मंगळवार, २५ जुलै, २००६

आज मैं उपर.. आसमा नीचे...

"येस्स... येस्स्स... येस्स्स......" असं आनंदातिशयानं चित्कारणाऱ्या मला बघून हापिसातल्या इतरांना काही कळेना की नक्की या बयेला अचानक झालं तरी काय ते ! त्यांना काय कळणार होत्या, इतक्या दिवसांनी माझा ब्लॉग विनाथांबा पूर्णपणे यशस्विरित्या रिपब्लिश झाल्याने माझ्या मनात फुटणाऱ्या आनंदाच्या उकळ्या !

मराठीब्लॉग्स.नेटवर प्रश्नोत्तर रुपाने पवनकडून मदत मिळाल्याने मी माझा हा ब्लॉग नटवायचा मनापासून प्रयत्न करत होते. तांत्रिकदृष्ट्या बऱ्यापैकी मठ्ठ असूनही प्रयत्नात यश मिळत असलेले पाहून आणखीन स्फुरण चढत होतं आणि प्रयत्न करायला हुरूप येत होता. पण... एके दिवशी अचानक मी 'अहिनकुल'बद्दलचे माझे अनुभव लिहिले आणि..... ब्लॉगने रीपब्लिश व्हायला ठाम नकार दिला. २%च्या पुढे गाडी जायलाच तयार नाही ! कित्तीवेळा प्रयत्न केला पण २च्या पुढची गणतीच जणूकाही विसरल्यासारखं माझा ब्लॉग वागायला लागला. अहिनकुल लिहिताना त्यात 'नकुल' सोडून निघून गेल्याने मी आधीच जबरदस्त भावूक झालेले आणि त्यात माझे विचार मुक्तपणे मांडायची मोकळीक देणारा माझा ब्लॉगही बंद पडला.. डोळ्यात पाणी उभं राहिलं माझ्या !

कित्येक दोस्त विचारायला लागले,"वेदश्री, ब्लॉगचं काय झालं? नविन काही लिहित नाहीस आजकाल.. काय झालं?" वगैरे वगैरे.. त्यांना द्यायला एकच उत्तर होतं माझ्याकडे .. 'ब्लॉग बंद पडला माझा !'.. माझ्या मनाला होणारे क्लेश मी काय सांगू त्यांना. मला माझा हाच ब्लॉग परत हवा होता.. जसा असेल तसाच ! ब्लॉगरवाल्यांना पत्र लिहिलं, इथूनतिथून सर्वांकडून मार्गदर्शन घ्यायचा प्रयत्न केला पण कोणालाच रामबाण असा उपाय माहिती असलेला दिसला नाही. हा ब्लॉग बंद पडण्याच्या अनपेक्षित धक्क्याने एकंदरीतच मनमोकळं, स्वतःचं असं काहीही लिहिण्याचाच उत्साह मावळला माझा. 'वर्डप्रेसमध्ये उघड तुझा ब्लॉग, तिथे असे प्रॉब्लेम आल्याचं ऐकीवात नाही' वगैरे ऐकायला मिळालं. मनाविरुद्ध मी तिकडे माझा ब्लॉग काढला.. काहीबाही लिहिलंही.. पण ...... या ब्लॉगची सवय झालेली असल्याने अनुभवांती आलेला मनमोकळेपणा, साहजिकता, सोपेपणा जो इथे वाटायला लागला होता तो मला तिथे जाणवेना. या ब्लॉगची खूपच सवय झाल्याने आणि त्याहून जास्त या ब्लॉगवर जीव जडलेला असल्याने मला तिकडे परकं परकं वाटायला लागलं. पर्यायाने ब्लॉग लिहिणंच बंद पडलं आणि परत एकदा माझ्या डायरीची पानंच्या पानं भरायला लागली.

आज इतक्या दिवसांनी उगाच वाटलं की जाऊन बघुयात का एकदा आपल्या ब्लॉगवर? बंद पडलेला असला तरी काय झालं? शेवटी आहे तर माझाच ब्लॉग ना.. एके काळी यालाच सजवायला किती इरेला पेटले होते मी.. मी लिहिलेला एकेक लेख इथे जमवायला किती आटापिटा केलेला.. पाऽऽर वेडावलं मला या ब्लॉगने.. विचार करताकरता कधी लॉगिन केलं गेलं आणि 'रिपब्लिश एंटायर ब्लॉग' वर क्लिक केलं गेलं माझं मलाच कळलं नाही.. धडधडत्या हृदयाने वाट पहात बसले की परत २% वर अडकतेय की काय गाडी? पण काय आश्चर्य !!! २३... ३७... ४६...६७....८६...१०० !!!!!!! काय हर्षोन्माद संचारला सर्वांगात.. जणू काही मला माझा अनमोल ठेवाच परत मिळाला आहे !!!

आज मैं उपर, आसमा नीचे,
आज मैं आगे, जमाना है पीछे,
टेल मी ओ खुदा, अब मैं क्या करू?
चलू सीधी के उल्टी चलू !!!

- वेदश्री.