मंगळवार, १७ जानेवारी, २००६

कृपया आम्हाला जगू द्या...

"कोणीही वर्गाच्या बाहेर जाणार नाही. पालक आले की तुम्हाला सोडण्यात येईल. तोवर कोणीही दंगा करायचा नाही.."
कितीक जणांनी भोंगा लावला होता, काही जण भेदरून गप्प बसले होते, काहीजण 'आम्ही इतक्या दूर रहातो. आमचे पालक अशा परिस्थितीत कसे येणार आम्हाला घ्यायला? आम्ही घरी कसं जायचं?' या चिंतेनी व्याकुळ झाले होते. मला काहीच कळेना काय करावं. कुठे जावं. बाबा तर नाहीच येऊ शकणार. आई.. ती कशी येईल अशा परिस्थितीत? दादा कॉलेजला. बाई गं. तो ठीक असेल ना? अक्का कोणत्या वर्गात बसते माहितीच नाही. श्री तरी ठीक आहे हे बरं आहे. पण आता मी काय करू? डोळ्यापुढे अंधारी पसरली. नक्की काय झालंय हेही कळेना. गावात काहीतरी झालंय एवढंच कळत होतं. चौथीच्या पोरीला अजून ते काय कळणार दंगलीतलं?
थोड्याच वेळात पालक यायला सुरुवात झाली. जे ते आपापल्या पाल्याला, शेजारच्यांचे ओळखीचे असतील तर त्यांना घेऊन जायला लागले. कोणाचे बाबा, कोणाचे काका, कोणाचा दादा आले आणि त्यांना घेऊन गेले. ज्यांचे पालक येऊ शकणार नव्हते त्यांना पोहोचवण्याची काहीतरी सोय शाळा करणार होती. माझ्या घराकडच्या बाअजूला वर्गातल्या उरलेल्यांपैकी कोणीच रहात नव्हतं त्यामुळे माझ्या घरी पोहोचण्याची पंचाईतच होती. "गणू, मला कोण येईल रे न्यायला?" असा प्रश्न मनात डोकावत होता. कुठून धैर्य आलं कोण जाणे पण मी बाईंना म्हणाले, "बाई, मी जाते माझी माझी घरी. माझं घर जवळच आहे तसं."
"गप्प बस. सोय करतोय आम्ही.." एवढंच त्या बोलल्या तरीही मी काही ऐकलं नाही आणि नजर चुकवून वर्गातून पोबारा केला. आणखी एकही क्षण त्या भीतीच्या सावटाखाली श्वास कोंडून बसून रहाणं मला शक्य वाटत नव्हतं. दप्तर पाठीला लटकावलं आणि मी रस्त्यावरून जायला लागले. नेहमी रमतगमत चालणारी मी, त्या दिवशी मागे वाघ लागल्यासारखी चालत होते. रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हतं. दुकानं बंद झालेली किंवा बंद होत आलेली. पटापट चालायच्या ऐवजी मी एव्हाना अनामिक भीतीने गारठून पळायला सुरुवात केली होती. जडबदक दप्तर संभाळत, भीतीने येणाऱ्या रड्याचे अश्रू दोन्ही हाताने पुसत रस्ता दिसेल इतपत सोय करतकरत मी जीव खाऊन पळत होते. घर जवळ होतं पण शॉर्टकट होता तो... आई गं.. एरवी माझ्याशी छान वागतात ते पण आज दंगलीमुळे जर तेही भंजाळले असले तर? एकेक शंका मनात येऊन अजूनच हडबडत चालले होते. पळण्याच्या शर्यतीचा वर्षभर सराव केला असता तरी पळाले नसते अशा आश्चर्यजनक वेगानी मी पळत होते. अर्ध्या रस्त्यात आले आणि वाटलं, कुठेतरी ओळखीच्यांकडे विचारुया. 'त्या' रस्त्याने जाणेच नको. एक एकदमच छान ओळखीचे काकाकाकू. आई त्या रस्त्याने येताजाताना बोलायची त्यांच्याशी. त्यांचं घर दिसलं आणि आशेचा किरण माझ्या मनात डोकावला. ते काका येतील सोडायला घरापर्यंत याचा विश्वास वाटला. मी त्यांच्या घरापर्यंत जायच्या वळणाला वळले आणि............ नको. ती तर आठवणही नको. त्या काकांच्या घरातून ३-४ चाकूधारी बाहेर पडत होते आणि त्या चाकूंवरून रक्त ओघळत होतं ! माझ्या हृदयाचे ठोके एकदम वाढले. दोन पावलं नाही तर कितीक पावलं मी मागे गेले माझं मलाच आठवत नाही. त्या लोकांनी मला बघितलं नाही हेच बरं. मलाही ते दिसले नव्हते नीट. ओझरतंच पाहिलं होतं मी त्यांना. मी अगदी सुन्न होऊन गेले होते. कुठे पळू तेच कळत नव्हतं. अंगात काही त्राणच उरले नसल्यासारखं प्रतित व्हायला लागलं. रडायला एकही अश्रू डोळ्यात उरला नसल्यासारखं वाटायला लागलं. मदतीसाठी ज्यांना विचारणार होते त्याच काकांच असं झालेलं. ते लोकं पळून गेले आणि थोड्यावेळानी तिथे पोलिसपथक आलं आणि त्या काकांना उचलून त्यांनी अँब्युलन्समध्ये घातलं आणि ती पी पी पी करत निघून गेली. मागून कशाचातरी ओरडा ऐकू आला. धावा धावा.. पळा.. मी वळून बघितलं तर लोकांचा लोंढाच्या लोंढा पळत सुटला होता आणि ओरडत होता पळा पळा... मी परत पळायला लागले जीव खाऊन. मेले तर मेले. नुसतं उभं राहून मरण्यापेक्षा घरी जातानाच्या प्रयत्नात मेले तर जास्त बरं असं वाटून गेलं. मला रस्ता असा दिसतच नव्हता. डोळे पाण्याने भरले होते की दुःखाने तेच कळत नव्हतं. विचारांचं काहूर मनात माजलं होतं, "का जगू देत नाहीत? कृपा करा. नका करू दंगली. आम्हाला जगायचं आहे. जगू द्या ना आम्हाला.... " मग अचानक वाटलं का रडायचं? का भीक मागायची जगू द्या म्हणून? मी नाही घाबरणार. मी धैर्याने तोंड देईन जे होईल त्याला. डोळे पुसले. ते परत भरून यायला पाणी उरलंच नव्हतं डोळ्यात कदाचित. पळणं बंद केलं आणि वैचित्र्यपूर्ण विरक्तीत संथपणे चालायला लागले. सुनसान रस्ता पहायचा योग आला नव्हता, तो तसा पहायला मिळणे हाच कदाचित माझ्या आयुष्यातला शेवटचा आनंद असा थरकाप उडवणारा विचार करून तो अनाकलनीय आनंद ( !! ) उपभोगायचा प्रयत्न करायला लागले आणि मला आई दिसली. आई येत होती माझ्याकडे धावत धावत, "शाळेतून का निघालीस मूर्ख. अक्कल आहे की नाही काही? चल आता लवकर घरी.."
"आई, दादा आला का गं? आणि आक्का?"
"सगळे आलेत. तुझाच पत्ता नाही फक्त. सगळ्यांचे जीव अटकले.. "
"आई, माहितेय का, त्या वळणावर ज्यांचं घर आहे ना - त्या काकांना भोसकलेलं मी ओझरतं पाहिलं.. "
आई खूपच घाबरली, रागवली. मला एक दणका घातला तिने पाठीत आणि पटापट चालणारी ती, आता मला ओढत ओढत पळायला लागली. ही माझ्या ज्ञात आयुष्यातली पहिली दंगल !

"बाबा, औ माझे सबमिशन्स आहेत हो कॉलेजमध्ये. काय जीवावर आलंय घरात राहून राहून. आम्ही जरा वरती गच्चीत जाऊन येऊ का हो? किती कंटाळा आलाय घरात बसून बसून.."
"काही गरज नाही. ऐकू येत नाही का? संचारबंदी आहे ते.. कुठेही जायचं नाही. मरण्यापेक्षा कंटाळा आलेला कधीही श्रेयस्कर कळलं का?"
"अहो पण किती दिवस? काही धरबंध आहे कि नाही त्याला? कोण ते चिमुटभर लोकं काहीतरी वेडेपणा करतात आणि सगळ्यांना भोगावं लागतं. किती दिवस चालणार हे अजून? का जगू देत नाहीत हे लोकं आपल्याला निवांतपणे? सांगा ना कोणीतरी त्यांना की कृपया आम्हाला जगू द्या हो.."
बातम्या बघण्यात गुंग बाबा माझ्या या वाक्यावर गप्प बसले.

"आज काय करू स्वयंपाक?" आईचा हा नेहमीचा प्रश्न. आजचा प्रश्न मात्र वेगळ्या परिस्थितीमुळे होता.
"आई, आज डाळ कर कुठलीतरी. भाजीच नाहीये एकही उरलेली.. "
"६ दिवस कोणती भाजी टिकणारे? भाजीचं ठीके पण दळलेलं पीठही संपत आलंय त्याचं काय? अजून किती दिवस चालणार कोण जाणे हा बंद.."
उपाशी मरणं चांगलं की दळण आणायला जाताना मरणं चांगलं कोणी सांगेल का? हा बावळट प्रश्न मनात डोकावला !

"वेदश्री, यार काय होईल गं? "
"काही होणार नाही गं. तू नको चिंता करूस. काही होणार नाही काकाकाकूंना आणि ते जम्मूला आहेत ना मग तू का काळजी करतेयस काश्मिर दंगलीने इतकी? "
"तुला माहित नाहीये वेदु, आमच्या घरात रोज दगडाने मारलेल्या चिठ्ठ्या यायच्या.."
"काय म्हणून? काय लिहिलेलं असायचं त्यात?" माझा बावळट प्रश्न.
" 'घर रिकामं करून इथून निघून जा नसता......."
"मग तुम्ही केलं रिकामं घर?"
"नाही. आम्ही शेवटपर्यंत नव्हतो गेलो पण.."
"पण काय गं इंदू?"
"मी आमचं अख्खं पुश्तैनी तीन मजली घर जळताना बघितलंय काश्मिरला. माझ्या एका काकांना भोसकलं होतं, मामांना तर मारूनच टाकलं. आमचं एकत्र कुटूंब होतं पण आता सगळेजण कुठे कुठे गेलेयत. जवळच्यांना डोळ्यासमोर भोसकलेलं पाहिलं ना मग कळेल काय वाटतं ते.."
अंगावर काटा उभा राहिला माझ्या.
"अगं पण आता तर काकाकाकू जम्मूला आहेत ना. तिथे नाहीये काही धोका. ते सुरक्षित आहेत. काही काळजी करू नकोस.."
"जम्मूलाही ते सुरक्षित नाही म्हणता येणार गं. जास्त अंतर नाही आहे जम्मू आणि काश्मिरात. आपण देवाचं दर्शन घेऊन येऊया का गं? मला कसंतरीच होतं आहे.. "
मंदिरात उभी राहून गणूलाही मी तेच विचारत होते मनातल्या मनात," का? का? का? का जगू देत नाहीत आम्हाला? आम्ही काय घोडं मारलंय कुणाचं म्हणून असं वागतायत आमच्याशी? कृपया आम्हाला जगू दे ना...."

"बाबा..."
झोपेत असलेल्या बाबांचा अस्पष्ट आवाज, "बोल रे बेट्या. सकाळी ५ ला कसा काय फोन केलास? आवाज का रडका येतोय तुझा? सगळं ठीके ना तिकडे?"
"मी ठीके. तुमचा आवाज असा का येतोय?"
"काही नाही गं. आत्ता उठतोय. काल जरा जाग्रण झालं ना म्हणून उशीर झाला जरा उठायला.. "
"आज कोणीही घराबाहेर पडायचं नाहीये कळलं का? "
"का गं काय झालं?"
"प्रश्न विचारू नका. सांगितलेलं ऐकत जा ना हो कधीतरी माझं. मला काही माहिती नाही. तुम्ही कोणीच आज घराबाहेर पडायचं नाहीये बस्स.. "
"अरे राजा, पण कसं शक्य आहे ते? मला आज क्लायंटकडे जायलाच हवं आहे. तो येणारे गाडी घेऊन.. "
"काऽऽऽऽही जायचं नाही सांगितलं ना मी तुम्हाला. काकांना सांगते मी फोन करून की काम नंतर होत राहिल म्हणून.." माझ्या रड्याचा एकदम स्फोटच झाला. मला काही बोलवेचना. मी इकडे येऊन सुरक्षित आहे पण आई-बाबा-श्री? त्यांना काही... नाही. काही होणार नाही त्यांना. तरीही मला काहीच सुचत नव्ह्तं. रडतारडता मी फोन ठेवून दिला मध्येच आणि आधीच ओल्या झालेल्या उशीत तोंड खुपसून रडत बसले.
दहा मिनिटांनी आईने फोन केला,"काय गं काय झालंय वेदल, काही सांगशील का?"
"मला काल स्वप्न पडलं की आपण सगळे गाडीतून कुठेतरी जातोय आणि मी 'एक फोन करून येते तोवर तुम्ही पुढे व्हा', असं म्हणून एका एस्टीडीपाशी उतरले आणि फोन करायला लागले. तुमची गाडी मी वळताना पाहिली डोळ्यासमोर आणि अचानक तिकडूनच १०-१५ चाकूसुरेधारी लोकं धावत आले. सगळी दुकां बंद व्हायला लागली. एस्टीडीवालीनी तिच्या घरात घेतलं मला. मी सुरक्षित होते पण... मी घरी कितीवेळची फोन करत होते पण घरी कोणीच उचलत नव्हतं फोन. मी एकदम किंचाळले आणि उठून बसले. मला कळलं मी झोपेत होते आणि जे बघितलं ते सगळं एक स्वप्नं होतं. मी तेव्हाच रात्री २ ला फोन करणार होते कसे आहात विचारायला पण तुम्ही झोपले असाल तात्पुरते रात्रभरासाठी असं वाटून सकाळ व्हायची वाट बघत बसले होते. आई, तुम्ही नका जाऊ ना गं कुठेच बाहेर. मला नाही रहावते इकडे तुम्हाला तिकडे एकटं सोडून. तुम्हीही या ना गं इकडे.. "
"काल तू काय वाचलं होतंस झोपायच्या आधी?"
"वर्तमानपत्र.."
"तरीच तुला अशी स्वप्नं पडतायत. काही काळजी करू नकोस. परिस्थिती तितकीशी हाताबाहेरची नाही आहे तरीही काही असलं तर मी स्वतःच जाऊ देणार नाही कोणाला घराबाहेर..."
मला वाटून गेलं की मीही इंदू पडली होती तशीच एकटी पडले आहे. अचानक डोळे मिटून घेतले आणि गणूला आठवलं. नकळत शब्द तोंडातून बाहेर पडले, "ही शेवटची दंगल ना रे गणू? आतातरी आम्हाला जगू देणार ना? मला सगळ्यांसोबत जगायचंय रे. कृपया आम्हाला जगू दे ना.. "

- वेदश्री.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा