सोमवार, ९ ऑक्टोबर, २००६

पारख मनांची - १

१२ ऑक्टोबर २००५, दसऱ्याचा दिवस. आदल्या दिवशीच्या १ पर्यंत चाललेल्या दांडियाने जब्बरी थकलेलो सगळेजणं. सगळेजणं म्हणजे मी आणि माझ्या रुपा ( रूम पार्टनर ) प्रिताश्री, रत्तिका आणि विनया. तिघीही दाक्षिणात्य पण वेगवेगळ्या प्रांतातल्या आणि एक कंपनी हाच काय तो आम्हाला जोडणारा दुवा. आम्ही सगळ्याच बोलक्या असल्याने गट्टी जमायला अजिबातच वेळ लागला नव्हता. प्रिताकडून मी तमिळ शिकत होते आणि विनयाकडून तिचं तमिळ टोनमधलं मराठी समजून घ्यायचा प्रयत्न करत होते तर रत्तिका माझ्याकडून हिंदी शिकायचा प्रयत्न करत होती. रत्तिका रोज म्हणायची की मलाही यायचंय बॅडमिंटन खेळायला पण ८ - ८:३० ला उठत असल्याने मी आणि प्रिताच जायचो सकाळी बॅडमिंटन खेळायला जवळच्या कोर्टवर. तिथेच विनयची ओळख झाली. एरवी त्याला कंपनीच्या बसमध्ये पाहिलेलं पण खरी ओळख झाली बॅडमिंटनच्या प्रांगणात. तो निघायच्या वेळेस अखिलेश जॉगिंग करून आलेला असायचा, त्यामुळे त्याच्याशीही जुजबी ओळख झाली होती. नवरात्रीचे नऊ दिवस आम्ही सगळेच आमच्या परीसरात असलेल्या एका ठिकाणी गरबा - दांडिया खेळायला जायचो. या सर्व दाक्षिणात्यांना हा नाचाचा प्रकार अगदीच नवखा असल्याने त्यांना मी स्टेप्स शिकवल्या. नवव्या दिवशी विनयसोबत एक नविन मुलगा आला होता, त्याचं नाव नितिन. ओ की ठो येत नव्हतं त्याला नाचता तरीही इतरांचं बघत बघत आणि तसं नाचायचा प्रयत्न करत थोड्याच वेळात तोही छान नाचायला लागला. बरेच जणं थकत गेले तसे तसे बाजुला ओत गेले. मी, प्रिता, विनय आणि नितिन फुल्टू गुंग झालो होतो नाचण्यात, संगीत भिनलं होतं नसानसात जणु काही. समोर कोणी आहे, नाही आहे याचं भानच नव्हतं उरलेलं मला. मी पूर्ण त्या संगिताच्या तालावर धुंद होऊन नाचत होते. एक-दीडच्या दरम्यान संगित थांबलं, तेव्हा कुठे मी भानावर आले. घामाने पूर्ण चिंब झाले होते, पण एक अलौकीक आनंद चेहऱ्यावर झळकला होता माझ्या.

दसऱ्याचा रविवार असूनदेखील घरात स्वस्थ कोण बसायला. मला झोप येत असूनही
"वेधा, प्लिज कम ना यार. यू आर मराठी, सो यू कॅन बार्गेन व्हेरी वेल अँड हेल्प अस टू सी द प्लेसेस.." वगैरे रत्तिकाच्या मखलाशीला भुलून मी मार कौतुकाने तयार झाले. मी, रत्तिका, प्रिताश्री, नितिन, विनय, अखिलेश असा आमचा कंपू दुकानं दरदर हिंडायच्या चढाईवर जाण्यास सज्ज झाला. रत्तिका आणि प्रिताश्री माझ्या रुपा तर विनय आणि नितीन आमचे बॅडमिंटन मधले प्रतिस्पर्धी आणि अखिलेश त्यांचा आणि रत्तिकाचा मित्र. बसने जायचं की लोकलने यावर थोडीशी चर्चा झाली आणि कौल लोकलला मिळाला. मी थोडीशी नाराजच झाले या निर्णयाने कारण मला स्वतःला ऍक्सलरेटर विशेषतः ब्रेक्स माझ्या हातात नसलेल्या वाहनात बसायचं म्हणजे धडकी भरते. रिक्षा, बस वगैरेंची सवय झालेली असल्याने भीती किंचित कमी झालेली असली तरी मनात कुठेतरी 'जलतुजलातु..' जप चालूच असतो म्हणायला हरकत नाही. तरी मी भीड भिकेची बहिण बनले आणि लोकलने जायला तयार झाले. विनयने सगळ्यांची तिकिटं ( लोकलची ! ) काढली आणि प्लॅटफॉर्मकडे आम्ही निघालो. एक लोकल लागलेलीच होती तिथे.
"वो अपनीही लोकल है.. पकडो.. भागो.." असं अखिलेश ओरडल्याने आम्ही सगळे पळायला लागलो. मी, अखिलेश आणि विनय त्या भरगच्च भरलेल्या डब्यात चढलो लोकलच्या. प्रिता आणि रती चढणारच होत्या पण प्रिताच्या मोबाईलवर कॉल आल्याने ती बोलण्यात गुंग झाल्याने चढलीच नाही आणि तिचा हात पकडलेला असल्याने रतीही चढली नाही. सगळेजणं पुढच्या लोकलने सोबत जाऊ असं म्हणत विनय खाली उतरला, तेव्हा लोकल हलकेहलके सुरू झाली होती. मला आधीच भीती वाटायची त्यात हे काय होतं आहे कळायला मार्गच नव्हता, तेवढ्यात अखिलेशनेही 'वेधा, कुदो लोकलसे.. जल्दी.. ' असं ओरडत माझा हात धरला आणि खसकन ओढून स्वतः उडी मारली. मी 'नहीं..' म्हणत माझा हात सोडवून घेतला आणि लोकलमध्येच रहायचा प्रयत्न केला पण या सगळ्यातून बसलेल्या हिसक्याने माझा हँडलला पकडलेला दुसरा हात निसटला आणि मागून रेटा चाललेलाच असल्याने मी लोकलच्या बाहेर फेकले गेले. काही कळायच्या आत मी प्लॅटफॉर्मवर पडले होते आणि कसा वळून कोण जाणे डाव्या पायाचा खालचा भाग मुडपला होता. दोन मिनिट मला काही कळलंच नाही काय झालंय ते. लक्षात आलं तेव्हा माझ्यासोबतचे सगळेजणं धावत आलेले दिसले, अखिलेश आणि रत्तिका सगळ्यात मागे होते तर प्रिता, नितीन पुढे. मला त्यावेळेस काहीच कळ वगैरे जाणवत नव्हती, वाटलं की काही नाही तोल सावरता न आल्याने पडले इतकंच असेल. सत्य परिस्थितीची थोडीशी कल्पना तेव्हा आली जेव्हा प्रिताच्या आधाराने मी उठायचा प्रयत्न केला. सण्णकन् एक कळ शिरशिरत डोक्यात गेली आणि पायोबांनी पुकारलेला सत्याग्रह लक्षात आला. तरीही थोड्यावेळाने प्रिताच्या मदतीने उठले आणि लंगडत लंगडत तिथल्याच एका बसण्याच्या जागेसदृश एका जागेवर जाऊन बसले. नितीनने पाण्याची बाटली आणली होती तोवर. प्रिता आणि विनय विचारत होते की कुठे दुखतं आहे वगैरे.. प्रिता तर जाम चिडली होती माझ्यावर असा पराक्रम केल्याबद्दल. रत्तिका अखिलेशला म्हणत होती,"ओऽऽह यार.. व्हॉट द हेल्ल इज धिस.. नाउ आय डोंट थिंक वुई कुड गो फॉर शॉपिंग.. आय हॅड टू गेट अ ड्रेस टूडे यार.. व्हाय पिपल मेक सच नॉनसेन्स आय जस्ट कांट इमॅजिन.. " वगैरे वगैरे. पाय दुखत असल्याने वाटलं नसेल इतकं खोलवर दुखले मला तिचे ते शब्द. यावर मी प्रिताकडे नुसतं बघितलं तर तिने फक्त डोळे थोडावेळ बंद करून उघडले. माझ्या डोळ्यात पाणी तरारलं होतं. नितीनने पाणी प्यायला दिलं आणि म्हणाला,"वेदश्री, तुम चल पाओगी क्या अभी? यहा अच्छा हॉस्पिटल नहीं है.. हम वाशीमे जाएंगे तो वहा एक हॉस्पिटल मुझे पता है.."या त्याच्या म्हणण्यामुळे मी पुढच्या ट्रेनमध्ये बसून त्यांच्यासोबत वाशीला गेले. अखिलेश मध्येच एका कुठल्याशा स्टेशनला उतरून गेला. नितिनला माहित असलेलं ते हॉस्पिटल रविवारी बंद असल्याने खूप वाईट परिस्थिती झाली माझी. मध्ये मला आणि प्रिताला एके ठिकाणी बसवून नितिन जवळपास कुठे आणखी कुठला दवाखाना आहे का बघायला गेला आणि विनयला घेऊन रत्तिका शॉपिंगला जाऊन आली. नितिनला हॉस्पिटल कुठलं सापडलं नाही, खूप उतरलेल्या चेहऱ्याने तो परत आला. मी दादाला फोन केला मग आणि ,"दादा, माझ्या एका मैत्रिणीला पायाला लागलं ती लोकलमधून पडल्याने, काही औषध सांग ना पटकन फरक पडेल असा. तिला अजिबात चालता येईना झालं आहे.."
"तिकडेसुद्धा धडपडाट करायची सुरूवात झाली का तुझी?"
"माझी?"
माझ्या आवाजातली वेदना दादाने अचूक ओळखली, यातून तो मला किती बरोब्बर ओळखतो याची खात्री पटली. त्याच्या रागवण्यामागचं प्रेम कळल्याने त्याही अवस्थेत मला सॉल्लिड आनंद झाला.
"दादा, आईबाबांना सांगू नकोस पण बरं का.."
"नाही." म्हणून त्याने गोळीचं नाव सांगून कशी घ्यायची तेही सांगितलं. लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा सांगत वरचेवर फोन करून परिस्थिती कशी आहे ते कळवत रहायची तंबी दिली. गोळीचं नाव नितीनला सांगितल्यावर तो अख्खी स्ट्रिपच घेऊन आला. आवश्यक सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये, ( जे आमच्या रूमच्या जवळच होतं !) पोहोचायला रात्रीचे १० वाजले ! तोवर माझा पाय टम्म फुगला होता आणि अजिबात हात लाऊ देईना झाला होता. तो जमिनीवर टेकवणं पूर्णच अवघड झालं होतं मला. या सगळ्याच्या दुःखाऐवजी, "डेली लेट नाईट यू वेअर डांसिंग इन दॅट दांडिया.. नाऊ टूडे यू कांट गो.. सो बिकॉज ऑफ धिस गॅप, यू कांट गेट द प्राईज .." या रत्तिकाच्या टोचणीने कुरतडली गेलेली माझी मानसिक जखम जास्त दुखत होती.

क्रमशः