सोमवार, २७ फेब्रुवारी, २००६

इस्त्री

सुट्टीचा दिवस. सहज गप्पा मारायला म्हणून मी शेजारच्या लाँड्रीवाल्या काकूंकडे गेले होते. त्यांची परवानगी घेऊन इस्त्री करायचं काम त्या दिवसापुरतं मागून घेतलं आणि रेडिओ ऐकत ऐकत करत होते. तेवढ्यात "ताई, आधी माझ्या गणवेषाला इस्त्री करून दे. बाबांचे कपडे मागाहून करत बस इस्त्री." या एका लहान मुलीच्या या मागणीला ऐकून माझं मन गतकाळातल्या आठवणींमध्ये हुंदडायला गेलं.

मी लहान असताना रोज मी शाळेला जाताना इस्त्री केलेलाच गणवेष घालावा असं म्हणण्यासारखी आमची आर्थिक परिस्थिती नव्हती. पंधरा ऑगस्ट अथवा सव्विस जानेवारीसारखे सण आले म्हटलं की मात्र शाळेच्या गणवेषाला इस्त्री करून मगच तेव्हा आयोजित केलेल्या कार्यक्रमांना खणखणीत उपस्थिती लावायला जाणे हे क्रमप्राप्त असल्यासारखंच असायचं. असंच एका १४ ऑगस्टची ही आठवण..

"दादा, तू कित्ती चांगला आहेस रे. मला जरा इस्त्री करून दे की माझा गणवेष." माझी मखलाशी.
"तुझी तू करून घे की. मोठी झालीस की आता. स्वतःची कामं स्वतः करायला शिक की जराशी." दादाचा टोमणा.
"असं काय करतोस रे. दे की करून. नसता तुझं बिंग फोडेन मी आईकडे." साम चालत नाही म्हणता मी दंडाची भाषा सुरू केलेली.
"जा. जा. सांग जा. खुश्शाल सांग. माझ्यापेक्षा तुझी बिंगं जास्त राग जागवतील तिच्यातला याची खात्री आहे मला." दादाचा टोला.
"तसं नाही. मी कशाला लावायला जाऊ काड्या? मी शहाणी आहे तेवढी. पण मी काय म्हणते.." वार फुकट गेला म्हणता सारवासारव करत हवं ते काढून घेण्यासाठी माझी स्वारी परत सामावर येत असतानाच माझं वाक्य मध्येच तोडत,"कृपा कर माझ्यावर. आता आणिक काही म्हणूबिणू नकोस. इस्त्री घेऊन ये. इस्त्री कशी करायची ते शिकवतो फार फार तर."
नहीं मामूसे नकटा मामू सही च्या न्यायाने मी निमूटपणे जाऊन इस्त्री घेऊन आले आणि पलंगावर माझा गणवेष पसरला. डोक्यावर टपली मारत दादा ओरडला,"पलंगावर इस्त्री करतात का? कधी पाहिलंस की नाहीस मला इस्त्री करताना? आंऽऽ?"
"मारतोस काय रे? सरळ तोंडानी सांगवत नाही का तुला?"
"महाकर्मकठीण आहेस तू म्हणजे ! आण ती इस्त्री इकडे.."
दादाच्या या रागोद्गारांनी 'आता हाच करून देईल इस्त्री..' अशी आशा पल्लवित झाली मनात आणि त्याच्या पुढच्या हालचालींकडे मी लक्ष द्यायला लागले. त्याने खाली सतरंजी अंथरली होती आणि त्यावर माझा गणवेष पसरला होता. इस्त्री चालू केली होती आणि...
"बघत काय बसलीस? खाली बसा सम्राज्ञी.. इस्त्री कोण करणार आहे?"
"तू." माझं भाबडं ( ! ) उत्तर.
"अगं महामाये, काही लाजलज्जाशरमहया आहे की नाही तुला? की विकलीस सगळी जुन्या बाजारात? मी फक्त शिकवणार आहे तुला इस्त्री करायला अँड नथिंग मोअर दॅन दॅट. कळलं का? पडला का प्रकाश?"
"प्रकाश तुझा मित्र आहे, तो पडला की नाही मला काय माहिती?" उगाच पीजे करत मी खाली बसले आणि,"हं आता काय करू? सांग."
"अशी इस्त्री धरायची आणि.."
माझ्या फ्रॉकच्या बाहीवर इस्त्री फिरवत
"आणि अशी करायची. कळलं का?"
"हो. कळलं."
"शाब्बास रे माझ्या पठ्ठ्या. कर मग आता." असं म्हणून धपाक्कन धपका हाणला त्याने पाठीत आणि उठून जायला निघाला.
"ओ महर्षी, निघालास कुठे? माझी इस्त्री होइतो थांब की. काही चुकलं मग?"
अशी आमची वटवट होतहोत माझा गणवेष इस्त्री झाला त्या दिवशी आणि तो करून द्यायचा तेव्हा असायची अशी अग्गदी कड्डक इस्त्री नसली तरी मी स्वतः केल्यामुळे एक वेगळाच कडकपणा जाणवला मला त्यादिवशी माझ्या गणवेषात.

"वेदश्री, जरा माझी ती काळी पँट आणि तो चॉकलेटी शर्ट इस्त्री करून दे आणि हो.. जरा लवकर बरं का?"
"स्वतःची कामं स्वतः करावीत. इस्त्री कशी करायची ते शिकवते फार फार तर.." असं मी म्हणणार होते, पण इस्त्री करायला शिकवण्याबद्दल तो माझा गुरू असल्याने,"बरं. देते करून."
असं म्हणत मी कपाटातून त्याचा तो ड्रेस काढला आणि इस्त्री करायची तयारी करून पँट सतरंजीवर पसरली. पँटला इस्त्री करून झाली आणि ती बाजूला ठेवत होते, तर दाढीच्या फेसयुक्त तोंडाने बोलता येत नव्हते म्हणून हातवारे करत तो मला काहितरी म्हणाला ते असं होतं,"अंऽऽ अंऽ अंऽऽऽ अंऽऽऽऽ अंऽऽ" !!! यातून मला काय कळणार होतं? त्याच्याकडे बघून हात झटकत मी ठेवून दिली पँट बाजूला आणि शर्टला इस्त्री करणं सुरू केलं. शर्टलाही इस्त्री करून झाली आणि परीटघडी करून मी शर्ट बाजूला ठेवत नाही तोवर तोंड धुवून तो माझ्या जवळ येऊन पोहोचलेला. डोक्यावर टपली मारत,"पँटला अशी करतात का इस्त्री?"
"मग कशी करतात?"
"तुला शिकवलं ना मी त्या दिवशी?"
"हो. तू फ्रॉक घालत जा म्हणजे तुला मी छान इस्त्री करून देत जाईन. हे असे चमत्कारीक कपडे तुझे. मला नाही बाई जमायचं.. इस्त्री करायची ते करायची आणि वर तुझ्या या टपल्या खायच्या ते.. तुझी इस्त्री आणि तुझे चमत्कारिक कपडे तुलाच लखलाभ असोत. मला नको सांगू काहीच आता. मला काहीच बोलायचं नाही तुझ्याशी जा." माझ्या गंगायमुनांना सुरूवात झालेली !
"अगं अशी काय करतेस वेडे? माझ्या नाही लक्षात आलं तुला माहिती नसेल ते. मी शिकवतो ना तुला पँटलाही इस्त्री करणं. अवघड काय आहे त्यात? हे बघ.."
"मी नाही जा.." असं म्हणून मी निघाले तर एका हाताने माझा हात धरून ठेवत दुसऱ्या हाताने इस्त्री करून दाखवली दादाने ! फुरंगटलेली मी दुसरीकडे बघतो आहोत असं दाखवत तो पँटला कशी करतो आहे इस्त्री हेच बघत होते आणि रडतही होते.
"आता जमेल ना तुला पँटलाही इस्त्री करायला?" माझा धरलेला हाताला किंचित हिसका देऊन दादाने विचारलं. रडक्याच आवाजात मी त्याच्याकडे बघायचीही तसदी न घेता हो म्हणाले. त्याने मग कुठे माझा हात सोडला आणि मी दुसऱ्या खोलीत पळाले. पूर्ण दिवसभर मी बोलले नाही मग त्याच्याशी.

दुसऱ्या दिवशी दादामहाराजांची स्वारी नेहमीपेक्षा जरा लवकरच उठलेली, स्वतःच स्वतःच्या ड्रेसला इस्त्री करायची म्हणून ! इस्त्रीची तयारी करून कपाटातून हवा तो ड्रेस काढला आणि तो माझ्या नावाने ओरडला,"वेऽऽऽदश्रीऽऽऽ"
मी दरवाजाआड लपून त्याचीच गंमत बघत होते ! तिथून पुढे येत आणि येत असलेलं हसू जबरदस्ती दाबून ठेवायचा प्रयत्न करत अगदी शांत आवाजात,"काय?"
"हे काय आहे?" :-/
"तुझा ड्रेस." :D
"कोणी केलं हे?"
".."
"ऐकू येतंय का तुला? मी काऽऽय विचारतो आऽऽहे?" आवाज चढलेला.
"नीट केली ना इस्त्री आता पण तरीही तू परत ओरडणारचेस का मला?" माझा आवाज रडवेला.
"चंपकच आहेस तू एक नंबरची. सकाळीच सांगायचं नाहीस का मला? मी पाच-दहा मिनिटं अजून नसतो का झोपून राहिलो?"
रडंबिडं सगळं विसरून या गोष्टीवर त्याला मी मारायला लागले आणि तो मोठ्ठ्याने हसायला लागला.

- वेदश्री.

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २००६

अहि - नकुल

ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालीत आला मन्थर नाग
मधुनीच उभारी फणा,करी फुत्कार
ये ज्वालामुखीला काय अचानक जाग !

कधी लवचिक पाते खड्गाचे लवलवते,
कधी वज्र धरेवर गगनातुन कडकडते,
कधी गर्भरेशमी पोत मध्ये जरतार
प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते

मार्गावर ह्याच्या लवत तृणांची पाती
पर्णावर सुमने मोडुनि माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नव वेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती

चालला पुढे तो - काय ऐट ! आनंद !
अग्नीचा ओघळ ओहळतो जणू मंद,
टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.

वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली-
रक्तात नाहली, शिरमुंडावळ भाली,
थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,
हे कंकण निखळुनी पडले भूवर खाली

चालला पुढे तो लचकत मुरडत मान,
अवतरे मुर्तिमान् मल्हारातील तान
चांचल्य वीजेचे, दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान !

हा थांब - कुणाची जाळीमध्ये चाहूल
अंगार - कणापरी नयन कुणाचे लाल.
आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,
रे नकुल आला ! आला देख नकुल !

थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा,
रिपु समोर येता सोडुनि अन् आडोसा,
भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा
घे फणा उभारून मरणाचा कानोसा.

पडलीच उडी ! की तडितेचा आघात !
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,
विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प,
फुंफाट करी अन् पिशापरी त्वेषात !

रण काय भयानक - लोळे आग जळात !
आदळती, वळती, आवळती क्रोधात,
जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनाशी झुंजे वादळवात !

झणि धुळीत गेली वहात ती विषधार
शतखंडीत झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूतुनि उपसूनि काढुनि दात
वाऱ्यापरि गेला नकुल वनातुनि दूर

संग्राम सरे, रक्ताचे ओघळ जाती,
आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,
पिंजून कापसापरी पडे तो नाग,
ते खंड गिळाया जमले कीटक भोवती !

- कुसुमाग्रज.

यातला नाग हा अत्याचारी वर्तन करणारे इंग्रज तर नकुल ( मुंगूस ) हा या नागाच्या अन्यायाविरुद्ध सशस्त्र क्रांती करणारे भारतीय क्रांतीकारक यासाठीचं रूपक आहे. आई लहानपणी ही कविता अगदी आवेशपूर्ण खड्या आवाजात गाऊन दाखवायची, मध्येमध्ये कडव्यानुरूप रोमांचक वर्णनही असायचंच ! पहिल्या सहा कडव्यांमध्ये जबरदस्त रोमांच उभे रहायचे अंगावर, शहारेच म्हणायला हवे खरं तर. जबरदस्त दडपण यायचं, मुठी वळल्या जाऊन "कुठेय तो? आणा त्याला माझ्या सामोरी. घेतेच त्याची खरमरीत खबर.." असं कोणीतरी म्हणा नसता मीच म्हणते असं वाटण्याची वेळ यायची. तोवरच सातवं कडवं नकुलाला घेऊन यायचं. आई जेव्हा "रे नकुल आला ! आला देख नकुल !" म्हणायची नकुलावर अगदी जीव ओवाळून टाकावासा वाटायचा. हा नकुल ( मुंगूस ) च माझं प्रेम आहे असं एका कोपऱ्यात वाटून ते माझं प्रेमच जणू मला मिळालं आहे असं वाटून खूप खूप आनंद व्हायचा ! आठव्या कडव्यात जेव्हा नाग घाबरलेला दिसायचा तेव्हा एक धमाल आनंद चेहऱ्यावर झळकायचा. "भले पठ्ठुश" म्हणून नकुलाला कौतुकाने थाप द्यावीशी वाटायची. पुढच्या अवघ्या दोनच कडव्यात नकुलाने नागाची यूंऽऽ उडवलेली त्रिफळा जब्बरी विजयोन्माद अंगात संचारवायची पण त्यापुढचंच नकुल दूर निघून गेला, हे सांगणारं कडवं हृदयात खोऽल कुठेतरी एक जीवघेणी कळ देणारी जखम करून जातंय असं वाटायचं. शेवटच्या कडव्यातल्या पहिल्या दोन ओळी शोषित-पिडीत सर्वजण त्रासापासून मुक्त झाले हे कळून नकुलाच्या त्या वायुवेगाने येऊन करून गेलेल्या प्रभावी सत्कृत्याचं जबरदस्त कौतुक डोळ्यात पाणीरुपाने साठवणाऱ्या ठरायच्या. शेवटच्या कडव्यातली तिसरी ओळ "खाशी जिरवली त्या नागाची.." असं म्हणून त्याच्या त्या खंडांकडे बघायची फुरसत नाहीये असं म्हणायला भाग पाडायची आणि सगळ्यात शेवटच्या ओळीने.... जबरदस्त वाईट वाटायचं... खरा 'सम्राट' तो कोण आणि आधिपत्य गेलं ते कोणाच्या हातात ! असं वाटायचं ! आता आई नाही म्हणत हे गाणं पण मीच शिकलेय म्हणायला. आजही काळजात काहितरी होतं 'रे नकुल आला ! आला देख नकुल !" म्हणते तेव्हा आणि तो कधीच निघून जाऊ नये असं वाटत असतानाही तो निघूनच जातो पण त्याला परत मिळवण्यासाठीचा त्वेष अंगात संचारवूनच ! हे गाणं अंगात भिनवल्याबद्दल आईला माझ्या कातडीचे जोडे करून वापरायला दिले तरी कमीच आहेत !