सोमवार, २६ ऑक्टोबर, २००९

लाडकी लेक

"अहो, ऐकलंत का? फीचे पैसे कधी मिळणार तुमचे? तुमच्या लाडक्या लेकीला एकही धडका ड्रेस नाही.. तो घ्यायचाय आणि जरा भाजीही आणायची होती."
"आली होती पण खर्च झाली. आईला एमटी केलेत पैसे."
"खर्च झाली???!!! आईंना आत्ता गेल्याच महिन्यात तर एमटी केलेलीत ना तुम्ही मग आता परत?"
"भाऊला लागत होते हातऊसने.."
"बास्स.. त्यांच्या उधळपट्टीला ठिगळे लावायला पैसे आहेत पण पोरांना कपडे घ्यायला नाहीत पैसे.. इतक्या दिवसांनी आलेली ती मेली फी, तीही टाकलीत देऊन आणि परत म्हणा मीच कर्कशा म्हणून.."
"माझ्याकडे नाहीयेत आत्ता अजिबात पैसे. कडधान्यं कर काही दिवस."
"बाबा, आईला का त्रास देता तुम्ही? पैसे असताना नाहीत असे सांगू नये."
माझ्या या मध्येच बोलण्याने दोघेही चमकले. बाबांचा पारा भलताच वर गेला..
"काय गं कार्टे, काय बडबडतेस? खोटं काय बोललो मी? पैसे नाहीचेत माझ्याकडे..बघ हवे तर खिशात.."
"आहेत! खिशात नाहीत पण आहेत.."
"कुठे आहेत गं बबडे पैसे?" आई.
"त्या जड पुस्तकात! थांबा मी काढून दाखवते.." असं म्हणून मी खुर्ची आणून त्यावर चढले. हात उंच करून अवकळा करकरून ते पुस्तक कसेबसे काढले.. त्या पुस्तकाचे वजन माझ्या लहान हातांना खूपच जास्त होते! पुस्तक उलटे धरून पानं फर्रर्र करताच एक १०ची नोट खाली पडली!
"आहे की नाही पैसे?!" माझा विजयीमुद्रेने प्रश्न.
"का हो? अजुन कुठेकुठे लपवून ठेवलेत तुम्ही पैसे?"
"अगं मला खरंच माहिती नाही ती नोट त्या पुस्तकात कशी काय गेली ते. वाचतावाचता पान लक्षात ठेवण्यासाठी म्हणून ठेवली असेल वाचनाच्या धुंदीत एखादवेळी. चला.. तुझ्या भाजीची तर सोय झाली. आता बबडीच्या ड्रेसचे बघू काय ते नंतर.."
"मला ड्रेस नको.. आहे मला ड्रेस.."
बाबांच्या गालाला लगेच खळी पडली. "बघ.. लेक लाडकी का आहे कळले का? ती म्हणतेय आहेत तिच्याकडे ड्रेस मग तू का मागे लागली आहेस माझ्या कधीची?"
"किती आणि कसे आहेत विचारा ना तुम्हीच.."
"??"
"शाळेचा गणवेश आहे की चांगला. बस्स झाला तेवढा मला."

शनिवार, २४ ऑक्टोबर, २००९

आठवण हंसाची...

काळजात (जनरल पब्लिक याला कॉलेज म्हणते!) असताना 'अर्न अँड लर्न' करत असल्याने काळजातल्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचा जरा कमीच चान्स मिळायचा पण तरीही वेळ काढून शेवटच्या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमातल्या अंताक्षरी खेळात भाग घेतला होता. प्रोफेसर विरुद्ध विद्यार्थी असा सामना होता. खेळतखेळत मी अंतिम फेरी गाठली आणि त्यात सामना टाय झाला. खुद्द काळजाचे प्रिन्सिपलच होते विरुद्ध! टायब्रेकर फेरी होती.. आर या पार.. एक शब्द देणार होते जो आपण म्हणायच्या असलेल्या गाण्याच्या पहिल्या दोन ओळीत येणे अपेक्षित होते. काळजातली (कॉलेज या अर्थाने नाही हो!) धडधड वाढली होती...

धडधड आणिक वाढवणारी नको ती भलामण लावून देत शेवटी एकदाचा शब्द ऐकू आला 'हंस'! मी आणि सर जवळपास एकाचवेळी सुरू झालो आमच्या गाण्यांनी.. त्यांचे होते 'दो हंसोका जोडा बिछड गयो रे..' तर माझे होते 'ओ हंसनी, कहा उड चली..'! दिलखेचक शब्दांमुळे की गाण्याच्या तालामुळे किंवा काय माहिती नाही पण सर्वांनी माझेच गाणे उचलून धरले आणि अख्खा हॉल अगदी सरांसकट तेच गाणे म्हणायला लागला. धुंद करणारा अनुभव होता अगदी! स्पर्धेच्या पंचांचा निकाल अर्थातच माझ्याविरुद्ध गेला कारण माझ्या गाण्यात 'हंस' नाही तर 'हंसनी' आली होती!!!

मंचावरून खाली उतरून पुढचे कार्यक्रम बघण्यासाठी प्रेक्षकांमध्ये जाऊन बसायला निघालो तेव्हा सरांनी कौतुकाने म्हटले,"इतकावेळ खेळताना एकही चूक केली नाहीस, मग आता शेवटच्या क्षणीच कशी काय चुकलीस तू?"
रंगेहाथ पकडणाराच प्रश्न होता तो.. गोरीमोरी होऊन मी फक्त 'जीवनतालमें भटक रहा रे मेरा हंसा' इतकेच हलक्याने गायले. सर खळखळून हसतच होते कितीतरी वेळ मग काहीवेळाने म्हणाले,"न जाणो मलाही या पोरीने युनिव्हर्सिटीतून बार केले तर.. या कल्पनेने घाबरला असणार तो तुला म्हणून बसला असेल भटकत..!" आता दिलखुलास हसण्याची वेळ माझ्यावर आली होती.

मायेसाठी काहीही!

अगदी आईबाबांसारखीच माया करणार्‍या मॅथ्यूंच्या घरात घुसले की माझी अखंड टकळी सुरू होऊन जाते आजकाल. रोज धावतपळत का होईना पण किमान एक चक्कर तरी मारायचीच ५-१० मिनिटाचीतरी असा अलिखित नियमच झालाय माझा. माझी त्यांना आणि त्यांची मला खूपच सवय झाली आहे आता. त्यांना त्यांच्या तब्ब्येतीच्या असंख्य प्रश्नांमुळे घराबाहेर पडता येत नाही आणि मला कामानिमित्त हापिसात जावे लागत असल्याने घरात रहायला वेळ मिळत नाही. असे असल्यानेच की काय.. त्यांची बाहेरची कामे मी करायची आणि माझी घरातली काही कामे करण्यात त्यांनी मला मदत करायची, हे अगदी न सांगता आपोआपच जमून आले आहे. अशीच एकदा गावाहून परत आल्यावर त्यांच्या घरी गेले तेव्हा..
"काका, काकू कुठेय? हे बघा.. मी काय आणलेय? रव्याच्या वड्या, भडंग.." मी माझ्याच बोलण्यात गुंग होते आणि नजरेने काकूंना शोधत होते. बाहेरच्या खोलीत दिसल्या नाही तर स्वैपाकखोलीत पाहिले. तिथे त्या खुर्ची घेऊन बसल्या होत्या आणि ओट्यावर मान टाकून निपचित पडल्या होत्या. मी हादरलेच एकदम.
"आंटी, क्या हुआ? अंकल, आंटी देखो.. अंकल.." मी बोलावले तर काका आले. ते म्हणाले की तिला बरे वाटत नाहीये. अचानक पाऊस पडून बरीच थंडी पडल्याने तिला खूप त्रास होतोय.
काकांना स्वयंपाकातल्या जुजबी गोष्टी जरी काकूंनी आता शिकवल्या असल्या तरी एखादा जिन्नस बनवणे त्यांना जमणे शक्य नव्हते.
"आंटी, आपकी तबियत इतनी खराब है तो आप यहा किचनमे क्या कर रही हो? जाओ, आराम करो आप. मैं बनाती हूं आप दोनोंके लिये खाना.."
"नो माय चाईल्ड, रहने दो. तुम्हे नहीं आएगा."
"त्यात काय आहे न येण्यासारखं? साखर अजिबात वापरायची नाही. मसाला, तिखट, मीठ वगैरे सगळं अगदी हात राखून टाकायचं.. बस्स. एवढं येईल की मलाही जमवता.. जा तुम्ही.. मी करते."
काकांच्या मदतीनी काकूंना उठवून दिवाणावर झोपवून किचनमध्ये आले परत. पोळीभाजी बनवायची असा डोक्यात विचार काहिसा पक्का होत होता तेवढ्यात काकूंनी करून ठेवलेली थोडीशी तयारी पाहिली आणि लक्षात आले की मला त्यातले काहीच येत नाही.. कारण तयारी सगळी अंड्याच्या कुठल्याशा पदार्थाची होती! आता आली का पंचाईत.. माझ्याबरोबर परत किचनमध्ये आलेल्या काकांना माझ्या चेहर्‍यावरचे सटास्सट बदललेले भाव काही न बोलताच कळले."
"आंटीने बोला था ना.. तुम्हे नहीं जमेगा!"
माझ्या मनातला कल्लोळ काहीच न बोलता समोरच्याला कळला की मला भारी राग येतो माझ्या अपरोक्ष माझ्याच चेहर्‍यावर प्रदर्शन मांडणार्‍या माझ्या भावनांचा.. पण ते असो. काका म्हणत होते ते खरंच होतं. आता काय करायचं?
"मुझे आता नहीं तो क्या बात है? कुछ प्रॉब्लेम नहीं.. मैं आंटीको पुछके सीख लुंगी तो बना सकुंगी. सीखनेका मैने अगर एकबार ठान लिया ना तो बस्स.. "
"लेकीन तुमको तो चलता नहीं ना.. फिर तुम कैसे बनाओगी?"
"अरे अंकल, मुझे ये अंडावंडा पसंद नहीं, लेकीन वो बुरी चीज थोडी ना है| और वैसेभी.. मुझे सिर्फ पकाना तो है.. खाना थोडी है!"
काकूंना विचारुन मी भुर्जी बनवली.. कशी झाली ते सांगता येणार नाही कारण चव बघता आली नाही मला! त्या दोघांनीही चांगली झाली असल्याची पावती मात्र दिली.

मग किमान सकाळचा स्वयंपाक मी त्यांना करून द्यायला लागले.. संध्याकाळी करायची इच्छा असली तरी ऑफिस असल्याने काही जमत नव्हते. दोनेक दिवसात हवेतला गारवा कमी झाला तर काकूंची तब्येत सुधारली आणि त्या परत नव्या दमाने रोजच्या कामाला लागल्या.

रविवारी दुपारी काकूंकडे गप्पा मारायला गेले होते तेव्हा गप्पा मारतामारता त्यांच्या डोक्याला तेलमालिश करून देत होते. त्या नकोनको म्हणत असतानाही मला हौस असल्याने मी करते म्हणून हट्ट केल्याने त्या तयार झाल्या होत्या. काय माहिती काय झाले.. त्यांना एकदम गहिवरूनच आले.
"तुम इतना क्यौं जान लगाता है हमको?" म्हणाल्या.
"मैने कहां लगाई जान? वो तो आपहीने लगाई है| याद है? मुझे जबरदस्त अ‍ॅसिडीटी हुई थी तो मैं आपके घरमे आके सोफेपे सो गई थी. तब मुझे वोमिटींग हुआ तो आपने मेरे पीठपर प्यारसे हाथ फेरा था.. ऐसा प्यारा हाथ आजतक मेरी जिंदगीमे सिर्फ मेरी आईने फेरा है| आपनेभी इतना प्यारा हाथ पीठपर रख्खा, तो फिर आप मेरी कौन हुई? मेरे अम्माअप्पा के लिये कुछ किया तो उसमे क्या खास बात है?"