शुक्रवार, १२ डिसेंबर, २००८

अस्सा रुमाल सुरेख बाई..

साहित्य : उरलेली/एकदा वापरून झालेली लोकर ( एकाच रंगाची असायला हवी असे नाही. थोड्याथोड्या उरलेल्या अनेक लोकरींचे छोटे छोटे गुंडेदेखील वापरू शकतो ), क्रोशाची सुई आणि कपडे शिवून झाल्यावर उरणारे कापड, झिगझॅग प्रकारे कापणारी कात्री.

कृती :

१ली ओळ : ४३ साखळ्या. वळवणे. ( रुमाल कितपत आकाराचा हवा त्याप्रमाणे साखळ्या कमीजास्त कराव्यात. )
२री ओळ : चौथ्या साखळीवर आणि त्यापुढील प्रत्येक साखळीवर एक खांब असे विणत शेवटपर्यंत विणावे. तीन साखळ्या वळवणे.
३री ओळ : दुसऱ्या खांबावर एक खांब. * एक साखळी. खालील एक खांब सोडून पुढील खांबावर एक खांब. * *-* मधले शेवटपर्यंत विणावे. ३ साखळ्या वळवणे.

चौरसाकृती रुमाल विणून होईतो ३ऱ्या ओळीबरहुकुम विणत जावे. आता जाळीदार रुमाल तयार होईल.

कपडे शिवून झाल्यावर उरणाऱ्या कापडाचे झिगझॅग प्रकारे कापणाऱ्या कात्रीने २० सेमी बाय ५ सेमी मापाचे तुकडे कापून घ्यावेत. ( झिगझॅग प्रकारे कापणाऱ्या कात्रीने कापल्यावर कापडाचे धागे निघत नाहीत. ) योग्य रंगसंगती साधत असे दोनदोन तुकडे एकेका जाळीतून घालून गाठी मारत जावे. सगळ्या जाळ्यांमधून अशाप्रकारे गाठकाम केल्यावर एक झकास रुमाल तयार होईल.

कापडाच्या तुकड्यांऐवजी लोकरीचेच तुकडे करून त्याच्या देखील गाठी मारू शकतो. अर्थात ही लोकर वरून दिसणार असल्याने चांगल्या प्रतीची आणि योग्य त्या प्रमाणात उपलब्ध असावी लागेल हे तर आलेच.

उपयोग : असा रुमाल फराळाचे पदार्थ शेजारच्या घरी नेऊन देताना ताट तात्पुरते झाकण्यासाठी, टेलिफोनचे कव्हर म्हणून, छोट्या टीपॉयचे कव्हर म्हणून वापरता येऊ शकतो.

- वेदश्री.