सोमवार, १२ मे, २००८

बदल

मेघन् ला काका भेटायला आले तेव्हा ते एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये जेवायला गेले. मेघन् तिथले हायफंडू एटीकेट्स पाळता पाळता मेटाकुटीला येत होती तर काका मात्र हाताने मनसोक्त जेवत होते. इतरांनी थोडावेळ काकांकडे चमत्कारीक नजरेने बघितलं पण मग प्रत्येकजण स्वतःच्या पोटपूजेत परत मग्न झाला. पण जेव्हा जेवण झाल्यावर काकांनी ताटात हात धुवून आचमन घ्यावं त्या आविर्भावात ते पाणी पिऊन टाकलं तेव्हा मात्र सर्वांच्या नजरांमध्ये एक कुत्सित भाव तरळल्याचा आभास मेघन् ला झाला. तिने काकांना नम्रपणे याबद्दल विचारता ते म्हणाले,"बेटा, लाखोकरोडो पैसे कमावले तरी आपण त्यामुळे मातायला नको, हेच शिकवण्यासाठी या सवयी लावलेल्या असतात. आणि त्या अशा ठिकाणी न पाळण्यामागे काही खास प्रयोजन मलातरी दिसत नाही. हॉटेल असो, महाल असो किंवा झोपडी, जंगल असो.. माझ्या या चांगल्या सवयी मी का म्हणून सोडायच्या?"
"तसं नाही हो काका. पण तुम्ही ताटात काही टाकलं नाही की झालं ना. ते धुवून असं पाणी पिण्याची ती काय जरूर?"
"एकेक कणासाठी जे झगडतात आणि त्या परिस्थितीतून जे वर येतात त्यांना सर्व अन्न संपवून स्वच्छ ताटातही अन्नाचे सूक्ष्म कण चिकटलेले असतात याची जाणीव असते बाळा. ते वाया जाऊ नयेत आणि अन्नाचा तितका सूक्ष्मसुद्धा अपमान माझ्या हातून घडू नये म्हणूनच काय ते असं वागणं.."
काकांचे हे विचार ऐकून कुत्सित्पणे बघणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करून मेघन् नेही ताट धुवून ते पाणी पिऊन टाकले.

- वेदश्री