शुक्रवार, १२ सप्टेंबर, २००८

असाही विमा !

मनोगतींच्या ठाणे येथे आनंदात, उत्साहात पार पडलेल्या कट्ट्यात काय झालं हे तर बरेच जणं सांगतीलच, पण कट्ट्यानंतर मला काय अनुभवायला मिळालं हे मला सांगावंसं वाटत आहे.

सर्वांचा निरोप घेऊन मी ठाण्याच्या स्टेशनला पोहोचले. तिकिट काढून मला हव्या त्या फलाटापर्यंत पोहोचेपर्यंत माझी लोकल मला वाकुल्या दाखवत माझ्या समोर निघून गेली. अखंड-प्रवास नशिबात नाही आज, असं काहीसं पुटपुटत खंड-प्रवासासाठी कुर्ल्याच्या फलाटाकडे गेले. फाष्ट लोकल पकडून कुर्ल्याला आले आणि मग तिथून माझ्या ठिकाणी नेऊन पोहोचवेल अशी लोकल पकडली. वटवटा स्वभाव गप्प कुठे बसायला? नेहमीप्रमाणे स्त्रियांसाठी राखीव असलेल्या डब्यात शिरल्याने माझ्याजवळ एक मध्यमवयीन बाई उभ्या होत्या. होताहोता गप्पा सुरू झाल्या, ज्यातून कळलं की त्या बऱ्याचदा ये-जा करतात लोकलने. मी मध्येच म्हटलं,"लोकलचीही तिकिटं किती महाग झाली आहेत आताशा ! नेहमी ये-जा करावं लागतं माझ्या एका मैत्रिणीला तर आम्ही परवा पासच काढून घेतला. खूप पैसे वाचतात त्याने."
माझ्या या वक्तव्यावर त्यांनी माझ्याकडे एक कारुण्यमय कटाक्ष टाकला ! त्यांच्या त्या नजरेचा मला काहीच अर्थ उमगेना. माझा चेहरा गोंधळलेला.
"पासला किती पैसे घेतले त्यांनी?" पुर्वीच्या काळी मुनिम लोकं उलट तपासणी घ्यायचे हिशेबाची, त्या खाक्याने त्यांनी मला विचारलं.
"१५० रुपये." प्रश्नाचा रोख लक्षात न येताही मी उत्तर दिलं.
"वेड्या आहात तुम्ही मुली !" या त्यांच्या वाक्यावर मी उडालेच ( लाक्षणिक अर्थाने ! ).
"का हो? असं का म्हणता?" माझ्या या बोलण्याने मी माझ्या वेडेपणावर शिक्कामोर्तबच केलं असल्यासारखं त्या माझ्याकडे बघायला लागल्या.
"फक्त ५० रुपयात काम झालं असतं तुमचं, तिथे तुम्ही १५० रुपये घातलेत." आता माझ्या डोक्यात थोडीशी ट्यूब पेटली, पण अजूनही ती पुकपुकतच होती.
"बघू मला तुमचा पास?" माझा प्रश्न.
"पासची काही गरज नाही !"
"काऽऽय? तुम्ही तिकिट काढलेलं नाही आणि पासही काढलेला नाही?" टीसीने पकडलं तर काय, या प्रश्नाने माझीच सट्टीपट्टी गुल झालेली.
"नाही. मी लोकलच्या प्रवासाचा विमा उतरवला आहे !"
'हे काय गौडबंगाल आहे विम्याचं?' असं विचारणं अगदी माझ्या ओठाशी आलेलं पण तोवर आम्हां दोघींचं अपेक्षित स्टेशन आलेलं असल्याने बोलणं बंद करून आम्ही उतरलो.
"अच्छा, भेटू परत." असं म्हणून त्या निघाल्या आणि डोक्यात सुरू झालेलं विचारचक्र घेऊन मीही माझ्या रस्त्याने निघाले. तेवढ्यात मला टीसीचा आवाज आला,"तिकिट दाखवा."
"नाही आहे." शब्दांचा आवाज ओळखीचा वाटला. मी वळून बघितलं तर त्याच माझ्यासोबत ज्या होत्या त्या बाई तिथे होत्या. त्यांच्या बोलण्याने सुरू झालेल्या माझ्या विचारचक्राचं काय उत्तर मिळत असेल तर ते कळावं या हेतूने मी दोन मिनिट थांबले त्या बाई काय उत्तर देतात ते ऐकायला. त्यांचं उत्तर होतं,"XXXX हमालाला दिलाय मी या महिन्याचा हप्ता !"

- वेदश्री.