शुक्रवार, २५ एप्रिल, २००८

आश्रमानुभव

वृद्धाश्रमांमध्ये जाऊन तिथल्या आजीआजोबांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे, व्यसनमुक्त होऊ इच्छिणाऱ्यांना मदत करणे किंवा कुठल्या रक्तदान शिबिरात भाग घेणे तर कधी पोलिओ लसीकरणाच्या कार्यक्रमात भाग घेणे असे माझे उद्योग हेच काय ते माझे सो कॉल्ड समाजकार्य होते. या सगळ्या उचापतींनी बाकी काही नाही तरी चांगल्या गोष्टी करण्यासाठी इतरांना बऱ्यापैकी उद्युक्त करू शकते असा विश्वास मला स्वतःवर वाटायला लागला होता. एक वेगळा वयोगट हाताळायला मिळाला तर छान होईल असं वाटलं आणि नेमकं तेव्हाच आमच्या कंपनीतर्फे अशी एक संधी मिळाली जी मी सोडली नाही. ती संधी होती - एड्सने पिडीत अथवा ग्रस्त मुलांच्या अनाथाश्रमातल्या मुलांसोबत ( वय वर्षे ३ ते १६ ) खेळण्याची, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्याची - त्यांची ताई बनण्याची. लहान मुले हा माझा अत्यंत आवडता प्रांत आहे आणि त्यामुळे या संधीत अपेक्षित काम काही खास अवघड जाईलसं वाटलं नाही. त्यातून काही शिकायला मिळेल का? याहीबद्दल साशंकता होती. दर महिन्याला एकच शनिवार जायला परवानगी मिळणार होती. त्यात जे काही अनुभव आले ते सांगावेसे वाटत आहेत म्हणून हा लेखनप्रपंच...

पहिली भेट :

त्या आश्रमामध्ये जाण्याची पहिलीच वेळ होती, त्यामुळे तिथल्या व्यवस्थापकीय लोकांशी जुजबी ओळख/गप्पा केल्या आणि आवश्यक गोष्टींची पूर्तता करून परवानगी मिळताच मी तिथल्या मुलांमध्ये गेले. काही मुलं मी त्यांच्यात जाताच माझ्याभोवती जमा झाली आणि 'ताई.. ताई..' करून माझं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करायला लागली. काही क्षणातच अखंड बडबड, प्रश्नांचा पाऊस, एकापाठोपाठ एक खेळांचा सपाटा.. असा एकंदर धमाल कार्यक्रम चालू होता आम्हा सर्वांचा. सर्वांचा?? खरंच? नाही. तिथल्या मुलांपैकी काही मुले माझ्याशी बोलायला अजिबात तयार नव्हती. कसलासा राग होता त्यांचा माझ्यावर की काय ते कळायलाही काही मार्ग नव्हता. या माझ्याशी भांडण असल्यासारखं वागणाऱ्या मुलांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करायचा असं मी ठरवलं आणि यात ज्यांनी मला आपसुकच त्यांची ताई मानलं होतं त्यांची मदत होणार होती. त्यांच्याशी खेळताना मीही त्यांच्यातलीच एक आहे हे त्यांना वाटेलसे वागण्याकडे माझा कल होता, जेणेकरून त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल. मी त्यांच्याशी खेळताना मुद्दामहून चुका करत होते, ज्या माझ्या लक्षात आणून देण्यात त्यांना मजा येत होती. मीही तोंड वेडवाकडं करत, "बऽऽरंऽ ! माझं चुकलं.. बस्स?" म्हणून चुका मान्य करत होते आणि त्या पुढे होणार नाहीत याची खबरदारी (!!) घ्यायचा प्रयत्न करतेयसं दाखवत होते.

दोरीच्या उड्यांचे नवीन प्रकार शिकवताना, ते प्रकार मी स्वतः खेळून जमाना झालेला असल्याने माझी दोरी सारखीसारखी पायात अडकत होती. दोरी अडकली की लगेच त्यांचा ओरडा सुरू व्हायचा,"ताई आऊट ताई आऊट" आणि मी एवढंसं तोंड करून बाजूला व्हायचे. त्यांच्या ताईला आऊट झालेलं पाहण्यात त्यांना जबरदस्त आनंद होत होता आणि त्यांना आनंदी बघणे हेच केवळ मला हवे होते. जे दोरीच्या उड्यांचे प्रकार ( कैची, रिंगण वगैरे ) मला स्वतःला आता जमेनासे झाले आहेत ( मी पुनश्च श्रीगणेशा करतेय ते शिकण्यासाठी.. बघुया ! ) ते प्रकार त्यांना शिकवता आले आणि ते त्यांना आता अगदी सहजगत्या खेळताही येतायत हे पाहून मला कोण आनंद झाला हे शब्दात सांगणेच शक्य नाही !

तसाच काहिसा प्रकार क्रोशाच्या विणकामाचा झाला. काही मुली मोबाईलचे कव्हर्स वगैरे विणत होत्या तर मी त्यांच्या विणण्यातल्या चुका लक्षात आणून दिल्या आणि बरोबर कसं विणायचं तेही सांगितलं. मला विणता येतं हे बाकीच्या मुलींना कळल्याने मग त्या माझाकडे आल्या आणि "ताई, मलाही शिकव" म्हणाल्या. तिथल्या मोठ्या ताईंना क्रोशाच्या सुया आणि लोकरीबद्दल विचारलं तर त्यांनी मला ज्या सुया आणि लोकर आणून दिली ती बघूनच मला कसंतरी झालं. तरीही त्या मुलींचा उत्साह पाहून मी त्याच साहित्यात त्यांना खांब-साखळ्या शिकवायला सुरूवात केली. या शिकण्याशिकवण्याला थोडासा वेळ झाला असेलनसेल एक मुलगी माझ्याजवळ येउन बसली आणि म्हणाली,"दीदी, मुझेभी सिखना है बुनाई करना।" तिच्या हातातली सुई-लोकर घेऊन तिलाही साखळी कशी घालायची ते समजवून सांगितलं. तिचा चेहरा तरीही संभ्रमितच दिसत होता. मग मी तिचा हात हातात घेऊन कसं विणायचं ते समजवून सांगितलं आणि 'कळलं का?' विचारलं तर कसनुसं 'हो' म्हणाली आणि जसं सांगितलं तसं विणायचा प्रयत्न करायला लागली. नवीन कुठलीही गोष्ट शिकायला वेळ लागतोच असं मनातल्या मनात म्हणून मी बाकीच्या मुलींचे विणण्यातले प्रश्न सोडवायला लागले. थोड्यावेळाने बघते तर ही मुलगी चमत्कारिकच विणत होती.. ज्या हातात सुई धरायला पाहिजे त्या हातात तिने लोकर धरली होती आणि ज्या हातात लोकर धरायला हवी त्या हातात सुई धरलेली ! बरोबर कसं धरायचं आणि विणायचं ते तिला समजवावं असं माझ्या डोक्यात आलेलं पण अचानक एक प्रश्न विचारला गेला,"तुम बाये हाथसे काम करती हो क्या?". आधीच नाराज दिसत होती ती आणि त्यात माझ्या या प्रश्नाने भर पाडल्यासारखं वाटलं. तिच्या शेजारी बसलेली एक सहजपणे विणणारी मुलगी म्हणाली,"तोच तर प्रॉब्लेम आहे ताई तिचा. कित्तीवेळा शिकवलं तिला पण ती अशीच उलटं करून ठेवते म्हणून तिला कोणी शिकवायलाच जात नाही आता." मला एकदम पोटातून ढवळल्यासारखं झालं. मी स्वतः डावखुरी आहे पण मला डाव्या हाताने विणायला जमत नाही, या गोष्टीचं आयुष्यात पहिल्यांदा वैषम्य वाटलं मला. इतर मुली विणताना अडकत होत्या तेव्हा त्यांना हाताला धरून बरोबर कसं विणायचं ते मी शिकवू शकले पण हिच्या बाबतीत ते मला जमणार नव्हतं. "देखो, मैं तुम्हे हाथ पकडके तो नहीं सिखा सकती, लेकीन तुम जहां गलती करोगी वहा बता सकती हूं। चलो, शुरू करते है।" डावखुरी आहे कळूनही मी तिला शिकवू इच्छिते ही गोष्ट तिला आवडली होती आणि म्हणूनच की काय तिचा चेहरा थोडासा खुलला होता. निघायची वेळ होईतो ती बऱ्यापैकी चांगलं विणायला लागली होती आणि मूळ म्हणजे आपणही विणू शकतो हा आत्मविश्वास तिला आला होता, यातच सगळं कमावलं असं मला वाटलं.

दुसरी भेट -

यावेळी मला ज्या मुलांनी आधी रागारोसाने वागवलं होतं, त्यांनीही हसतखेळत प्रतिसाद दिला. सगळ्याजणांची चिवचिव चालली होती माझ्याभोवती. कोणाला त्यांच्या शाळेतल्या गमती सांगायच्या होत्या तर कोणाला दोरीच्या उड्या खेळून दाखवायच्या होत्या. कोणाला विणलेले मोबाईल कव्हर्स दाखवायचे होते तर कोणाला येत्या आठवड्यातला त्यांचा होणार असलेला नाच करून दाखवायचा होता. माझ्याकडून काहींना नवीन गोष्टी शिकायच्या होत्या त्यामुळे त्यांनी मला 'टीचर' म्हणायला सुरूवात केली तर काही त्यांना सांगत होते की "वो टीचर नहीं, दीदी है !"

यावेळेस त्यांनी लोकरीचे वेगवेगळे प्रकार विणायला शिकले. रिचा आणि अनिलची परवानगी घेऊन मी त्यांच्यासाठी सुया आणि लोकर नेली होती. यावेळेस गंमत म्हणजे त्या मुलांना संभाळण्यासाठी असलेल्या त्यांच्या खरोखरीच्या टिचर्ससुद्धा विणकाम शिकायला बसल्या होत्या !

तिसरी भेट -

माझ्या बाबांची तब्ब्येत खूपच खालावलेली असल्याने त्यांना भेटायला मी घरी गेले होते. आश्रमाचा पहिला शनिवार चुकतोय हे लक्षात आलं होतं पण इलाज नव्हता. आश्रमाची परवानगी घेऊन मग मी चौथ्या शनिवारी गेले तिथे. ताई पहिल्या शनिवारी येणार म्हणून पोरं वाट बघत बसली होती कळताच मला गुन्हेगार वाटलं. काही मुलं पुढल्या आठवड्यात त्यांच्या शाळेच्या गावी जायची असल्याने त्यागोदर मला भेटायचं होतं त्यांना. मुलांमध्ये गेले तेव्हा कळलं की बाबांच्या आजारपणाबद्दल त्यांना आधीच कुठुनतरी कळलेलं होतं.. त्यामुळे लगेच प्रश्न सुरू झाले.. "दीदी, तुम्हारे पापाको क्या हुआ?" वगैरे.. बाबांची तब्ब्येत बरी झाली असली तरीही खूप काही बरी होती असं नव्हतं, त्यामुळे माझीच मानसिक अवस्था धड नव्हती. मलाही कदाचित आधार हवाच होता कोणाचातरी. मुलांमध्ये तो आधार शोधायला गेले असं म्हणून कदाचित मुर्खात काढेल मला कोणी पण तसं झालं खरं तेव्हा. मी गोष्ट सांगावी तसं त्यांना सांगत बसले की बाबांनी कसे हालाखीत दिवस काढले आणि कुटुंबाला इतकं सुंदर आयुष्य मिळवून दिलंय वगैरे.. त्यांची तब्ब्येत आता बरी राहत नाही म्हणून मी घरी गेले होते सांगितलं. बोलल्याने मला बरं वाटत होतं. मी काहिशी माझ्या भावविश्वातून बाहेर आले होते. मुलांना हे सगळं सांगायला नको होतं असं एकदम वाटून गेलं आणि मी बघितलं तर तीही त्यांच्या भावविश्वात गुंगलेली दिसली. बाहेरच्या जगातली माणसं नेहमी खोदूनखोदून त्यांच्या आयुष्याबद्दल विचारतात असं कळलं ( तुझ्या आईला एडस झालाय की वडलांना? असेही प्रश्न त्या चिमुकल्यांना विचारलेले ऐकून मी हादरलेच होते ! ) पण कोणी स्वतःच्या कुटुंबाबद्दल, त्यांच्या प्रश्नांबद्दल सांगत नव्हतं त्यांना. बाहेरची माणसं नेहमी त्यांच्याकडे मदतीच्या वस्तू फेकून देऊन चालू लागतात, त्यांच्याशी अंतर ठेवून वागतात असं कळलं. अजाणतेपणी का असेना पण मी हे अंतर पार करून त्यांच्यात जाऊन मिसळले होते, त्यांना माझी सुखदुःखं सांगत होते याचं त्यांना कुठेतरी समाधान मिळाल्यासारखं वाटलं. माझ्यावरचा विश्वास वाढल्यानेच की काय त्यांनी त्यांच्या आयुष्यातले 'खरे'प्रश्न मला सांगायला सुरूवात केली. शप्पथ ! त्या जगातली जबरदस्त भीषणता पहिल्यांदाच लक्षात आली माझ्या. मदत म्हणून देण्यात आलेल्या वस्तू प्रत्यक्ष त्या मुलांपर्यंत पोहोचतच नव्हत्या, तिथल्या काम करणाऱ्या बायका त्यांना दुखलंखुपलं तरी लक्ष द्यायच्या नाहीत वगैरे वगैरे.. हे सगळं ऐकून मला माझं दुःखं एकदम किस झाडकी पत्ती वाटायला लागलं. मी या विचारात गुंग असताना तिथे एक अंथरूणाला खिळलेला मुलगा मला म्हणाला,"तु.. तुम.. चिंता मत.. करो.. दीदी.. अंक..ल ज..ल्दीही.. ठी..क हो जा..एंगे". त्याचे हे शब्द ऐकून स्वतःच्याच रडण्याला रडत बसलेल्या माझ्या कोत्या मनाची लाज वाटली मला. त्याची शारिरीक अवस्था पाहून मला त्याच्याशी हातमिळवणी करावी असं धाडसच होत नव्हतं मला. मनात कुठेसं असा आखडता पवित्रा घेणं पटत नव्हतं. आजवर कधीही कुठलेही मूल मला ताई, मावशी, आत्या म्हटलंय आणि मी त्याच्याशी प्रेमाने वागले नाही असं झाल्याचं मला आठवत नाही. मग आजच असं का होतंय ते कळत नव्हतं पण चमत्कारिक शक्ती मागून ओढत असल्यासारखंही वाटत होतं ! मला साधा हात मिळवावासा वाटत नव्हता त्याच्याशी आणि तो मात्र मला इतक्या प्रामाणिक सदिच्छा देऊन मोकळा झाला होता !!! डोळ्यातले अश्रू गालावर कधी ओघळले माझं मलाच कळलं नाही. त्याला खूप त्रास होत होता आणि तो पलंग पंख्याखाली हलवायला सांगत होता. तो म्हणाला,"तुमने जो इन सबको सिखाया है, वो चीजे बेचने के लिये मैं दुकान निकालूंगा ! " जेव्हा मी त्याला म्हणाले की आपण तुझं हे दुकान नक्की काढुया तेव्हा त्याला अत्यंत आनंद झालेला दिसला पण का कोण जाणे मला मात्र माझं मन खात होतं कारण इतर कोणाला कळलं नसलं तरी मला कळत होतं की मी त्याच्यापासून जाणूनबुजून एक हात दूर राहत होते !

चौथी भेट -

आज मी मनाशी पक्कं केलं होतं की त्या आजारी मुलाशी खूप गप्पा मारायच्या. त्याचे प्रश्न, दुःखं समजून घेऊन त्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करायचा. त्याला विनोद सांगून हसवायचं, त्याला जे खायला आवडत असेल ते व्यवस्थापनाची परवानगी घेऊन त्याला आणून द्यायचं. मूळ म्हणजे मागल्यावेळी या माझ्या भावापासून उगाचच दूर रहायची केलेली चूक सुधारायची असा मी चंग बांधला आणि मगच तिथे गेले. आश्रमाच्या ऑफिसमध्ये गेल्यावर मी माझी इच्छा तिथल्या टिचरना बोलून दाखवली तर पहिल्यांदा तर त्यांना खूप आश्चर्य वाटलं की मला तो मुलगा कसा माहिती आणि मी त्याला कशी काय भेटू शकले वगैरे. सर्व कळल्यावर त्या म्हणाल्या,"तुझी इच्छा खूप चांगली आहे पण ती आता पूर्ण नाही होऊ शकणार." कारण विचारता कळलं की तो मुलगा १५ दिवसांपुर्वीच वारला होता ! आसपासच्या सगळ्या वस्तू माझ्या भोवती गोलगोल फिरतायत असं वाटलं मला. "दीदी, तुम चिंता मत करो.."शब्द माझ्या कानात घुमायला लागले. डोळ्यात पाणी आणि विषण्ण मन झाल्याने काही समजेनासंच झालं मला. त्या टीचरने समजुतीचे शब्द सांगितले आणि याबद्दल आपण काही करू शकत नाही म्हणाल्या. त्याच्या आजाराबद्दल मी काही करू शकणार नव्हते हे जरी सत्य असलं तरी किमान त्याने पुढे केलेला हात तर अव्हेरायचा नव्हता ना मी.. त्याला भेटून त्याची माफी मागायची होती पण आता सगळंच संपलं होतं. एका अजबशा पोकळीने मला घेरून टाकलं होतं आणि मी घरी जायला निघाले. कुठल्या तोंडाने मी मुलांसमोर जाऊ असं वाटलं मला. ऑफीसमधून बाहेर पडत नाही तर एक छोटा मुलगा माझ्याकडे येऊन म्हणाला,"ताई, आज आपण काय खेळायचं?" काय उत्तर देणार होते मी त्याला? त्या मुलांमधून वाट काढून घरी जाणे शक्यच नव्हते. त्या दिवशी मी खेळले (?!) तर सही त्या मुलांशी पण त्यात राम नव्हता हे माझं मला जाणवत होतं.

आजही तिथे जाते तेव्हा 'ताई.. ताई..' म्हणणारे असंख्य आवाज ऐकू येतात पण तरीही 'दीदी' म्हणणारा तो आवाज ऐकू यावा असं खूप मनापासून वाटतं ! ही टोचणी आता कधीही पूर्णपणे जाईलसे वाटत नाही पण त्याच्यासारख्याच इतर मुलांशी एका 'ताई'प्रमाणेच वागून ती कमी करता आली तरी मिळवले असे म्हणता येईल. बघुया कितपत जमतेय ते..

- वेदश्री.

प्रथमं वक्रतुंडंच...

माझी एकाग्रता (?!) म्हणजे एक न उकललेलं कोडं आहे माझ्यासाठी. कधीकधी काहीच न ठरवता हाती घेतलेल्या कामात पूर्ण एकरूप होऊन जाऊन अत्यंत झकासपणे हातावेगळं करून मोकळी होऊन जाते तर कधीकधी नाही तर नाहीच सूर जुळत. नक्की काय केल्याने मन एकाग्र होतं आणि काय केल्याने नाही, हे मी शोधायच्या कधीच फंदात पडले नाही हे मात्र अगदी खरं आहे.

हे असं सगळं असूनदेखील आज जेव्हा सकाळी वसतिगृहात बसवलेल्या गणपतीचे दर्शन घ्यायला गेले, तेव्हा एक झकास अनुभव आला. झालं काय की तिथे कर्ण्यावर मोठ्या आवाजात सुंदर भक्तीगीते लागली होती. नेहमीच्या सवयीने मी आत गेले, हात जोडले आणि डोळे मिटून भक्तीगीतांच्या बॅकग्राउंड म्युझिकमध्ये माझ्या सरधोपट चालीतलं गणपतीस्तोत्र म्हणायला सुरूवात केली. म्हणताम्हणता मी 'प्रथमं वक्रतुंडंच..' म्हणायला आणि कर्ण्यावरील गीत बदलून 'जशी चिकमोत्याची माळ होती गं तीस तोळ्याची गं..' गाणं सुरू व्हायला एकच गाठ पडली ! माझ्या तोंडी 'वक्रतुंडंच..'च्या पुढचा शब्दच यायला तयार नाही ! पटणार नाही तुम्हाला कदाचित पण अगदी निमिषार्धात मागच्या भूतकाळात भटकून परत आले. ते गाणं, त्याच्या शब्दलयीवर एका नर्तिकेनी केलेलं अतीव सुंदर नृत्य - जे दूरदर्शनवर दाखवलं गेलं होतं, तिच्या स्टेप्स बघून मी आणि श्रीने तसंच नाचायचा केलेला अयशस्वी प्रयत्न.. वगैरे वगैरे सगळ्या फुटकळ गोष्टी त्या निमिषार्धात माझ्या मनात तरळून गेल्या. माझं मन जेव्हा पुढच्याच निमिषार्धात परत स्तोत्रावर आलं तेव्हा 'वक्रतुंडंच'च्या पुढचा शब्द शोधायला मनाच्या कानाकोपऱ्यात जंग जंग पछाडलं पण नाही तर नाहीच मिळायला त्याला तो शब्द !
माझंच वस्ताद मन मलाच दूषणे द्यायला लागलं.
'काय हे? तुला साधं स्तोत्रही येईना? थू आहे तुझ्या जिंदगानीवर..'
भोळं मन भोळं असलं तरी असले आरोप सहन करून गप्प बसेल? शक्यच नाही..
'जरा गप्प बस. परत एकदा सुरूवात केली की आपोआप येईल तो शब्द माझ्या तोंडून बाहेर. असा नाही सापडायचा तो शब्द मला..'
'कराऽऽऽ पर्रऽऽत सुरुवात करा.. पण पडू दे जरा काही उजेड.. '
वस्ताद मनाची तानाशाही संपुष्टात आणायला मी, तसंच काहीशा बावरल्या मनाने मी कसेबसे एकेक शब्द उच्चारत परत स्तोत्र म्हणायला सुरूवात केली. चुकलं तर हे वस्ताद मन काय काय म्हणेल मला? या विचाराने धडधडत होतं माझं हृदय.. पुढचा शब्द आठवतो की नाही याची धास्ती सदोदित होती भोळ्या मनात.
'त्या शब्दाची जागा जवळजवळ येतेय.. आतातरी आठवला का? आठवला का?'
वस्ताद मनाच्या या हैराण करवणाऱ्या प्रश्नाच्या भडिमाराला गप्प करण्याच्या प्रयत्नात माझं भोळं मन गुंतलं आणि...... व्हायला नको तेच झालं ! माझी स्तोत्रगाडी 'वक्रतुंडंच..' पर्यंत येऊन परत अडकली !
वस्ताद मन जणु काही याचीच वाट बघत असल्यासारखं विकृतपणे हसायला लागलं. भोळ्या मनाच्या डोळ्यात (!!!) अश्रू तरळले. दोन मिनिट तशीच मी उभी दिग्मूढासारखी तिथे काय करावं ते कळतच नव्हतं.
'तू आणि मी वेगळे आहोत का? माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना अपयश मिळता तुला असा आनंद का होतो? हुरूप द्यायचा सोडून तू खच्चीकरण का करतोस माझं?' भोळं मन आक्रंदलं.
'अरे येड्या, तू मला चान्स दिलास रे दिलास की मला तुला सतावायला भारी आवडतं. आत्ता तूच बघ तुझं पूर्ण मन होतं का स्तोत्रात? असतं तर अडकायला झालंच नसतं.. तू अटकलास, मला चान्स मिळाला तुझ्यातून बाहेर निघून तुझ्यावर चिडवाहसायला, मी हसलो.. हे बघ असाऽऽ' असं म्हणून वस्ताद मन परत हसायला लागलं.
भोळं मन मनातल्या मनात म्हणालं,'वस्ताद जरी वस्ताद असला तरी म्हणण्यात काहीतरी मेख आहे. मला चॅलेंज देतोय का? आता ऐकच स्तोत्र..'
एकदम एक आगळीच झिलई चढली शब्दोच्चारांवर, एक आगळाच विश्वास वाटला भोळ्याला त्याच्या स्वतःवरच आणि एकेक शब्द पुढच्या शब्दाकरताच्या शोधाबद्दल पूर्ण बेफिकिर होऊन माझ्या तोंडून शब्द बाहेर पडायला लागले. अजूनही बॅकग्राउंडला 'चिक मोत्याची माळ..' होती आणि 'गणपती किती हासला...' ही होता ! म्हणतम्हणत मी 'वक्रतुंडंच..' पर्यंत आले आणि पुढचा 'एकदंतं..' कधी तोंडून ओघळला माझं मलाच कळलं नाही. एका वेगळ्याच आनंदपर्वात गेले होते मी.. भानावर आले तेव्हा नुसतं स्तोत्रच नाही तर अथर्वशीर्षही म्हणून झालेलं होतं !!!
भोळ्याला जब्बरी आनंद झाला.
'वस्ताद, कुठेयस तू? ऐकलंस का स्तोत्र?'
'येडू, मी तुझ्यातच आहे आता !'

आज इतकं धमाल वाटत आहे की बस्स !

- वेदश्री.

हरवलेलेसे काही

"पीहू.. अगं ए पीहू.." पेपर वाचतावाचता नीलने मारलेली ही तिसरी हाक ! काम सोडून काय म्हणतोय ते बघायला जावंच लागलं.
"काय रे काय झालं? काय आरडाओरडा लावला आहेस?"
नील अगदी उत्साहात म्हणाला,"अहो राणीसाहेब, तुमच्याच आवडीची गोष्ट आहे. गावात एका मोठ्या चित्रकाराच्या चित्रांचं प्रदर्शन लागलं आहे. चलणार का बघायला?"
"वाह ! का नाही? यात विचारायचं ते काय? आजच जाऊयात. अरे पण त्या चित्रकाराचं नाव तर समजू देत की मला.."
"समीर ठाकूर. बरं ए ऐक. आज संध्याकाळी मी लवकर येतो, तू तयार राहशील. काय?"
"समीर ठाकूर.. समीर... !" मी परत नाव उच्चारलेलं पाहून नील म्हणाला,"का गं काय झालं?"
"काही नाही.. नील, मी नाही येऊ शकणार आज. आत्ताच आठवलं की मला मिसेस शर्मांबरोबर शॉपिंग करायला जायचं आहे ते."
"ह्म्म.. ठीक आहे मग उद्या जाऊया."
घाईघाईने मी,"नाही.. माझ्या म्हणण्याचा अर्थ होता की तू का माझ्यासाठी कॅन्सल करतोस? तू जाऊन ये की.."
"जशी आपली आज्ञा राणीसाहेब. मी एकटाच जाऊन येईन."
नील ऑफीसला निघून जाताच मी पेपर उचलला.
"समीर ठाकूरचं चित्रप्रदर्शन.. समीर.. माझ्या समीर.. शेवटी तू माझं स्वप्न सत्य करून दाखवलंसच.." पेपरमधल्या त्या बातमीने माझं मन भूतकाळातल्या प्रसंगांमध्ये वावरायला लागलं.

तेव्हा मी एम.कॉम. च्या पहिल्या वर्षात होते. माझा सिनियर असलेला समीर ठाकूर - खूपच आकर्षक व्यक्तिमत्व, उंचेला आणि एकदम हसऱ्या स्वभावाचा. माझ्या वर्गातल्या इतर मुलींप्रमाणेच मलाही तो खूप आवडायचा पण तो मात्र कधीच आमच्याकडे लक्ष द्यायचा नाही. मला पक्कं आठवतं, तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये कला-स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. मी पांढऱ्या रंगाचा सलवारकमीज घालून गेले होते. मी त्याच्यासमोरून थोडीशी पुढे गेले होते की तेव्हाच त्याने मला हाक मारली होती,"हेऽऽ पांढरा ड्रेस.. !" मी थांबले. समीर माझ्याचकडे येत होता. याला माझ्याशी काय बोलायचं आहे आता? या विचारासरशी मी घाबरले. तो माझ्याजवळ येऊन म्हणाला,"तू जुनियर आहेस ना?" मी थरथरत,"हो सर.."
"काय नाव आहे तुझं?"
"पीहू गुप्ता.."
"पीहू.. चांगलं नाव आहे. पीहू, थोड्याचवेळात चित्रकला स्पर्धा आहे. तू लवकर तिकडे ये. आज मी तुझंच चित्र काढतो. ठीक आहे?"
मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं,"अम्म? अम्म.. हो सर !"
समीर निघून गेला आणि मी अवाक् होऊन त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहत राहिले. समीरने माझं खूपच सुंदर पोर्ट्रेट बनवलं. मी त्याच्या या रुपाला पाहून विस्मित झाले होते. काही वेळाने जेव्हा कवितांची स्पर्धा सुरू झाली तेव्हा त्यात समीरचं नाव घेतलं गेल्याने मला परत आश्चर्य वाटलं. तो माझ्याजवळून जायला लागला तर मी त्याला हळूच विचारलं,"पोर्टेट तर माझं बनवलंत, आता कविता कोणावर लिहिली आहे?"
त्याने हसून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला,"तिच्याचवर.. जिचं पोर्टेट बनवलं आहे." हसल्याने त्याच्या गालावर पडलेल्या खळीत मी स्वतःला विसरतेय की काय असा भास मला झाला. हळूहळू गप्पा होतहोत आमची ओळख वाढत चालली होती.

आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो आमचं आम्हालाच कळलं नाही, पण हे अजून ना त्याने माझ्यापाशी कबूल केलं होतं ना मी त्याच्यापाशी. बघताबघता एक वर्ष निघून गेलं. त्याचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि मी जुनियरची सिनियर झाले होते. एकीकडे त्याचे नोकरी शोधायचे प्रयत्न सुरू झालेले आणि दुसरीकडे माझ्यासाठी घरी स्थळं बघणं सुरू झालेलं. मी समीरशिवाय दुसऱ्या कोणाचा माझ्या आयुष्यात विचारसुद्धा करू शकत नव्हते. मी समीरशी याबद्दल बोलू इच्छित होते पण त्याचा एकूणच सगळ्या गोष्टी अगदी हलकेच घेण्याच्या स्वभावामुळे मी त्याला काहीच बोलू शकत नव्हते. मी त्याला किती समजावलं की त्याच्या या हलगर्जीपणामुळे त्याला एखाद्या दिवशी खूप नुकसान नको व्हायला, पण तो माझी कुठलीच गोष्ट सिरीयसली घ्यायचा नाही. हसून टाळायचा.

एके दिवशी असंच एक कुटुंब मला बघायला येणार होतं. मी कॉलेजमधून निघालेच होते की समीर दिसला,"इतक्या लवकर कुठे निघालीस पीहू?"
"आज एक कुटुंब मला बघायला येणार आहे."
"असले फालतू विनोद करत जाऊ नकोस पीहू. मला अजिबात आवडत नाहीत."
"विनोद? विनोद तर तू करतोयस समीर.. मी नाही !"
तो एकदम भंजाळून म्हणाला,"तू दुसऱ्या कोणाशी लग्न नाही करू शकत पीहू !"
मला जसं काही काहीच माहिती नाही असा आव आणत मी म्हणाले,"म्हणजे? मी दुसऱ्या कोणाशी लग्न करू शकत नाही म्हणजे काय?"
"पीहू, तुला तर माहिती आहे की मी तुझ्या... तुझ्याशी.."
"माझ्याशी.. काय समीर?"
समीरने एक मोठा श्वास घेतला, डोळे बंद केले आणि घाईघाईत म्हणाला,"मी तुझ्यावर प्रेम करतो पीहू. तुझ्याशी लग्न करू इच्छितो. करशील का माझ्याशी लग्न?" इतकं बोलून त्याने डोळे उघडले आणि मी हसते आहेसं पाहून सुटकेचा श्वास घेतला. हिला सगळं माहिती होतं तरीही.. मग रागावून म्हणाला," सगळं जर तुला माहिती होतं तर मग असं काहीच माहिती नसल्यासारखं का भासवत होतीस?"
"सगळं माहिती होतं मला पण तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. आता चल माझ्या घरी माझ्या आईबाबांशी बोलायला.

समीर माझा हात आपल्या हातात घेऊन म्हणाला,"येईन.. नक्की येईन, पण त्या दिवशी ज्या दिवशी मी काहितरी बनेन. माझ्या पायावर उभा असेन. प्लिज पीहू, मला थोडास्सा वेळ दे."
मलाही त्याचं बोलणं पटलं त्यामुळे मी होकार दिला. या गोष्टीला सहा महिने होऊन गेले पण त्याला नोकरी मिळाली नाही. मग एके दिवशी मी त्याला म्हणाले,"समीर, तू इतका सुंदर कवी आहेस, चित्रकार आहेस, मग त्यालाच तू स्वतःचा व्यवसाय का नाही बनवत? नोकरी शोधण्यासाठी का धक्के खात फिरतो आहेस?"
यावर तो हसून म्हणाला,"मलाही तेच हवं होतं पीहू पण आईबाबांचं स्वप्न आहे की मीही माझ्या दादाप्रमाणे नोकरी करावी. त्यांच्या मते कला संतुष्ट करते पण पोट नाही भरू शकत."
मी त्याला असहमती दर्शवत,"इतकं तर मला काही माहिती नाही समीर पण तुला एका छान चित्रकाराच्या रुपात बघायला मला जास्त आवडेल. तुझ्या चित्रांचं प्रदर्शन लागेल, लोकं ते बघायला येतील, तुझं तोंडभरून कौतुक करतील, एका कलाकाराच्या रुपात सगळे तुला ओळखतील.. हेच तर माझं स्वप्न आहे समीर.."
"आणखी थोडे दिवस जर मला नोकरी मिळाली नाही ना पीहू तर तुझं हे स्वप्न मी खरं करून दाखवीन." तो म्हणाला होता.

त्यानंतर काही काळातच समीरला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. स्वतःच्या कामात गुंग झालेल्या समीरला आता माझ्यासाठी खूपच कमी वेळ देता येत होता पण त्याचं स्वप्न पूर्ण होताना पाहून मला खूप आनंद होत होता. कसं कोण जाणे पण तेव्हाच माझ्या घरच्यांना आमच्याबद्दल समजलं. आई म्हणाली,"काही विचार केला आहेस? तू जर दुसऱ्या जातीतल्या मुलाशी लग्न केलंस तर काय होईल याचा? आणि समज आम्ही जरी हो म्हणालो तरी त्याच्या घरातले याला हो म्हणतील का?"
मी शांत स्वरात म्हणाले,"आई, तू अजिबात चिंता करू नकोस. जर तो माझ्यावर खरंच प्रेम करत असेल तर तो फक्त त्याच्या घरच्यांनाच मनवून थांबणार नाही तर स्वतः येऊन तुमच्याकडून माझा हात मागायला येईल. मला त्याच्यावर विश्वास आहे आई.."
"..पण असं नाही झालं तर..?"
"जर सगळ्या रीतीभाती संभाळत तो मला घेऊन जायला आला नाही तर तुम्ही जे म्हणाल तेच मी करेन."
"ठीक आहे पीहू.. जसं तुला योग्य वाटेल तसंच. आम्हाला तर फक्त तुझा आनंद हवा आहे."

जेव्हा मी हे सगळं समीरला सांगितलं तेव्हा तो म्हणाला,"मी इतक्यातच माझ्या घरच्यांना याबद्दल नाही सांगू शकत पीहू. अजून तर माझा या नोकरीत चांगला जम देखिल बसलेला नाही. थोडी आणखीन मुदत दे मला पीहू.."
मी चिडून म्हणाले,"वेळच तर नाहीये माझ्याकडे समीर. आतातर माझं शिक्षणदेखिल पूर्ण झालं आहे. आता मी काय सांगू माझ्या घरच्यांना आणि थांबा म्हणू? आणि मग माझी लहान बहिण रियापण तर आहे.."
विषय टाळत तो म्हणाला,"बरं ते राहू दे, मला कामानिमित्ताने सिंगापोरला जायचं आहे."
"समीर, तू जायच्या आधी माझ्या घरच्यांशी बोलून जाशील ना?"
"नक्की सांगू शकत नाही पण प्रयत्न जरूर करेन."
"ठीक आहे. तू हवं तर आताच नको येऊस माझ्या घरच्यांना सांगायला, पण जायच्या आधी तुला तुझ्या घरच्यांना तरी आपल्याबद्दल सांगावंच लागेल. तसं झालं की मी आईबाबांना विश्वासाने सांगू शकेन की मी तू परत येईतो थांबणार आहे म्हणून. बोल ना.. सांगशील ना आईबाबांना आपल्याबद्दल?"
काही वेळ अगदी शांत बसून मग तो म्हणाला,"ठीक आहे. बोलेन मी.."

सिंगापुरला जायच्या आधी तो मला भेटायला आला.
"समीर, तू बोललास घरी?"
"ह्म्म्म पीहू.. बोललो मी.. पण माझं बोलणं ऐकताच आईबाबा खूपच चिडले. खूपच ओरडले मला. ते या गोष्टीला तयार होत नाहीयेत पीहू.."
समीरचं हे बोलणं ऐकून डोळ्यासमोर काजवे चमकले माझ्या. त्याचा हात धरून मी म्हणाले,"आता काय होईल रे समीर? आता काय करायचं आपण?"
"अजून काही विचार नाही केला की काय करेन ! पण पीहू मी आईबाबांच्या विरुद्ध नाही जाऊ इच्छित आणि ते हो म्हणण्याची काहीच शक्यता दिसत नाही."
"समीर?"
त्याचा खाली गेलेला चेहरा वरती केला तर त्याने नजर चुकवली. त्यावेळेस वाटलं की सगळं संपलं. माझ्या पायातले त्राणच गेले जणू आणि मी मटकन खाली बसले. समीर काहीच न बोलता निघून गेला.ज्या समीरच्या भरवशावर मी माझ्या घरी इतकी मोठी हमी भरली होती, आज तोच समीर स्वतःची शपथ, माझा भरोसा सगळ्याला तोडून निघून गेला होता.

मी माझ्या घरच्यांशी नजरेला नजर भिडवू शकत नव्हते. माझ्या मनात जे वादळ उठलं होतं त्याला कसं सामोरं जायचं माझं मलाच कळत नव्हतं. किती प्रेम, तक्रारी, प्रश्न माझ्या मनात उभे राहिले होते त्याला तर काही गणतीच नव्हती. माझ्या डोळ्यात कितीक आसवं येऊन उभी होती पण मी मनमोकळं कोणाजवळ रडूही शकत नव्हते. कोणाला सांगणार होते मी माझ्या मनातलं? याचवेळी माझ्याकरता नीलचं स्थळ आलं आणि मी त्याची बायको बनून त्याच्या घराची मर्यादा बनले ! तेव्हापासूनच मला एकच प्रश्न आजपर्यंत उलगडला नव्हता,'समीर, तू माझ्या मनाचा राजा होऊ शकला असतास मग असा शत्रू बनलास तो का?'

दरवाजाची घंटी वाजली आणि मी भूतकाळातून परत वर्तमानात येऊन पोहोचले. बघितलं तर संध्याकाळ होत होती.. लाईट लावून मी दरवाजा उघडला,"नील तू आलासही?"

नील हसत,"काय राणीसाहेब, कशात गुंग आहात एवढ्या? मी तर समीरचं प्रदर्शन बघूनही आलो. पीहू.. खरंच सांगतो तुला.. तू यायलाच हवं होतंस.. इतके सुंदर चित्रं होती की मी तुला काय सांगू ! मी भेटलो समीरला, जरा विचित्रच माणूस वाटला मला. माहीतेय का तुला? ही आसामी आधी एका मोठ्या कंपनीत कामाला होती पण मग अचानक ती सोडून चित्रकार झाली. त्याने अजून लग्नही नाही केलेलं ! लोक म्हणतात की कोणावर तरी मनापासून प्रेम करत होते पण तिला मिळवू शकला नाही. बस्स.. तिच्याच आठवणीत कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेऊन बसलाय..."
नील त्याच्यात्याच्याच धुंदीत कायकाय बोलत सुटला होता पण माझं मन मात्र,"लग्न नाही केलं..' याच शब्दांभोवती अडखळलं होतं. 'समीर मला अजून विसरला नाही?'
मला हरवलेल्या मनःस्थितीत पाहून नील मध्येच म्हणाला,"पीहू, काय झालं? तू अशी टेन्शनमध्ये असल्यासारखी का दिसते आहेस?"
"काही नाही. थोडंसं थकल्यासारखं वाटतं आहे बाकी काही नाही." असं म्हणून मी बोलणं टाळलं.

दुसऱ्या दिवशी दुपारी नीलचा फोन आला,"पीहू, आज संध्याकाळी माझा एक मित्र येणार आहे घरी. झकास काहीतरी खायला करशील बरं का..."
माझं मन तर अजूनही समीरच्याच विचारांमध्ये गुंग होतं. कित्ती प्रश्न होते जे त्याला विचारायचे होते.. असं वाटलं जाऊन त्याला एकदा भेटून यावं. मग वाटलं भेटून काय मिळेल? मी अशीच उदास मनाने घरातली कामं करत बसले. संध्याकाळी मी नील घरी येण्याची वाट बघत बसले. तेव्हाच फोन वाजला. नीलचा होता. "पीहू, मला थोडंसं काम आहे अजून ऑफीसमध्ये. माझा मित्र येईल तर त्याचा नीट पाहुणचार कर.. मी येतोच लवकर कामं आटोपून.."
मी खूपच चिडले. ही काय पद्धत झाली? त्याच्या मित्राशी ना माझी ओळख ना पाळख आणि म्हणे पाहुणचार कर..

संध्याकाळी बरोबर ६ला दरवाजाची घंटी वाजली. दरवाजा उघडताच समोर दिसलेल्या माणसाला पाहून मी आश्चर्यचकित झाले.
"समीर.. तू इथे?"
मला बघताच समीरच्या हातातली निशिगंधाची फुले थरथरली.
"पीहू !"
काही वेळ काहीच न बोलता आम्ही असेच उभे होतो. मला समजत नव्हतं की मी नक्की काय करू? माझी मनःस्थिती ओळखून तो म्हणाला,"मला नीलजींनी इथे बोलावलं आहे. हे त्यांचंच घर आहे ना?"
मी त्याला आत यायची परवानगी देत म्हटलं,"हो... त्यांचंच घर आहे आणि मी त्यांची बायको.."
मला समजत नव्हतं की नीलने समीरला का बोलावलं आहे? तेव्हाच समीरने विचारलं,"कशीयेस पीहू?"
मी हसत,"खूप छान.. खूप आनंदात !"
"पीहू... कधी माफ करू शकशील का मला?"
मी काहीशा तिरसटपणे,"माफी? कसली माफी समीरजी? तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलंत. त्यामुळे माझ्यावर काय गुदरली याच्याशी तुम्हाला काय देणंघेणं? हे सगळं सोडून द्या.. जितक्यापर्यंत मला आठवतंय तुम्ही तर एक मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर कामाला होतात, मग अचानक ते सगळं सोडून मध्येच चित्रकार कसे काय झालात?"
समीर उदासवाणं हसत म्हणाला,"वेळेसोबतच खूप गोष्टी मागे सुटून जातात.. काही सोडून द्याव्या लागतात. कोणी होती जी मला चित्रकाराच्या रुपात पाहू इच्छित होती पण एके दिवशी माझ्यावर रुसून न जाणो कुठे निघून गेली. तिचं स्वप्न पूर्ण करून तिला माझ्या रंगांमध्ये गुंफायचा प्रयत्न करत असतो."
कुठल्याशा वेदनेने मी,"इतकंच जर प्रेम होतं तर जाऊच का दिलंत तिला?"
समीर मान खाली घालत,"जर मला माहिती असतं की माझ्या क्षणैक कमजोरीने इतकी मोठी उलथापलथ होऊन जाईल.. तर कदाचित... ! माहितेय पीहू.. त्या दिवशी तुझ्यापासून दूर जाताना एकेक पाऊल उचलताना असं वाटत होतं जणू काही माझ्या हातातून कुठलीतरी अनमोल गोष्ट निघून चालली आहे. सहा महिने जे मी तुझ्याशिवाय सिंगापूरला काढले.. असे होते जणू काही सहा वर्ष ! तेव्हा मला जाणवलं की तू माझ्या आयुष्यातली किती महत्त्वाची व्यक्ती बनून गेली होतीस. तिथून परत येताना मी निर्णय घेतला होता की इकडची दुनिया तिकडे झाली तरी चालेल पण मी तुला आपलंसं करूनच राहीन. परत येताच मी तुझ्या घरी आलो होतो. तेव्हा तुझी बहिण म्हणाली की तुझं.. !"
इतकं बोलून समीर थांबला. मग एक दीर्घ श्वास घेत म्हणाला,"तेव्हा असं वाटलं होतं पीहू की कोणीतरी माझ्यावाटची जमीन आणि आकाश दोन्ही माझ्यापासून हिरावून घेतलं आहे. आठवतं तुला.. तूच म्हणायचीस की माझ्या या हलगर्जीमुळे कधी मला खूप किंमत मोजावी लागेल असं? ती किंमत तूच असशील हा तर मी विचारच केला नव्हता. तुझी सोबत मला जगण्याची हिंमत द्यायची, तुझ्या जाण्यानंतर वाटलं की आता तुझ्यासाठी मरूनच जावं. प्रत्येक क्षण.. अग्गदी प्रत्येक क्षण मला आसपास तूच हवी होतीस. कसला वेडेपणा होता तो.. जे अशक्य होतं तेच सगळं मला हवं होतं. घरातले मला समजावून समजावून थकले पण मी दुसऱ्या कोणाशी लग्न करण्यासाठी तयार नाही झालो. मग एके दिवशी आई म्हणाली,"ठीके समीर. जा. जिला तू आपलंसं करू इच्छितोस तिला आपल्या घरची सून बनवून घेऊन ये." आईचं हे बोलणं ऐकून आधी तर मी खूप जोराने हसलो आणि मग तिच्याच गळ्यात पडून एखाद्या लहान मुलासारखा रडलो. मला काहीच न बोलता आई केवळ माझ्या केसातून हात फिरवत होती. आता कदाचित तिलाही कळलं होतं की या सगळ्याला खूप उशीर झाला आहे.

तुझ्या भरवशाला पूर्ण करू शकलो नाही या अपराधी भावनेने मला जबरदस्त दुःखी करून सोडलं होतं. प्रत्येक क्षणी माझ्या मनात एकच विचार असायचा की मी तुझा भरोसा तोडला पीहू.. ! ज्या त्रासातून आणि वेदनांमधून तुला जावं लागलं असेल त्याचा विचारही करणं मला असह्य होत होतं. आजतागायत मी स्वतःला माफ नाही करू शकलो. कितीक वेळा मी देवाकडे प्रार्थना केली असेल माहीत नाही की मला एकदाच.. फक्त एकदाच पीहूशी भेटव ! तुला भेटू शकलो असतो तर म्हणू शकलो असतो की पीहू मला माफ कर ! मी खरंच भ्याड होतो.. जो काहीच करू शकलो नाही.. ना आपल्या प्रेमासाठी आणि ना तुझ्या विश्वासासाठी. जेव्हा मी पूर्ण मोडून गेलो तेव्हा एका रात्री मला कुठूनतरी तुझे शब्द ऐकू आले,"समीर, मी तर तुला नेहमीच एका चित्रकाराच्या रुपात पाहू इच्छिलंय.. माझं हे स्वप्न पूर्ण कर समीर.." आणि मग सकाळी मी उठलो ते तुझं स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय समोर ठेवूनच ! बस्स हाच आहे या मामुली चित्रकाराचा प्रवास.. पीहू !" इतकं बोलून तो शांत बसला. मी डोळ्यातले अश्रू पुसत,"इतकी मोठी शिक्षा का दिलीस समीर तू स्वतःला? का स्वतःबरोबर मलाही गुन्हेगार बनवून टाकलंस तू?"
समीर माझा हात पकडून,"माझी तुझ्याकडे काहीच तक्रार नाही पीहू. तो तर मी होतो जो चुकलो होतो, अपेक्षा पूर्ण करू शकलो नव्हतो.. जेव्हा माझ्या हे लक्षात आलं तेव्हा माझ्या हातातून वेळ निसटून गेली होती."
काही वेळाच्या शांततेनंतर," खूप बरं झालं तू भेटलीस. खूप इच्छा होती तुला भेटून माफी मागण्याची. तुला सांगायचं होतं की बघ पीहू मी तुझं स्वप्न पूर्ण करतोय.." तेव्हाच माझी ५ वर्षाची छोटी मुलगी,"आई आई.. " करत माझ्या गळ्यात पडली. मी समीरशी तिची ओळख करून देत म्हणाले,"समीर, ही आमची मुलगी, परी.."
परीला कडेवर उचलून घेत समीर म्हणाला," परी?"
"हो समीर.. परी.. तेच नाव जे तुला आपल्या मुलीचं ठेवायचं होतं. तुला तर नाही मिळवू शकले पण आमच्या मुलीचं नाव परी ठेवून तुझी आठवण नेहमी जवळ ठेवावी असं वाटलं म्हणून.."
यावर समीर हसला. दरवाजाची घंटी वाजली बघितलं तर नील होता. येताच म्हणाला,"समीर आला का?"
"हो.."
आत येताच समीरला म्हणाला,"माहिती आहे की तुम्हाला वाटत असेल की काहीही ओळखदेख नसताना मी तुम्हाला घरी जेवायला कसं काय बोलावलं. हो ना?" नीलच्या या बोलण्यावरून मी एकदम चमकून समीरकडे बघितलं. मग उत्सुकतेने नील काय म्हणतोय ते ऐकायची वाट पहायला लागले.
"काल जेव्हा मी तुमची चित्रं बघत होतो तेव्हा मला पीहूचंही एक चित्र तिथे दिसलं. ते पाहून मी अगदी आश्चर्यचकित झालो. तुमच्या सेक्रेटरीला जेव्हा मी ते चित्र विकत घेण्याबद्दल विचारलं तेव्हा तिने तुम्ही हे चित्र विकण्यासाठी नाही असे सांगितलं आहे असं म्हणाली. तिच्याकडून तुमच्या लग्न न करण्याच्या निर्णयाबद्दल, तुमच्या चांगली नोकरी सोडून देण्याबद्दल कळलं... मग वाटलं की याचा संबंध पीहूशीच तर नसेल? प्रेम मग ते कोणाचंही असो,सन्माननीयच असतं. जे काही तुम्ही तुमच्या प्रेमासाठी केलंत ते पाहता तर तुमच्या प्रेमाला तुम्ही खूप उंचीवर नेऊन पोहोचवलंय माझ्या नजरेत. जिच्यासाठी इतकं सगळं केलं जातं आहे तिला कल्पना तर यावी या सगळ्याची असं वाटलं आणि म्हणूनच मी तुम्हाला घरी बोलावलं. आशा करतो की तुम्हाला यात काही गैर वाटलं नसेल."
समीरने नीलचा हात पकडून म्हटलं,"तुम्ही विचारही नाही करू शकत नीलजी की तुम्ही आज माझ्यावर किती मोठे उपकार केलेत ते. आठ वर्ष मी माझ्या मनावर एक ओझं घेऊन जगत होतो.. ज्यापासून आज कुठे मला मुक्तता मिळाली आहे. हे सगळं तुमच्यामुळेच मिळालं आहे नीलजी ! जर पीहूची माफी नसतो मागू शकलो तर कदाचित सुखाने मरूही नसतो शकलो. नीलजी, कित्येकवेळा आपल्या असमजूतदारपणामुळे माणसाला कळतच नाही की त्याच्याकडे जे काही आहे ते किती अनमोल आहे.. हातातून निघून गेल्यावर कुठे कळतं की ते अनमोल होतं.. तुम्ही खरंच खूप नशिबवान आहात जे तुम्हाला पीहूसारखी बायको मिळाली आहे."
नील हसत मला जवळ घेत,"तो तर मी आहेच.. काय गं पीहू?" त्याच्या या बोलण्यावर आम्ही हसायला लागलो.
समीर म्हणाला,"चला आता मी निघतो. आजची संध्याकाळ आयुष्यभर एक गोड आठवण म्हणून राहील माझ्यासोबत." त्याला सोडायला मी आणि नील दरवाजापर्यंत गेलो. मी समीरला म्हणाले,"समीर, खूप झालं स्वतःला शिक्षा देणं आता, स्वतःसाठी एखादी झकास बायको शोध आता."
समीर हसत म्हणाला,"पीहू, तू नशीबवान आहेस म्हणून तुला नीलसारखा समजूतदार नवरा मिळाला आहे. जो सन्मान, जे प्रेम तुझा हक्क होता तो नील तुला देतो आहे.. पण जर माझी बायको आपल्या दोघांमधल्या भावनांना तोच सन्मान देऊ शकली नाही तर? मी एकटाच ठीक आहे... बस्स एकच इच्छा आहे.. पूर्ण करशील का?"
मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले.
"एकदा.. फक्त एकदाच.. तू माझी चित्रं बघायला ये.. बघ की मी तुझं स्वप्न पूर्ण करू शकलो की नाही ते.. येशील ना पीहू?"
"येईन.. नक्की येईन समीर.." माझा होकार ऐकून समीरच्या चेहऱ्यावर एक प्रकारच्या तृप्तीचे भाव तरळून गेले. आम्ही दोघं दूर जाणाऱ्या समीरला पहात राहिलो. मी हळूच माझं डोकं नीलच्या खांद्यावर टेकवलं आणि नीलने मला हलकेच आपल्या कुशीत घेतलं.

मूळ कथा - खोया हुआ-सा कुछ
मूळ कथाकार - कृत्तिका केशरी
स्वैर अनुवाद - वेदश्री

.. आणि मी पैज जिंकली !

माझे जुने मेल्स चाळताना हा मेल सापडला आणि आमच्या पत्रकट्यातल्या या लाजऱ्या दोस्ताचं हे दिलखुलास मनोगत इथे सर्वांसमोर ठेवावंसं वाटलं, म्हणून हा लेखप्रपंच. त्याने केलेले अनुभवकथन जसेच्या तसे इथे लिहित आहे ( काळ्या अक्षरात लिहिलेला सर्व भाग 'चिंटूच्या काका'ने लिहिलेला आहे ). हा उपद्व्याप करण्याआधी त्याची पूर्वपरवानगी घेतलेली नाही .. पण तो आक्षेप घेईल असं वाटत नाही. चिंटूचे काका चु.भू.द्या.घ्या. :D

~~~

संदर्भ : मागच्या भागात पाहिल्यानुसार सुप्रसिद्ध काका ( आस्मादिक ! ) आणि त्यांचे थोरले बंधू यांची पैज लागली होती की जर काकाने चिंटूकडून पहिले 'काका' वदवून घेतले तर काका जिंकला आणि जर बाबांनी 'बाबा' वदवून घेतले तर बाबा जिंकले आणि चिंटूची 'आका' पर्यंत प्रगती झाली होती.

चिंटूचे हे 'आका'पुराण खूप दिवस चाललेले. काय करावे काही कळत नव्हते.

"बाळ इथे बघ.. ( बळेबळेच तिची मान माझ्याकडे वळवायचा खटाटोप चाललेला. मान वळवली की.. ) ह्म्म आता म्हण काऽऽका.."
"आऽऽकाऽऽ"
हाच कार्यक्रम १०-१५ वेळेस डोळ्यासमोर आणा बघू.. आणलात का? ओके...

माझे शर्थीचे प्रयत्न चालूच...

"ओके.. फक्त 'का' म्हण बघू.."
"का"
"अरे वा ! छोनुली आमची कित्ती छानी." यावर चिंटूचे एक छानसे स्माईल.
"आता म्हणा परत.. काऽऽऽकाऽऽऽ"
"आऽऽऽकाऽऽऽ"
शक्य तितका शांत आवाज ठेवत ( ही लहान मुले आपल्या सहनशक्तीची हद्द बघतात ) "बाळ हे बघ.. 'आ' वेगळा.. ( आ वेगळा आहे दाखवण्यासाठी डावीकडे मान आणि डावीकडे बोट.) आणि 'का' वेगळा.. ( का साठी उजवीकडे मान आणि उजवीकडे बोट. ) आता कळले ना?"
परत ४-५ वेळा 'आ' आणि 'का' वेगळा हे दाखवण्याची खटपट.
शेवटी चिंटू होकारार्थी मान हलवते.
हुऽऽश्शऽऽऽऽ ! आता नव्या उमेदीने काका परत चालू..
"मग बाळ आता बोल बरे.. काऽऽऽकाऽऽऽ"
"आऽऽऽकाऽऽऽ"
"हे गजानना आता मी ह्या पोरीचे काय करू?" म्हणून काकांचा कपाळाला हात.

अशी माझी खटपट खूप दिवस चाललेली पण काही यश मिळेना. मी तर इरेलाच पेटलो. अरे असा थोडीच पराभव मानीन. मग विचार केला काहितरी वेगळे करायला हवे पण काय ते सुचेना.

तिला गाण्यात म्हणून दाखवले... "काका सांगा कुणाचे? काका आमच्या चिंटूचे.." उड्या मारून 'काका' म्हणून दाखवले. बाळाला मारतानाही 'काका काका' म्हणून ओरडायचो. पण छे ! काही उपयोग नाही. घरी अध्यादेशच काढला, सर्वांनी मला 'काका' म्हणूनच बोलवायचे. पण छे ! तरीही चिंटू काही बधेना !!!

शेवटी मात्र मी हात टेकले. तिच्यासमोर पांढरे निशाण फडकवले.

या सर्व दिवसात बाईसाहेब 'मामा' म्हणायला लागलेल्या. 'मामा' म्हण सांगितले की 'अमामा' म्हणायची.
मग सुचले. चिंटूला परत जवळ घेऊन बसलो आणि चालू..
"बाळ म्हण पाहू... अमामा.."
"अमामा.."
"वा ! छान हो छान.. आता बाळ 'अकाका' म्हण पाहू.. "
"अकाका.."
"येऽऽऽऽऽ ! जिंकलो ! जिंकलो !! जिंकलो !!! ढिंचँक ढिंचॅक.. काका तो फंडू है रे.. काका तुस्सी टॉप हो.. "
दादा आल्यावर आमच्या जवानाला सांगितले,"बाळ, म्हण बघू 'अकाका' "
"अकाका"
छे ! पण आमचे दादासाहेब मान्यच करेना. म्हणे तिने फक्त 'काका' बोलायला हवे. हे असे नाही चालणार. छे ! पण मी कसला मानतोय? म्हटले 'काका' म्हणाली ना मग झाले पण दादा मानेनाच. मग शेवटी माघार घेतली.

परत दुसऱ्या दिवशीपासून पुर्वीचे प्रयत्न चालू पण यश काही हाती लागेना.

आता तुम्ही म्हणाल.. किती हा आप्पलपोटपणा !! फक्त 'काका'च बोलायला शिकवत होतात ते पण नाही हो त्याचबरोबर इतर गोष्टीही शिकवत होतो,"भू.. भू.. म्याव..म्याव...."
एकदा असाच तिला 'म्याव म्याव' शिकवत होतो.
"बाळ, 'म्याव म्याव' बोल बघू.."
"माऽव ( 'व' अगदीच सायलेंट ! )ऽमा"
"बाळ असे नाही. माझ्याकडे लक्ष दे बघू.. परत बोल.. म्याव म्याव.."
"माऽऽ(व)ऽऽमा.."
छे! पण इतक्या लवकर हार मानेल तो चिंटूचा काका कसला !!!
परत १०-१५ वेळेस हीच गोष्ट नजरेसमोर आणा.
आता मात्र काका पुरते थकलेले.. आणि परत कपाळाला हात लावून बसले. ( स्वतःच्याच होऽऽ ! ) परत विचारचक्र चालू.. काय करावे बुवा काही कळत नाही.

काका विचार करतायत..

~!~!~!~

आजचा भाग संपला.

हेऽऽऽय, इथे तुम्हाला एक प्रश्न. ओळखा पाहू काकाने काय केले असेल आणि चिंटूकडून 'काका' वदवून घेतले असेल.

कलोअ.
चिंटूचा काका.

प्रतिसाद देण्यातला आनंद

लहानग्या राजूच्या शाळेत आज शालेय नाटकात भाग घेण्यासाठी निवड करण्यात येणार होती. राजू आणि त्याच्या वर्गमित्रांनीही नाटकात काम करायला मिळावे म्हणून हिरीरीने त्यात भाग घेतला होता. त्याची आई - सरला, तिला माहिती होतं की राजूची किती जबरदस्त इच्छा आणि अपेक्षाही आहे की त्याला निवडलं जावं नाटकासाठी, जसं भाग घेतलेल्या इतर सर्वांनादेखील वाटत असणार. कदाचित त्यामुळेच की काय तिला थोडीशी भीतीही वाटत होती की त्याची निवड झाली नाही तर त्याची मनःस्थिती काय होईल ते..

संध्याकाळी सरला राजूला घ्यायला शाळेत पोहोचली. राजू अगदी धावतच तिच्याकडे आला. त्याचे डोळे अलोट अभिमान, उत्साह, आनंद यांच्या संमिश्र भावनेने लकाकत होते.
"आई, सांग काय झालं असेल?", तो उत्साहाने उद्गारला,"मला माझ्या नाटकात सहभागी दोस्तांना टाळ्या वाजवून, उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी निवडलं गेलं आहे !"

मूळ कथाकार - Unknown.
स्वैर अनुवाद - वेदश्री.

कर्ज

हे घरी आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जबरदस्त ताण आणि चिंता दिसत होती. त्यांचा चेहरा बघून माझ्या मनात नाहीनाही ते विचार यायला लागले. घाबऱ्या आवाजात मी विचारलं,"काय झालं? सगळं ठीक तर आहे ना?"
"ह्म.." उतरलेल्या चेहऱ्याने उत्तर मिळालं होतं.
"मग तुम्ही इतके चिंतातूर का दिसत आहात?"
"अम्म.. काही नाही.. असंच.."

दुसऱ्या दिवशी बातमी कळली की ताईंना परत हृदयविकाराचा झटका आला आहे. हा दुसरा झटका होता. हॉस्पिटलमध्ये हलवावं लागलं होतं त्यांना. मी म्हणाले,"तुम्ही जायला पाहिजे."
यावेळेस जेव्हा हे परत आले तेव्हा त्यांचा चेहरा तणावमुक्त होता. मी विचार केला, चला सगळं ठीक झालं वाटतं. विचारल्यावर म्हणाले,"वाचणं मुश्किल आहे. तुला बोलवलं आहे.." ऐकून मला अतीव आश्चर्य वाटलं. त्यांच्या चेहऱ्यावरून तर असं काहीच वाटत नव्हतं. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा तर ताई जवळपास शेवटचे श्वास घेत होत्या. निरागस चेहरा.. जो या वयातही दिव्याच्या उजेडाप्रमाणे झगमगत असायचा, अगदी सुकून गेला होता. खूपच असहाय्य वाटत होत्या त्या. त्यांची ती केविलवाणी परिस्थिती पाहून डोळे भरून आले माझे. माझ्याशी एकांतात बोलायची इच्छा त्यांनी व्यक्त करता सगळेजणं खोलीतून बाहेर निघून गेले. आता त्यांच्याजवळ फक्त मीच होते. खूप कष्टाने त्यांच्या तोंडून शब्द निघत होते,"निक्की, या आयुष्यात माझ्याकडून काही चुका झाल्या असल्यास माफ.. आणि.. ती... ती डायरी.. आकाशच्या हाती अजिबात.. नको.. जाळून.."
"नाही.. ताई.. नाही.. तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत.." मला रडू आवरणं शक्यच नव्हतं.
"अगं वेडी.. रडू नकोस. बाबांची सगळी संपत्ती ... तुझ्या नावावर.. ती स्विकार.. " त्यांचा हात माझ्या डोक्यावर होता.

सगळी दुनिया एकीकडे व्हॅलेंटाईन डेच्या रंगात रंगली होती आणि दुसरीकडे या सगळ्यापासून दूर आपल्या अर्धवट स्वप्नांसोबत त्यांनी माझ्याच मांडीवर प्राण सोडले. दिव्याची ज्योत विझण्यापुर्वी जशी एकदम झळाळून उठते तसाच मृत्यूपुर्वी काही क्षण त्यांचा चेहरा अगदी उजळला होता. जणू काही त्यांचं आयुष्याकडे कुठलंच मागणं उरलं नव्हतं की कशाबद्दल कुठली खंत, राग त्यांच्या मनात उरला नव्हता याचीच साक्ष देत होता.

त्यांनी मला बोलायची थोडाशी जरी संधी दिली असती तरी मी सांगितलं असतं की जे काही माझं आहे.. ते सगळं.. अगदी हेसुध्दा .. तुमचे आहेत..

मी बाहेर आले. यांनी आतुरतेने विचारलं,"काय झालं?"
मी पुन्हा रडायला लागले. बघितलं तर आत्ताही यांच्या चेहऱ्यावर तीच शांतता.. तीच स्थिरता.. तेच समाधान.

ताईंच्या कुटुंबात आता कोणीच उरलेलं नव्हतं. जे कोणी होतो ते आम्हीच होतो. अंत्यसंस्कार कोणी करायचे असं यांनी विचारता,"तुम्हीच करायला हवेत. शेवटी मैत्रिण ना त्या तुमच्या.."

यांच्याशी जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा नेहमी मी ताईंना त्यांच्या आसपासच पाहिलं होतं. त्या यांच्याच वयाच्या होत्या. सगळ्यांकडून ऐकलं होतं की त्या यांच्या खूप छान मैत्रिण आहेत म्हणून. श्रीमंत बापाची श्रीमंत लेक. माझ्या सासुरवाडीपासून काही अंतरावरच त्यांचा शानदार बंगला होता. बंगला, मस्त मोठा बगिचा, नोकरचाकर, गाडी वगैरे सगळ्या सुविधांनी सज्ज होता. नंतर माहित झालं की हे दोघंही एकाच कॉलेजमध्ये सोबतसोबतच शिकले होते. पदवी मिळाल्यानंतर यांनी नोकरी पत्करली आणि त्या पुढच्या शिक्षणाच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात निघून गेल्या होत्या.

जसं की सर्वश्रूत आहे.. कुठलीही मुलगी स्वतःच्या नवऱ्यासोबत दुसऱ्या कुठल्या मुलीचं नाव अजिबात सहन करू शकत नाही मग ती नवऱ्याची कितीही चांगली मैत्रिण असली तरीही. मीही काही वेगळी नव्हतेच. माझंही मन अनेक शंकाकुशंकांमध्ये भोवंडत गेलं. या दोघांच्यामध्ये काही लफडं आहे का की खरंच फक्त मैत्री आहे? की आणखीनही काही आहे? असे विचार मला स्वस्थ बसू देईनात.

होताहोता माझ्या लग्नाला पाच वर्षं होऊन गेली. एक मुलगा आणि एक मुलगी यांनी आमचा संसार डवरला. लग्नाच्या पाचव्या वाढदिवशी शुभेच्छा द्यायला ताई घरी आल्या होत्या तेव्हा मी त्यांना विचारलं,"तुमच्या मित्राने तर लग्नही करून टाकलं.. आता दोन मुलांचे बाबाही झाले आहेत.. तुमचे काय बेत आहेत लग्नाबद्दल?"
त्या अंमळ हसल्या आणि अगदी सहजपणे म्हणाल्या,"लग्नाचं काय आहे? त्या तर योगायोगाच्या गोष्टी असतात.."
झाऽऽलं ! माझ्या सगळ्या शंका खऱ्या ठरत आहेत असं मला वाटायला लागलं. एका वर्षाने त्यांचे वडील वारले आणि त्यांच्या लग्न होण्याची सगळीच चिन्हं संपली. एकदा असंच संध्याकाळी जेव्हा हे खूप उशिरापर्यंत घरी आले नाहीत तेव्हा मी स्वतःच त्यांच्या बंगल्यावर जायचा निर्णय घेतला.

दरवाजा त्यांनीच उघडला."अरेच्चा तू इथे कशी? ये ना आत ये.."
मी काहिशा तटकतोडपणेच विचारलं,"हे इथे आले होते.. अजूऽन घरी आले नाहीत."
"बाई गं ! काय सांगतेस काय?" त्यांना जबरदस्त आश्चर्य वाटल्याचं स्पष्ट दिसत होतं,"आकाश इथून जाऊन तर बराच वेळ झाला. कुठे गेला असेल?"
काहिशी खजील होत यांची बाजू सावरण्याच्या हेतूने मी म्हणाले,"काही काम निघालं असेल बहुदा म्हणून गेले असतील कुठे.. बरं ठीके.. मी निघते आता.."
"अगं असं कसं जाशील? पहिल्यांदा तर माझ्याकडे आली आहेस.." असं म्हणत माझा हात पकडून मला आत घेतलं होतं. त्यांच्याचकडून कळलं की त्यांना एक लहान बहिण होती. १५-१६ वर्षाची असतानाच एका अपघातात ती वारली होती. तिचं नाव निक्की होतं. त्या दिवशी मला आवडलेलं नसूनही त्यांनी मला त्यांचं छोटी बहिण मानून टाकलं होतं आणि मला निक्की म्हणायला सुरूवात केली होती.

त्यानंतर त्यांच्या बंगल्यावर माझं येणंजाणं सुरू झालं. मनात एकच सुप्त इच्छा होती.. कध्धी ना कध्धी तरी तर मला संधी मिळेलच.... तसंही खोटेपणा जास्त दिवस तग धरू शकत नाही. पण २५ वर्षं होऊन गेली तरी मला एकही संधी मिळाली नाही. माझी शंका अगदीच बिनबुडाची सिद्ध झाली होती. मीही मग अगदी मनापासून त्यांना 'ताई' मानलं. माझ्या मुलीचं लग्न ठरण्याच्या बेतात होतं, पण माझ्याकडे पुरेसे पैसेच नव्हते. चांगलं स्थळ हातातून निसटतं की काय वाटत होतं. त्यावेळेस ताईंनी यांना २ लाख रुपाये कर्जाऊ दिले. मुलाला नोकरी लागताच हळूहळू दोघं मिळून कर्ज फेडून टाकतील असे एकंदर बेत होते.

दोन वर्षं होऊन गेली. मुलाला नोकरीही लागली. ताईंकडे इतक्यांदा येणंजाणं व्हायचं की आता औपचारिकपणा नावालादेखील उरला नव्हता. ताईंच्या नोकराने सांगितले की त्या त्यांच्या खोलीत आहेत. मी नेहमीप्रमाणेच थेट त्यांच्या खोलीत जाऊन धडकले होते. बघितलं तर पलंगावर बसून त्या काहितरी वाचत बसल्या होत्या. त्यांची डायरी त्यांच्याकडून काढून घेत मी म्हणाले,"मलापण तर पाहू देत की माझ्या ताई काय वाचत आहेत ते.."
"नाही.." त्यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला तर मी म्हणाले,"एकीकडे मला स्वतःची छोटी बहिणही म्हणता आणि माझ्याचपासून गोष्टी लपवता.. छान !"
मी डायरी बघायला सुरूवात केली. खूपच सुंदर कविता होत्या त्या डायरीत. एकेक शब्द जणू काही थेट काळजातून उतरला होता त्या डायरीत. "वाऽह ताई.. खूपच सुंदर. काय अप्रतिम कविता आहेत.." असं म्हणत मी ते पान उलटलं जे कदाचित मी उलटायला नको होतं. डायरीच्या पहिल्या पानावर सुंदर अक्षरात लिहिलेलं होतं - "माझ्या प्रिय आकाशसाठी" !

माझ्या अंगांगाची लाहीलाही झाली. घोर आगीत जळत असल्याचा भास झाला मला. इतका मोठा धोका? इतकी मोठी अवहेलना? एकही क्षण आता तिथे थांबणं मला शक्य उरलं नव्हतं. डायरी भिरकावून टाकून मी तिथून ताडदिशी निघाले. त्यांनी माझा हात पकडला,"निक्की, माझं थोडंसं ऐक तर खरं.. "
"मला आता काहीच ऐकायचं नाहीये आणि हो.. पक्कं ध्यानात असू द्या. मी तुमची निक्की नाही.. मला त्या नावाने अजिबात हाक मारू नका.."
जर रागाला नीट व्यक्त करता आलं नाही तर तो अश्रूंच्या रुपाने बाहेर येतो म्हणतात, तेच माझ्याबद्दल होत होतं. मी त्यांची कर्जदार होते.. त्यांच्याहून छोटी होते..त्यांच्यावर राग कसा काय काढू शकणार होते? माझ्या डोळ्यात असहायतेचे अश्रू उभे राहिले.

मला बळेच पलंगावर बसवून घेत त्या म्हणाल्या,"निक्की, तू एका क्षणासाठीही तुझ्या आकाशला विभागून घ्यायला तयार झाली नाहीस.. मी तर अख्खी २५ वर्षं तुझ्यासोबत.."
"बस्स ताई बस्स..." मी संतापाने थरथरत ओरडले,"इतकंच जर प्रेम होतं तुमचं त्यांच्यावर तर लग्नच का नाही केलंत त्यांच्याशी?"
उत्तर मिळालं. खूपच करूण शब्द होते ते.
"केलं असतं.. पण भाग्याचा खेळ दुसरं काय. आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये ३ वर्षं सोबतच शिकलो. हळूहळू माझं मन जडलं त्याच्यावर. ही डायरीही त्याच काळात मी लिहायला सुरूवात केली होती. आकाशला हे सांगायचा कधी धीर मात्र झाला नाही. पुढच्या शिक्षणासाठी नंतर मी शहरात गेले आणि मग कळलं की त्याचं लग्न होणार आहे... तुझ्याशी. मी वेडीच झाले. मनात आलं की सगळं सगळं आकाशला सांगून टाकावं.. सांगून टाकावं की माझं तुझ्यावर प्रेम आहे पण एक शंका सारखीसारखी मनात येत होती की हे तर काही जरूरी नाही की त्याचंही माझ्यावर प्रेम असेलच.. आणि त्या मुलीचा काय दोष जिने आता आकाशला तिच्या नवऱ्याच्या रुपात बघत स्वप्नही बघायला सुरूवात केली असेल. तिच्या स्वप्नांना मूठमाती कशी काय देऊ शकणार होते मी? मी गप्प बसले. मूकपणे त्याला तुझं होताना पाहात राहिले. तुझ्या चेहऱ्यात मला कुठेतरी माझी निक्कीच दिसत होती. मी नाही तरी माझी छोटी बहिण तर सुखी आहे, या विचाराने मी मनावर दगड ठेवून घेतला."
शेवटचे शब्द बोलताबोलता त्या रडायला लागल्या. मी हतबुद्ध झाले होते. खरंच का इतकं प्रेम कोणी कुणावर करू शकतं? तेही संपूर्ण आयुष्यभर? मी त्यांना सावरलं आणि त्यांना 'ताई'म्हणण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाही.."ताई.. म्हणजे अजून यांना..."
"नाही.. नाही..." त्या अजिबात उसंत न घेता म्हणाल्या,"त्याला अजिबात कळता कामा नये. माहित नाही त्याला काय वाटेल. स्वतःला दोषी समजून घ्यायचा नसता तो. घेतलेले सगळे निर्णय हे फक्त माझेच होते आणि आहेत. मी गुन्हेगार आहे तर ती फक्त तुझीच.. जी काही सजा द्यायची ती देऊ शकतेस तू मला.."
त्या रडत असताना त्यांना तसंच एकटं सोडून मी घरी निघून आले. ३-४ दिवस मला काहीच कळेनासं झालं होतं की हे नक्की काय चाललं आहे आसपास ते. मग सगळं पुन्हा पुर्ववत् झालं. काही दिवसांनी मी यांना चिंतातूर पाहिलं तर कळलं की ताईंनी त्यांच्या वडलांच्या नावाने एक खूप मोठं सर्व सोयींनी सुसज्ज असं हॉस्पिटल बनवायचं मनावर घेतलं आहे.
"वाह ! किती छान विचार आहे. यात चिंता ती कसली?" मी अगदी आश्चर्याने विचारलं.
"तुला माहिती नाही आत्ता तिची परिस्थिती खराब आहे. त्यांची फॅक्टरी तर बंदच पडायच्या मार्गावर आहे. तिने तिचे पैसे परत मागितले तर?"
यांना आलेली शंका अगदीच काही बिनबुडाची नव्हती. दुसऱ्या दिवशी ऐकलं तर ताईंना हृदयविकाराचा झटका आला होता. घरीच इलाज करणं चाललं होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशीच हा दुसरा झटका आला होता.

ताईंची निक्कीच आता त्यांच्या संपत्तीची एकुलती एक वारस झाली होती ! हॉस्पिटल बनवायचं की नाही.. त्यांचं कर्ज फेडायचं की नाही.. आता हे सगळं माझ्यावर अवलंबून होतं.

यांना मी नोकरी सोडायला सांगितली. फॅक्टरीमध्ये लक्ष घालायला सांगितलं. फॅक्टरीचं पुनरुज्जीवन करवलं. हॉस्पिटल सुरू करवलं गेलं. आता हे दिवसभर त्याच कामात गुंग असायचे. ताईंच्या म्हणण्यानुसार डायरी मात्र मी जाळू शकले नाही. ती स्वतःजवळ ठेवण्याचा मोह मी आवरू शकले नाही.

एके दिवशी ती डायरी यांच्या हाती लागली. त्यांनी वाचली असेल ती, म्हणूनच तर कदाचित माझ्याकडे तक्रार घेऊन आले होते,"अरे वाह ! माझी बायको इतकी छान कवयित्रीही आहे हे मला आजपर्यंत माहितीच नव्हतं. माझ्यावर इत्तकं प्रेम की माझ्यासाठीच्या कवितांनी अख्खी डायरीच भरवून टाकली !! आज माझ्या आनंदाला पारावारच राहिलेला नाही. मस्त मिठाई तर मिळायलाच पाहिजे यासाठी.."
मी काही म्हणणार एवढ्यात ते जाऊन फ्रिजमधून मिठाईचा डबा काढून त्यातली एक वडी हातात घेऊन मला म्हणाले,"हं.. तोंड उघड.."
"अहो ऐका तर सही माझं जरा.." मी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला.
"नाही. अजिबात नाही. आज मी खूपच खुश आहे.. आधी तू तोंड उघड.."
"ही डायरी माझी नाही आहे." माझ्या तोंडून आपोआप निघून गेलं. ताईंना दिलेल्या वचनाला नाही जागू शकले मी.
यांना खूप आश्चर्य वाटलं. "तुझी नाहीये !!! मग कोणाची आहे?" ते परत पानं उलटीपालटी करून त्यात नाव मिळतं का शोधायचा प्रयत्न करायला लागले. मी त्यांना मध्येच थांबवत म्हणाले,"जिची आहे तिचं यात कुठेही नाव नाही आहे. तुम्हाला तिचं हस्ताक्षरसुद्धा नाही ओळखता येते का?"
"कोणाचं?" त्यांनी धडधडत्या हृदयाने विचारलं.
"छायाताई.." मी पूर्ण वाक्य नाही बोलू शकले. डोळे आसवांनी भरून गेले.
तेही काहीवेळ सुन्न होऊन गेले. काहीवेळ तिथेच बसून राहिले आणि मग डायरी एका बाजुला ठेवून पलंगावर जाऊन निपचित पडून राहिले.
मी त्यांच्याजवळ गेले,"ताईंनी मला नाही सांगितलं होतं तुम्हाला सांगायला. त्यांना भीती होती की तुम्ही स्वतःलाच दोषी नको ठरवून घ्यायला. सगळे निर्णय हे त्यांचे स्वतःचे होते. ही डायरी त्यांच्या कॉलेजजीवनातली आहे.. तेव्हाच त्या तुमच्यावर.."
"प्लिज.." ते एका लहान मुलाप्रमाणे हमसून हमसून रडायला लागले. "आता काहीच बोलू नकोस. तुला माहिती नाही.. मी.. नाही.. नाही... अख्ख्या जगात माझ्यासारखा माणूस कोणी नसेल.. जिनी माझ्यावर इतकं निरतिशय प्रेम केलं.. पूर्ण आयुष्य ज्याच्या केवळ आठवणींवर पूर्ण आयुष्य व्यतीत केलं... हो.. हो... माझ्याच मनात .. माझ्याच मनात विचार आला होता.. क्षणभरासाठी का असेना पण माझ्याच मनात विचार आला होता.. की जर ती मरून गेली.. तर तिचं.. तिचं कर्ज..."

मी आवाक झाले होते. आज मला त्यांच्या चेहऱ्यावरच्या त्या भावांचे अर्थ कळत होते. आजवर मी देवाकडे हेच मागितलं होतं की प्रत्येक जन्मी मला नवऱ्याच्या रुपात आकाशच मिळावेत... पण आज... आज मी मनापासून प्रार्थना करत आहे की जर यांचा दुसरा जन्म होणार असेलच तर तो पूर्णपणे ताईंकरताच असावा जेणेकरून ते त्यांच्या निस्सीम प्रेमाच्या कर्जाला चुकवू शकतील.. आपल्या अपराधाचं प्रायश्चित्त करू शकतील.."

यांच्या डोळ्यातून अजूनही अश्रूंच्या अविरत धारा वहात होत्या.

मूळ कथा - कर्ज़
मूळ कथालेखक - शैलेन्द्र सिंह परिहार
स्वैर अनुवाद - वेदश्री

दगाबाज मैत्रिण

रायगडमधल्या आमच्या छोट्याशा गावात जिकडेतिकडे एकच चर्चा होती.. आस्थाच्या नवऱ्याच्या खुनाची. मला चीड येत होती ती याबद्दलच्या लोकांच्या आपापसातल्या कुजबुजण्याची. तिची मैत्रिण म्हणून मला समजलं असतं ना ते काय बरळतायत तर मग मी त्यांना सरळ केलं असतं.

आस्था तर पुरतीच मोडली होती. "मंजिरी, जर तू नसतीस..", माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत ती," तर मी वेडीच झाले असते. गावातल्या सर्वच जणांना असं वाटत आहे की धीरचा खून मीच केला आहे. प्रश्नांचा भडिमार करून पोलिससुद्धा मलाच भंडावून सोडत आहेत."

आस्था आणि मी अगदी बालपणीपासूनच्या मैत्रिणी. पदवीपर्यंतचं शिक्षण देखिल एकाच कॉलेजमधून. बॉयफ्रेंडसाठी एकमेकींशी भांडायचो आणि मग माफही करायचो एकमेकींना. खरं तर तीच मला माफ करायची बऱ्याचदा.. कारण आम्ही एकदम जीवलग मैत्रिणी ना. स्वतःसाठी तिचे बॉयफ्रेंड गटवण्यात मी खूप पटाईत होते.

आस्थाने जेव्हा एकदम स्मार्ट आणि चांगल्या घरातल्या आणि राजकीय वर्तुळात कार्यरत अशा धीरेंद्र सिंग (धीर)शी लग्न केलं, तेव्हाही आम्ही छान मैत्रिणी होतो. मी मुंबईत राहायचे. उच्चभ्रू वर्गातल्या लोकांना सौंदर्यवर्धनासाठी पर्सनल ट्रेनिंग देण्याचं काम मी करत होते. अधूनमधून घरीही चक्कर असायचीच माझी. अशीच एकदा घरी गेलेली असताना धीरने सुंदर दिसण्यासाठीच्या मार्गदर्शनासाठी माझ्याकडे मदत मागितली होती. नजीकच्या भविष्यात असलेल्या निवडणुकीत मतदारांवर छान छाप पडावी हा त्याचा हेतू होता.

त्याला मी काही व्यायाम सांगितले. त्याचा व्यायाम झाल्यावर आम्ही फळांचा रस प्यायचो आणि मग काही त्याच्या कार्यालयीन कामाबद्दलच्या गप्पा व्हायच्या. आधी मला वाटलं होतं की कॉलेजमध्ये असताना जसं आस्थाच्या इतर बॉयफ्रेंड्सबद्दल झालं तसंच हेही प्रकरण चाललं आहे, पण धीरने मला लक्षात आणून दिलं की त्याला फक्त आणि फक्त निवडणुकीत मतदारांवर छाप पडावी या दृष्टीने सौंदर्यवर्धनाबद्दलच्या मार्गदर्शनासाठी माझ्याकडून मदत हवी होती आणि त्याहून जास्त काहीच नाही. त्याने मला हेही साफ शब्दात सांगितलं की त्याचं आस्थावर खूप खूप प्रेम आहे आणि कुठलाही गैरसमज मनात निर्माण होऊ देणे योग्य नाही. त्याने आमची ही ओळख कामापुरतीच मर्यादीत ठेव असे बजावले.

ह्म्म.. धीरेंद्रने आस्थाबद्दल इतका प्रामाणिकपणा दाखवावा असं त्या लाजऱ्या गोड मुलीत आहेच काय? आधी कधीच असं झालं नव्हतं की मला तिचा कुठला बॉयफ्रेंड गटवायचा आहे आणि त्याने मला अशाप्रकारे नाही म्हटलं असेल. मग माझ्या लक्षात आलं की मी जेव्हापण त्याच्याकडे गेले होते तेव्हा त्याच्या ऑफीसातच गेले होते. त्याला निवडणुकीत छान छाप पाडायची होती आणि म्हणून कदाचित तो असं वागण्याचं ढोंग करत असेल कारण तिथे सगळेजण त्याला नेहमीच नीट बघत असणार.

त्याला त्याच्या घरी भेटून जाणवून द्यायचं ठरवलं की तो माझ्यासोबत आला तर त्याच्या आयुष्यात त्याला किती धमाल मजा मिळू शकते. व्यायामासाठी नविन वजने ( वेट्स ) देण्याच्या निमित्ताने मी त्याच्या घरी गेले.. अर्थातच आस्था घरी नसेल याची खात्री करून घेऊनच. माझा विश्वासच नाही बसत की मी तिथे पोहोचताच धीरेंद्रने रागाने फणफणत मला सांगितले,"माझे आस्थावर अत्यंत प्रेम आहे आणि तू इथून निघून जा."

माझ्याकडे पाठ करून तो दुसऱ्या खोलीत निघून चालला होता. त्याला दुखापत पोहोचवण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता पण त्याची एकंदर वागणूकच माझ्या डोक्यात गेली. जी वजने मी त्याच्यासाठी आणली होती, ती तिथेच तशीच पडून होती.

मी त्याला आणखीन जोरात हाणायला हवं होतं असं वाटलं मला पण तो अजिबात हलत नव्हता. मी पटकन खोलीतून बाहेर निघाले आणि माझं सगळं विचारचक्र थांबवलं. झाल्या गोष्टीबद्दल कुठलाही पुरावा मागे राहू द्यायचा नाही याची यथोचित काळजी घ्यायचं ठरवलं. आस्थाच्या घरी आधीही बऱ्याचदा येऊन गेलेली असल्याने कुठे काय ठेवलेलं असतं हे सगळं मला अगदी पक्कं माहिती होतं. त्यादिवशी तिची मोलकरीणदेखील निघून गेलेली होती. मी धावत वरच्या मजल्यावर जाऊन आस्थाचं एक ब्रेसलेट घेऊन आले आणि ते किंचित तोडून धीरच्या शरीराखाली सरकवून दिलं. घरातून बाहेर पडत मी पूर्ण खात्री करून घेतली की दरवाजाचा लॅच नीट लागलेला आहे आणि मग मी माझ्या जीवलग मैत्रिण - आस्थासोबत लंच करायला निघून गेले.

आस्थाने पोलिसांना सांगितले होते की ती शिवरत्न हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा मी तिथे तिची वाट बघत बसले होते. आम्ही दोघींनी ठरवलेलं होतं की आम्ही एकत्रच लंच करू. अम्म.. नाही, कोणीच आम्हाला पाहिलं नव्हतं. आम्ही दोघीच होतो तिथे. तिने सांगितले की लंचनंतर ती घरी गेली आणि तिने पाहिले की धीर मरून पडला होता.

मी माझा जबाब देताना पोलिसांना सांगितले की त्यादिवशी मी धीरला पाहिलंच नव्हतं आणि आस्थाने जी लंचची कहाणी सांगितली होती तिलाच पाठिंबा दिला. मी जे काही सांगते आहे ते खरं नाही असा आव आणण्याकरता मी जबाब देताना मुद्दाम डोकं खाली घातलं होतं. पोलिसांना खात्री पटायला हवी होती ना की मी माझ्या जीवलग मैत्रिणीला वाचवायचा प्रयत्न करते आहे.

सगळ्या गावाला माहिती होतं की आस्थाला एका राजकारण्याची बायको म्हणून राजधानीत जाऊन राहायला अजिबात आवडत नव्हतं. तिला फक्त रायगडमध्ये रहायचं होतं आणि मुलांच्या शिक्षणाकडे आणि संस्कारांकडे लक्ष द्यायचं होतं. सगळ्यांना एकच माहिती नव्हतं - आणि मीही ते त्यांना कळू दिलं नाही - लंचच्या वेळेस आस्थाने मला सांगितलं होतं की तिने तिचं मत बदललं आहे आणि ती धीरला आता त्याच्या राजकीय क्षेत्रातही जमेल तितकी मदत करणार आहे. ती म्हणाली होती की जर यातच त्याला आनंद होणार असेल तर तिलाही मदत करण्यात आनंद आहे.

आस्थाने तिच्या मतपरिवर्तनाबद्दल फक्त मलाच सांगितले होते. त्यामुळे मला वाटले की तिच्याकडे खून करण्यासाठी कारण होतं, साधन होतं, संधी होती आणि तिचं ब्रेसलेटसुद्धातर सापडलं होतं जिथे धीरेंद्र मरून पडला होता. अजून काय हवं होतं पोलिसांना? थोड्याचवेळात ते आस्थाला अटक करून घेतील. थोड्याशा ळेचाच काय तो खेळ उरला होता !

मी आस्थाला खात्रीशीर सांगितलं होतं की मी तिच्यासोबत असेन. आणखीन एक मदत माझ्याकडून माझ्या संकटात सापडलेल्या मैत्रिणीला ! पोलिस आधीच येऊन बसलेले होते. आस्था वाचनालयातल्या सोफ्यावर मान खाली घालून बसली होती. मान वर करून माझ्याकडे बघणंही तिला अवघड झालं होतं जणू. मी तिथे पोहोचले तेव्हा मला खूप समाधानी वाटत होतं. इन्स्पेक्टर पटेलने मला प्रश्न विचारायला सुरूवात केली आणि सगळाच नूर पालटत गेला.

धीरचा खून मीच केला आहे असे त्याने सांगितले. सगळेजण परत आपापसात धीरेंद्रबद्दल कुजबुजत सांगायला लागले की धीरेंद्रच्या पर्स्नल सेक्रेटरीने ऑफीसमध्ये आमचे बोलणे ऐकले होते. कशाप्रकारे मी बोलले होते आणि धीरने नाकारलं होतं वगैरे. "पण ते सगळं केवळ प्रासंगिक होतं." या माझ्या म्हणण्याकडे त्याने साफ दुर्लक्ष केलं. पोलिसांनी बोटांचे ठसे वगैरे गोष्टी शोधून काढल्या होत्या. एकूणात आता मी संशयित होते.

बापरे ! याचा अर्थ आता ते माझ्याविरुद्ध सर्च वॉरंट काढू शकणार होते. म्हणजेच माझ्या बॅग्स धुंडाळू शकणार होते. बॅगेतच तर मी ते वजनं ठेवले होते - ज्यामार्फत मी धीरला माझ्या नजरेतून हे जग दाखवलं होतं ! मी विचार केला होता की कुठे टाकले तर कोणाला सापडायचे आणि प्रश्न उपस्थित व्हायचे.. त्यापेक्षा मी ते बॅगमध्येच राहू देणं जास्त श्रेयस्कत जोपर्यंत मी हे गाव सोडून जात नाही.

धीरेंद्र इन्स्पेक्टर पटेलचा मित्र होता. त्याच्या एकूणच बोलण्यात धीरच्या मरण्याबद्दलचं दुःखं झळकत होतं. त्याने मला विचारलं," त्याला दोनदा का मारलंत? दोनदा नसतंत मारलं तर जिवंत राहिला असता तो."

जर मी त्याला दोनदा मारलं नसतं तर धीर जिवंत राहिला असता.. दोनदा मारलं नसतं तर.. दोनदा??? पण मी तर त्याला एकदाच मारलं होतं.

पोलिस जसे मला आस्थासमोरून घेऊन जायला लागले तसं तिने मान वर करून पाहिलं. ही माझी कल्पना तर नाही? तिच्या दुःखी डोळ्यात एक राक्षसी आनंद आणि चेहऱ्यावर एक विचित्र क्रूर हास्य दिसत होतं ! तिने माझे हळूच माझे हात हातात घेतले आणि म्हणाली," आणि मी समजत होते की आपण अगदी जीवलग मैत्रिणी आहोत."

मूळ कथा - Unfaithful friend
मूळ कथालेखक - अभिजीत आनंद
स्वैर अनुवाद - वेदश्री

शेवटची हाक

"नीलू, मला उद्या एका मिटींगसाठी दिल्लीला जायचे आहे, तुला चलायचं असेल तर तूही चल. तसंही तुला तुझ्या मैत्रिणीच्या लग्नाला जायला जमलं नव्हतं ना.. मग याच निमित्ताने तिला भेटून पोटभर गप्पा मारता येतील तुला. "

रितेशचं हे बोलणं ऐकून मनात एक अनामिक उत्साह संचारला. माझी सगळ्यात आवडती मैत्रिण-अर्पिता. कधी एकदा तिला भेटते असं झालं मला. तिच्या नवऱ्याबद्दल अधिक जाणून घेण्याची जबरदस्त इच्छा निर्माण झाली. ३ महिन्यापुर्वी जेव्हा तिच्या लग्नाचं आमंत्रण आलं तेव्हा माझा अजिबात विश्वासच बसला नव्हता. अर्पिता लग्न करतेय?! परत परत नाव वाचून आणि फोनवर तिच्याशी बोलून खातरजमा करून घेतली की ती लग्न करते आहे.. अर्पिता.. जिच्यामते लग्न म्हणजे गुलामीचं दुसरं नाव.. एक असा पिंजरा की ज्यात अडकलेली स्त्री म्हणजे एक पंख छाटून टाकलेला पक्षी जो लाचारीचं जीणं जगून कुढत कुढतच मरतो !

अर्पिताला मी बालपणापासून ओळखते. एक वेगळ्याच प्रकारची मुलगी होती ती. मेरठच्या माझ्या घराला लागूनच होतं तिचं घर. आमच्या दोघींचं खूप पटायचं...सोबतच खेळायचो, शाळेत जायचो, गच्चीत लपून बसून तासतासभर गप्पा मारायचो.. तिच्या आईवडलांनी फारकत घेतली होती आणि ती वडलांसोबत राहायची. शाळा संपल्यावर पुढचं शिक्षण घ्यायला ती दिल्लीला हॉस्टेलमध्ये राहायला गेली तरीही अधूनमधून पत्रातून तर कधी फोनवर का होईना आमच्या गप्पा होत राहिल्या आणि मैत्री जपली गेली आमची.

तीन वर्षापुर्वी मी अर्पिताला भेटले होते तेव्हा आम्ही २-३ दिवस सोबतच घालवले होते. तेव्हा तिच्यात झालेले बदल पाहून मी अगदी आश्चर्यचकित होऊन गेले होते. लहानपणची ती हसरी, खट्याळ, बडबडी अर्पिता आता पार बदलली होती. जुन्या अर्पिताचा लवलेशही सापडायला जाता सापडत नव्हता. तिची जागा एका आधुनिक अर्पिताने घेतली होती जी अगदी टॉमबॉय प्रकारातली होती. स्त्रीसुलभ लाज, कोमल स्वभाव तर दूरदूरपर्यंत कुठेच दिसत नव्हता.. दिसत होती फक्त आपल्याच हिंमतीवर सगळं आयुष्य जगण्याचा दावा करणारी, स्वतंत्र, स्वच्छंद, स्वतःच्या पायावर उभी, किंचित जास्तच अभिमानी आणि इतर मुलींपेक्षा स्वतःला वेगळं आणि उच्च दर्जाची समजणारी अशी काहीशी अर्पिता.. लग्न करून घरदार सांभाळणे म्हणजे फुटकळ काम असं समजायला लागली होती ती. "नाही बाई, माझ्याकडून नाही होणार जन्मभर कुठल्या पुरुषाची गुलामी करणं.. मी माझ्या आयुष्यात खुश आहे आणि यात कोणाचा हस्तक्षेप मला खपणार नाही.." असं ती मला म्हणाली होती.

अर्पिता नेहमी म्हणायची," भारतातल्या लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. नेहमी इतरांच्या आयुष्यात डोकावण्याची घाणेरडी सवय असते या लोकांना."
माझ्यासमोर तिचा घरमालक एकदा चुकून तिला विचारून बसला,"बाळ, या २-३ दिवसात दिसली नाहीस. कुठे बाहेरगावी गेली होतीस का?"
बस्स ! अर्पिताच्या भुवया लगेच वाकड्या झाल्या.
"बघितलंस ना? हे लोकं कशाप्रकारे माझ्या आयुष्यात नाक खुपसतात ते? मी कधीही येईन.. कधीही जाईन.. जगेन किंवा मरेन.. यांना काय देणंघेणं असायची गरज आहे?.."
एवढ्याशा प्रश्नाला ती तिच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ मानून मोकळी झाली होती !

अर्पिताचा हा अवतार बघितलेला असल्याने या बाईसाहेब लग्नाच्या फंद्यात कशा काय पडल्या हे जाणून घ्यायला मी अगदी अतोनात अधीर झाले होते. तो कोण महान पुरूष आहे, ज्याचा हस्तक्षेप आयुष्यभरासाठी मानायला अर्पिता तयार झाली? तीपण माझ्याचसारखी घरातली लहानमोठी कामं बघत असेल का? याच विचारात मी इतकी गुरफटले की मला कळलंच नाही कधी आवश्यक सामानाची बांधाबांध करून करून दिल्लीला जायला तयारही झाले ते !

पूर्ण प्रवासात मी रितेशला अर्पिताबद्दल सांगत होते आणि त्याला जे ऐकायला मिळत होतं त्याबद्दल त्याला आश्चर्य वाटत होतं. शेवटी एकदाचे आम्ही अर्पिताच्या घरी जाऊन पोहोचलो आणि परत एकदा तिच्या बदललेल्या रुपाने मला धक्का दिला.

मागच्या वेळेस भेटलेली जबरदस्त नखरे असलेली अर्पिता आज अगदी भारतीय गृहिणीसारखी सामोरी आली होती ! एकदम छान नीटपणे घातलेली सुती साडी, वेणीत गुंफलेले केस, या सर्वाला साजेसा हलकासाच दागिन्यांचा पेहेराव.. एकूणतच एकदम नविन अर्पिता ! आमचा एकदम छान पाहुणचार केला तिने. रितेश चहा पित पित मध्येमध्ये माझ्याकडे रोखून बघत होता, जसं काही नजरेतूनच म्हणत होता,'काय गं? तू सांगितलंस काय आणि ही आहे कशी?' ! माझ्याकडे नजर खाली करण्यावाचून दुसरा काही पर्यायच ठेवला नव्हता अर्पिताने.

अर्पिताचे यजमान ३-४ दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. माझं खरंतर रितेशसोबत गेस्टहाऊस मध्ये राहण्याचं ठरलं होतं, पण अर्पिताने माझ्यामागे लागून तिच्याच घरी राहण्याबद्दल मला आणि रितेशला मनवलं. थोड्यावेळाने रितेश ऑफीसच्या कामानिमित्ताने निघून गेला आणि तो जाताच मी तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. "हे काय? का? कसं?" वगैरे वगैरे.. माझी अधीरता पाहून अर्पिता खळखळून हसायला लागली. तिच्या हसण्यातून मला माझ्या बालपणच्या अर्पिताचंच ते निरागस हसणं आठवलं आणि त्या आठवांनी अगदी रोमांचित करून टाकलं.

"अगं तू आत्ताच तर आली आहेस. सगळं काय एका दमात जाणून घ्यायचं आहे की काय तुला? थोडावेळ जरा आरामात बैस तर खरी. मी जरा १-२ कामं आटोपून घेते.. मग निवांत गप्पा मारूयात.. काय?" असं म्हणून अर्पिता स्वयंपाकघरात निघून गेली. काहीवेळ दिवाणखान्यातच बसून मग मीही तिच्यामागे स्वयंपाकघरात गेले.
"का गं? काय बनवते आहेस?"
"भरली वांगी आणि कचोरी."
"वाह ! सहीच की, पण आत्ता मला अजिबात भूक नाही गं. आत्ताच तर पोटभर नाश्ता केला की !"
"तुला देतंच कोण आहे पण? हे तर मी माझ्या शेजारणीकरता बनवते आहे. संध्या आहे तिचं नाव.. आई बनणार आहे ती काही दिवसांतच. तिसरा महिना चालू आहे तिचा आता. आजकाल तिला चटपटीत खायची खूप इच्छा होते आहे पण मॉर्निंग सिकनेसमुळे तिला स्वयंपाकखोलीतसुद्धा जाता येत नाही. काल असंच बोलताबोलता विषय निघाला तर म्हणत होती की तिला भरली वांगी आणि कचोरी खाण्याची खूप इच्छा होते आहे, म्हणून आज ठरवलं की सरप्राईज देऊन तिला खाऊ घालावं."
मला आणखीन एक धक्का बसला हे ऐकून ! शेजाऱ्यांनी ख्यालीखुशाली विचारण्यालाही आयुष्यातली दखलंदाजी मानणारी मुलगी आज शेजारणीलाच सरप्राईज देऊन काहितरी चटपटीत खाऊ घालू इच्छित होती. माझा अजिबात विश्वासच बसत नव्हता. मी तिच्या कपाळावर हात ठेवून तब्ब्येत ठीक आहे ना? बघत असल्याचं नाटक केलं.
"चल गं.. काय हे? मी बदलले आहे आता."
"ते तर मी बघतेच आहे.. पण हे सगळं कसं काय झालं काहीच कळत नाही आहे."
"ते सगळं मग सांगते तुला. आधी जरा मी संध्याला हे देऊन येते." असं म्हणत अर्पिता दोन्ही जिन्नस घेऊन निघून गेली. थोड्यावेळाने परत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जबरदस्त समाधान आणि आनंद झळकत होता.
"तुझ्या शेजारणीला खूपच आवडलेलं दिसतंय तुझ्या हातची भरली वांगी आणि कचोरीही."
"हो ना ! ती इतकी खुश झाली की मी तुला काय सांगू?! तिचा आनंदी चेहरा पाहूनच माझं पोट भरलं. खरंच.. दुसऱ्यांसाठी काहितरी चांगलं करून त्यांना आनंद देण्यात कित्ती सुख असतं.. पण हे किती उशिरा शिकले मी.." असं म्हणताम्हणता अर्पिताच्या डोळ्यात एक अजबच सुनेपणा पसरला.. शून्यात बघायला लागली होती ती जणू काही.. भूतकाळातल्या कुठल्यातरी गोष्टीत अडकली होती बहुदा.. काही क्षण तिथेच घुटमळल्यासारखी वाटली पण लगेच वर्तमानात येत म्हणाली,"तू बोल की काहितरी तुझ्याबद्दल.. घरात सगळे कसे आहेत?"
"ए आता खूप झालं हं तुझं.. माझ्या सहनशक्तीची सीमा गाठायला लावू नकोस आता तू मला.."
"म्हणजे?" अर्पिताने हसून विचारलं.
"म्हणजे हे की तुझ्या व्यक्तिगत डायरीचं एकेक पान मला वाचायचं आहे. या आधी जेव्हा भेटलो होतो तेव्हा तू अजिबात अशी नव्हतीस.. त्यानंतर असं काय झालं की ज्यामुळे तू इत्तकी बदलून गेलीस?"
"सांगते.... सांगते.... मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे...

मी माझी नोकरी बदलली होती त्यामुळे राहायसाठी फ्लॅट शोधत होते ऑफीसच्या जवळच्याच भागात. खूप मुश्किलीने मला एक घर मिळालं. तिथे आसपास राहणारी मंडळी ही जास्तकरून मध्यमवर्गीय किंवा त्याखालच्या वर्गातलीच होती. प्रत्येकाला शेजारच्या घरातलं सगळं माहिती असायचं. कोण कधी जातं.. कोण कधी येतं.. कोण आजारी आहे.. तुला तर माहिती आहे की मला या सगळ्या गोष्टींचा किती जबरदस्त राग यायचा ते. म्हणूनच की काय सुरूवातीपासूनच मी आसपासच्या सर्वांशीच अगदी तुटकतुटक वागायचे.. त्यांच्यात असूनही नसल्यासारखीच म्हण ना. माझ्याच रूमसमोर एक वयस्कर जोडपं एकटंच राहायचं. ऑफीसला जाताना किंवा परत येताना त्या काकूंशी नेहमीच नजरानजर व्हायची. त्या माझ्याशी बोलण्यासाठी आणि मी त्यांना चुकवण्यासाठी मनापासून हरेक असे ते शक्य प्रयत्न करायचो.

एकदा मला अगदी जबरदस्त ताप आला होता. माझ्या रूमच्या बाहेर पडून राहिलेल्या दूधाच्या पिशव्यांवरून की वर्तमानपत्रावरून माहिती नाही पण त्या काकूंना कळलं की माझी तब्ब्येत खराब आहे आणि माझी परिस्थिती इतकी खराब आहे की बाहेर येऊन मी माझ्यासाठी आलेली दुधाची पिशवी आत घेऊन जाऊन तेच का होईना पण पिऊ शकेन. तेव्हा आठवडाभर त्यांनी अगदी माझ्या आईने घेतली असती अशी काळजी घेतली माझी. माझी तब्ब्येत ठीक झाली तरीही त्यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्या काही ना काही माझ्या खाण्यासाठी बनवून आणायच्या आणि माझ्याजवळ बसून गप्पा मारायला लागायच्या. त्यांचं एकंदर वागणंच इतकं प्रेमळ होतं की बस्स ! त्यांचं मला 'बाळ' म्हणून संबोधणंही मला खूप आवडायला लागलं होतं... पण परत तेच प्रश्न.. घरचे कुठे असतात?.. लग्न का नाही करत?.. मुलींचं असं एकट्याने राहणं बरं नाही.. बस्स.. मला त्यांचा हळूहळू राग यायला लागला. मी त्यांना बघून न बघितल्यासारखं करायला लागले. घरी आल्यावर दरवाजा बंद करून घ्यायला लागले आणि त्यांनी २-३दा हाका मारल्या तरी दरवाजा उघडायचे नाही.. ४थ्यांदा उघडला तर उघडायचे.

एक दिवस असंच रविवार होता. मी सकाळी मस्त आरामात बसून नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत बसले होते. तेवढ्यात दरवाजावर ठकठक आणि पाठोपाठ काकूंची हाक. सकाळी-सकाळी डोक्याला नसती किटकिट नको बुवा म्हणून मी दरवाजाच उघडला नाही. काहीवेळा हाका मारून त्या निघून गेल्या आणि मीपण ती गोष्ट विसरून गेले.

संध्याकाळी मी कुठे बाहेर निघाले होते, तेव्हा आमच्या बिल्डींगच्या वॉचमनने मला पाहून विचारलं,"मॅडम, ते तुमच्याशेजारी राहतात त्या काकांची तब्ब्येत आता कशी आहे?"
"का? काय झालं त्यांना?" मी घाबरून विचारलं.
"अरेच्चा ! तुम्हाला नाही माहिती? सकाळीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. खूप वाईट परिस्थितीत होते ते जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. अगदी पाण्याविना मासा तळमळावा तसे तडफडत होते ते. असं वाटत होतं जसं काही शेवटचेच क्षण मोजत आहेत. माहिती नाही वाचले तरी असतील की नाही ते.. मला वाटलं तुम्ही त्यांच्या शेजारीच राहता तर तुम्हाला कदाचित माहिती असेल त्यांच्या तब्ब्येतीबद्दल.."
हे सगळं ऐकून तर जणू काही माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ओह गॉड.. सकाळी कदाचित काकू माझी मदतच मागायला आल्या असाव्यात.. आणि मी दरवाजाच उघडला नाही. माझ्या या निष्ठूर वागण्यावर माझा अंतरात्मा मला दूषणे द्यायला लागला. इकडूनतिकडून चौकशी करून खूप मुश्कीलीने मला त्या हॉस्पिटलचा पत्ता मिळाला. मी तिथे धावतपळत पोहोचले तर खरी... पण पोहोचल्यावर कळालं की काकांचा मृत्यू झाला होता.. काकांच्या पार्थिवाशेजारी काकू अगदी असहाय्य आणि अगदी एकट्याच पडल्यासारख्या बसल्या होत्या. त्यावेळी काकूंनी मला ज्या नजरेनी पाहिलं ती नजर मी या जन्मी कध्धीच विसरू शकत नाही.

काकूंना हॉस्पिटलमधल्या फॉर्मॅलिटीज समजत नव्हत्या. मी ते सगळं बघितलं.. त्यांना काही मुलबाळ नव्हतं. कुठल्या नातेवाईकांना बोलवायला त्यांनी नकार दिला...म्हणाल्या,"जिवंतपणी कोणी विचारलं नाही मग आता त्यांच्या मृत्यूनंतर तरी कशाला कोणाचे उपकार घेऊ मी?" काकांचा अंतिमसंस्कार विद्युतदाहिनीत करवला गेला...

माझ्या हृदयावर केल्या गुन्ह्याचं ओझं वागवत मी त्यांच्यासोबत एक आठवडाभर राहिले आणि त्यांची काळजी घेतली. बोलताबोलता त्यांनी मला सांगितलं,"जेव्हा तुझ्या काकांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हाच नेमका आमचा फोन खराब झालेला होता. मी तुझ्याकडे मदत मागायला आले होते. दरवाजा ठोठावला होता.. तुला हाकाही मारल्या होत्या. वाटलं होतं, तू तुझ्या कारमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकशील किंवा किमान फोन करून अंब्युलन्स तरी बोलावशील... पण माझं दुर्भाग्य बघ की तूही घरी नव्हतीस.. बाहेरून फोन करण्यात आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात झालेल्या काही मिनटांच्या विलंबानेच त्यांचा जीव गेला. डोक्टर म्हणत होते की १० मिनिट जरी आधी आले असते तरी ते नक्कीच वाचले असते.. जाऊ दे.. नियतीचा खेळ आहे हा.. कोण वाचू शकलंय यातून.."

"मी त्यांना काय म्हणू शकत होते.. कसं सांगू शकणार होते की त्या निर्मम क्षणी मी घरीच होते पण माझ्या क्षणैक स्वार्थाने मी दरवाजा उघडला नाही आणि नाहूतपणे त्यांच्या सौभाग्याला मृत्यूच्या अक्राळविक्राळ जबड्यात ढकललं होतं..." अर्पिता धाय मोकलून रडत होती. तिची ही एकंदर कहाणी ऐकून मलाही गहिवरून आलं होतं.

"काय सांगू तुला नीलू, आजही माझ्या मनावर त्या गुन्ह्याचं ओझं मी वाहते आहे. काकू जेव्हापर्यंत या जगात होत्या तेव्हापर्यंत मला त्यांची सगळ्यात जवळची हितचिंतक मानत राहिल्या आणि मी... मीच त्यांचं सर्वस्व हिरावलं होतं त्यांच्यापासून.."

"असं नको बोलूस गं अर्पिता.. तुला काय माहिती होतं की त्या संकटात आहेत म्हणून.."

"याचंच तर दुःखं आहे ना नीलू.. संकट आधी सांगून थोडीच येतं.... जेव्हा त्या मला आपलं समजून माझ्याकडे मदत मागायला आल्या तेव्हा मी त्यांना माझ्यापर्यंत पोहोचायची संधीच दिली नाही.. त्या दिवसानंतर त्या कधीच माझ्या घरी आल्या नहईत.. माझ्या दरवाजावरची त्यांची ती शेवटची हाक आजही माझ्या कानात घुमते.. त्या हाकेने माझं सग्गळं आयुष्य पाऽऽर बदलवून टाकलं.. आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच पार बदलला. ज्या सामाजिक मूल्यांची मी खिल्ली उडवायचे, त्यांचाच गहिरा अर्थ उलगडून माझ्यासमोर आला होता जणू काही.. हळूहळू मी माझ्या आसपासच्या लोकांना सन्मानाच्या नजरेनी बघायला लागले आणि मग मला कळायला लागलं की एकमेकांच्या सुखदुःखात एकमेकांच्या उपयोगी पडून, दुसऱ्यांच्या कामात हातभार लावल्याने जीवनात किती आनंद प्राप्त होतो.."
"काहीशी त्याचवेळी माझी ओळख राजशी झाली. माझ्याच ऑफीसमध्ये नव्यानेच रुजू झालेला राज दिसायला ठीकठाकच पण उच्चविचार आणि दुसऱ्यांना मदत करणे वगैरेसारख्या त्याच्या गुणांमुळे मला तो खूपच आवडला. आम्ही जवळ येत गेलो आणि मग घरच्यांच्या संमतीने नवराबायको झालो. आज मी माझ्या संसारात आणि आजूबाजूच्या सर्वांमध्ये खूप खूप सुखी आहे.. पण त्या काकूंची ती शेवटची हाक आजही एका गळफासाप्रमाणे माझ्या मनाला जीवघेणी आवळत जाते, आणि काही केल्या मी त्यातून सुटका मिळवू शकत नाही." मी अर्पिताच्या हातावर सहानुभूतीने हात ठेवले.

३-४ दिवस कसे भुर्रकन् उडून गेले काही पत्ताच लागला नाही. आम्ही कित्ती मनसोक्त गप्पा मारल्या, कडूगोड अनुभव दिलेघेतले.... पण अर्पिताच्या मनाला डाचणारी ती 'शेवटची हाक' मी नाही घालवू शकले.

मूळ कथा - 'अंतिम दस्तक'- 'मेरी सहेली' (संपादक - हेमामालिनी ) मे २००६
मूळ कथालेखिका - दीप्ति मित्तल
स्वैर अनुवाद - वेदश्री.

नको ते धुम्रपान...

"मे आय कम इन सर?"
"येस."
"सर, आय विल नॉट टेक मच ऑफ युअर टाईम. आय जस्ट वाँटेड..."
"बसून बोललीस तरी चालेल तू."
प्रोजेक्ट मॅनेजर मराठीत बोलल्याने स्वरुपाला खूप बरं वाटलं.
"सर, मला प्रोजेक्ट बदलून हवा आहे."
"अच्छा. कोणाच्या प्रोजेक्टमध्ये आहे तुला इंटरेस्ट?"
"सर, पण मला प्रोजेक्ट का बदलून हवा आहे ते नाही का विचारणार तुम्ही मला?"
"कारण मला माहिती आहे म्हणूनच विचारतो आहे की ते कारण कोणाच्या ग्रुपमध्ये टळेल अशी तुला खात्री वाटते आहे ते सांग. मी तुला त्या ग्रुपमध्ये टाकतो. मी करेन तुला मदत."
"मालिनी. तिच्याकडचा प्रोजेक्ट इंटरेस्टींग सुद्धा आहे आणि तिच्याकडे मला काहीच प्रश्न नाही काम करायला.."
"तथास्तु बालिके."
धन्यवादादाखल हलकेच हसून अग्गदी आनंदाने कुठलंसं गाणं गुणगुणत स्वरुपा प्रोजेक्ट मॅनेजरच्या कक्षाबाहेर पडली. नेहमीचा तिचा हसरा चेहरा आज आणखीच जास्त खुलला होता. स्वतःच्या जागी परत जाताना मध्येच नेहाच्या जागी थांबून तिच्या डोक्यावर टपली मारत ती तिला म्हणाली,"नेहा, आज दुपारी टेबल टेनिस खेळुया बरं का न चुकता. येशील ना ?"
आश्चर्यचकीत होत नेहा,"हे चक्क तू विचारते आहेस स्वरा? इतके दिवस मी तुला विचारायची आणि तू भंजाळलेल्या अवस्थेत असायचीस आणि उडवाउडवीची कारणं देत नाही म्हणायचीस आणि आज चक्क इतकं परिवर्तन तुझ्यात.. आश्चर्य आहे. काय बढती वगैरे काही मिळाली की काय?"
"छे आत्ताच तर आले आहे या ऑफिसमध्ये. लगेच कुठली आलीये बढती?"
"मग राज क्या है आखिर आपकी इस खुशीका?"
"प्रोजेक्ट बदलून मिळाला मला." आनंदातिशयाने स्वरुपा उद्गारली.
"काऽऽऽय? तुला वेडबिड लागलंय का स्वरा? अगं तू चक्क निखिलचा प्रोजेक्ट सोडलास? आय जस्ट कांट बिलिव्ह धिस.."
"माझाच विश्वास नाही बसत आहे की मी सुटले त्या असह्य त्रासापासून.."
"अगं पण तूच म्हणत होतीस काही दिवसांपूर्वी की तुला खूप नविन शिकायला मिळण्याच्या शक्यता आहेत त्या प्रोजेक्टमध्ये वगैरे. मग?"
"प्रोजेक्ट अप्रतिम आहेच गं पण निखिलचं स्मोकींग.. आऽऽई गं.. काही प्रॉब्लेम आला काम करताना आणि त्याला विचारायला गेलं तर इतका उग्र दर्प यायचा की 'समजावू नको पण स्मोकींग आवर.' असं म्हणायची पाळी यायची अगदी. इतके दिवस केलं मी सहन पण आता जशीजशी डेडलाईन जवळ येते आहे तसं तसं त्याचं स्मोकींग वाढत चाललं आहे. मला काहीही विचारायला त्याच्याकडे जायचं म्हणजे अगदी जीवावर यायचं. आज मिळाली एकदाची त्यापासून सुटका. मालिनी निखिलहून जास्त अनुभवी आहे कामात पण तिचं माझं ट्युनिंग कितपत जमेल हे एक कोडंच आहे, पण ते जमवेन मी. तोही प्रोजेक्ट खूप इंटेरेस्टींग आहे. मग येतेस ना दुपारी?"
"हो."

दिवसभरात ही बातमी अख्ख्या फ्लोअरभर झाली. स्वरुपाने मालिनीशी ओळख करून घेतली होती.

"स्वरुपा, मलाही नाही सहन होत स्मोकींग. तुला तर माहितीच आहे की माझा आता २रा महिना चालू आहे. आधीच मला जबरदस्त त्रास होतो उलट्यांचा आणि त्यात या लोकांचं स्मोकींग म्हटलं की माझे काय हाल होत असतील.."
"खरं आहे गं मेधा."
"मीही मागू का प्रोजेक्ट बदलून?"
"विचारून बघ की. आमच्या ग्रुपमध्ये हवे आहेत कदाचित आणखीन २-३ जणं त्यामुळे तुला छान चान्स आहे."
मेधाही मालिनीच्या प्रोजेक्टमध्ये आली. असेच होता होता स्वरूपा,मेधा वगैरेंप्रमाणे बघता बघता अखिला, रुजुता गौरव आणि आशिष कधी मालिनीच्या ग्रुपमध्ये येऊन दाखल झाले कळलंच नाही.

आणि एक दिवस...

"आनंद, या कोडकंपायलेशनमध्ये ना.." असं बोलत असतानाच रुजुताला 'तो' नकोसा वास आला. होता तो प्रश्न सोडवून घेऊन ती जागेवर आली पण काहीशी उद्विग्नच दिसत होती. दुपारी जेवणातही तिचं लक्ष नव्हतं. तिच्याकडून काही चुका व्हायला लागल्या. ग्रुपमधल्या सगळ्यांकडे लक्ष देणाऱ्या मालिनीला रुजुतातला हा बदल समजायला वेळ लागला नाही. फिरता फिरता एक दिवस असंच तिच्याकडे जाऊन मालिनी," रुजुता, कसं चाललं आहे काम? काही प्रॉब्लेम नाहीये ना?"
एकदम प्रोजेक्ट लीड मागे येऊन ठेपेल अशी कल्पना नसल्याने रुजुता हडबडली.
"अं? नाही.. काही प्रॉब्लेम नाही."
"काहितरी लपवते आहेस. काय झालंय रुजुता?"
"मॅडम, आनंदला स्मोकींगची सवय आहे. त्याच्याकडून डाऊट्स क्लीअर करून घ्यायला नको वाटतं मला अगदी."
"ठीके. मी बघते काय करायचं ते."

"सर, आनंदला निखिलच्या प्रोजेक्टमध्ये टाकता येईल का? तिकडे तसंही प्रेशर नेहमीच जास्त असतं. आनंद छान आहे कामात तसा.",
प्रोजेक्टचं डिस्कशन संपल्यावर मालिनीने धनंजय सरांना विचारलं.
"विशिष्ट नावडीचा ग्रुप बनतो आहे मालिनी तुझा. हे कितपत बरोबर आहे? आवडीनिवडीवर ग्रुप असायला हवा की काम करण्याच्या हातोटीवर? तुझ्या प्रोजेक्टमध्ये ..."
"माझ्या टीम मेंबर्सकडून कुठलीही तक्रार तुम्हाला येणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते सर पण त्यांची कुठलीही गैरसोय होऊ न देणे हे बघणंही तर माझंच काम आहे ना. कोणावर अन्याय न करता जर हे होऊ शकत असेल तर काही प्रश्न नसावा, असं मला वाटतं."
"तू याबाबत आधी आनंदशी बोलून बघावंस, असं मला वाटतं. तो काय म्हणतो ते बघ आणि मग आपण काय ते ठरवू." जे काही चाललं होतं त्याला खरंतर धनंजय सरांची मूक संमतीच होती, पण तरीही कंपनीच्या नियमात याबद्दल काही नमूद नसल्याने त्यांना उघड उघड काही करता येत नव्हते.

"मालिनी, मला ग्रुपमधून काढण्याचं कारण कळेल का?"
"ग्रुपमधून काढलं नाहीये तुला आनंद. निखिलच्या ग्रुपमध्ये गरज होती म्हणून तुला तिकडे पाठवलं आहे."
"हा बदल कायमचा आहे, तात्पुरता नाही."
"आनंद.."
"माझ्या कामात काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मॅडम. माझ्या सब लिडींगमध्ये कोणाचे कुठले प्रश्न सुटले नाहीत की माझ्याबद्दल काही तक्रार?"
"स्पष्टच सांगायचं तर तुझ्या कामाबद्दल मला नितांत कौतुक आहे, आनंद पण तुझ्या धूम्रपानामुळे इतरांना तुझ्याशी संवाद साधणं कठीण होऊन बसतं. तुला आनंद ( ! ) मिळत असला तरी इतरांना खूप त्रास होतो या गोष्टीचा."
"म्हणून चक्क मला ग्रुपमधून काढून टाकायचा निर्णय घेतला? छान ! उत्तम !"
"ह्या प्रोजेक्टमध्ये जर तुला रहायचं असेल तर ऑफीसच्या वेळांमध्ये धूम्रपान करणं पूर्णपणे बंद करावं लागेल तुला. चालेल का?"
"हो चालेल. हा खूप महत्वाचा प्रोजेक्त आहे माझ्यासाठी. मला नाही सोडायचा हा."
"ग्रेट ! तू याच प्रोजेक्टमध्ये राहशील मग. काहीच प्रश्न नाही." मालिनीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.

होताहोता मालिनीच्या ग्रुपने हाताळलेले प्रोजेक्ट्स कंपनीत बक्षिसं पटकावत होते आणि सर्वांच्या कौतुकाचा विषय बनत गेले. तिच्या ग्रुपमध्ये काम करायला मिळावं म्हणून कित्येक जण प्रयत्न करायचे पण 'ऑफीसच्या वेळांमध्ये धूम्रपानास पूर्ण बंदी.' हा तिच्या ग्रुपचा अलिखित नियमच बनल्याने इतर तांत्रिक मुद्द्यांबरोबरच हाही एक अतिशय महत्त्वाचा टप्पा होता तिच्या ग्रुपमध्ये प्रवेश मिळवायचा !

- वेदश्री.