शनिवार, ७ जानेवारी, २००६

बेधुंद प्रवास

घरी जायला मी बस स्टँडवर उभी. प्रोजेक्ट पेटलेलं आणि सुट्टी मिळायची मारामार पण तरीही ऍप्रुव्हल मिळवून आणि काम आटपून कशीबशी धावतपळत ९ ला मी स्टँडवर पोहोचले. बस मिळते की नाही याची चिंता होतीच आणि आईबाबांना चिंता की रात्रीचा प्रवास.. एकटी पोरगी.. वगैरे वगैरे..

बस मिळाली. हवी तशी खिडकीजवळची जागाही मिळाली. बस बर्‍यापैकी रिकामी. गर्दी अज्जिब्बातच नव्हती. मन एकदम आनंदून गेलं माझं. 'होल वावर इज् आवर' सारखं अगदी. थंडी होती म्हणून अंगात स्वेटर. खरं तर गरज नव्हती स्वेटरची थंडी आवडते त्यामुळे पण घरी गेलं की,"बापरे ! इतके कसे थंड पडले तुझे हात? स्वेटर घालून यायला काय झालं? आणि हे काय? रुमाल नाही बांधलास डोक्याला? वगैरे वगैरे सुरू होतं म्हणून अंगात स्वेटर आणि डोक्याला रुमाल बांधला अगदी अंडर्वर्ल्ड डॉनसारखा - म्हणजे फक्त डोळे दिसतील असे आणि बाकी सगळा चेहरा रुमालानी झाकलेला ! माझी स्वारी पूर्णपणे झोपायच्या मूडमध्ये आणि अशातच...

एक एकदम झकास मुलगा बसमध्ये चढला. दिसायला काहीच खास नव्हता पण काहितरी होतं त्याच्यात. काहीतरी नक्कीच होतं.. छान वाटला एकदम. माझं लक्ष त्याच्याकडे आणि तोही माझ्याचकडे पाहात माझ्या शेजारी येऊन उभा ! मी खलास !! :))

त्याने मला रिजर्वेशनचं तिकिट दाखवलं आणि मी बसले होते ती सीट त्याची आहे, हे लक्षात आणून दिलं. मी बाजूला सरकले आणि तो खिडकीशेजारी बसला. तो छान होता पण मला उगीचच अवघडल्यासारखं वाटायला लागलं. मी उठले आणि सगळ्या बसमध्ये नजर फिरवली की अजून कुठे जाऊन बसू शकते का बसायला ते. "काय झालं? माझं रिजर्वेशन एकाच सीटचं आहे. तू बस की इथेच. मला काही प्रॉब्लेम नाही आहे.." (च्यामारी टोपी. याला कसला यायला प्रॉब्लेम? ) तोंड वाकडं झालं माझं रुमालाच्या आत पण तरीही मी तिथेच बसले त्याच्याजवळ.. ;-)

माझा परत झोपायचा प्रयत्न चालू झाला. शेजारी काहीतरी वळवळ झाल्यासारखी जाणवली. डोळे उघडून बघते तर महाशयांची चुळबुळ चालेलेली. असं बसून बघ तसं बसून बघ. मी चमत्कारिक प्राण्याकडे बघावं तसा दृष्टीक्षेप त्याच्याकडे टाकला. तो हसला. हातवारे करत मला म्हणाला,"तुला गरमी होत नाहीये का त्या रुमालाने?"
मी नकारार्थी मान हलवली आणि परत झोपले. मध्येच फोनवर बोलल्याचा आवाज आला,"अरे नाही ना. घरी जायलाच हवं आहे. आईबाबांना येतो म्हणालेलो. अं? जाऊ दे रे. थोडावेळ दुखेल मग बरं वाटेल. नाही. शेजारी एक मुलगी बसली आहे. चप बस. झोपतीये ती. तोंडाला रुमाल बांधून बसली आहे. कसली बोलणार ती माझ्याशी डोंबल?" वगैरे वगैरे..
दुसर्‍यांचं बोलणं ऐकू नये.. पण का माहित नाही मी अगदी लक्ष देऊन ऐकलं त्याचं बोलणं. खूप गोड बोलत होता तो. मला बोलावंसं वाटलं त्याच्याशी पण कशी सुरूवात करावी कळेना. झोप तर कधीच उडून गेली होती. :))
कंडक्टर आला. मी रुमाल काढला आणि एक तिकिट घेतलं. तो मुलगा ओरडलाच, "तुला बोलता येतं?" ( सगळे झोपायला आलेले किंवा झोपलेले आणि हे ध्यान ओरडलं.. अस्सल्ला संताप आला की बस्स पण तरीही मी नाही चिडले त्याच्यावर.. का? तेवढं फक्त विचारू नका. )
मी होकारार्थी मान डोलावली. त्याने हातवार्‍याने मला सांगितलं की," बोलता येतं ना? मग 'हो' तोंडानेही म्हणू शकतेस."
राग आलेला असूनही हसले मी. तोही हसला. "हाताला काय झालं?" (पुढे 'तुझ्या' म्हणणार होते पण शब्द घशातच अडकले आणि प्रश्न पूर्ण झाला..)
"काही नाही गं. गाडीवरून पडलो आज आणि जब्बरी लागलं हाताला. घरी येतो सांगितलेलं मग ऐनवेळेस कसं नाही म्हणणार? म्हणून जातोय पण हात जाम ठणकतोय. झोप येत नाहीये त्यामुळे.. " "मला कल्पना आहे लागलं की झोप येत नाही त्याची. मलाही लागलं होतं नुकतंच. " आणि मी माझ्या ठेच लागण्याची इत्थंभूत कहाणी त्याला सांगितली. तो हसायला लागला. मला राग आला. मी रुमाल बांधायला लागले परत.
"अगं तू इतकी गंमत केली मग मी हसायचं पण नाही का? बरं राहिलं. झाऽऽलं.. तुझ्या त्या रुमालाला सुट्टी वगैरे नसते का कधी?"
मी नुसतीच हसले. तो पुढे बोलत होता,"मी एक कोडं सांगतो. बघुयात येतं का तुला सोडवता ते. एक राजकुमार असतो. तो शेजारच्या राज्यात काही कामानिमित्ताने गेलेला असताना त्याच्याकडून काही आगळीक घडते आणि त्या राज्याच्या राजाकडून त्याला देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात येते. तो क्षमेची मागणी करतो. राजा म्हणतो ठीक आहे. मी तुला एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तू एक वर्षात देऊ शकलास तर मी तुला जीवनदान देईन. माझा प्रश्न आहे,"स्त्रीला स्वर्गीय समाधान कशातून मिळू शकत?" प्रश्न ऐकून राजकुमार समजून जातो की आपली १०० वर्ष भरलीत कारण या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर असणंच शक्य नाही पण तरीही प्रयत्न करायला काय हरकत आहे असं म्हणून तो चान्स घ्यायचं ठरवतो. स्वत:च्या राज्यात परत येतो. झाऽऽडून सगळ्यांशी या प्रश्नावर चर्चा करतो. दासदासी , रावरंक सगळ्यांना पण कोणाकडूनच त्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही पण एक सूचना मात्र बर्‍याच जणांकडून मिळते की राज्याबाहेरच्या एका चेटकीणसदृश बाईकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर असतात पण ती त्याबदल्यात मोबदला खूप घेते. शेवटचा दिवस उजाडतो. सगळे उपाय थकले म्हणून राजकुमार शेवटी त्या चेटकीणसदृश बाईकडे प्रश्न घेऊन जातो. ती राजकुमाराला उत्तर सांगते पण त्या बदल्यात तिच्याशी लग्न करण्याची अट घालते. उत्तर असतं, "स्त्रीला तिच्या स्वत:च्या आयुष्याची सूत्रं तिच्या हातात असलेली आवडतात आणि तसं जगू दिल्यास तिला स्वर्गीय समाधान मिळतं." राजकुमाराला जीवनदान आणि त्या चेटकीणीला राजकुमार नवरा म्हणून मिळतो. लग्नाच्या पहिल्या रात्री राजकुमार शयनकक्षात शिरताना त्याच्या अंगावर काटा उभा राहतो. स्वभावानी अत्यंत संयमी आणि धाडसी होता तो पण तरीही आता काय प्रसंग वाढून ठेवलाय ते त्याला कळेनासं होतं. तो आत जातो तर पलंगावर अवर्णनीय सुंदर अशी एक तरुणी तिथे असते. सौंदर्य असं की त्यानी आजवरच्या त्याच्या आयुष्यात कधी ते पाहिलेलं / अनुभवलेलं नाही. त्याला काही कळेनासं होतं. 'आपण कोण?',असं तो तिला विचारतो.
"मी तुमची बायको.."
"पण..."
"मी २४ तासातले १२ तास अशी आणि १२ तास चेटकीण बनून राहू शकते. तुम्ही सांगा मी दिवसा कशी राहू आणि रात्री कशी?"
त्याच्या मनाची दोलायमान अवस्था होते. दिवसा सुंदर बायको आणि रात्री भयानक चेटकीण की दिवसा चेटकीण आणि रात्री शृंगारीक रमणी? कोडं हेच आहे. आता सांग त्याने काय उत्तर द्यावं?"
"तुला जसं पाहिजे तसं राहा. तुझं तूच ठरव. तीही शेवटी एक स्त्रीच होती. तिच्या आयुष्याची वाटचाल तिला ठरवू दिली तर तिला जास्त छान वाटेल. नाही का?"
"एकदम बरोब्बर.. आणि हे ऐकून ती त्याच्या गळ्यात पडली आणि म्हणाली की मी कायमसाठी अशीच सुंदर राहीन फक्त तुझ्याचसाठी..."
"हंऽऽऽऽ... आता मी एक कोडं विचारू का?"
"विचार विचार..."
"तुझ्याकडे एक सुंदर चुटुकली चार चाकी गाडी आहे. तिच्यात एका वेळेस दोनच जणं बसू शकतात ड्रायव्हर धरून. तू ती गाडी एका रात्री एकदम सुनसान रस्त्यावरून नेतो आहेस. रहदारी अज्जिब्बात नसल्यातच जमा आहे समज. समजलास का?"
"होऽ गं. सस्पेन्स घालवू नकोस. पुढे सांग मजा येतेय. माझ्या अंगाला मस्त थंड हवा पण लागतेय आणि आता माझा हातपण दुखत नाही आहे.."
"बरं.. तर मी कुठे होते? अशा वेळेस तुला तिथे एका झाडाखाली ३ जणं उभे दिसतात. एक वैद्यकीय मदतीची नितांत गरज असलेली म्हातारी , एक डॉक्टर आणि एक असते तुझी स्वप्नातली राणी बनू शकेल अशी तरूणी. तर तू काय करशील? कोणाला लिफ्ट देशील? किंवा अशा परिस्थितीत काय करशील?" विचार केल्याचा आव आणत तो खिडकीबाहेर बघत बसला ५ मिनिट. घड्याळाची पाच मिनिटं किती मोठी असतात नाही? त्यानी माझ्याकडून तोंड फिरवलं तेव्हा मला प्रकर्षानी जाणवलं ते ! मग एकदम उत्साहात म्हणाला,"त्या डॉक्टरला मी गाडीची किल्ली देऊन टाकेन आणि त्या वृद्धेला त्वरीत वैद्यकीय मदत मिळेल याची काळजी घ्यायला बजावेन आणि मी स्वत: माझ्या स्वप्नातल्या राणीसोबत त्या झाडाखाली उभा राहीन आणि आम्ही गाणं म्हणू,

दो प्यार करनेवाले जंगलमे खो गए
बागी बने पागल हुए दिवाने हो गए..
अजी अब क्या करे .. कहो अब क्या करे..
दो प्यार करनेवाले जंगलमे खो गये

खूपच सुंदर म्हणत होता तो गाणं.. मीही म्हणायला लागले मग त्याच्यासोबत.... आणि मध्येच एक आवाज कानावर आला,"लाऽऽस्ट स्टॉप.. " मी खडबडून उठून बसले आणि शेजारी बघते तर कोणीच नाही. मी खिडकीशेजारीच बसलेले आणि शेजारी कोणीच नाही. माझा चेहरा एकदम खर्रकन उतरला. मी उतरताना कंड़क्टरला विचारलं,"माझ्याशेजारी कोण बसलं होतं?"
तो म्हणाला," आज कोणीच चढलं नाही बसमध्ये. कोणीच नव्हतं !"

हा माझा सगळा अनुभव एक स्वप्न होता !!! पण अजूनही ते शब्द माझ्या कानात गुंजारव करतायत आणि मन आनंदून जातंय, "दो प्यार करनेवाले जंगलमे खो गए....."

- वेदश्री.

३ टिप्पण्या:

  1. waaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaw khup chan aahe he tuze swapna.......agdi harvun taknare........khup chan

    उत्तर द्याहटवा
  2. Khuuuuuuuuuuuuuuuuuuuupach chan aahe tuze swapna.........................

    उत्तर द्याहटवा
  3. mala vatate he ardha swapna ahe. khari maja pudhe baki hoti pan tuza last stop........

    उत्तर द्याहटवा