसाला मदत करायचे मनाने घेतले.
"आपका नाम क्या है? " तो माणूस हिंदी आहे कळताच माझा गाडा परत हिंदीकडे.
"जी, शिवप्रसाद। सब लोग मुझे शिवा बुलाते है।"
"अच्छा शिवाजी, आप क्या क्या काम कर सकते है? " असं रस्त्यावर उभं राहून असे प्रश्न विचारायचे म्हणजे जरा अवघडच वाटत होते पण इलाज नव्हता. अनाहूतपणे शिवाचा शिवाजी केल्याबद्दल बोलून गेल्यावर विचारात पडणाऱ्या मला मौज वाटली.
"साफसफाईका काम कर सकता हूं। या फिर हापिसमे अगर दूसरा कुछ काम है तो वो भी मैं जल्दी सीख जाउंगा। मुझे बस्स महिने की २-३हजार तनखा मिले ऐसा काम चाहिए।"
पोटात कालवलं माझ्या. मी इथे ३०%च्या स्लॅबमधून १०%च्या स्लॅबमध्ये यायला निव्वळ फोटोकॉपीमध्ये ५० रुपये उडवले होते आणि हा माणूस २-३हजारात त्याचं अख्खं कुटुंब महिनाभर चालवायला मिळाले तरी खूप झाले म्हणत होता ! लाज वाटली माझीच मला.
"अच्छा. आप चिंता मत करो। मैं देखती हू की आपको जल्दीही नौकरी मिल जाए। लेकीन आपका पुरा नाम, पता और फोन नंबर मुझे दीजिए।" काय बोलावे ते खरेतर सुचत नव्हतेच मला पण तरीही..
"म्याडम, मेरा नाम शिवप्रसाद है। पता ऐसे तो कुछ नहीं है अभीतक और फोन भी नहीं है।"
हे राम ! आता काय करणार मी?
"लेकीन फिर आपको कैसे काँटॅक्ट करेंगे? मेरा मतलब है आपको बुलाना हो तो.."
"जी.. आप इस दुकानपे मेरेलिए बुलावा रख दिजिएगा। वो मुझे बता देगा।"
!!!!!!!
"जी। ठीक है। मैं देखती हूं मैं क्या कर सकती हूं।" असे म्हणून मी गेटकडे वळायला लागले. तेवढ्यात तो माणूस चक्क माझ्या पाया पडला.
"जरूर दिलवाइएगा नौकरी, म्याडमजी।"
आता मात्र हद्द झाली होती. सगळे लोकं माझ्याकडे पाहून हसत होते.
"आप ऐसे मत किजिए प्लिज। मैने बोला ना मैं देखती हूं.. " असे म्हणून मी ऑफिसकडे धूम ठोकली.

~~~

"हॅलो.. "
"हॅलो मुफिज, तू तर साफ विसरलीस ना मला?"
"नाही रे वेदा, असं होऊ शकते का? पण मी तुला नंतर फोन करते कारण आत्ता मी जरा टेन्शनमध्ये आहे. ओके?"
"नाही. मला तुला आत्ताच भेटायचं आहे. एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी."
"अब्बे मेरा स्वाईप कार्ड गुम हो गया है !!! तू अभी मेरा दिमाग मत खा.. प्लिज।"
"तू जास्त खिटपिट करू नकोस. मी इथे रिसेप्शनच्या तिथे आहे.. तू लगेच ये."
ती मुकाट्याने आली आणि माझे सरप्राईज म्हणजे तिचे स्वाईप कार्ड असेल याची सुतराम शक्यता तिला वाटलेली नसल्याने तसे ते असल्याचे कळल्यावर हरखून गेली ती एकदम.
"थँक्स, वेदा. यू आर ब्युटीफूल ! " तिची ही नेहमीचीच पद्धत थँक्स म्हणण्याची.
"ब्युटीफूल-फ्युटीफूल राहू दे बाजुला पण तुझ्या या मंगळसूत्राच्या बदल्यात मी एक प्रॉमिस करून आले आहे ते परत देणाराला. ते पूर्ण करण्यात तुला माझी मदत करता येईल का सांग. " खरेतर मी फक्त एक पोस्टमन होते एकूण व्यवहारात पण का कोण जाणे आता मला माझी जबाबदारी त्याहून अधिक वाटायला लागली होती.
"बोल ना.. काय प्रॉमिस केले आहेस?"
"नोकरी मिळवून देईन म्हणून ! "
"हॅ ! इतकेच ना? किती वर्षाचा एक्स्पिरियन्स आहे? बीई आहे की एमसीए की बिएस्सी? रिझ्युमे फॉर्वर्ड कर आणि काम झालं समज. तू आजवर एकालाही सजेस्ट केलेले नाहीस, त्यामुळे हे करायला मला खूपच आनंद होईल."
"मुफी, ही इज नॉट लिटरेट. "
"हाय दैया !!! मग कशी काय देणार नोकरी? तू पण ना वेडीच आहेस.. पैसे द्यायचेस आणि काम तमाम करायचेस मग. उगीच प्रॉमिसबिमिस करत बसतेस.. "
"मला तुझे उत्तर मिळाले, मुफी. थँक्स." असे म्हणून मी उतरल्या चेहऱ्याने वळायला लागले.
"अब्बे रुक तो। अशी काय जातेस मध्येच निघून? तो क्लिनिंगचे काम करू शकेल का? क्लिनिंग स्टाफमध्ये? "
माझा चेहरा उजळला. "हो. चालेल. "
"ह्म्म.. क्लिनिंग स्टाफची जबाबदारी आपल्याकडे नाही. ती एका एजन्सीकडे आहे. मला त्या माणसाचे डिटेल्स दे, मी पाठवते त्या एजन्सीवाल्यांना. बघुया काय करता येतं ते. ओके? "
मी माझ्या एका फोटोकॉपीतला एक कागद फाडून त्यावर शिवप्रसाद असे लिहून केअर ऑफ म्हणून झेऱोक्सवाल्याचा पत्ता आणि फोन नंबर लिहून तिला दिला. ते पाहून ती माझ्याकडे पाहतच राहिली.
"मुफी, तू हे करू शकत नसशील तर तसे सांग क्लिअरकट.. मी दुसरीकडे काही व्यवस्था होते का पाहीन. बाय हुक ऑर कुक हे मला करायचेच आहे."
"तू कशाला मध्ये पडतेयस? माझ्या स्वाईपकार्डसाठीचं रिपेमेंट मीच करायला हवेय. आय विल गेट इट डन. डोंट यू वरी. "
"थॅंक्स, मुफी ! यू आर रिअली ब्यूटीफुल.. " आम्ही दोघी एकमेकींकडे पाहून हसलो. त्या हसण्यातला अर्थ इतर कोणालाही समजता येणार नव्हता. तेवढ्यात मौमचा ५व्यांदा फोन आला. तिने आता माझीही ऑर्डर देऊन ठेवली होती आणि डायरेक्ट कँटीनमध्ये पधारायचा हुकुम जारी केला होता.

~~~

"वेदू, तूने ऐसी क्या जादूकी छडी घुमाई है की तेरे डेस्ककी सफाईके लिए एक स्पेशल बंदा आने लगा है? "
मौमचा हा प्रश्न ऐकून मी बुचकळ्यात पडले. वाशीहून येत असल्याने बस नेहमीच उशिरा आणायची माझी मला हापिसापर्यंत त्यामुळे हा शोध मला लागणे शक्यच नव्हते.
"स्पेशल बंदा? "
"हां.. क्या तो शिवा नाम बताया उसने. "
मौमच्या या उत्तराने मला इत्तका आनंद झाला की मी अगदी चेकाळून गेले. आता सगळे जगच माझ्यासाठी ब्यूटीफुल झाल्यासारखे वाटले मला. हापिसातल्या कोणालाच मी कधी एसेमेस पाठवत नाही पण त्यादिवशी मात्र आवर्जून पाठवला मुफीला..
हम सोचते थे की सिर्फ हम मानते है आपको
लेकीन आपको माननेवालोंका काफिला निकला
दिलने कहा की शिकायत कर खुदासे
मगर वोभी आपको माननेवालोमेसे निकला !

~~~

कधीकधी आपली शुष्क तत्त्वे बाजुला ठेवून काही करण्यातूनदेखील आयुष्य जगण्यातली खरी मजा चाखायला मिळते म्हणतात.. ते असेच काही असावे का?

- वेदश्री