मंगळवार, १४ जुलै, २००९

अन्नपूर्णा ते विद्यापूर्णा

डावा पाय प्लॅस्टरमध्ये असूनही या नोकरीत नविनच लागलेली असल्याने सुरूवातीचे ट्रेनिंग बुडायला नको म्हणून मी पायावरची सूज थोडीशी उतरली आहे असे लक्षात येता लगेचच ऑफिसात जाऊन बसले होते. नुकत्याच झालेल्या कंपनीच्या मालक दोघा भावांच्या विकोपाच्या भांडणामुळे जिथे त्यातल्या एका भावाचे ऑफिसमधले केबिनच फोडले गेले होते तिथे दुसऱ्या भावाच्या ताब्यातल्या जागेत आमची एक वर्ष कंपनीतर्फे रहायची सोय अचानक रद्द झाली होती त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हतेच. महिनाखेरीपर्यंतची मुदत दिलेली होती दुसऱ्या जागी बोचकं घेऊन जायला. रहायची जागा शोधणे भाग होते त्यामुळे तेही एक कारण होतेच ऑफिसमध्ये येण्याचे. ऑफिसमध्ये अजून जास्त कोणाशी ओळख झाली नव्हती कारण मला नुकतेच प्रोजेक्ट अलोकेट झाले होते जेव्हा माझा तो नतद्रष्ट अपघात झाला पण तरीही एकदोघांशी जुजबी ओळख झाली होती. या अपघाताला पण काही अक्कल नाही.. काळ वेळ काही न बघता येतो मेला.. असेच काहीबाही मी विचार करत होते नेमके तेव्हाच "हाऊ आर यू फिलिंग नाऊ, वेदस्री? " असा अनोळखी आवाजातला प्रश्न आला.

मी मान वळवून पाहिले तर एक उंचापुरा, गोरा, हसऱ्या चेहऱ्याचा दाक्षिणात्य उभा होता.

"याऽऽह.. नाऊ आय ऍम फाईन, सर. एव्हरीथिंग हॅपंड सो सडनली, आय कुड नॉट इव्हन ब्लिंक अँड इट वॉज ओव्हर ऑल्मोस्ट. आय ऍम न्यू हिअर अँड हेन्स द पॅनिक वॉज मोअर.. बट थँक गॉड.. माय रूममेटस अँड नेबर्स आर जेम्स हू हेल्प्ड मी अ लॉट. बाय गॉडस ग्रेस, आय ऍम गेटींग फाईन नाऊ. " मी हसले.

"यू नीड एनी हेल्प? "
"आय नीड टू फाईंड पेईंग गेस्ट ऑर हॉस्टेल फॅसिलिटी अँड आय ऍम न्यू हिअर.. "
"नेव्हर माईंड. मणी विल हेल्प यू आऊट इन दॅट. मणीऽऽ"
"थँक यू, सर."
इतकं बोलून तर गेले मी पण बोलल्यावर लक्षात आलं की ही व्यक्ती कोण हेही आपल्याला माहिती नाही आणि आपण इतकं काय पुराण सांगत बसलो वेड्यासारखं? त्या व्यक्तीला काय वाटलं असेल? कोण असेल ही व्यक्ती? वगैरे. पश्चातबुद्धी म्हणतात ते हेच असावे बहुतेक. दाक्षिणात्य लोकांचा अत्यंत उत्तम अनुभव माझ्या गाठीशी असल्याने मला तशा नव्या व्यक्तीबद्दलही मनमोकळेपणा वाटणे साहजिक आहे म्हणा पण ते असो.

"दॅटस व्हेरी गुड टू हिअर. लेट मी नो इफ यू नीड एनी हेल्प.. आय वील गेट इट अरेंज्ड. नेव्हर फील दॅट यू डोंट हॅव एनी रिलेटीव्हज हिअर. " असं म्हणून हलकेसे स्मित करून ती व्यक्ती वळली आणि जायला लागली.

कंपनीत लागल्यापासून या माणसाला मी कधी पाहिले नाही की आधी काही बोलणे नाही आणि अचानक हा माणूस येतो काय आणि अगदी आस्थेने चौकशी करून जातो काय? मला तब्बल दोन मिनिटे लागली या सुखद धक्क्यातून बाहेर पडायला. धक्क्यातून बाहेर पडल्यावर मात्र त्या ५-६ पावले चालून गेलेल्या व्यक्तीला, "आय डोंट थिंक आय नो यू सर. कॅन आय नो युअर नेम प्लिज? " असा प्रश्न विचारला.

ती व्यक्ती वळली. चेहऱ्यावर आश्चर्य अगदी साफ झळकत होते.. जणू काही मी प्रत्यक्ष अनिल अंबानीलाच असा प्रश्न विचारला की काय असे वाटावे असे! मी चपापले.

" माय नेम इज भास्कर. " हसतहसत त्यांनी उत्तर दिले आणि त्यांच्या रस्त्याने ते निघून गेले. आता डोक्यातली बत्ती पेटली. मी अपघात झाल्यानंतर ऑफिसला येऊ शकत नसल्याबद्दल फोन केला होता तेव्हा माझा बॉस महिन्याच्या सुट्टीवर गेलेला असल्याने मला यांना फोन करायला सांगितला गेला होता! माझ्या पूर्ण डिपार्टमेंटचे हेड होते ते!!!

~~~~

मणीकंदन माझा प्रोजेक्टमधला कलिग. त्याने नुकतेच कुठल्याशा परीक्षेच्या निमित्ताने मुंबईला आलेल्या त्याच्या बहिणीसाठी राहण्याची सोय केली होती त्यामुळे त्याच्याकडे मुलींच्या राहण्याची व्यवस्थित सोय होऊ शकेल अशा ठिकाणांची यादीच होती. माझी गरज समजून घेतल्यावर त्याने मला सांगितले की तू अन्नपूर्णामध्ये जा रहायला. खर्च परवडण्यासारखा आहे, चांगल्या मुलींना कसलाही त्रास नाही आणि लोकं खूप चांगले आहेत. त्याच्या बहिणीची सोय बहुदा त्याने तिथेच केली होती शेवटी. मणीने सांगितल्या दिवशीच मी अन्नपूर्णा महिला मंडळाच्या हॉस्टेलमध्ये चौकशी केली. रूम बघून आले. ऐसपैस घरात रहायची पहिल्यापासून सवय असल्याने एका छोट्याशा रूममध्ये तिघींनी रहायचं म्हणजे.. पण अडला हरी म्हणून १००० रुपये डिपॉझिट आणि १५०० रुपये (रहाणे-जेवणे मिळून) भाड्याची रक्कम भरून १ तारखेपासून पहिल्या मजल्यावरच्या पहिल्या रूममधली एक जागा बुक केली. माझ्यासोबत रहायला होती ज्युलिएट नावाची मुलगी आणि त्या खोलीतली अजून एक जागा रिकामी होती.

~~~~

तेव्हापासून जवळपास अडीच वर्षं राहिले मी अन्नपूर्णामध्ये. तिथे सर्वचजणं मला जशी काही मी परग्रहावरून आलेली असल्यासारखे वागवायचे. तिथे जवळपास सर्वचजणी डोमेस्टीक कॉल सेंटरमधल्या. पगार ६५०० आणि वर्षाहून जास्त अनुभव असल्यास ७५०० रुपये. पीएफ वगैरे कटींग जाऊन हातात पडणार ६ ते ७ हजार. त्यात भाड्याचे, ऑफिसला जाण्यायेण्याचे, इतर कामचलाऊ खर्च करून घरी ठराविक रक्कम पाठवताना होणारी त्यांची बेजारी. त्यांच्यामते मी सॉफ्टवेअर क्षेत्रात, तेही इतक्या चांगल्या पगाराची नोकरी करत असताना असं इथे गरिबासारखे रहायला नको होते. मी त्यांना सुरूवातीला उत्तर दिले की माझ्या माणूसवेडेपणाला साजेसे वातावरण इथेच आहे त्यामुळे मला इथे आवडते पण नंतरनंतर तरीही त्यांचे म्हणणे त्या सोडत नाहीत म्हटल्यावर मी त्या प्रश्नांकडे लक्ष देणेच बंद करून टाकले. त्यांनीही मग मला स्विकारून त्यांच्यातलीच एक गणायला सुरूवात केली. ऑफिसमधून रूमवर आले की एकतर अभ्यास, फोनवर आईबाबांशी गप्पा, कुठले पुस्तक वाचणे वगैरे असल्याच गोष्टी माझ्या चालू असायच्या. नोकरीनिमित्ताने बाहेरच्या जगात पडल्यावर मी बऱ्याच अंशी घरकोंबडी झाले त्याचा हा परिणाम पण आधी त्यांना वाटायचे की मी त्यांच्याहून श्रीमंत म्हणून गर्विष्ठपणा करते. हळूहळू जेव्हा त्यांना खरी गोष्ट माहिती पडली तेव्हा मग कोणी कुठेही निघाले की हटकून माझ्या मागे लागून मला सोबत घेऊन जाणार असे चालू झाले. घरकोंबडेपणा पुरता गेला असे जरी नसले तरी मी त्यांच्याबरोबर जायला जास्त काचकुच करत नसे. तिथे मिळालेल्या विविधरंगी मैत्रिणींचे आयुष्य पाहता त्या अडीच वर्षात किती उदंड शिकले त्याला काही मर्यादाच नाही. मुलगी असूनही स्वतःच्या गावापासून दूर, तेही केवळ ६-७ हजारासाठी? या प्रश्नांची जी उत्तरं मिळाली ती तर हादरवून टाकणारी होती. तरीही त्यांच्या चेहऱ्यावर बहुतकरून आनंदच असायचा.. कधी कोणाला काही प्रश्न असलाच तर सर्व मिळून समजूत घालून, मदत करून पुढे जायचो.

रहायला गेले तेव्हा केवळ एक हॉस्टेलची सोय होतेय म्हणून जरी गेले असले तरी हळूहळू लक्षात आले की हे हॉस्टेल हा मुख्य उप्तन्नाचा भाग नसून त्यांचे जाणारे जेवणाचे डबे हे त्यांचे मुख्य उत्पन्न आहे. समाजातील पिडीत महिलांना एकत्र करून सुरू झालेली ही संस्था. हे कळल्यावर तिथे काम करणाऱ्या बायका, त्यांचे प्रश्न ह्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. कोणाच्या नवऱ्याला रानात लाकूड तोडायला गेला असताना साप चावला होता, तर कोणाच्या नवऱ्याने हिचा कंटाळा आला म्हणून दुसरा घरोबा केला होता. कोणाला घरी मारझोड होती म्हणून त्या पळून आल्या होत्या तर कोणी अपंग झाली म्हणून टाकून दिली गेली होती. त्यांची छोटीमोठी मुलं घेऊन दिवसरात्र त्या अन्नपूर्णात खपताना दिसायच्या.

ऑफिसमधून यायला एकदा अकरा-साडेअकरा होऊन गेले रात्रीचे. एरव्ही जेवणासाठी त्राण उरत नाही इतक्या रात्री पण त्यादिवशी मात्र पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. अख्खी रात्र न जेवता काढणे शक्य दिसत नव्हते. स्वयंपाकखोलीत जाऊन मंजुताईंना हाक मारली. सकाळी साडेचारला उठून दिवसभर कामाचा पिट्टा पडलेला असूनही आपण त्यांना असं निर्दयपणे उठवतोय याचे वाईट वाटत होते पण मंजुताईने मात्र अजिबात खळखळ न करता जेवण वाढून दिले. माझे होईतो ती बसून होती तिथेच. तुम्ही झोपा आता. मी ठेवेन सगळं नीट जागी सांगूनही गेल्या नाही. मी त्यांना थकवा न येण्यामागचे कारण विचारले तर त्या म्हणाल्या, "५ वर्षाची होते जेव्हा लग्न करून सासरी आणलं. आत्याने करून घेतलं होतं मला आईवडील लहानपणीच वारले म्हणून. सकाळी साडेचारला आत्याबाई पाठीत लाथ घालून उठवायच्या आणि घरकामाला लावायच्या. तेव्हापासून सवय लागली साडेचारला उठायची ती या जन्मात जाईलसे वाटत नाही. आता पाठीत लाथ बसत नाही.. कोणीतरी विनंती करून बोलवतंय हेच काय कमी आहे का?" क्षणात माझे "ऑफिसात कामाचा डोंगर उपसून" आल्याचे विचार निघून गेले.

हळूहळू मला तिथे काम करणाऱ्या बायकांबद्दल आपलेपणा वाटायला लागला. तिथे सगळ्याच चांगल्या होत्या असे नाही. परिस्थितीने काही ठिकाणी नकारात्मक बडगाही दाखवला होताच पण ते असो. लहान मुले हा माझा तसाही आवडता प्रांत असल्याने मी त्या बायकांच्या मुलांना रविवारच्या दिवशी शिकवायला सुरूवात केली. कधी गोष्टी, कधी गाणी, कधी हॉस्टेलच्या चुटुकल्या अंगणात कुठले रोप लाव, कधी काय तर कधी काय. माझे पाहून मग बाकीच्याही काही मैत्रिणींनी त्यांना सुट्टी असेल त्या दिवशी (त्यांची रोस्टरनुसार दर आठवड्याची सुट्टी आदल्या आठवड्यात ठरवली जायची. ) जसे जमेल तसे त्या मुलांसोबत खेळ खेळणे सुरू केले.

एके दिवशी नोटीसबोर्डवर नोटीस लागली होती की प्रेमाताईंचा वाढदिवस आहे म्हणून एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी हॉलमध्ये सकाळी जमायचेय. गेल्यावर समजले की याच प्रेमाताईंनी (खरेतर आजीच्या वयाच्या आहेत त्या पण नावच प्रेमाताई पडलेय त्यांचे.. ) या अन्नपूर्णा संस्थेची स्थापना केली होती. त्यांना एक गुलाबाचे फुल आणि शाल वगैरे दिली गेली. कुठलाही बडेजाव न होता अत्यंत साधा कार्यक्रम झाला. प्रेमाताईंना दोन शब्द बोलण्याची विनंती झाली आणि त्यांनी बोलायला सुरूवात केली. गोवा मुक्तीसंग्रामाच्या त्यांनी प्रत्यक्ष जगलेल्या गोष्टींचे अनुभव त्यांच्या तोंडून ऐकायला अत्यंत भारावून गेल्यासारखे झाले होते. त्या छोट्या मुलीने घातलेले ते पुरूषी कपडे, सरकारी कार्यालयांवर केलेली अखंड पाळत, उडवलेले बंदुकीचे बार वगैरे गोष्टी कुठे पुस्तकात वाचणे निराळे आणि समोर सुती साडी नेसलेल्या आजीच्या वयाच्या एका स्त्रीने तिच्या गतायुष्यात हे सर्व केलेले आहे, हे पचवणे निराळे. इतका लढा देऊन स्वातंत्र्य तर मिळवलं पण पुढे काय पडलं पदरात? लोकांच्या समस्या आजही आहेतच.. असे चित्र दिसता तोच लढा पुढे चालू ठेवायचे असे ठरवल्याचे त्या म्हणाल्या. गरीब, पिडीत, असहाय्य महिलांना रोजगार मिळावा म्हणून अन्नपूर्णा संस्था त्यांनी सुरू केली. असेच अजूनही बरेच प्रकल्प केलेत बहुतेक त्यांनी. भाषण संपले. त्यांचे त्या दिवशी बरेच कार्यक्रम होते त्यामुळे त्या निघून गेल्या. मग मी त्यांच्याबद्दल विचारायला सुरूवात केली. त्या कुठे असतात रहायला वगैरे तर माझ्यावर बाँबगोळा पडला की त्या अन्नपूर्णातच राहतात!!! इतक्या दिवसांचे आपण इथे राहतोय, पण आपल्याला कधीच कशा दिसल्या नाहीत अशा कोड्यात मी असताना कोणी सांगितले की त्यांची तब्ब्येत आताशा ठीक असत नाही त्यामुळे त्या त्यांच्या एका खोलीत पडून असतात. त्यांचा तो मुक्तीसंग्राम, या संस्थांमागचं ग्राउंडवर्क वगैरे गोष्टी मी काहीच खोदून पहायला गेले नाही. त्या भाषणात जे त्यांचे शब्द ऐकले तेच इतके प्रेरणादायी होते की बस्स. आजही कानात घुमतात ते. आपणही असेच काहीतरी करायचे असे काहिसे त्याचवेळी मनात आले होते. त्या दिवशीपासून गप्पा मारायला आणखी एक हक्काचं माणूस मिळालं होतं.

~~~~

"मेधाताई, मला पुण्याला नोकरी मिळतेय आणखी चांगल्या पगाराची. आपली तिकडेपण सोय आहे का हॉस्टेलची? "
"पुण्याला नाही हॉस्टेल आपले. डब्यांची सोय आहे. तुम्हा पोरींची प्रगती पाहून खूप कौतुक वाटते. आता पुण्याला जाणार का मग? कधी जाणारेस? "
"हो. म्हणते तर आहे पुण्याला जायचं. अजून काही नक्की नाही पण. इथून पाय निघत नाहीये. "
"पाय न निघायला काय झालं? पोरीला माहेरीच ठेवून घेणार का काय आम्ही कायमचे? पंख लागले की उडणारच असतात पाखरं.."
कंठ भरून आला होता.
"ताई, आले तेव्हा वाटलं नव्हतं इतकं मन गुंतेल असं. अडला हरी... तत्त्वाने सामान तर आणलं इकडे पण आज इथलीच होऊन गेलेय. इतक्या चांगल्या हेतूसाठी काम करणाऱ्या संस्थेत रहायला मिळालं हे माझं भाग्यच म्हणायला हवं मी."

हिशोब पूर्ण न करताच मी माझे सामान पुण्याला हलवले. ताईंचा मग फोन आला होता की डिपॉझिटच्या १५०० रुपयाचा (मध्ये ५०० रुपयाने डिपॉझिट वाढवले होते, जे आधीपासून राहणाऱ्यांसाठीही वाढवले गेले होते.)चेक काढून ठेवते, येऊन घेऊन जा. तिथे काम करणाऱ्या बायकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरून टाका ते पैसे असे मी त्यांना सांगितले. त्यांनीच मग मला त्यांच्या पुण्यातल्या विद्यापूर्णा प्रकल्पाची माहिती दिली. मी आनंदाने होकार दिला.. विद्यापूर्णा स्वतः न बघताच. स्वतः बघायची गरजच वाटली नाही कारण तितका माझा मेधाताईंवर विश्वास बसला होता त्या अडीच वर्षात.

~~~~~

विद्यापूर्णाची बाजप्ता पावती जरी माझ्या घरच्या पत्त्यावर २-३ महिन्यात पोहोचली असली तरी मी तिकडे काही विशेष लक्ष दिलेच नव्हते. बाबांना एकूणात हा प्रकार तितकासा मान्य नसल्याने घरी आलेला या बाबतीतला पत्रव्यवहार मला काही मुद्दामहून कळवला जात नव्हता. बाबा कुठे गावाला गेलेले असले आणि तेव्हा आईच्या हातात पत्र पडले तर ती मात्र मला कळवायची. मी दिलेले पैसे हर्षद नावाच्या मुलाच्या शिक्षणाकरता वापरले गेले असून मी त्याची शैक्षणिक पालक झाल्याने त्याची शैक्षणिक प्रगती ( सहामाही आणि वार्षिक ) मला कळवण्यात येत होती. शिवाय पालकसभांची बोलवणी होती, ती वेगळीच. पुण्यात घर झालं म्हणता मी त्यांच्याकडे पुण्याचा पत्ता दिला आणि आता मला सर्व पत्रव्यवहार मिळतो. या वर्षीही मदत करण्याबद्दल त्यांचे पत्र आले तेव्हा कामाच्या धबाडग्यात मला जायला जमणार नव्हते तर मी तिथल्या ताईंनाच माझ्या ऑफिसमध्ये बोलवून घेतले. एका विद्यार्थ्याला वर्षाला १५०० रुपयाची मदत करतो असे तिने सांगितले. बाकीचा खर्च त्यांच्या आया आणि आम्ही मिळून करतो असे ती म्हणाली. हर्षदची आई धुणीभांडी करून घर चालवते आणि त्यात हर्षदच्या शाळेचा (नववीला आहे तो आता) खर्च थोडा आवाक्याबाहेरचा ठरतो सांगत होती. याही वर्षी तुम्ही मदत केली तर तिला मदत होईल, शिवाय हर्षद दुसऱ्या श्रेणीत पास झालाय मागच्या वर्षी. घरची-बाहेरची कामं करून अभ्यास करायचा म्हणता अगदीच काही वाईट नाही म्हणता येणार त्याची प्रगती. तिचे म्हणणे मला अगदी पटत होते. जमली तितकी मदत तर केली आहे.. बघुया आता हर्षदसोबत आणिक कोणाचे शैक्षणिक पालकत्व मला बहाल होते ते.

- वेदश्री.

~~~~

डॉ. मेधा पुरव - सामंत ( प्रेमाताईंची मुलगी ) या प्रमुख विश्वस्त म्हणून काम पाहतात अन्नपूर्णाचे.

विद्यापूर्णा हा प्रकल्प अन्नपूर्णाद्वारेच चालवला जातो त्यामुळे त्याचा वेगळा असा पत्ता नाही. विद्यापूर्णाचे काम पुण्यातल्या शाखेत बघितले जाते. अन्नपूर्णा ही संस्था ८०जी अंतर्गत नोंदली गेलेली आहे.

नवी मुंबई -
अन्नपूर्णा महिला मंडळ
प्लॉट नं. १८, सेक्टर नं. १९,
कोपरी गाव, वाशी.
नवी मुंबई - ४००७०५.
फोन - ०२२ - २७६६४४५९

पुणे -
अन्नपूर्णा महिला मंडळ
प्लॉट नं. १९, अखिल हिंगणे होम कॉलनी,
मिलेनिअम शाळेजवळ, कर्वेनगर,
पुणे - ४११०५२.
फोन - ०२० - २५४४७७९१, २५४५०११, २५४५८४६१
इमेल - ammmys@pn2.vsnl.net.in

रविवार, १२ जुलै, २००९

वेच्यावरून पुस्तक शोधायचेय - ठाण तशी वृत्ती

पुर्वी पुस्तक विकत घेण्याची चैन परवडण्यासारखी नसल्याने आवडलेले वेचे परतपरत वाचायला मी ते माझ्या एका डायरीत लिहून ठेवायला सुरूवात केली होती. उपक्रम चांगला असला तरी लहान वयात सुरू केलेला असल्याने आवश्यक तितका विचार नाही करून ठेवू शकले आणि त्यामुळेच की काय आज माझ्याकडे उत्तमोत्तम वेचे तर आहेत पण ते कुठल्या पुस्तकातले, कोणी लिहिलेले आहेत ही महत्त्वाची माहिती गायब असल्याने आज मी इच्छा आणि पैसे दोन्ही असूनही ती विकत घेऊ शकत नाहीये. शक्य असल्यास मला मदत करू शकाल का वेचे कुठल्या पुस्तकातले आहेत हे शोधून काढायला? इथे एक वेचा देतेय माझ्या डायरीतला...

वेचा -

खाण तशी माती त्याचप्रमाणे ठाण तशी वृत्ती बनते!
उघड्या दरवाज्याच्या मातीच्या घरात राहणाऱ्या माणसांना आपण मातीच्या घरात राहतो आहे हे पदोपदी जाणवत असतं. आपली घरं कच्ची आहेत, मोठा पाऊस आला की ती वाहून जातील आणि मग आपल्याला निवाऱ्याची, मदतीची गरज लागेल याची त्यांना क्षणोक्षणी जाणीव असते! त्यामुळे उतायची - मातायची त्यांच्या मनाची हिंमतच होत नाही. एकमेकांला आधार दिला तरच तग धरू हे दगडामातीच्या घरात राहणारे ओळखून असतात. 'एकमेकां साह्य करू' या सुपंथाचे ते सहजीव वारकरी होतात!

काँक्रीटच्या प्लॅटमध्ये बंद दरवाजाआड राहणाऱ्यांना भ्रम निर्माण होतो. आपण सुरक्षित आहोत, आपण आपल्या परिवाराभोवती आयुर्विम्याचे कवच उभारलं आहे. हे कवच कोणी भेदू शकणार नाही, असा भलता विश्वास त्यांच्या मनात ठिय्या मांडून बसतो. दुःखाच्या प्रसंगी अश्रू पुसण्यासाठी व आनंदाच्या क्षणी मिठी घालण्यासाठी खरेखुरे हात लागतात. आयुर्विम्याच्या जाहिरातीतील जोडलेले हात उपयोगाला येत नाहीत याची त्यांना जाणीव नसते! घंटा वाजली तरच पीपहोलमधून किंवा व्हूफाईंडरमधून कोण आहे ते पाहून दरवाजा उघडायची शिस्त त्यांनी लावून घेतलेली असते. त्यामुळं आपण फक्त सुखाला आत घेऊ व दुःखाला उंबरठ्याच्या हद्दीवर रोखू या खुळ्या कल्पनेत फ्लॅटवाले मश्गुल असतात. 'एकला चालो रे' हा त्यांचा सुखाचा मूलमंत्र असतो.

म्हणे भूकंपात मातीची घरे पडतात आणि सलोह काँक्रीटचे फ्लॅट जगतात! पण मातीची कनवाळू घरं नाहीशी होत चालली आहेत आणि त्या जागी बिनहृदयाचे कॉंक्रीटचे फ्लॅट पाय रोवून खडे होत आहे ही वस्तुस्थिती भूकंपाहून धक्कादायक नाही काय?

- वेदश्री