सोमवार, ३० जानेवारी, २००६

दे धमाल...

मी पुण्याला असताना रूमवर एकटी बसून कंटाळले म्हणून ई-स्क्वेअरमध्ये सिनेमा पाहायला गेलेली. 'हमतुम' बघायचा होता पण तो ४-५ दिवस फुलपॅक होता.. मग बाकीचे सिनेमे निकालात काढत रात्री साडेआठच्या 'युवा'चं तिकिट काढलं. एकेटीच गेलेली खिंड लढवायला. मल्टिप्लेक्सची रामजन्मी सवय नाही मग कुठलं कळायला कुठल्या पडद्यावर दाखवला जाणारा सिनेमा ते? तिथेच एकीला विचारलं की 'युवा' कुठे लागलाय? तिनी गावठी माणसाकडे फॉरेन रिटर्न्ड माणसाने बघावं तसं माझ्याकडे पाहिलं आणि माझं तिकिट बघून सांगितलं,"जिन्याने वर जा. तिथेच आहे." मी आपली गेले. जे दार दिसलं तिथे घुसले. तिकिटचेकरला तिकिट दाखवलं. तो ही पठ्ठ्या बहाद्दर !! तिकिट नीट न बघताच "तिसरी रो चौथी सीट" सांगून अर्धं तिकिट माझ्या हातात कोंबलं त्याने. मी जाऊन बसले निर्दिष्ट खुर्चीवर. पडद्यावर चित्रं फिरायला लागली. 'धूम'ची जाहिरात लागली. मग हमतुमची.. जाहिरात चालू आहे असं मला वाटलेले पण जाहिरात नसून सिनेमाच आहे हे कळलं आणि बसल्या जागी मला घाम फुटला. मी आजूबाजूला पाहिलं भीतीयुक्त आश्चर्याने. कोणी मला बघतंय की काय असं वाटलं पण सगळेजणं आनंदात हसत होते आणि काहीकाही जणं ( अशा गोष्टी सांगायच्या नसतात कै.. :)) ) मला वाटत होतं की पकडले गेलो तर? मग काय स्टार्ट गेलेला युवा बघायचाय का? स्टार्ट गेलं की जीवाचा तीळपापड होतो. नाही.. हाच पाहुयात. कोणी आलं तर बघून घेऊ. मनाची समजूत घातली गेली होती आणि मी निवांतपणे सिनेमाचा आनंद लुटायला लागले.

पण हाय रे माझ्या कर्मा ! मध्यंतराअगोदर १०-१५ मिनिट एक जोडपं आलं आणि सीट दाखवायला प्रकाशझोत टाकणाऱ्या पब्लिकपैकी एक आमच्या रांगेतल्यांची तिकिटं तपासायला लागला. होताहोता माझ्याजवळ आला. माझ्या पोटात भीतीचा गोळा उठला. काय करावं असं वाटत असतानाच मी त्याच्या "मॅडम, टिकिट दिखाओ." या मागणीला "मैने नहीं रख्खा वो आधा पोर्शन. चेक हो गया इसलीये फ़ेक दिया." असं बोलून धुडकावून लावलं. त्याने तरीही मला उठवलं आणि त्या जोडप्याला बसायला जागा करून दिली. का? तर म्हणे त्यांच्याकडे वैध तिकिटं होती ! त्या दिवशी खरंच माझा मूड काय होता माहित नाही. काय एकेक शब्द फुटत होते तोंडातून,"सगळी यंत्रणाच तकलादू आहे ! तुम्ही तिकिटं तपासाल तेव्हा तपासाल माझा सिनेमा जातोय त्याचं काय? मॅनेजरला बोलवा. कुठेय तो?" असं मी बोलताच काय ते स्त्रीदाक्षिण्य ! काय ती आपुलकी !! मनात एकीकडे खूप वाईटही वाटत होतं की हे जे काय करतोय ते बरोबर नाही पण तसं म्हटलं तर माझी काय चूक होती? मी मुद्दामहून जाऊन नव्हते बसले. चुकून चुकले होते. हंऽऽऽऽ आता नंतर लक्षात येऊनही मी उठले नाही ही थोडीशी चूक आहे पण म्हणून मला सिनेमाच बघू द्यायचा नाही की काय? काय सणक गेली होती त्या दिवशी माहित नाही. सगळं ई-स्क्वेअर दणाणून सोडलं. वेगळी खुर्ची टाकून त्यांनी कोणाला बसवलं तर ३ लाख रुपये दंड असतो, हे मला त्या दिवशी कळालं. मॅनेजिंग कमिटीमधला कोणी एक माणूस तिथे बसलेला सिनेमा बघायला. त्याने मला त्याची जागा दिली वाद मिटवण्यासाठी. नविन जागेवर जाऊन बसल्यावर शेजारी बघितलं तर कॉलेजचा एक कंपू येऊन बसलेला. माझ्या शेजारी बसलेली आसावरी आणि माझी लगेच गट्टी झाली. त्यांचा स्टार्ट गेला होता. मी त्यांना सांगितला तो आणि पुढचा सिनेमा मजेत पाहिला.

इथेपर्यंत सगळा आवेश होता. रणमर्दानी झाशी वगैरे वगैरे काय म्हणतात ते सगळं माझ्यात एकवटलं होतं. शत्रूवर मिळवलेल्या विजयाची धुंदी होती. 'हमतुम'ची धून डोक्यात,मनात आणि तोंडात गुणगुणली जात होती. सैफ आणि राणी तर छायले होते मनावर पण सिनेमा संपता बाहेर आले थिएटरच्या आणि... आणि काय? ११:३० वाजून गेलेले. जवळपास शुकशुकाट झालेला रस्त्यावर. माझी बस समोर दिसत होती पण काही वेळापुर्वी स्त्रीदाक्षिण्य दाखवत असलेला एक तिकिटचेकर मुलगा तिकिटविक्रीला बसली होती त्या मुलीसोबत जात असताना हातवारे करून माझ्याकडे निर्देश करून सांगत होता, "हीच ती मुलगी. किती प्रॉब्लेम झाले माहितेय का? 'हमतुम'च्या तिकिटविक्रीमध्ये लोचा झाला आहे आज काहितरी." आणि ती जीव तोडून सांगत होती, "मी हिला 'युवा'चं तिकिट दिलं आहे." त्यांचं हे बोलणं ऐकताच 'बाऽऽऽऽपरेऽऽऽऽ.... भाऽऽऽऽगो नही तो कचुमर बन गया समझो' असं म्हणत मी धावत सुटले आणि बस पकडायला धावले पण ती मिळाली नाही. थांबणं शक्य नव्हतं कारण त्या जोडगोळीला माझं गुपित कळलं होतं. मग काय? जलद चालण्याच्या शर्यतीत भाग घेतल्यावर चालले नसते अशा वेगात चालायला लागले. काय ती लोकं रस्त्यावरची.. याऽऽऽकऽऽऽ... एका मुलाने लिफ्ट हवी का विचारलं.. :( "नको" म्हणून मी पुढे गेले खरी पण तो तरीही पाठलाग केल्यासारखा मागे येत होता. माझं धाबं दणाणलं होतं. रिकामी रिक्षा दिसली. हुश्शले एकदाची. त्या आजोबांना सांगितला पत्ता. ते म्हणाले," पेट्रोल संपत आलं आहे. मी पुढच्या बस स्टॉपवर सोडतो." 'आई गंऽऽऽ' बस स्टॉपवर बस मिळाली आणि घरी सुखरूप पोहोचले तरीही धडधडत होतं काळीज. दुसऱ्या दिवशी मेसच्या काकू, घरमालकीण काकू आणि आई असा तिहेरी ओरडा पडला तो वेगळाच. पण एकंदर एकदम छान वाटलं या अनुभवाने. परत कॉलेजवयात गेल्यासारखं वाटलं आणि एक मस्त अविस्मरणीय धमाल माझ्या अनुभवांच्या शिरपेचात खोचली गेली.

- वेदश्री.

चारोळ्या

आईबाबा कित्ती दूर शहरी
गणूही आहे चिडलेला भारी
कसा सहू मी इथे एकटी
जीवलगांचा विरह दुहेरी !

स्वप्नात त्याच्या येतेस तू गं
झोपेतही छळून जातेस तू गं
ना सोडी तो अबोला कधीचा
आणि वेल्हाळ हेकेखोर तू गं !

धरला सख्याने आता अबोला
जीव हा तगमगला माझा
पण काही बिघडलेय का त्याचे?
निलाजरा झोडतोय मस्त झोपा !

येईना स्वैपाक जमेना घरकाम
आलाच पुन्हा हा करित गयावया
माझा अंतरीचा जीव तगमगला
धावले मी त्याला सावराया !

कोणाची त्यात आर्त हाक
तर कोणाची आहे आरोळी
कोणा गंमत,कोणा टवाळी
अशी ही वरदायिनी चारोळी !

कातावले मी या जीवनासी
गवसेना साथ माझ्या सख्याची
कुठला कच नी कुठली संजीवनी
मी तर वैदेही, वनवासी रामाची !

कातावले या जीवनास मी
प्रश्नाळले या उत्तरास मी
साथ नको कुणाची या जीवनी
निरोपले या जीवनास मी !

बावरले या जीवनात मी
कातरले या जीवनात मी
साथ देऊनी अशा जीवनी,
सावरले या जीवनास तू !

उचललेस या सुमनास तू
गोडगोजिऱ्या सुमनास तू
भान देऊनी तारूण्याचे त्या
फुलवलेस त्या सुमनास तू !

तूच दिलेली वंचना
तूच दिलेली वेदना
ऋणी मी आजन्म तुझी
तूच झंकारल्या संवेदना !

वाट पहाणे सफल होता
बहरणार परत भावना
म्हणूनच का ह्या विरहाच्या
खोट्या , लटक्या वल्गना?

कळेल का रे तुला
या फुलांची भावना
काट्यावीण सुगंध
मिळतो का हे सांग ना !

नको हा अबोला अता राहवेना
असे एकटेपण मला सोसवेना
कशाचा अबोला? कशा वेदना या?
कसे एकटेपण मला भोगवेना?

नको हा अबोला आता राहवेना
नको एकटे एकटे चालणे हे
करूनी उद्यापन अबोल्याचे
हवेसे तुझे एकटे बोलणे हे !

राहिल्या उरी आता
फक्त वेदना वंचना
दे मनाला उभारी तूच
अव्हेरून वृथा वल्गना !

वाट पहाता पहाता
चांदही नभी थकला
गेला परतून तोही
जीव माझा रडवेला !

स्वप्नामध्ये अवचित माझ्या येउन गेले कुणीतरी
दरवळणारे सूर सभोती छेडुन गेले कुणीतरी
एकटी बरी मी,नको कुणीही,एकटीच बरी मी
म्हणत असताना मी, दुकटे करून गेले कुणीतरी !

- वेदश्री.

माझी घाबरगुंडी !

"ए, तू उठतेयस का? आम्ही गावात चाललो आहे.. तू येणारेस का?" आईचा प्रश्न !
मी गाढ झोपल्याचं नाटक करत ,"अंऽऽऽऽ काऽऽऽऽय म्हणालीस?"
आई जे कातावली की बस्स.. "आम्ही गावात चाललो आहोत. कुलुप लावून चाललोय. तू एकटीचेस घरात .. समजलं का?" आणि आई आणि सगळेजण गेले निघून !!!
यूऽऽऽहूऽऽऽऽऽ..... आता होल वावर इज आवर !!! उठले ताडकन बिछान्यातून. पांघरूण दिलं भिरकावून. काय करावं? काय करावं? अंऽऽऽऽ... हाऽऽऽ टीव्ही बघुया.. डिस्कव्हरी ! मेडिकल डिटेक्टीव्हज... तुम तो छा गयी रे ... मस्त !!! नुसतं बघायला मजाच नाही काही. काहीतरी हवं आहे अजून. काय करुया? अंऽऽऽ.... स्व्वीट डिश करूया ! सकाळच्या पोळ्या होत्याच !! आता हवंय दाण्याचं कूट. कुठे ठेवलंय? कुठे ठेवलंय? आई गं, कुठे ठेवलंयस गं कूट. सापडेचना. अरेच्या ! शेंगदाणे सापडले. चला नही मामूसे नकटा मामू सही ! शेंगदाणे, तिखट, मीठ, तेल, कोथिंबीर थोडीशी. कालव पटकन. शाब्बास. आता पोळीवर पसरवायचं, सुरळी करायची आणि डिटेक्टिव्हज बघत बघत खायचं. काय रम्य कार्यक्रम आहे, वाह ! सोबत जलजिरा करूयात. सर्व तयारीनिशी खुर्चीवर येऊन स्थानापन्न झाले. सुरळी केलेल्या पोळीचा एकच घास माझ्या मुखी प्रवेशला आणि नाकाकानातून धूर निघाला. किती तिखट केलंयस !!! आता काय करू? इतक्या तिखटजाळ शेंगदाण्यांचं काय करू? फ़ेकून देऊया.. बाथरूममध्ये गेले. बाऽऽऽपरे ! कुलुप काढल्याचा आवाज? आली पण का इतक्यातच परत? पटकन शेंगदाणे फ़ेकले बाथरूमच्या आऊटलेटमध्ये. परत आले. अजून एक पोळी हातात घेतली. टीव्ही बंद केला. जलजिरा घटाघट पिऊन टाकला. पेला बेसिनमध्ये फेकला ( आवाज न होऊ देता हे सांगणे न लगे ) आणि दोन्ही पोळ्या हातात घेऊन माझ्या बिछान्याकडे पळाले. पोळ्या एकावर एक ठेवून सुरळी करून घेऊन जाताजाता एक पेपर घेऊन गेले. त्यात गुंडाळून पोटाशी धरली पोळी आणि डोक्यावरून पांघरूण घेऊन गुपचुप झोपून गेले. आई सोनपावलांनी घरात आली. :)) माझं काळीज अजूनही धडधडत होतं. :( मन मध्येच किंचाळलं माझं जोराऽऽत. 'मुर्खानाम शिरोमणी ! तू पाणी टाकलं नाही शेंगदाणे अऊटलेटमध्ये टाकल्यावर. आता आईचं लक्ष गेलं तर? रामाराघवारघुनंदना.. वाचव रे बाबा. नाही नाही... गणूगणेशागजानना, वाचव रे माझ्या बबड्या... नाही नाही.. माझा हा मनोमनीचा ओरडा चाललेला असताना एक खरोखरचा ओरडा ऐकायला मिळाला आणि पाठीत धपाटा.. "शेंगदाणे कोणी फेकले बाथरूममध्ये?" मी त्या गावचीच नाही असा चेहरा करून उठले ;;) आणि म्हणाले, "अगं मला काय माहिती? तू बघतेयस ना. तू गेलीस तेव्हाही झोपलेली होते आणि आत्ताही झोपलेलीच तर आहे ना.. "
"हो गं हो. माझी भोळीभाबडी राणी ती आणि ही पोळ्यांची सुरळीपण कुठून आली तुला माहित नसेलच.. "
'मुर्ख , बेअक्कल , ... ( पुढच्या शिव्या http://www.shivyaa.com/ वर आहेत.. :D ) सुरळी दिसणार नाही अशी व्यवस्था नको होतीस का तू करायला?'
"अगं आई... पण... "
"आता अजून काय सांगणार आहेस? एक शब्द बोलू नकोस.. दोन दिवस जेवण नाही मिळणारे तुला.. " :((
जेवणचं काही नाही.. पण आईनी बोलणंही बंद केलं. तिला मनवायला मी मग सारखी अनुप जलोटांची कॅसेट लावायचे आणि त्यातलं ते गाणं लावत रहायचे येताजाता.. "मै नही माखन खायो री मैया मोरी.. "

:))

अजूनही शेंगदाणे, दाण्याचं कूट, माझी स्वीट डिश, जलजिरा या माझ्या अगदी आवडत्या गोष्टी आहेत. फक्त शेंगदाणेच काय कोणतीही खायची वस्तू वाया जाऊ देत नाही इतकाच काय तो फरक पण ही गोष्ट घडून गेली तरी कितीक तरी दिवस मला कोणी दुपारी निवांत झोपू द्यायचे नाही. मध्येच यायचे आणि म्हणायचे,"ए बघू बघू.. किती पोळ्या लपवून ठेवल्यास ते?" !!!

:((

- वेदश्री.

शनिवार, २८ जानेवारी, २००६

दैनंदिनीतलं पान - २६ जानेवारी

आज २६ जानेवारी ! मी वेगळं ते काय लिहिणार? पण आज मनात असंख्य गाणी फेर धरून नाचत आहेत.. तीच लिहावीशी वाटली , म्हणून ही एक धडपड..

वंदेमातरम , जनगनमन , प्रतिज्ञा , प्रार्थना या सगळ्या तर नसानसात भिनलेल्या आहेतच.. त्याशिवाय..

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती...

रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली

आओ बच्चों तुम्हे दिखाए झाकी हिंदुस्तान की
इस मिट्टीसे तिलक करो ये धरती है बलिदानकी
वंदेमातरम.. वंदेमातरम..

कोण पुरी करणार मनिषा कोण पुरी करणार?
स्वातंत्र्यास्तव शिर तळहाती , घेऊनी लढले परंतू अंती
लढता लढता धारातिर्थी , पडले जे नरवीर तयांची
कोण पुरी करणार मनिषा? कोण पुरी करणार.. मनिऽऽऽषा...

दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल
साबरमतीके संत तुने कर दिया कमाल
रघुपती राघव राजाराम

भारतीय नागरीकांचा घास रोज अडतो ओठी
सैनिकहो तुमच्यासाठी.. सैनिकहोऽऽऽ तुमच्यासाठी !

अगणित गाणी आहेत मनात पण ती सगळी सगळी ऐकून काय होतं माहित नाही आणि म्हणावंसं वाटतं की माझी इच्छा आहे खूऽऽप काहीतरी करायची. मला फक्त एक योग्य दिशा हवी आहे, जिकडे चालून मी देशासाठी काहितरी भरीव काम करू शकेन...आणि म्हणूनच जणू हे एक गाणं सुचत आहे.

एक तुतारी द्या मजलागुनी
फुंकीन जी मी स्वप्राणाने
दीर्घ तिच्या त्या किंकाळीने
भेदून टाकीन सगळी गगने !

- वेदश्री

कंटाळ्याचाच कंटाळा !

अहो कशाचा म्हणून कंटाळा येईल ना अज्जीब्बात सांगता येत नाही. जेवायचा कंटाळा , ऑफीसचा कंटाळा , कामाचा ( हा वाला नेहमीच असतो :) ) कंटाळा , त्याच त्या गप्पांचा कंटाळा.. अगदी कधीकधी तर स्वत:च्या अस्तित्वाचाही कंटाळा येतो बाई.. पण अशा या कंटाळ्याचाच कंटाळा आला तर काय बहार येईल नाही?

काहीही करायला घ्या.. कंटाळाच नाही ! घेतलं काम की कर पटापट. अगदी एखाद्या रोबोटसारखं.. न थांबता.. न थकता.. न कंटाळता ! कामं कशी सटास्सट होऊन जातील. मी तर म्हणते 'कंटाळा' शब्दच नको ! आणि असलाच तर C मध्ये जसं Goto असूनही सांगतात की ते न वापरणारा एकदम पर्फेक्ट प्रोग्रामर.. तसं पाहिजे.. कंटाळा शब्द वापरायलाच लोकांना कंटाळा यायला पाहिजे !

जेवायचा कंटाळा आला आहे?
"नको जेवूस.. अशीच रहा मरतुकडी हो आणि जा वैकुंठाला लवकरात लवक्कर.."
" ए अशी काय बोलतेस गं?"
"मग काय आरती ओवाळू का तुझी पंचारती घेऊन? चल चुपचाप जेवायला.."

कामाचा कंटाळा?
"नको करूस.. बस अशीच.. झालं नाही की मग जी बोंब ऐकावी लागेल त्याची प्रॅक्टिस करत बस.. :)) "
"करतोय ना काम !"
;-)

उठायचा कंटाळा?
"वॉऽऽऽऽव.. काय मस्स्स्स्त वातवरण आहे बाहेर.. मी तर जातेय बाई फिरायला.. कुडकुडत्या थंडीत कोणीच नाही बाहेर.. मीच एकटी असेन रस्त्यावर आणि सोबत असेल फक्त तो... "
" कोण तो?"
"ए गपे.. तू झोप ना.. मला बोलू दे माझं माझं.. हं तर मी कुठे होते? हं... मी असेन आणि सोबत असेल तो .. थंड थंड वारा.. हाहाहाहा.." आणि मग ती मारायला धावेल मला मूड ऑफ केल्याबद्दल आणि आपोआप लवकर उठेल... हाहाहा...

बोलायची गंमत असतेच अशी मजेशीर.. कंटाळ्याला यूंऽऽऽ पळवून लावते चुटकीसरशी.. "लांब जीभ आयुष्य कमी करते." म्हणतात. म्हणजेच जास्त वटवट करणारे लवकर यमसदनी रवाना होतात.. :)) कदाचित म्हणूनच नाही ना मी कंटाळ्याला घालवायच्या निमित्तानी जास्तीत जास्त वटवट करत? :))

- वेदश्री.

शुक्रवार, २७ जानेवारी, २००६

चकवा

ते पावसाळ्याचे दिवस होते. मी मस्त रेडिओ मिरची ऐकत ऐकत नुकतंच जिथे मी शिफ्ट केलं होतं अशा माझ्या खोलीकडे चालले होते. 'दिलको तुमसे प्यार हुआऽऽऽ पहली बार हुआऽऽऽ'.. मीही गुणगुणत होते गाण्याबरोबर. थोडावेळाने मला वाटलं की मी त्याच रस्त्यावरून परत परत जात आहे. सहज मोबूकडे पाहिलं तर तब्बल २ तास झाले होते मी त्या रस्त्यावरून चालत होते ! कालावधी लक्षात येताच पायात पेटके आल्यासारखं वाटलं !! इतक्या थंडीत घाम फुटला. कानावर पडणारं 'जब कोई बात बिगड जाये... जब कोइ मुश्किल पड जाये..' वगैरे शब्द अगदीच असह्य व्हायला लागले ऐकणं. यंत्रवत् मी रेडिओ बंद केला आणि इकडेतिकडे बघितलं. बघते तर काय.. मिट्ट काळोख, सगळा रस्ता नुकत्याच होऊन गेलेल्या पावसाने ओलाचिंब आणि आसपास एक चिटपाखरूसुद्धा नव्हतं. जणू हे काहीच त्या क्षणापर्यंत मी अनुभवलंच नव्हतं. मी गाण्यात गुंगले होते.. चित्रविचित्र आवाज ऐकू यायला लागले. काळीज धडधडायला लागलं माझं. तशाच संभ्रमित अवस्थेत मी आणखीन १० मिनिट चालले कशीबशी.. पण मग हबेलंडीच उडाली माझी मनात येणाऱ्या एकसेएक नकारात्मक विचारांनी.. जेमतेम जीव उरलेल्या मोबूवरून खोलीमैत्रिणीला फोन लावला.आमच्या खोलीच्या आवारात फिरत होते तरीही कितीतरी वेळ ! एकन्दर प्रकाराने पुरती हडबडलेली मी.. सटपटल्याने घाबरलेली मी.. मोबूवरून खोलीमैत्रिणीला माझा दुखडा ऐकवत होते, सांगत होते माझं धाबं दणाणलं आहे म्हणून तर ती तिकडे हसून हसून लोटपोट होत होती .. घाबरले होते, त्यातच त्या निर्जन रस्त्यावरून माझ्याच दिशेने संथपणे चालत येणाऱ्या व्यक्तीला पाहून सुटकेचा निश्वास टाकायच्या ऐवजी त्या व्यक्तीच्या पांढाऱ्या वेशाने आणखीनच घाबरले. रात्रीच्या अंधाराने काही कळत नव्हतं कोण आहे आणि कोण नाही ते.. तऱ्हेतऱ्हेचे विचार करून पुरती गारठले होते मी ! तरीही पुढे जाऊन त्या व्यक्तीला पत्ता विचारायचाच असा निश्चय करून मी पुढे जायला लागले.. ३-४ हात अंतरावर असेल ती व्यक्ती.. आणि तिचे डोळे मला दिसले ! लक्क झालं काळजात माझ्या.. नक्की काय दिसलं आठवत नाही, पण काहितरी चमत्कारिक भाव दिसले मला की काहितरी अनपेक्षित दिसलं माहित नाही.. पण मी अबाऊट टर्न करून जीव मुठीत धरून पळायला सुरूवात केली ! धपापत्या कातर रडवेल्या आवाजात माझ्या मैत्रिणीशी फोनवरून बोलत होतेच.. ती जे हसायला लागली मला की बस्स ! 'घाबरटच आहेस एक नंबरची' वगैरे कायकाय पदव्या बहाल करणं चालू होतं तिचं.. मला तिचं ते फुटकळ बोलणं ऐकायचं नव्हतं पण तिच्या ओळखीच्या आवाजाचाच काय तो एकुलता एक आधार होता त्यावेळेस मला म्हणून झेलत होते तिची मुक्ताफळं !!काहीच म्हणता काहीच मार्ग नव्हता दिसत बाहेर पडायला. त्यात मोबूही झोपून गेला अखेर ! मग मैत्रिणीच्या आवाजाचाही उरलासुरला आधार गेल्याने पुरताच आधार सुटल्यासारखं झालं.. ती कोण अनपेक्षित व्यक्ती होती, जिच्यामुळेच जणू काही हे सगळं दुष्टचक्र मागे लागल्यासारखं भासत होत, ती अजूनही पाठलाग करते आहे की काय बघायला वळून बघून परत समोर बघत नाही तोवर तीच व्यक्ती माझ्यासमोर दत्त म्हणून उभी ठाकलेली !!! 'आऽऽऽऽऽ' करून जोराऽऽऽत किंकाळी फोडली मी.. तर माझं तोंड दाबत ती व्यक्ती म्हणाली,"अय्ययो वेदा डा.. ईट्स मी.. प्रिता.." मग कुठे भानावर आले आणि बघते तर जिच्याशी मोबूवरून बोलत होते तीच प्रिताश्री माझ्यासमोर उभी !!! नंतर माझ्या एकंदर वागण्याचं रसभरीत वर्णन ऐकूनैकवून जो एकच हास्यकल्लोळ झाला त्या दिवशी आमच्या खोलीत विचारू नका !!! जाम मजा आली, त्या दिवशी मी स्वतः स्वतःवरच दिलखुलास हसून घेतलं !!!!!

- वेदश्री.

मंगळवार, २४ जानेवारी, २००६

प्रेमनियोजित विवाह - भाग ५

"अरू, तू माझ्यासोबत येणार होतीस ना? मग आता मध्येच काय झालं?" - वैदेही
"मला बाईकवर जायचं आहे कुणालसोबत. जाम धमाल येईल. तूही रामसोबत का नाही येत घरी? चलो रेस हो जाए.."
"नको बाई रेस बिस... मी जाईन माझीमाझी."
"का गं? का नको माझ्यासोबत?" - राम.
"तुझ्यासोबत नको असं नाही रे. मला .."
वैदेहीला पुढे बोलूच न देता अरुंधती तिची नक्कल करत ओरडली, "भीती वाटते डबलसीट बसायची. ऍक्सलरेटर आणि ब्रेक्स माझ्या हातात असले तरच मला आवडतं जायला गाडीवर नसता नाही. "
"अजबच आहे. मला नव्हतं वाटलं की तू कशाला घाबरत असशील असं."
"मी घाबरत नाही."
मोठ्ठ्याने हसत राम,"हो का? मग बस बाईकवर.बघूयात काय होतं ते."
वैदेहीचा चेहरा एवढासा झाला.
"तोंड वाकडं करू नकोस. बस ना."
"नको. मला नाही येत बसता मागे. मी कधीच प्रयत्न केला नाही तसं बसायचा. मला खूप असुरक्षित वाटतं.."
"अच्छा मग आपण नाही हरवू शकणार तर कुण्या आणि अरूला.."
"तसंच काही नाही. मला चालवू देतोस का गाडी? मी हमखास हरवेन त्याला.."
"ठीके. चालेल."
"३.......२.........१........ गोऽऽऽ" असं करत स्वानंद ओरडला आणि कुणाल-अरू आणि वैदेही-रामची रेस सुरू झाली. कुणालची बाईक वैदेहीशेजारून झुऽऽऽईऽऽऽकन निघूनही गेली पुढे आणि वैदेही हळूहळू मागे पडायला लागली.
"काय चाललं आहे वैदे? अगं कुणाल गेलाही निघून पुढे. आपण मागेच आहोत अजून.."
वैदेही आपल्याच विचारात गुंग झाली होती. तिने हळूच गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली. खाली उतरत राम तिला म्हणाला," काय झालं वै? बरं नाही का वाटते तुला?"
"मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. आपण कुठेतरी बसूयात का?"
वैदेहीचा गंभीर चेहरा पाहून रामही गंभीर झाला आणि 'हो' म्हणाला. एका बसस्टॉपकडे जाऊन तिथे ते बसले आणि वैदेही बोलायला लागली,"राम, तुझ्यात ते सगळे गुण आहेत जे मी माझ्या नवऱ्यात असावेत असं अपेक्षिलं होतं. पहिल्यांदा तुला पाहिलं तेच सदऱ्यापायजम्यात, आणि तुझा तोच साधेपणा मला मनापासून भावला ! तरीही तू नाही म्हणावंस म्हणून कायकाय केलं मी पण तुझा प्रतिसाद अगदी वेगळाच. जे मुलांना अजिबात आवडत नाही ते ते मी सगळं ट्राय केलं तुझ्याबद्दल पण तुला काही फरकच पडला नाही. तुला राग येईल माझा कदाचित पण मी तुला शोधलं नेटवर ! तेही एकदा नाही तुला भेटल्यापासून तोच छंद लागल्यासारखं झालं होतं. तुझी सगळी माहिती मी जमवली. जशीजशी तुला ओळखत गेले तशीतशी मी स्वतःलाच हरवत गेले. असं याआधी कधीच झालं नाही मला. मला लग्नासाठी पहायला आलेल्यात कोणात इतकी गुंतलेय असं कधीच झालं नाही.तू मला खूऽऽऽऽऽप आवडलास राम....... "
वैदेही मनापासून बोलत सुटली होती आणि राम ऐकत होता.
"आजपर्यंत मला खूप मुलांनी लग्नाबद्दल विचारलं. मागेही लागले काही, त्यातल्या काहींचे काही गुण मला खूप आवडले पण म्हणून माझा नवरा व्हायला पूर्णपणे पात्र असा कोणीच भेटला नाही आणि मी नाही म्हणत गेले. कधी मला कोणी मुलगा आवडेल आणि मी स्वतःहून हे त्याला सांगेन असं मला स्वप्नातल्या स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं जे आज मी प्रत्यक्षात करते आहे. आईबाबासुद्धा खूप आवडले मला, एकंदर तुझं कुटुंबच खूप छान आहे. पण.."
रामच्या डोळ्यात बघण्याचं टाळत वैदेही बोलत होती.
"मी तुझ्याशी लग्न नाही करू शकणार, राम. तू खूप छान आहेस आणि त्या तुलनेत मी काहीच नाही. मी तुझ्यासाठी योग्य नाही राम. प्लिज डोंट कॉम्प्रोमाईज.. माझ्या आईबाबांबद्दलची, माझ्या छकुलीबद्दलची माझी स्वप्नं अशी अर्धवट टाकून माझ्याच स्वतःच्या सुखाचा, स्वार्थाचा विचार मी करायचा आणि कोणाबरोबर लग्न करून निघून जायचं? हे मनाला कधीच पटत नाही माझ्या. तुझ्यात मी गुंतलेय राम पण या प्रश्नांची उत्तरं नाहीत माझ्याकडे. त्यामुळे..." वैदेही रडायला लागली होती आणि हुंदके देत म्हणाली,"मला नाही लग्न करायचं तुझ्याशी.."
५ मिनिट वाट पाहिली वैदेहीने पण राम काहीच बोलत नाही, "रडू नको.." वगैरे काही म्हणून समजावणीदाखल काहीच शब्द बोलत नाही किंवा रागानेही काही बोलत नाहीसं पाहून वैदेहीला खूप आश्चर्य वाटलं.
"तू काहीच का बोलत नाहीस?"
"तुझं बोलून संपायची वाट बघतो आहे."
डोळे पुसत हसत वैदेही म्हणाली,"काय रे तू पण.. झालं माझं बोलून..""हुश्श ! संपलं का एकदाचं? बरं झालं. मला सॉलीड भूक लागली आहे, काहितरी खाऊयात का?"
"राऽऽम ! मी इतका वेळची जे बोलले त्याचं काय? त्याच्याबद्दल काही न बोलता तुला भूक लागतेच कशी?"
दिलखुलास हसत राम म्हणाला,"त्यात काय बोलायचं आहे? इथे कोणाला लग्न करायचं आहे तुझ्याशी?"
"म्हणजे?"
"म्हणजे मलाही तू खूप आवडली आहेस पण तरीही मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आहे."
"का बरं?"
"कारण कशाला हवंय तुला? तुझं पर्पज सॉल्व्ह झालं ना.. मग?"
"कारण हवंय ना पण मला.."
"तू मला काय सांगतेस? परदेशी नोकरी करणारा मुलगा पहायला येणार म्हटलं की मुली एकतर शर्टपँटमध्ये असतात किंवा नटूनथटून साडीमध्ये. मला वीट येतो या गोष्टींचा. एकतर लग्न करायचं नाही हजारदा सांगूनही आईबाबा ऐकत नाहीत. त्यात आणखिन अवाजवी अपेक्षा असतात मुलीवाल्यांच्या. सगळ्यालाच फाटा द्यायचा हेतूने मी माझा आवडता पेहराव करून आलो आईबाबा ओरडत असूनही. वैदेही नामक मुलगी मला नाही म्हणणारच या धुंदीत मी आलेलो पण तू अगदीच साधी सामोरी आलीस. तिथूनच तुझ्याबद्दलचे सगळे आडाखे चुकत गेले. ते चुकत जाणंच आवडत गेलं. त्यात तुझा माझ्यावरचा विनाकारणचा राग तर अजूनच छान वाटत होता. भारी मौज आली. तू मला शोधलंस नेटवर आणि मी तुझा सगळीकडे पाठलाग केला हे सात दिवस ! तू कोणाशी कशी वागतेस, बोलतेस हे सगळं पाहिलं मी. तुझं कोणाशी जमतं, कोणाशी जमत नाही हे सगळं समजून घेतलं मी. इतरांना तुझ्यातल्या ज्या गोष्टी खटकतात, त्याच मला का आवडत गेल्या हे कळलं नाही. आज तू ट्रीपच्या नादात सायलीला परीक्षेसाठी बेस्ट लक करायला विसरलीस, याचं मला राहून राहून आश्चर्यही वाटतं आहे आणि वाईटही. तिला खूप वाईट वाटलं होतं आज. तिच्या आवाजावरूनच कळत होतं ते. मी तिला फोन केला, याचा तिला आनंद झाला होता..."
"ओऽऽह नोऽऽऽ " वैदेही.
"ओह येस ! माझ्या आईला माझ्याशिवाय कोणीही अगंतुगं केलेलं मला आवडत नाही, पण जेव्हा आईशी बोलनं झालं आणि तुमच्या फोनवरच्या बोलण्याबद्दल कळलं तेव्हा राग नाही आला. मला खूप आवडलीस तू वै.. पण..."
"खरं सांगू का तुला? मला खूप आवडलं असतं तुझ्याशी लग्न करायला. आता तू मला घरी सोडलंस की परत आपण कधी भेटणार याची काहीच कल्पना नाही. हे सगळं क्षणभंगूर आहे. तू भेटलास आणि माझ्या स्वप्नांना जी जागा मी दिली होती तीच बळकावून बसलास. सात दिवस तुझ्याशिवाय मी कशाचाच विचार नाही करू शकले. मला माहित आहे या सगळ्यातून बाहेर निघणं खूप अवघड आहे पण त्याशिवाय मार्ग नाही. मी माझ्या आपल्यांना सोडून तुझ्यामागे नाही येणार. परदेशात कायमचं वास्तव्य हे मला पटणेबल नाही, राम. कूपमंडूक म्हण मला हवं तर तू पण या वयात आईबाबांना एकटं सोडणं मला आवडणार नाही त्यामुळे मला नकार देऊन टाक.""काय सांगतेस वै? तुला परदेशात रहायचं नाही? खरं बोलतेयस?"
"हो अगदी खरं.."
"वै, मी न्यूजर्सीत नोकरी करतो ही तुझ्या नजरेत माझी जमेची बाजू नाही?"
"न्यूजर्सीचं कौतुक मला अजिबात नाही. फ़िरायला जायला एखाददोन वर्षं ठीके.. पण कायमचं रहायला? नोऽऽ वेऽऽऽऽ इथे पुण्याला आलेय तरी अर्धा जीव घरी असतो माझा. काहीही गरज लागली तर कधीही माझं सामान पॅक करून मी आईबाबांकडे जाऊ शकते. परदेशात गेल्यावर ते काहीच करता येणार नाही. "
"सही ! हेच शब्द ऐकायला मी कधीचं कोणी भेटतं का शोधत होतो. मलाही आवडत नाही परदेशात रहायला. माझ्या स्वतःच्या कंपनीचं स्वप्न उराशी बाळगून त्याच स्वप्नपूर्तीसाठी पैसे जमवायला चांगलाच हातभार लागेल म्हणून मी तिथलं प्रोजेक्ट ऍक्सेप्ट केलंय. आईबाबांची मलाही खूप आठवण येते. माझं असं कोणीच नाही तिकडे न्युजर्सीला. तू येशील का माझा एकटेपणा घालवण्यात मला मदत करायला?"
वैदेही अगदी आश्चर्यचकित नजरेने रामकडे बघत होती.
"पण माझे आईबाबा.. "
"फक्त तुझे की आपले?"
"माझी नोकरी? "
"इथे करतेस तशी तिथे कर. मी आहेच की त्या शोधकार्यात मदत करायला. आपण इथे परत आलो की आपल्याच कंपनीत काम करशील तू. ठिके? उत्तर आत्ताच सांग असं म्हणत नाही. पूर्ण वेळ घे तू तुझा आणि सांग मला. खूप उशीर झाला आहे, निघुयात का आपण? "
"हो." म्हणाली वैदेही आणि ते निघाले. गाडीजवळ पोहोचताच वैदेहीने किल्ली रामला द्यायला हात पुढे केला. ते पाहून रामला खूप आश्चर्य वाटलं आणि हसत त्याने किल्ली हातात घेऊन गाडी सुरू केली. गाडीवरून दोघं जात असताना थोडे दूर जात नाहीत तर रामचा मोबाईल वाजायला लागला.
"हॅलो"
"राम, कुठे आहेस?"
"बाईक चालवत होतो. वैदेहीला घरी सोडायला निघालो आहे."
"कशी झाली ट्रीप? बोटींग केलं की नाही मग शेवटी?"
"ट्रीप एकदम झकास झाली. बोटींग करायला वेळ नाही मिळाला पण ते होईलच थोड्या दिवसात कारण आमचा पहिला हनिमून महाबळेश्वरलाच करायचा असं आम्ही ठरवतो आहोत... खूपच खास जागा झाली आहे ती आमच्यासाठी. हो ना गं वैदेही?",असं म्हणून रामने मोबाईल वैदेहीकडे दिला आणि ती लाजून हसत "हो." म्हणाली.
"ओऽऽहोऽऽ.. वैदेही, कळलं बरं का मला आता, काल स्वप्नात कोण आलं होतं तुझ्या ते..", या आईच्या वाक्यावर वैदेही मनापासून खळखळून हसायला लागली.

- वेदश्री.

सोमवार, २३ जानेवारी, २००६

प्रेमनियोजित विवाह - भाग ४

जवळजवळ पहाट होईपर्यंत जो सगळ्यांचा असा धुमाकूळ घालणं चाललेलं होतं की विचारायला सोय नाही पण मग सगळेजणं डिस्चार्जड होत जातील तसेतसे झोपायला लागले. शेवटचा ५-६ जणांचा कंपूही खेळून खेळून दमला आणि झोपला. ६ च्या दरम्यान वैदेहीचा मोबाईल थरथरला. कितीकवेळ तर तिला वाटत होतं की स्वप्नातच मोबाईल वाजतोय. स्वप्नातल्या स्वप्नात तिनी तो उचलला आणि इच्छित व्यक्तीशी बोलायलाही सुरूवात केलेली ! पण तरीही थरथराट गेला नाहीसं उमगून तिला कळलं की हा खरा मोबाईल बोलावतोय. तो कानाला लावून नेहमीच्या झोपाळू आवाजात,"ए आई, काय गं सकाळी सकाळी फोन करतेस? ५ मिनिट झाले झोपलेय मी.. ही अरू बघ कशी लोदळलीये माझ्या अंगावर जशी काही मी म्हणजे मी नाही तर लोडतक्काच आहे तिचा. किती ढकललं तिला तरी परत परत खांद्यावर डोकं ठेवते. यातून थोडीश्शी डुलकी लागली नाही की तुझा फोन. सायलीला उठव. झोपली असेल ढाराढूर कुंभकर्णासारखी. परीक्षा आली म्हटलं की हिला झोप इतकी का प्रिय होऊन जाते कळत नाही. जा बाई किती बोलतेस गं तू ! मी तुला थोड्यावेळानी फोन करते म्हटले ना. चिडू नकोस गं. मला खूपच झोप येतेय आत्ता. तो आलाय स्वप्नात. नंतर बोलू. चल बाय. मी करते तुला फोन थोड्यावेळाने. चालेल ना?"
फोनमधून मंजूळ आवाज आला,"हो चालेल की." आणि फोन डिस्कनेक्ट झाला. वैदेही झोपून गेली परत.

महाबळेश्वरला एका हॉटेलसमोर थांबलेली बस तेव्हा सगळे उठवत होते एकमेकांना. तोंडहात धुतले आणि नाश्त्याची वाट पहात सगळे थांबले. आठ-साडेआठ चा सुमार असावा. वैदेहीने घरी फोन केला. बाबांनी घेतला. "हॅलो बाबा, मी आत्ता महाबळेश्वरला आहे. धमाल मजा येतेय. काल मी भडंग आणि खोबऱ्याच्या वड्या बनवल्या आणि बट्टूचे पराठेही. आई आहे का? तिला द्या ना. तिला गंमत सांगायची होती वड्यांची. काल अगदी फालंफोक झाला होता वड्यांचा. कसा सावरून घेतला ते माझं मला माहिती.. " बाबांनी आईला हाक मारली पण वैदेहीचं इकडे चालूच, "होय हो. काळजी करू नका. अरुंधती आहे काळजी घ्यायला माझी. तिने माझ्या खांद्याला तिची डनलॉप पिलो समजलं होतं कधीचं. आता गेलीये नाश्त्याची सोय बघायला. "
आईने फोन घेतला,"काय गं? काय म्हणतंय महाबळेश्वर? मला वाटलं दुपारी वगैरे फोन करशील. सकाळीसकाळी कसा काय केलास?"
"अशी काय करतेस? तूच नाही का सकाळी फोन केलेलास मला?"
"मी? मी कधी केला फोन? आज पाणी आणि लाईटचा गोंधळ चालला आहे नुसता आणि त्यात ठमीही उठत नव्हती. एकटी कुठेकुठे बघू मी आता?"
काहितरी चुकतंय. आईने फोन केला नव्हता मग कोणाचा फोन होता सकाळी? सावरून घेत वैदेही,"बऽऽघ.. मग मला स्वप्नातच असं वाटलं असेल की तुझा फोन आलाय असं. ते जाऊ दे. खूप मज्जा येतेय इकडे. घरी आली की सांगेन सगळं बैजवार. सायलीचं आवरलं नसेलच. मी तिला परीक्षेला जायच्या वेळी करेन फोन. चल ठेवतेय आता. बाय.."
"बाय."
फोन तर ठेवला पण सकाळचा फोन कोणाचा होता मग हे बघायला वैदेही कॉल हिस्टरी बघायला लागली. तेवढ्यात दुधाचा कप घेऊन येऊन अरुने वैदेहीच्या पाठीवर थाप मारली होती.
"खांदा झाला तर आता माझी पाठ गवसलीये का गं तुला अरूराणी?"
"काय करतेयस?"
"कॉल हिस्टरी... बॅक... हा कोणता नंबर आहे आता?"
"कोणता? कोणता? बघू बघू.." असं म्हणत मोबाईल देण्याची वाट न बघता वैदेहीच्या हातून मोबाईल काढून घेत नंबर बघायला उतावीळ झाल्यासारखी अरू बघायला लागली.
"हा लँडलाईन नंबर आहे. एस्टीडी कोड शोधू शकतो पण नंबर कोणाचा आहे हे समजण्यासाठी.." असं म्हणत तिने सरळ तो नंबर डायल करून टाकलेला होता !
"अगं नको नको.." असं वैदेही ओरडत होती तरीही तिने ऐकलं नाहीच.
"तुला फोन केलेला इतक्या भल्या पहाटे आणि इतका वेळ बोलणं झालेलं तरी तुला माहीत नाही कोणाशी बोललीस ते. धन्य आहे तुझीपण."
फोनवर अरु," हॅलो.."
"हॅलो . सुलभा बोलतेय."
"कोण सुलभा?"
"आपण कोण बोलताय? आपण फोन केलेला आहे."
"सकाळी माझ्या मैत्रिणीच्या मोबाईलवर या नंबरवरून फोन आलेला आणि कोणी बोललेलं तिच्याशी. तिला आत्ता आठवत नाही आहे म्हणून मी फोन केला."
वैदेही डोक्याला हात मारून घेत होती. तिकडून काहितरी बोलणं झालं आणि अरूने फोन वैदेहीला दिला. "तुमच्याशी बोलायचं म्हणतायत सुलभा मॅडम."
अरूकडे पाहून दातओठ खातखात वैदेहीने फोन घेतला. "हॅलो.."
"हॅलो वैदेही. मी रामची आई बोलतेय."
"आऽऽऽऽऽऽईऽऽऽऽऽऽऽ !!! ", एक आवंढा गिळत वैदेही कसंबसं बरळून गेली.
"घाबरू नकोस. मी काही करणार नाही तुला. सकाळी सहज म्हणून तुला फोन लावला होता. छान बोलत होतीस."
वैदेही जीवाचा आटापिटा करून आठवायचा प्रयत्न करायला लागली की ती सकाळी काय बोलली होती पण खूपच अंधुकसंही काही आठवत नव्हतं तिला.
"मला काहीच आठवत नाही आहे हो मी सकाळी कय बोलले तुम्हाला ते."
"आता का अहोजाहो करतेयस? सकाळी तर छान 'ए आई' म्हणून सुरूवात केलेलीस. कित्ती गोड वाटलं सांगू."
रामाकृष्णागोविंदा वाचव रे बाबा. आठवू दे काय बोलले ते.
"मग मी माझ्या आईशी बोलतेय असं समजून बोलले असेन. काय बोलले मी तुम्हाला सकाळी?" बोबडी वळल्यासारखा एकेक शब्द वैदेहीच्या तोंडून निघत होता.
"कोणीतरी स्वप्नात आलं सांगत होतीस." असं म्हणून खळखळून हसल्याचा आवाज आला.
"कोण?"
"तेच तर नाही सांगितलंस ना. तू सांगायला फोन करते म्हणालेलीस. आत्ता केलायस तर सांगून टाक."
"काहीतरीच काय हो?"
"अहोजाहो नाही अगंतुगंच म्हण. छान वाटतं."
हॉटेलपासून दूर जात दुधाचा एकेक सीप पितपित वैदेही बोलत होती.
"कोणी नाही आलं स्वप्नात वगैरे पण काल काय गंमत झाली सांगू का? .." पासून जे सुरू झालं वैदेहीचं बोलणं ते सकाळच्या फोनपासून, वड्या बनवण्याच्या फालंफोक्ला वळसा घालून चप्पल तुटून बसमध्ये येऊन केलेल्या धुमाकुळापर्यंत येऊन पोहोचेपर्यंत चालूच होतं. अरूने हात धरून ओढायला सुरूवात केली इतक्यावेळेस हाक मारूनही येत नाही म्हणता आणि मग वैदेही,"बापरे.. कितीवेळचं बोलतेय मी. चल गं आता पॉईंट्स बघायला जायचं आहे. ठेवू का फोन?"
"ठेव पण स्वप्नात कोण आला ते राहिलंय सांगायचं. परत फोन करशीलच ते सांगायला याची मला खात्री आहे. करशील ना?" तिकडून हसतहसत प्रश्न विचारला गेला आणि वैदेही सत्यसृष्टीत आली.इतका वेळ बोलत बसलो याचा अर्थ काय घेतला असेल आईने? स्वप्नात कोण आलं हे त्यांनी गृहित धरलं असेल का? तसं गृहित धरणं चुकीचं आहे का? मी आईला म्हणाले की घरी येऊन सांगते सगळं मग आईला का सांगत बसले आत्ता सगळं? आई-आई? दोघी आईच? विचार करून करून वैदेहीचं डोकं सुन्न झालं असतं पण अरू होती ना..
"का गं कोण होत्या त्या सुलभा? तू पण शर्थ करतेस अगदी.. राँग नंबर असला तरी तास तास बोलत बसतेस.."
"सुलभा म्हणजे रामची आई."
"ओऽऽऽऽऽऽहऽऽऽ राऽऽऽऽमच्या मातोश्रींचा फोन होता काऽऽ. आता इकडच्या स्वारींना आपण ही बातमी कधी सांगणार आहात?"
"अर्धेऽऽऽऽ चपचु चसबै चगुनसां चवतेठे आहेआ चलातु चमी. चतो चनफो चझ्यासाठीमा चताहो चरीज चमच्यारा चईनीआ चलाके चताहो."
"चमच्यारा चईचाआ चनफो चदेहीलावै? चपलाघ चहेआ चलिड्सॉ.. चत्ताचआ चगळास चमलामा चडतोफो." स्वानंद असं बोलला आणि पुढे निघालेल्या रामकडे धावला.
"आन रामा स्व कृष्णा आंब्रामा थकृष्णा आझी रामा मकृष्णा उला रामात कृष्णा अपथ रामाश कृष्णा आहे रामा आकृष्णा. आंब्रामा थकृष्णा आहितर्रामा नकृष्णा ओलणार रामा बकृष्णा आहीरामा नकृष्णा उझ्याशी रामातकृष्णा." असं वैदेही ओरडली आणि स्वानंद थांबला. पण सगळेजणं वैदेहीकडे चमत्कारिक नजरेनी बघायला लागले कारण ही सांकेतिक भाषा फक्त शाळकरी स्वान्वैदेची गुपित भाषा होती ! इतक्यांदा रामाकृष्णाच ऐकू आल्याने इतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर मात्र असे भाव होते की 'रात्रीची गुम झालेली रामात अजून निघालीच नाही की काय वैदेही बाहेर?' रामला काय भाव चेहऱ्यावर ठेवावे तेच कळत नसल्यासारखं झालं. हसावं तर पंचाईत न हसावं तर पंचाईत. वैदेहीची तर सट्टीपट्टीच गुम झाली होती. प्रकरण हाताबाहेर चाललंय की काय असं आताशा तिला वाटायला लागलं होतं जे म्हटलं तर तिला खूप खूप हवंहवंसं वाटत होतं म्हटलं तर अगदी नकोनकोसं !

"बस घेऊन आलो असतो ना आत तर बरं झालं असतं. आता कितीक चालावं लागतं आहे. बाकीचे घेऊन चालले आहेत गाड्या बिनधास्त आणि मला काय सांगत होतास रे की म्हणे गाड्यांना परवानगी नाही आहे आत जायला. बोटींग नाही मिळणार अशाने करायला. मागच्यावेळी झालेलं ना पॉईंट्स बघून. आता बोटींग घालवण्यात काय पॉईंट आहे का बरं?"
"किती वटवट करतेस गं वैदेहीऽऽऽ एक दिवस राहून घेऊयात बोटींगसाठी. आहे काय आणि नाही काय?"
"शहाणाच आहेस की. राहायचं वगैरे काही नाहीये. आजच बोटींग करूयात बस्स. काय हो की नाही रे राम?" हळूहळू रामला इतर दोस्तांसारखं वागवत अरेतुरे करायला वैदेहीने सुरूवात केली होती.
"तुम्ही ठरवाल तसं. वैदे, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं मला महत्त्वाचं.. "
"मस्कापॉलीश बिल्कुल नहीं चलनेवाली. आधीच ६-७ वड्या फस्त केल्या आहेस तू खोबऱ्याच्या. आता आणखीन हव्या असतील तर अंकी,स्वान,जिग्या मागे राहिलेत. ते आल्यावर त्यांना देऊन उरलं की मग विचार करेन. उरल्या तर मिळतील तुला वड्या. सांगितलं कोणी बनवायला आणि खातंय कोण असं झालं आहे."
"मीच सांगितलं होतं कौस्तुभला वड्यांबद्दल आणि म्हणूनच तो तुला म्हणालेला वड्यांबद्दल." हे रामचे शब्द ऐकून वैदेही हतबुद्धच झाली.

एको पॉईंटला सगळेजणं ओरडाआरडा करून एको ऐकण्यात आणि निसर्गसौंदर्य बघण्यात गुंग झाले होते. राम वैदेहीजवळ जाऊन म्हणाला,"मला तुला वड्या नव्हत्या मागायच्या. दुसरंच बोलायचं होतं.. "
वैदेही हडबडली. 'काय बोलायचं असेल याला आता?' "बोल की. काय बोलायचं आहे ते. इतकी काय प्रस्तावना लावलीयेस उगीचच? काय आहे ते बोलून टाक की एकदाचा."
"एक्झॅक्टली. असंच आणखी एकाला वाटतंय. मग तू का बोलत नाहीयेस त्याच्याशी मनमोकळेपणाने? जाणिवपूर्वक का टाळतेयस त्याला?"
"मी? मी कोणाला टाळतेय?" उत्तर माहित असूनही वैदेहीचा नामानिरळं राहण्याचा प्रयत्न.
"अंगद. तू का बोलत नाहीयेस त्याच्याशी? अरू सांगत होती की तू तिला द्यायला सांगितलीस खोबऱ्याची वडी त्याला. तो जिथे जिथे असेल तिथेतिथे तू जात नव्हतीस. त्याला हेतूपुरस्सर टाळत होतीस. असं का करतेयस सांगशील का?"
"मी टाळत नाहीये कोणाला."
"मग हे जे काय वागतेयस याला काय म्हणतात?"
"माहित नाही. मला नाही आवडते त्याच्याशी बोलायला बस्स."
"अगं पण का? "
"तो कसं बोलला होता जेव्हा मी बसमध्ये.."
पुढे तिला बोलू न देता राम म्हणाला,"तुला जसं वाटलं तसा त्याचा उद्देश अज्जिबात नव्हता तसं बोलण्यामागे. तो जिथे लहानाचा मोठा झाला तिथे अशीच भाषा सर्रास वापरली जाते म्हणून तो बोलून गेला. इथे तसं बोलल्याचे वेगळेच अर्थ निघतात हे मला माहितेय. मी तुला सॉरी म्हणालोय आणि तोही म्हणालाय जेव्हा त्याला ही गोष्ट मी समाजावून सांगितली. आता काय प्रॉब्लेम आहे तुला त्याच्याशी बोलायला?"
".."
"तो खूप चांगला दोस्त आहे माझा. खूप हुशार आणि समंजस मुलगा आहे. माझा कलीगही आहे तो. तू असं वागू नकोस त्याच्याशी प्लिज. तो घुम्यासारखा वागतोय तू त्याला टाळतेयस म्हणून. तो हे बोलला नाही मला पण मला माहितेय की त्याला वाईट वाटतंय. माझ्यावर थोडा जरी विश्वास असेल ना तुला, वैदे तर तू त्याच्याशी बोल. तो तुझा खूपच छान दोस्त होईल याची मी तुला खात्री देतो. बोलशील ना त्याच्याशी?"
द्विधा मनःस्थितीत अडकली वैदेही. एकीकडे तिला अंगदविषयी अजूनही राग वाटत होता तर राम जे बोलला तेही समजून घ्यायची इच्छा होती. आता काय उत्तर देऊ रामला? संभ्रमित अवस्थेत वैदेही बोलून गेली,"मला माहित नाही."
राम तिथून निघून गेला काहीच न बोलता. वैदेहीच्या मनात रामचे शब्द परत परत घुमत असतानाच, "वैदेही, आम्ही चाललोय. दमली का? अरेरे.. इतक्यात हरलीही का?" हे स्वानंदचे शब्द ऐकू आले.
"मी दमलेली नाहीये. मीच आधी पोहोचणार आहे पुढच्या पॉईंटला."असं म्हणत वैदेही पळाली. विचार मनात चाललेच होते तिच्या. मी का अडकतेय या गुंत्यात? कोण कुठला अंगद आणि कोण कुठला राम.. मी का विचार करत बसलेय त्यांचा? असं म्हणून कमरेला लटकवलेला वॉकमन चालू करून इअरफोन्स कानात घालणार इतक्यात कुठल्याशा झाडावरून आवाज आला 'कुहूऽऽऽ कुहूऽऽऽ ' आणि वैदेहीनी वॉकमन बंद करून टाकला आणि ती परतीची साद देत ओरडली 'कुहूऽऽऽ कुहूऽऽऽ' लहानपणापासूनचाच खेळ तिचा तो. कितीतरी वेळ हेच चाललं होतं वैदेहीचं आणि ती कोकिळ कुठे दिसतो का हेही शोधायला लागली. मनाच्या एका कोपऱ्यात विचारांचं द्वंद्व चाललं असलं तरीही ती या खेळामुळे त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करण्यात यशस्वी झाली होती. सगळेजणं खूप मागे पडले होते आणि ही एकटीच खूप पुढे येऊन पोहोचली होती कुहू कुहू करत. तेवढ्यात कोणीतरी धप्पकन पडल्याचा आवाज आला आणि मागोमाग आवाज आला,"ओऽऽऽऽह.. ओहऽऽ माय गॉडऽऽऽ.." वैदेही दचकली आणि आजुबाजुला पहायला लागली कोणी दिसतंय का ते पण कोणीच दिसेना. आवाज आला तिकडे जावं की नाही हा नविनच विचार आता तिच्या मनात स्वार झाला होता. मनाचा हिय्या करून ती गेलीच बघायला काय चाललं आहे ते. बघते तर अंगद कपडे झटकत वाकडातिकडा होत उभा राहात होता. अंगद वैदेहीकडे बघून ओशाळवाणं हसला. त्याचं ते हसणं आणि विचित्र अवस्था पाहून आणि राम बोलला होता ते शब्द आठवून वैदेहीला अपराधी वाटायला लागलं.
"काय झालं?" इतकेच शब्द निघाले तरीही तिच्या तोंडून !
"नथिंग. आय वॉज जस्ट टेकींग अ स्नॅप बट कुडंट बॅलन्स मायसेल्फ.. " असं म्हणून हसायला लागला मोठ्याने.
"म्हणजे?"
"म्हंझे म्ही.. झाढाव्हर.. फोठो.." हातवारे करून अंगद आदखळत मराठी बोलत होता.
"हे भगवान ! तिथे कशाला गेलेलास कडमडायला? आणि इकडे कोणीच नाही आहे. काही झालं असतं तुला मग?"
"अ व्हेरी क्यूट नेस्ट इज देअर अँड इन दॅट अ स्मॉल बेबी इस वेटींग फॉर इट्स पॅरेंट्स. आय ऑल्वेज वेटेड सच इन्सिडेंट टू केज इन माय कॅमेरा यू नो?"
"ओऽऽऽह.. खरंच? मलाही आवडतात लहान गोडुली पिल्लं बघायला पण झाडावर चढायचं म्हणजे थोडं विचित्रच वाटतं. "
"व्हॉऽऽऽट्ट? यू डोंट ट्राय प्लिज.. आय डोंट वाँट दॅट टू हॅपन विथ यू व्हीच आय ऍम ऑलरेडी एक्स्पिरिएन्सिंग.."
आता हसायची पाळी वैदेहीवर होती.
"बट यू कॅन सी द स्नॅप इन माय कॅमेरा.." असं म्हणत अंगदने त्याचा कॅमेरा वैदेहीच्या दिशेने पुढे केला. आत्तापर्यंत कोसावरून बोलत असलेली वैदेही अंगदकडे गेली. कॅमेरा घेऊन त्यातला फोटो बघितला आणि हरखूनच गेली. "मला हा फोटो हवाच आहे." असं कधी बोलून गेली तिचं तिलाच कळलं नाही.
"डेफिनेटली व्हैधै.. "
"अंगद, माझं नाव वैदेही आहे रे.. व्हैधै नाही. "
"ओऽऽह नो.. इट्स सो डिफिकल्ट.. व्हैधै.. नाऊ ओक?"
वैदेही खळखळून हसायला लागली.
"ठीके बाबा ठीके. अजून नविन काहीतरी अविष्कार ऐकण्यापेक्षा व्हैधै तर व्हैधैच ठीक आहे. पुढचा पॉईंट आता जवळच आलेला आहे. आपण तिथपर्यंत जाऊयात आणि बाकीच्यांसाठी थांबू मग. तुला चालता येईल ना तिथेपर्यंत?"
"मे बी.. मे नॉट बी.."
"चल रे.. काही होत नाही.. एक गंमत देईन तुला खायला पॉइंट ला पोहोचलो की.. चल.. मला सांग यातले बाकीचे फोटो कसे बघायचे?"
अंगदने समजावून सांगितलं मग की बाकीचे फोटो कसे बघायचे ते. चालता चालता वैदेही ते फोटो बघत होती आणि त्यातलं हे कोण ते कोण विचारत होती. अंगद सांगत होता. होताहोता ते पॉईंटला येऊन पोहोचले. तिथल्या कट्ट्यावर मटकन बसत अंगदने सुस्कारा सोडला,"ओह माय गॉड.. माय लोएग्स आर पेनिंग अ लॉट नाऊ.. बाय द वे व्हेअर इज दॅट गंमत?"
वैदेहीने पर्समधून एक पिशवी काढली आणि त्याला देत म्हणाली. "ही घे गंमत.."
'एवढ्या मोठ्या पिशवीत काय असेल बरं?' असा विचार करत अंगदने ती पिशवी पटापट उघडली तर आत चुरमुऱ्यासारखं काहितरी दिसत होतं. "यू मेड मी अ फूल ऑर व्हॉट?"
"खाऊन तर बघ आधी.."
"ओके.."
एक घास खाउन अंगद,"ओ माय गॉड.. इट्स सो चिली..हा हा.. " करून पाणी मागायला लागला. "का रे, खूप तिखट लागलं का? तुला तिखट नाही का आवडत? नको खाऊ मग. एक मिनिट थांब.." असं म्हणत वैदेहीनी खोबऱ्याच्या वड्या काढून त्याला दिल्या आणि पाण्याची बाटलीही. तोवर अंगद हसायला लागला होता. "इट्स जस्ट सुपर्ब एव्हन दो समव्हॉट चिली. आय लाईक ईट. कॅन आय हॅव इट मोअर?"
"बिनधाऽऽस्त.."
"अंगद, आत्ताच खायला सुरूवात झाली का तुझी? मध्येच खाऊ नकोस पुढे चालता यायचं नाही तुला अशाने." अंकिता.
"अंगद्या, तू पण आणलेस का भडंग? वाऽऽह.. आता भारी मजा येईल. "असं म्हणून कुणालने पिशवीत हात घातला आणि बचकभर भडंग घेऊनच हात बाहेर काढला.
"इट्स नॉट माईन.. इट व्हैधैज.. मी जख्मी झाल्हो म्हण्हून धिले तिने खधाचीत.."
"जख्मी?" धावत येत राम म्हणाला.
"काय मराठी आहे ! वाह !! जख्मी नाही. पक्ष्यांचा फोटो काढायला महर्षी झाडावर चढलेले तर तोल गेला आणि आपटले खाली. त्याचा काही नूर दिसत नव्हता इथपर्यंत येण्याचा म्हणून पॉईंटला पोहोचलो की एक गंमत देईन सांगितलं तर आला इथेपर्यंत. हो ना रे अंगद?"
"येस अँड आफ्टर रिचिंग हिअर शी गेव्ह मी धिस चिली भडंग.. वॉटर प्लिज.."
"भडंगवर पाणी नसतं प्यायचं. पोट साफ होऊन जाईल नसता.", असं म्हणून राम हसायला लागला आणि त्याच्यासोबत सगळेच.
"वैदे, थँक्स."
"कशाबद्दल?"
"अंगदशी बोलल्याबद्दल." राम.
माझ्याच दोस्ताशी बोलल्याबद्दल कोणी थँक्स म्हणायची गरज आहे का?" या वैदेहीच्या बोलण्यावर राम एकदम छान हसला. वैदेही राहून राहून ते हसू विसरायचा प्रयत्न करत होती पण विसरूच शकत नव्हती. पॉईंट्स पहाण्यातच जास्त वेळ झाल्याने बोटींग राहूनच जाणार होतं, तसं ते राहिलंच. थोडासा वेळ होता तेवढ्यात शॉपिंग करायला सगळेजणं निघाले. काही जणं स्ट्रॉबेरीज घेत होते तर काही फुटाणे. बरेच जणं उभे होते गोळेवाल्याच्या गाडीजवळ हातात रंगीबेरंगी असे बर्फाचे गोळे घेऊन. हसतखेळत सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. कशा गमती केल्या वगैरे वगैरे बोलणं चालू होतं. बसमध्ये बसून सगळेजणं कायकाय घेतलं? वगैरे दाखवण्यात आणि बघण्यात दंग होते. वैदेहीला आता घरचे वेध लागले होते. खिडकीशेजारी बसून ती विचार करत बसली होती. 'आईबाबांना काय सांगायचं आता रामबद्दल? राम इतका छान आहे सर्वार्थाने. अग्गदी मला हव्वा तस्साच आहे. हो म्हणू का मग ह्या लग्नाला? नको पण मी कुठे ठीक आहे रामसाठी? तो रहाणार न्युजर्सीला आणि माझा इथला पुण्यातला जॉब मग? आणि न्युजर्सीमध्ये सगळेजणंच अंगदसारखे थोडीच असणारेत. तसे इथेही नाहीयेत म्हणा पण इथे मला कित्ती दोस्त आहेत. तिकडे कोणे माझं? त्याचे आईबाबाही नसणार तिकडे. मग काय येताजाता यालाच पाहात बसू की काय मी? भरपूर माणसं असायला हवीत, प्रत्येकाचे वेगळे अनुभव, वेगळ्या गप्पा, वेगळे दृष्टिकोन, त्यातून निर्माण होणाऱ्या गमती, कधी होणाऱ्या लुटुपुटुच्या लढाया आणि मग मनवामनवी.. अशी काहीच गंमत नसणार. माझे आईबाबा माझ्यापासून किती दूर जाणार. 'जा मुली जा' ऐकताच रडणारे बाबा, दिवसातून एकदातरी फोनवर बोलल्याशिवाय रहात नसलेली आई आणि माझी गोडुली सायली? सायलीला एकटं सोडून मी एकटीच जाऊ? माझं घर, माझे आईबाबा, माझे दोस्त, माझं करीअर माझं सगळंसगळं सोडून मी रामबरोबर जायचं? २५ वर्षांपासून जे जीवापाड जपलं ते जेमेतेम २५ तासांच्या ओळखीसाठी लाथाडून निघून जायचं? इतकी स्वार्थी आहेस का तू वैदे? तुला राम आवडला पण म्हणून एका व्यक्तीसाठी तू इतक्या सगळ्या जीवांशी असलेलं नातं तोडून दूर अशा त्या परक्या देशात निघून जाणार? आठवड्यापूर्वीचा तुझा तो निर्धार काय झाला? झाली तुझी स्वप्नं पूर्ण? स्वार्थी आहेस तू वैदे स्वार्थी आहेस.. ' एक ना अनेक विचार करून करून वैदेही भंडावली. एक बाजू धरावी तर दुसरी सोडावी लागणर होती आणि दुसरी धरावी तर पहिलीशी कृतघ्नपणा केल्यासारखं झालं असतं. यातलं दोन्हीतलं काहीच नको होतं तिला. दिवसभर अत्यंत आनंदी असलेल्या वैदेहीला अचानकच सगळंच गोलस्गोल फिरायला लागल्यासारखं वाटायला लागलं. 'काहीच नकोय मला. मला नाही करायचंय लग्न. मला कोणीच नकोय. मला नका विचारू हे प्रश्न ज्यांची उत्तरं नाहीयेत माझ्याकडे. कृपया मला एकटं राहू द्या.' असं मनातल्या मनात विचार करत परत खिडकीशेजारी बसली होती वैदेही.


(क्रमशः)

- वेदश्री.

प्रेमनियोजित विवाह - भाग ३

"का हो अंकिताला बरं नाही सबब तुम्हीच सांगितलेलीत ना सकाळी सकाळी? येणार नव्हतात ट्रीपला.. मग आता हे काय आहे? असं खोटं बोलणं बरं दिसतं का?" इति वैदेही.
"हेऽऽय.. हू इज धिस बेब?" कोणीतरी अनोळखी मुलगा बसमध्ये बसलेला हे बोलला.
"चनस्वा, चहा चर्खमू चणीप्रा चणको चहेआ चरे? चचंत्या चड्तों चदबं चरवाक चधीआ..."स्वानंद काही बोलणार इतक्यात,"चचीत्या चळीपा चणारये चहीना. चतो चझामा चत्रमि, चगदअं चहेआ. चमी चलात्या चमजावूनस चगतोसां. चजप्लि चमी चरीसॉ चणतोम्ह चच्यात्या चतीनीव." असं बोलणाऱ्या रामकडे बघून वैदेही हतबुद्ध राहून गेली. तिला वाटलं नव्हतं की त्याला 'च'ची भाषा येत असेलसं. आता सिक्रेट बोलायचं तर पंचाईतच आहे असा भाव तिच्या चेहऱ्यावर झळकून गेला. अंगदकडे जळजळीत कटाक्ष टाकून ती सगळ्यात मागे बसायला निघून जाताजाता पुटपुटली,"कसलीकसली लोकं भरली आहेत कोण जाणे या जगात. खोटं काय बोलतात..."
"सायली म्हणाली अशी गंमत कर म्हणून आणि काही झालं तर ती संभाळून घेईल असंही म्हणाली. मला छान वाटली तिची कल्पना आणि तुला चिडवायला आयता चान्स मिळतोय तर का सोडा म्हणून मी गंमत केली तुझी. तुला इतकंही चालवून घेता येत नसेल तर..."
मागे जाणारी वैदेही मध्येच थांबत,"काऽऽऽय? काय म्हणालात? सायलीचा काय संबंध मधल्या मध्ये? तिच्या नावावर काहीही बोललेलं मला खपणार नाही सांगून ठेवतेय."
"खरं सांगितलेलं पटत नसेल तर माझा नाईलाज आहे."
"सायलीचा नंबर कुठेय पण तुमच्याकडे?"
"मी तुझ्या घरी फोन करून विचारला."
"कशाला?"
"सहज."
"आईबाबा काय म्हणाले मग? त्यापेक्षा हे सांगा की तुम्ही आईबाबांना काय म्हणालात?"
"मी का सांगू?"
वैदेहीचा अगदी तिळपापड झाला.
"अरेऽऽऽ हाऽऽऽय फोक्स.. थोडा उशिर झाला मला मान्य आहे पण चिडू नका कृपा करून. मी आधीच या हेल्मेटला कंटाळलो बुवा.", बसमध्ये चढलेल्या कौस्तुभच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला होता.
"काबरं काय झालं?" स्वाती.
"अगं तुला सांगतो स्वाती.." असं म्हणत स्वारी स्वातीजवळ जाऊन बसलीही. त्याला हेल्मेटमध्ये गरमी कशी होते आणि त्याने म्हटलेलं गाणं त्यालाच ऐकू आल्याने उगीचची शिक्षा कशी सहन करावी लागते याचं साद्यंत वर्णन झालं आणि "..म्हणून हेल्मेट न घालता चेकींग होणारे रस्ते टाळत यायच्या प्रयत्नात ४०० रुपयांचा झब्बू बसला यार हकनाक.." या शेवटच्या त्याच्या वाक्यावर सगळे हसत सुटले. हसण्याच्या मूडमध्ये नव्हती फक्त एकच व्यक्ती - वैदेही ! ती सर्वात मागे जाऊन बसली होती. डोक्यात अनेक विचारांचं वादळ उठलं होतं तिच्या. शंकाकुशंकांनी मन भरलं होतं. 'हा चंपक काय बोलला असेल घरी? या ठमीला काही कामं आहेत की नाहीत? उगीच काड्या लावायची का कामं करते ही? पण राम बोलला ते का खरं समजतेय मी? तो हेही खोटंच बोलला नसेल कशावरून? इथे रेंज सुद्धा येत नाहीये. काय करू तरी काय मी आता?' असे एक ना अनेक विचार करत वैदेही खिडकीतून बाहेर बघत होती..

"अरे आले का सगळे? फोडायचा का नारळ?"या कौस्तुभच्या प्रश्नावर सगळेजणं एकाच पट्टीत ओरडले,"होऽऽऽऽ"मग तो खाली उतरून गेला फुलांचा हार,नैवेद्य आणि नारळ घेऊन.चुटुकली पुजा करून नारळ बसच्या एका टायरच्या समोर ठेवून ओरडला, "हं चालू करा .." बस चालू झाली. थोडीशी पुढे गेली आणि आनंदात नारळाचे ३-४ तुकडे घेऊन कौस्तुभ बसमध्ये चढला आणि ओरडला, "गणपतीबाप्पाऽऽऽऽ"
आणि सगळे ओरडले,"मोरयाऽऽऽऽ"
"हर हर .."
"महाऽऽऽदेवऽऽऽ"
"लक्ष्मीमाताकीऽऽऽऽ "
"जऽऽऽय"
"बाहुबलीकीऽऽऽ"
"जऽऽऽय"
"बोलो कौस्तुभमहाराजकीऽऽऽऽ"
सगळ्यांना त्याचा हा दरवेळेसचा कावा माहिती असल्याने सगळे गप्प बसले. नविनमध्येही सगळे बरेच कलंदर होते आणि त्यामुळे ते गप्प बसले. एकटी अंकिताच ओरडली,"जऽऽऽऽय". सगळे गप्प आणि ती एकटीच ओरडली त्यामुळे जो एकच हशा पिकला बसमध्ये की बस्स.. अंकिताचा चेहरा अगदीच गोरामोरा झाला होता आणि गंमत म्हणजे कधी नव्हे ते कौस्तुभ लालेलाल झाला होता एका सुंदर ललनेने जयजयकार केला म्हणून !!! हशा चालू असतानाच अंगद उभा राहिला. वैदेहीचा राग अजूनही गेलेला नव्हताच. 'आता काय बोलणार हे विद्वान?' असा टेन्शनयुक्त चेहरा करून बसलेली ती. "आय ऍम व्हेरी सॉरी व्हैधै. म्हाझ्याखडून भोलन्यात चूक झाली. डू फरगीव्ह मी प्लिज. वेऽऽल, व्हेन वुई आर सपोज्ड टू स्टार्ट वुईथ द अंताक्षरी?" इतकं बोलून अंगद बसत नाही तोवर कुणाल उभा राहिला. उभा राहताराहताच बसला कचकन ब्रेक्स लागले आणि तो मस्तपैकी कोलमडला. सावरून घेत ,"हाऽऽ तर अंगदने म्हटल्याप्रमाणे टिम्स ठरवण्याचा सगळा भार माझ्यावर येऊन पडलेला मला भासतो आहे कारण आत्तापर्यंत सर्व कर्ताकरविता मीच आहे."
कोणीतरी गायला लागलं,"तूऽऽऽच कर्ता आऽऽऽणि करऽऽविऽता.. "
"काय चाललंय काय? इतका महत्वाचा मुद्दा इथे चालू असताना फुटकळ विनोद करण्यात तो काय जीवनाचा अमूल्य वेळ वाया घालवता आहात?" - कुणाल.
"कसला मुद्दा? काही नाही एक लाईन व्हर्सेस दुसरी लाईन.."
"कुठेय लाईन? कोण मारतंय लाईन? अरे काही लालशह आहे की नाही शिल्लक?"
"लालशह?" - राम
"लाज लज्जा शरम हया इज इक्वल टू लालशह !" - विश्वास ऊर्फ विसू. हसतहसत रामने त्याला टाळी दिली.
"सायलेन्स प्लिऽऽऽज" असं चित्कारत अरु उभी राहिली. अरू उभी राहिली म्हणताच कुणाल निमूटपणे खाली बसला. हे पाहून वैदेहीला हसू आवरेना. "शूऽऽऽक शूऽऽऽऽक" चा एकच हलकल्लोळ बसभर माजला.
"पोरांकडून काही होणार नाही. सरळसरळ दोन गट. मुलींचा व्हर्सेस मुलांचा. "
तिच्या या बोलण्यावर केतकी उभी राहिली. जनगणना अधिकाऱ्यासारखी मोजायला लागली.
"१५ मुली आणि २१ मुलं." असं बोलून खाली बसली.
"काऽऽऽऽय बोलतेस काय केता? बस थांबवा. मी येत नाहीये ट्रीपला. ३६ चा आकडा झालाय." ज्योतिषी जिग्नेष उद्गारले.
"ए गपे. किटकिट करू नकोस फुकाची."
"जिग्या, पैसे चार्ज कर रे. फुकाची किटकिट नकोय म्हणतायत तर.."
इकडे रेंज येत नाही म्हणून वैदेही भंजाळलेली आणि त्यात ही अर्थहीन बडबड ऐकून ती एकदम उभी राहिली. "आत्ता जे जिथे बसलेयत ते तिथेच बसून राहतील. जागा बदलायची मुभा आता मिळणार नाही. समोरचे १८ विरुद्ध मागचे १८ असे गट पाडुया. शब्दांच्या भेंड्या ओके? पहिलं गाणं समोरच्या गटाने म्हणायचं आहे ज्यात 'आईना' शब्द यायला पाहिजे. करा सुरुवात." बाँबगोळा टाकून वैदेही खाली बसली. खाली बसताच पाहिलं तर टॉवर्स दिसत होते. घरी फोन न लावता सायलीला मोबाईलवर फोन लावला.
"छकु, तुझं आणि रामचं काय बोलणं झालं गं?"
"मी कुठे बोलले छोजीशी?" असं म्हणून सायली हसायला लागली.
"सायले, डोकं पिकवू नकोस ना गं. मला जाम टेन्शन आलं आहे. त्याने घरी फोन केला होता म्हणे. काय बोललं ते ध्यान? आईबाबांनी काय अर्थ काढला त्यातून? तू का बोललीस त्याच्याशी? तुला माहिती आहे ना राणू की मला या सगळ्यात काही इंट्रेस्ट नाही आहे ते."
"हो, मला सग्गळं माहिती आहे तुला कशात इंट्रेस्ट आणि कशात नाही ते आणि म्हणूनच म्हणतेय की राम बेस्ट आहे तुझ्यासाठी. कौस्तुभ इतकी चेष्टा करतो तुझी ते चालतं तुला, मग रामने केली तर का मिरची लागली तुला?"
"अगं पण कौस.."
"अगं नाही आणि पण नाही.. काही बिघडलेलं नाही आहे कौस्तुभ शाळेतला दोस्त आहे, पण रामही चांगला आहे आणि त्याच्याशी मैत्री करायला काही हरकत नाही आहे. कळालं का? आणि का गं? माझ्याशी बोलताना छोजीचा उल्लेख सरळ तुझ्या दुसऱ्या दोस्तांसारखा करतेस आणि मग त्याच्याशी बोलतानाच का अहोजाहोचं नाटक?"
"नाटक?"
"नाहीतर काय? माझ्याशी बोलताना मी अरेतुरेत बोलले त्याच्याशी. किती छान बोलत होता आणि तू त्याला अहोजाहो करतेस सांगताना किती हसत होता बापरे !"
"हो का? थांब बघतेच आता त्याला.. "
मोठ्याने हसत सायली,"तेच तर म्हणतेय मी.. बऽऽऽघ त्याला.." असं म्हणून सायलीने समारोपाचं बोलून बोलणं आवरतं घेतलं आणि फोन ठेवला. 'मी रामला अहोजाहो का करतेय?' य प्रश्नाला वैदेहीकडे काहीच उत्तर नव्हतं. या विचाराने आलेल्या इतर विचारांनी वैदेही लाजली आणि स्वतःशीच हसली गालातल्या गालात.इकडे प्रत्येकजण आपण कुठल्या १८त आहोत हे तपासण्याच्या मागे लागला. कोणाला जागा बदलून हवी होती. समोरचे सगळे सीटवर चढून गुडघ्याच्या आधारानी बसून मागच्यांकडे बघायला लागले. वैदेही बोलून तर गेली होती पण आता ती रामला बघत होती आणि तो कुठल्या गटात आहे हे बघता तिला वैशम्य वाटलं तिच्या गट पाडण्याच्या क्लृप्तीबद्दल कारण राम आता तिच्या विरूद्ध गटात गेलेला होता !
कुणाल एकदम ओरडला,"मी म्हणतो मी म्हणतो गाणं.. आईनेके सौटुकडे करके मैने देखे है.. एकमेभी थे तनहा सौमे भी अकेले है.. सौमे भी अकेले है.."
अरु सुरू झाली,"अकेले अकेले कहा जा रहे हो.. हमे साथ ले लो.. जहा जा रहे हो.."
"जहा मैं जाती हु वहीं चले आते हो.. चोरी चोरी मेरे दिलमे समाते हो... ये तो बताओके तुमऽऽऽ मेरे कौन हो?"
"कौऽऽऽऽऽनऽऽऽ डोंट ओपन युअर डोऽऽऽऽरऽऽऽ"
"ए हे गाणं नाही आहे रे काऊ.." स्वाती.
"काऽऽऽऽऽऊऽऽऽऽऽ?" सगळे ओरडले.
"म्हणजे कौस्तुभ !" लाजतलाजत स्वाती म्हणाली.
"वन्स मोअर.. वन्स मोअर.. स्वाती आणि लाजतेय.. बघा बघा.."
"कौन है जो सपनोंमे आया.. कौन है जो दिलमे समाया.. लो झुक गया आसमाभी.. इष्क मेरा रंग लाया.. ओ प्रियाऽऽ " यश गात होता.त्याच्या ग्रुपमधले कोणीच माहितीचे नव्हते. अमृत त्याच्याच ग्रुपमधला एक. तो उभा राहिला,"भेंड्या - अंताक्षरी खूपच नेहमीचे प्रकार आहेत आणि प्रत्येकजण भाग घेत नाही यात. यापेक्षा एक गमतीशीर खेळ आत्ताच सुचला मला तो खेळायचा का?"
"तुले ग्येम सुचलाय ह्ये लय ब्येस झालं रं बाबा. तसंबी जीव लय लय उबलाय बग या खेळाले. कवाधरनं कटाळला व्हता म्हाया जीवड्याले. आता कसं थोडं बरं वाटतंय तुह्ये सबुद ऐकुनशान. सांगून टाक बिगीबिगी काय हाय ग्येम त्ये.." कौमुदीची मुक्ताफळं.
"काही खास अवघड नाही आहे. मुलांनी मुलीचं नाव असेल असं गाणं म्हणायचं तर मुलींनी मुलाचं नाव असेल असं गाणं म्हणायचं. जसं आत्ता यशोधन 'प्रिया' चं गाणं म्हणत होता.कळला का खेळ? चालेल का?"
"मस्त खेळ आहे रे अम्र्या.." असं म्हणत त्याच्या पाठीत रट्टा मारत राम म्हणाला,"पण एकाने एकच गाणं म्हणायचं का?"
"दम आहे रे प्रश्नात तुझ्या.." कौस्तुभ."नाही तसं काही नाही. लिमिट एक्स टेंड्स टू इन्फ़िनिटी बट द लोअर लिमिट इज नॉट झिरो. इट इज वन."
"आत्ता गं बया. म्हंजी काय?" कौमुदी.
"म्हंजी अस्सं की. यक डाव तरी गायालाच होवं परत्येकानी. समजलं का गं पोरी? आता तू म्हन बगू एक गानं.. "
"अनहोनीको होनि करदे होनीको अनहोनी.. एक जगह जब जमा हो तिनो अमरअकबरअँथोनी.."
"ओ प्रिया.. ओ प्रिया.. प्यार क्यौं इतना किया.. जो भी मेरे पास था तुझको दे दियाऽऽऽ..""सुरमयी अखियोंमे एक नन्हामुन्ना सपना दे जा रे.. रारीरारुं.. हो रारीरुम.. "
"ए यात कुठे आहे रे मुलीचं नाव? "
"सपना.."
"असं नाही चालणार.. " वैदेही.
"चालेल चालेल." असं म्हणत अमृत उठला आणि बसच्या समोरच्या मोकळ्या भागात गेला आणि इनामिनाडिकाडिकाडायडामानाकानाका करत करत जे गातागाता नाचायला लागला चालत्या बसमध्ये की बस्स.. ५ मिनिट सगळे आ वासून त्याचा तो मस्त अविष्कार बघत होते. त्याचा नाच करून झाला आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला बसमध्ये.
"बघाऽऽऽऽ मुलं कित्ती छान गाणी म्हणतात नाहीतर मुलींमधून फक्त एकच गाणं आलं अत्तापर्यंत.."
या आव्हानामुळे वैदेही गायला लागली, "गुम है किसीके प्यारमे.. दिल सुबहशाम.. पर तुम्हे लिख नही पाऊ मैं उसका नाम.. हाऽऽऽये राम.. हाऽऽऽये राऽऽम.. सोचा है इक दिन मैन उससे मिलके.. कह डालू अपने सब हल दिलके.. और कर दू जीवन उसके हवाले.. फिर छोड दे चाहे अपना बनाले.. मैं तो उसका रे हुआ दिवाना.. अब तो जैसा भी मेरा हो अंजाम.. हो गुम है किसीके प्यारमे दिल सुबहशाम पर तुम्हे लिख नही पाऊ मैं उसका नाम.. "
"चाहा है तुमने जिस बावरीको वोभी सजनवा चाहे तुम्हीको.. नैना उठाये तो इकरार समझो.. पलके झुकादे तो इजहार समझो.. रखती है कबसे छुपाछुपाके.. क्या? अपने होटोंपे पिया तेऽऽऽरा नाम.. हो गुम है किसीके प्यारमे.. दिल सुबहशाऽऽम पर तुम्हे लिख नही पाऊ मैं उसका नाम.. हाये राम.." - राम
"अरे काय चाललंय काय? अख्खी गाणी म्हणायला मदत का करताय रामराव? विरुद्ध पार्टीला असे नका सामील होऊ हो.."
"कुणाल, मी तर 'नैना' शब्द होता म्हणून ते कडवं म्हणालो." असं म्हणून राम वैदेहीकडे बघत मिष्किल हसला आणि वैदेही लाजत तोंड लपवायला खाली बसली.


(क्रमशः)

- वेदश्री.

शुक्रवार, २० जानेवारी, २००६

प्रेमनियोजित विवाह - भाग २

आईबाबांना मनवण्याची महत्कठीण खिंड यशस्वीपणे जिंकून वैदेही परत पुण्याला तिच्या नेहमीच्या आयुष्यात जायला तयारी करायला लागली.
"ए ताई, तू नको जाऊ ना.."
"का गं? आले तेव्हाची पिडतेयस मला आणि आता का रडवेली झाल्याचं नाटक करतेयस?" विचारताना जरी विचारलं असलं तरी वैदेहीलाही हे पक्कं ठाऊक होतं की सायलीचा किती जीव आहे तिच्यावर ते आणि हा प्रश्न तिने अगदी मनापासून विचारला असणार हेही.
वैदेही म्हणाली,"तू शुक्रवारी येतेयस ना पुण्याला? मी येतेय तुला घ्यायला स्टँडवर."
"नाही. मी नाही येतेय ट्रीपला."
"का? आधीच ठरलेलं आपलं तू येणारेस असं. आता काय झालं तुला मध्येच? "
"माझी परिक्षा आली आहे त्यादिवशी."
"धत्तेरेकी.. मग पुढच्या रविवारी जाऊयात. काय? मग तर ठीके ना?"
"नको. छोजीला राग येईल आणि उगीच हा निर्णय लागायला उशीर नकोय मला माझ्यामुळे."
"काय गं हे?" "मी फोन करेन ना. मला पिन टू पियानो वर्णन ऐकायचं आहे बरं का? काऽऽऽऽही काही गाळून सांगायचं नाहीस. ओके?"
"पण..."
"पण आहे माझ्या ताईचा जो राम पूर्ण करतो की नाही तेवढं कळव. काय?" डोळ्यात लटका राग आणत वैदेही फुरंगटली आणि आईनी दिलेली कणकेची बाटली बॅगेत सरकवली. सायली हसतहसत निघून गेली.

"काय मॅडम लक्ष कुठेय?"
कीबोर्डकडे एकटक बघत हसत बसलेली वैदेही अजूनही तशीच गालातल्या गालात हसत बसली होती. पाठीवर एकदोनदा थोपटून अरुनी विचारलं,"काय मॅडम, काय चाललं आहे? घरी जायची वेळ झाली तरी तू कीबोर्डकडे बघून हसत काय बसली आहेस? विनाकारण हसणाऱ्यांना काय म्हणतात माहितेय ना? काय झालंय काय तुला?"
"कुठे काय झालंय? काहीच तर नाही. खरंच काही नाही. काही म्हणता काहीच नाही गं.."
"एकच गोष्ट कितीवेळा सांगतेयस? काय झालंय काय तुला? "
"काही नाही गं.. आज गुरूवार आहे ना म्हणून.."
"ऍ? गुरूवार आहे ठीके पण त्यात हसण्यासारखं काय आहे?"
"अगं म्हणजे परवा शनिवार आहे ना. कसं कळत नाही तुला?"
"च्याऽऽऽऽऽमाऽऽऽरी टोपी.. मला शेंड्या लावू नकोस. आता आज गुरूवार म्हणता परवा शनिवारच असणार हे तर शेंबडं पोरगंही सांगेल. त्यात नवल ते काय? आणि हसण्यासारखं काये? तू नीट सांगतेस का आता?"
अरुंधतीला काहीच माहिती नाही, हे आता कुठे लक्षात आलं वैदेहीच्या आणि म्हणून एकदम सावरुन घेत," अगं म्हणजे सुट्टी नाही का असणार? म्हणून.."
"ती तर दरवेळेसच असते पण म्हणून दरवेळेस तू अशी स्वतःशीच हसत बसत नाहीस. कुछ तो हुआ है.. कुछ हो गया है.."
"कुछ होनेवाला है.."
"क्या?"
"काही नाही गं. महाबळेश्वरला जाणरोत आम्ही."
"आऽऽऽऽऽऽम्हीऽऽऽऽऽऽ.. हंऽऽऽ.. "
"आम्ही म्हणजे मी,कुणाल,कौस्तुभ,स्वानंद,स्वाती.." वैदेही थांबली.
"ये सब पेहचानके है.. और कौन है नये?"
"कोणीच तर नाही.."
"खोटं बोलायचा प्रयत्न करू नकोस. तुला येत नाही ते. "
दिलखुलास हसत वैदेही,"अगं राम येतोय त्याच्या दोस्तांसोबत."
"राऽऽऽऽऽऽऽमऽऽऽऽऽ ", एक भुवई चढवून खोचक हसत अरुनी ढोपर मारलं वैदेहीच्या पोटात आणि," तरीच.. तरीच मॅडम अशा एकट्यानेच हसत होत्या. मला काही काम नाही आहे शनिवार-रविवार .. मीही येतेय. "
"अगं पण गाडी.."
"मी कुणालला फोन करते. तू काही काळजी करू नकोस. आता घरी चला आणि यापुढचं हसणं चालू राहू द्या."
"बोंबाबोंब करू नकोस सांगून ठेवतेय. कुणालला मी तक्रार करेन नसता तुझी."
"नाही गं. मी फक्त २-४ जणींना विचारणारे येतायत का ते. जितके जास्त जणं तितकी जास्त धमाल येईल ना म्हणून.."
"हो. ते तर आहेचे. मीही विचारते मग आता माझ्या बाकीच्या दोस्तांना.."

८ वाजले तरीही वैदेही स्वप्नातच ! मोबाईल वाजायला लागला तसा नेहमीच्या सवयीने वैदेहीने मोबाईल उचलून कानाला लावला झोपेतच आणि,"हॅलो आई, मी अजून उठले नाहीये. मी थोड्यावेळाने फोन करू का?"
"व्हॉऽऽऽऽऽट? हेऽऽऽऽय हेऽऽऽऽय राम आहे मी.. "
"आऽऽऽऽ?" करून मोठ्याने ओरडत वैदेही ताडकन उठून बसली आणि धांदलीत तिच्या हातून मोबाईल खाली पडला. तो उचलून परत कानाशी लावला तर तोवर कनेक्शन कट झालं होतं. "कनेक्शन कट होण्याची ही काय कटकट आहे बाई" असं म्हणत स्वतः उशीरापर्यंत गप्पा मारत जागत बसल्याबद्दल स्वतःलाच हजारो शिव्या घालत, आता हे ध्यान परत फोन करतं की नाही याची उगाच चिंता करत वैदेही ब्रश-पेस्ट घेऊन बेसिनकडे धावली. तोंड धूत असतानाच फोन वाजला म्हणून पटापट तोंड धुवून वैदेहीनी फोन उचलला आणि शिस्तीत "हॅलो" म्हणून गप्प बसली.
"हॅलो, उठलीस का आतातरी?"
"हो." अजीजीच्या स्वरात वैदेही.
"काऽऽय घाबरलो मी मगाशी तू किंचाळलीस ते ऐकून. कानाचे पडदे फाटायची वेळ आली माझे."
"आय ऍम एक्स्ट्रीमली सॉरी.. मला वाटलं होतं तुम्ही सकाळी फोन कराल.."
"म्हणजे? आत्ता पहाट आहे का? की रात्रच आहे अजूनही?"
"नाही हो. तसं नव्हतं म्हणायचं मला."
"मग कसं म्हणायचं होतं तुला?"
"मला म्हणायचं होतं की.. "
"की..."
"लिटरल्ली व्हेरी सॉरी."
"हंऽऽऽ ठीके. बरं मी जे सांगायला फोन केला होता ते राहिलंच. मी महाबळेश्वरला नाही येऊ शकत."
वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. ते अश्रू 'चलो बला टली' चे होते की 'राम नाही येते मग काय उरलंय महाबळेश्वरला?' चे होते, वैदेहीलाच माहित नव्हतं पण तरीही वरकरणी शांत राहून, "का? काय झालं? सगळं ठीके ना?"
"हो सगळं ठीके. अंकिताला फुड पॉयझनिंग झालं आहे. तिच्याशिवाय मी महाबळेश्वरला येणार नाही आणि तिला एकटं कसं काय सोडू शकतो मी? तिचं इथे कोणीच नाही."
"काय झालं? कशीये ती? कुठेय ती सद्ध्या? खूप सिरियस आहे का?"
"कितीवेळा सांगितलं तिला पण अजिबात ऐकत नाही. पाणीपुरी खाल्ली तिने. म्हणत होती की उलट्या झाल्या आल्याआल्या आणि रात्रीपासून लागलं पोटात दुखायला. आत्ता गोलुकडे आहे. गोलुची आई आहे म्हणा तशी काळजी घ्यायला पण तरीही काही लागलं तर नको का बघायला? डॉक्टरांच्या मते तसं काळजीचं काही कारण नाही आहे."
"ट्रीप पुढे ढकलू शकलो असतो पण बरेच जणं येणारेत आता त्यामुळे शक्य नाही.तुमच्या त्या गोलुंचं घर कुठेय? आम्ही आलो असतो तिला भेटायला. तशीही दुपारी मिटींग आहे ट्रीपची कोथरुडला. तिकडून तिकडे आलो असतो तुमची हरकत नसेल तर."
"स्वारगेटला आहे. दूर पडेल तुम्हाला सगळ्यांना कोथरूडहून यायचं म्हटलं तर. त्यापेक्षा तुम्ही महाबळेश्वरला जायला निघाल तेव्हा या म्हणजे रस्त्यातच लागेल अगदी."
"बरं चालेल. तुमचं नक्की ना मग ट्रीपला न येण्याचं.. नाही.. म्हणजे तसं मला कुणालला सांगायला बरं म्हणून विचारलं."
"त्याला सांगितलं आ.." असं राम म्हणत असतानाच पलिकडे काहितरी झाल्याचा आणि रामच्या ओरडण्याचा आवाज आला.
"का हो? काय झालं?"
"काही नाही. काही नाही. नाही येणारे मी आणि माझे दोस्त हे नक्की आहे... "
"बरं ठीक आहे. मी सांगते कुणालला. अंकिताची काळजी घ्या. चला ठेवू का मग फोन?"
"हो. बाय."
"बाय."
फोन ठेवला आणि वैदेहीला अगदीच अर्थहिन दिवस उगवल्यासारखं वाटायला लागलं. कशातच मन लागेना. आजपर्यंत इतकी मुलं पाहिली. बोलले कित्येक जणांशी. दोस्त आहेत चिक्कार. मग असं कधीच का वाटलं नाही कोणाबद्दल जसं रामबद्दल वाटतं आहे? आज तो येणार नाही म्हणता असं रिकामं रिकामं का वाटतं आहे? अशा विचारात एक मन गुंग असतानाच दुसरं मन ओरडलं तिचं,'नाही आला तर नाही आला. मी का माझा मूड खराब करू घेऊ? चला गाणी ऐकूया धमाल.' वॉकमन काढून रेडिओ मिरची ऐकायला तिने इअर फोन्स कानात कोंबले आणि गाणी ऐकायला लागली. नेहमीप्रमाणे गाण्यांवर नाचायला उठून उभीही राहिली पण .. पण आज पायात बळच नाही असं तिला वाटायला लागलं. तो नेहमीसारखा अनामिक आनंदच होईना तिला. तिची किती आवडती गाणी लागली पण काहीच फरक पडायला तयार नाही. शेवटी कंटाळून तिने रेडिओ बंद करून टाकून नेहमीची रोजची आणि आठवड्याभरची कामं करायला सुरुवात केली. सगळं आवरून होता तर तिला अजूनच विचित्र वाटायला लागलं. काय करावं काय करावं म्हणता म्हणता तिने कुणालला फोन लावला.
"कुणाल, अरे राम आणि त्याचे दोस्त नाही येतेत ट्रिपला. प्रॉब्लेम झालाय त्यांच्याकडे."
"हो मला माहितेय."
"माहितेय? कसं काय?"
"खरंच की मला कसं काय माहिती? तूच सांगितलंस नाही का अत्ताच.."
"कुण्याऽऽऽऽ फालतू विनोद करून डोक्यात जाऊ नकोस सांगून ठेवतेय."
"अस्तित्वातच नसलेल्या जागेत मी कसा काय जाऊ शकेन? काहीतरीच तुझंही.."
"कुणाऽऽऽऽलऽऽऽऽ"
"ओरडू नकोस गं. मला एक सांग. तुझा आवाज आज का असा मरतुकड्या उंदरासारखा येतोय?"
"सुधर रे कुणाल सुधर ना. काय ते शब्द आणि कसल्या त्या भंगार उपमा !"
"अरे होऽऽऽऽ उपम्यावरून आठवलं. तू भडंग आणशील ना? आणि काहितरी स्वीट पण आण.."
"शहाण्या, अरुस्वातीला सांग की काही बनवायला. सगळा कोटा माझ्याच का माथी मारतो आहेस? आणि मी आधीच बटाट्याच्या पराठ्यांची सगळी तयारी करून ठेवली आहे त्यामुळे ते करणार आहे."
"अगं जरा बाजारात जाऽऽ, साऽमान खरेदी कऽर. डोक्यातला थर्ड्क्लास माल कशाला वापरतेयस? आणि राहिली बात अरुस्वातीची.. तर तुला माहितीच आहे स्वाती प्रकरण अवघड आहे ते आणि अरूऽऽऽऽ ती येणारे ना हेच पुष्कळ आहे मला. तिला कष्ट कशाला काहीबाही बनवायचे? तू आहेस की बनवायला.."
"थर्डक्लास माऽऽऽल काऽऽऽऽय.. तू ये रे ट्रीपला. तुझा सगळा नक्षा नाही उतरवला ना तर बघ. मी आता ठेवतेय फोन. बाय.."
"ए चिडतेस कशाला? अगं अरु कोथिंबिरीच्या वड्या आणणार आहे माझ्यासाठी. तू खोबऱ्याच्या आण ना. प्लीऽऽऽऽज. मला आवडत नाहीत खोबऱ्याच्या वड्या पण आण ना तू. प्लीऽऽऽऽज..आणि भडंग तुझ्याशिवाय कोणाला येत नाहीत, तेव्हा तेही आणच ओके? चिडू नकोस. काळे लोकं चिडले की अजूनच काळे दिसतात असं ऐकलंय मी. तुझ्या रुपांविषयी सहानुभूती वाटते मला.."
"कुणाऽऽऽऽऽऽलऽऽऽऽऽऽऽ.."
"मी फोन ठेवतोय. बाय. दुपारी भेटू १ च्या आसपास जोशी वडेवालेजवळ ओके. सगळा कंपू येतोय तिकडे. बाय."
"बाय."
'कुणालशी बोलून छान वाटतं. चला भडंग करायचेत आणि आता खोबऱ्याच्या वड्यांचा झोल काय बाई मध्येच? कित्ती दिवस झाले करून. जमतील की नाही आता कोण जाणे. ट्राय मारुन बघुयात.' अशा विचारात गुंग वैदेही परत कामाला लागली.

"काये हे? कुठे आहात तुम्ही?"
"आम्ही कधीचे आलोत. तुझाच कुठेय पत्ता? कधी टपकतेयस? आम्ही निघतोय आता.."
"अरे थांबा ना. मी बसमध्ये आहे. माझी चप्पल तुटली मध्येच म्हणून मी बूट घालायला घरी गेले. पंजाबी ड्रेसवर बूट छान नाही दिसत म्हणून मग ड्रेसही बदलला आणि उशिर झाला. मी १० मिनिटात पोहोचतेय. थांबा ना प्लिऽऽऽऽजऽऽऽ"
"आमच्यापैकी कोणाला उशीर झाला असता की मग फडाफ्फड बोलली असतीस, घोडे चौखूर उधळतात तशी. वेळेवर यायला नको वगैरे वगैरे काय काय बोलली असतीस आणि आता? आता आम्ही काही बोलायचं नाही हो ना?"
"बोल रे बाबा बोल. निकाल लो मनकी भडास.. "
"आणखी वरतून तूच बोल.."
"अरे होऽऽऽ एक राहिलंच. आपल्याला एकाच्या घरी जायचं आहे बरं का? ते राहिलं सांगायचं... "
"झाऽऽऽलं का? आता हे काय नविन झेंगट? कोणाच्या घरी जायचंय आता?"
"असा कातावल्यासारखा का बोलतोयस रे? गोलुच्या घरी जायचं आहे.."
"गोलु? हे कोण गोलमटोलराव टपकले मध्येच?"
"काहीच्या काही बोलू नकोस. अंकिताला बरं नाही आहे म्हणून जायचं आहे गोलुच्या घरी.."
"अगं हे काय चालवलं आहेस तू? एका कथेतून दुसऱ्या कथेत शिरतेयस खपाखप. ही अंकिता कोण आता?"
बोलता बोलता वैदेही मिटींगमध्ये ठरल्याप्रमाणे नियोजित ठिकाणी येऊन पोहोचली होती. फोन बंद करून,"अरे, रामची दोस्त आहे ना अंकिता तिला फुड पॉयझनिंग झालं.."
"तू आधी बसमध्ये बसतेस का? आपण आत बसून बोलुयात.."
कुणाल वैदेहीला दोन्ही हातांनी ढकलत बसच्या आतपर्यंत घेऊन गेला.. "अरे अंकिताला फुड पॉयझनिंग झालंय ना तर ..." इतकं वैदेही बोलतेय तेवढ्यात तिचं लक्ष ती येऊन पोहोचलेल्या ठिकाणी बसलेल्या व्यक्तीवर गेलं आणि तिचे शब्द तोंडातल्या तोंडातच विरून गेले कारण................ तिथे राम बसलेला होता !

( क्रमशः )

- वेदश्री.

बुधवार, १८ जानेवारी, २००६

प्रेमनियोजित विवाह - भाग १

"हॅलो, अगं कुठेयस तू? कधीचा फोन लावतेय तर उचलत का नाहीयेस?"
"अगं मी वॉकमनवर गाणी ऐकत होते मोठ्या आवाजात त्यामुळे लक्ष गेलं नाही. आत्ताच पाहिला मोबाईल तर ५ मिस्ड कॉल्स. बघितले तर तुझेच. बोल का पेटलीयेस इतकी?"
"तुला एक गाणं ऐकवायचं होतं. ऐकवू का?"
"फोनवर? आणि त्यासाठी ६ वेळेला फोन लावत बसलीस?"
"हो. गाणंच तसं आहे. म्हणू का?"
"म्हण ना.."
"नक्की?"
"आता डोक्यात जाऊ नकोस. म्हण ना पटकन.."
घसा खाकरून..
"सुन सुन सुन दीदी. तेरेलिये एक रिश्ता आया है.. "
"हे भगवान !!! नॉट अगेन... "
"भगवान नाही गं. एकदम मस्त छोजी होईल तो माझा.."
"छोजी?"
"छोटे जिज्जू गं. "
"बाप्रे ! लगेच पदवीप्रदान समारंभ पण करून टाकलास की तू तर.. "
"अगं कालच त्याचे बाबा आले होते. फोटो आणला होता सोबत त्यांनी. ठीकठाक आहे दिसायला म्हणजे तुला अगदी योग्य."
"दिडशहाऽऽऽऽणे, थांब गं मी येतेय ना आता शनिवारी मग बघतेच तुला चांगली.."
"ओऽऽऽऽह ! कोणाला बघायला येतेयस मला काय माहित नाही की काय?"
"म्हणजे?"
"म्हणजे तो येतोय ! "
"कशाला कडमडणारे तो? मी नाही येते मग. माझं पोट दुखतंय सांग आईला. मी काल वपा खाल्ला आणि पोटात गुडगुडतं आहे माझ्या. मी नाही येऊ शकत सांगून टाक आईला."
"ए बया, आईबाबांना सांगू नकोस मी तुला हे सांगितलं म्हणून. माझा कचुमर करतील नसता ते. तुला नाही सांगायचं असा डाव होता त्यांचा."
मिश्किल हसत,"बरं नाही सांगत. तू आईला सांगून टाक मी नाही येऊ शकते म्हणून. ठीके ना?"
"बरं. अगं पण तुला सांगू का? छोजी खूपच छान आहे गं. "
"खबरदार जर टाच मारूनी जाशील पुढे चिंधड्या, छोजी म्हणू नकोस कोणाला सांगून ठेवतेय तुला." आणि वैदेहीने फोन पटकून दिला.

"हॅलो.."
"हॅलो बाबा. कुठे आहात हो? मला विसरलात ना कामापुढे. मी चेकत होते की तुम्ही मला फोन करता की नाही पण तुम्ही नाही केलात अख्ख्या दिवसात फोन."
"अरे राजा, खूप काम आहे रे. आत्ता वेळ मिळाला तर केला की नाही मी तुला फोन?"
"जेवण झालं का ओ बाबा? चटणी जास्त खात जाऊ नका."
"तूच ये ना इकडे. खूप आठवण येते गं तुझी. कधी येतेयस? अगदी वाटेकडे डोळे लावून बसलोय तुझ्या. "
"असं काय बोलताय ओ बाबा. मला कसंतरी होतं तुम्ही असं बोललात की. आई आहे का तिकडे? तिला द्या बरं जरा."
तिकडे आवाज ऐकू आला, "अगं ए ऐकलंस का? फोन घे.. "
पॅरलल लाईनवर आईने फोन घेतला. बाबांनी ठेवलेला नाहीये माहिती होतं तिला. त्यांचे सगळे छक्केपंजे तिला माहित होते. त्यांचीच मुलगी ना ती !
"आई, बाबांना काय झालं गं इतकं सेंटी व्हायला?"
"त्यांना सेंटी व्हायला काही कारण लागतं का? कुठूनसं गाणं ऐकलं "जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा.."आणि हे अचानक रडवेल्या आवाजात ओरडून म्हणाले ,"नाऽऽऽही. नाऽऽऽही. मी नाही माझ्या बबडीला सासरी पाठवणार. आपण घरजावई करून घेऊ.." तो भावावेग आवरला आणि तुझा फोन फिरवला त्यांनी. "
"आऽऽऽई गं! ओ बाबा, काही काळजी करू नका हो. मला लग्नच नाही करायचंय. मग तर काही प्रॉब्लेमच नाही ना.. उगीच काय रडवेले होता? असं नाही करायचं. "
बाबांनी लगेच फोन ठेवून दिला.
"तू का येत नाहीयेस घरी? आणि वडापाव खात जाऊ नकोस कितीवेळा सांगितलं तुला. बाबांना सारखी बजावत असतेस आणि स्वतः अव्वाच्या सव्वा तिखट खात असतेस त्याचं काय? मग पोट बिघडणार नाही तर काय होईल? तू इकडे ये मग आपण तुझा इलाज करूया."
"कायमचा की काय?"
"तू येतेस की नाही आता? "
"आऽऽऽऽऽऽईऽऽऽऽऽऽ प्लीऽऽऽऽज..."
"बरं नको येऊस. गुळपोळ्या केल्या होत्या तुझ्यासाठी पण आता काय? राहू देत.. "
"गुळपोळ्या? मी येतेय मग पण मी थांबणार नाही. सीकेपी प्रोग्राम ठेवायचा नाही ही मुख्य अट. बघ मान्य आहे का?"
"सीकेपी?"
"चहा कांदा पोहे गं.. "
"नाही ठेवणार. पण तू ये. "
"बरं मी येतेय."

"आई, कुठेत गुळपोळ्या? " घरात घुसल्याघुसल्या तिची शोधाशोध सुरू.
"तुझं पोट दुखतंय ना? आत्ता नाही खायच्या मग गुळपोळ्या."
"पोटाचं काये? ते वेडं आहे. काही झालं नाही तरी दुखतं आणि काही झालं तरी दुखतं. ते बदलत नाही मग मी का बदलू? मी खाऊन पिऊन मरावं म्हणते !"
"मरायच्या गोष्टी कशाला करतेस गं?" असं म्हणत मागून पाठीत धपाटा बसला सायलीचा आणि वरून गाणं सुरू झालं, "सुन सुन सुन.. लडकेमे क्या गुन सुन सुन दीदी सुन.. अरे सुन सुन सुन दीदी तेरेलिये एक रिश्ता आया है.. मेरी प प प.. प्यारी अंजू.. जरा पा पा पा पास तो आना.. "
"ए कार्टे गप्प बस ना.. " तिला मारायला वैदेही धावली आणि आई मागून ओरडली. "दंगा करू नका आणि होऽऽ गं तुम्ही तयारी करा लवकर. ते येतील कधीही?"
"ते कोण?"
"मुलाकडचे लोकं अजून कोण?"
"आऽऽऽईऽऽऽ मी तुला म्हणाले होते की असला काहीही प्रोग्राम तू ठरवणार नाहीस असं आणि तू कबूल केलंस म्हणून मी आलेय. "
"सीकेपी कार्यक्रम नाहीचे. सौ कार्यक्रम आहे ! "
"सौ? हे काय भलतंच?"
"सरबत आणि उपमा ! "
वैदेहीवर बेशुद्ध पडायची पाळी आली.
"इतकं कूट कारस्थान? घोऽऽऽऽर अन्याऽऽऽय. घोर कलियुग आलं आहे म्हणतात ते काही खोटं नाही. "
"अन्याय म्हण किंवा काहीही म्हण. ते येतायत आता आणि तू तयार हो. ती हिरवी साडी आणि दागिने ठेवलेत काढून. ठमे दाखव गं तिला ते सगळं. "
सगळीकडून बांधली गेली आहे कळल्यावर शेवटचा प्रतिकार म्हणून वैदेही म्हणाली,"मी साडी घालणार नाही आणि सजणार तर त्याहूनच नाही. मी काही शोभेची बाहुली नाही आहे. १-२ दा केलं तुम्ही म्हणालात म्हणून आता बस्स झालं. मी साधा पंजाबी ड्रेस घालेन आणि सजणार वगैरे नाही. जशी नेहमी असते तशीच समोर जाऊन बसेन. कोणी काका वगैरे आले भेटायला तर कशी बोलते तशीच बोलणार आणि यात आता मी काहीही ऐकून घेणार नाही आहे."
"लाडावून ठेवलंय नुसतं बाबांनी हिला. काही म्हणता काही ऐकेल तर शपथे. अहो ऐकलंत का? पोरगी साडी नाही घालणार म्हणतेय तुमची. ड्रेस घालेल म्हणतेय. "
"घालू देत की मग. काय फरक पडतोय? "
"बाबा, तुम्ही किती छान आहात हो."

वैदेही सरबत आणि उपमा करण्यात गुंग होती. आईबाबा दिवाणखान्यात पाहुण्यांची वाट बघत बसले होते आणि मध्येच सायलीबाई अस्फुट ओरडल्या,"आले आले आले.. सासरेबुवा प्रविष्ट झालेत. सासूबाई आल्यात आणिऽऽऽऽऽऽऽ छोजी आले ! " असं म्हणून ती तिथून पळाली वैदेही मारेलच्या भीतीने. सरबत झालं ! उपमा करताना कांदे चिरायला घेतले आणि जो तिखट निघाला कांदा की वैदेहीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वहायला सुरुवात !
"अगं अगं अगं होऽऽऽऽ आत्तापासूनच सराव करतेयस का रडायचा? "
सायली परत अवतरलेली !
"फोटोमध्ये तर छान दिसत होता. आता काहीतरी विचित्रच दिसतो आहे."
"म्हणजे? "
"ऑऽऽऽऽऽ आता कशाला आता कशाला? लग्न नाही करायचं आहे एका मुलीला मग चौकशा त्या कशाला? "
"तू म्हणजे ना साडेसाती आहेस अगदी ! "
"बरं राहिलं. सांगते बापडी. मिशी नाहीये. सदरा-पायजमा पद्धतीचा वेश केलेला आहे."
'सदरा पायजमा ! वॉऽऽऽऽव.. कसा दिसतोय विचारू का?' पण तोवर तिचं दुसरं मन ओरडलं,'काही गरज नाही आहे काही विचारायची. नाही म्हणायचंय बस्स.'
उपमा शिजायला टाकून झाला होता. दिवाणखान्यातून मोठ्याने हसण्याचा आवाज येत होता. काय गंमत झाली असेल याचा विचार करून करून वैदेहीच्या डोक्याचा भुगा व्हायची पाळी आली. सायली नाही असं बघून गुळपोळी सापडतेय का याचाही शोध घेणं चालूच होतं. आई आली तेवढ्यात.
"अगं झालं की नाही तुझं? जा लवकर तयार हो आणि ठमे हिच्यासोबत जा गं उपम्याच्या प्लेट्स घेऊन."
"बरं ! "
वैदेहीने सरबताचे पेले छान कलात्मकतेने ठेवले ट्रेमध्ये आणि निघाली घेऊन. मागोमाग सायली ! आई कधीचीच निघून गेलेली होती. एकेक पाऊल टाकताना वैदेहीला जीवावर येत होतं. ट्रे पटकून देऊन पळून जावंसं वाटत होतं. पण आईबाबा.....

"ये बेटा." सुरुवातीची ओळख वगैरे करून देण्याचे प्रकार झाले. वैदेहीने रामच्या आईबाबांना आणि तिच्या आईबाबांना नमस्कार केला. सायली कानात खुसपुसली,"अगं रामही मोठा आहे तुझ्याहून." गप्प बस म्हणण्यासाठी तिने सायलीकडे बघून डोळे मिचकावले. वैदेहीने निर्विकार चेहऱ्याने सर्वांना सरबत दिलं. त्यालाही ! पण चेहऱ्यावरचे भाव अजिबात बदलू दिले नाहीत. 'घ्यायचं तर घे नाही तर बस तसाच' अशा आविर्भावात सरबताचा ट्रे त्याच्यासमोर धरला तिने. त्याने ग्लास उचलला आणि त्याचाही ढिम्म प्रतिसाद. ती पुढे जाताच सायलीने उपम्याची ताटली त्याला दिली आणि छोजी पसंत असल्याची ग्वाही देत गोडशी हसली ! गंमत म्हणजे तोही हसला तेही अख्खी बत्तीशी दाखवत ! वैदेही समोर जाऊन बसली एक ग्लास आणि उपम्याची ताटली घेऊन. सगळेजण इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते. त्याचे आईबाबा बऱ्यापैकी मिश्किल. त्यांच्या एकदोन विनोदांवर तर हसण्यावाचून गत्यंतरच नव्हता तिला. शेवटी हसण्यावर नियंत्रण ठेवायलाही काही बंधनं असतातच की. होता होता त्या सो कॉल्ड सौ कार्यक्रमाला तिला नको होतं ते वळण लागलंच.
"आम्हाला सगळ्याविषयी सगळं माहिती झालं आहे.तुम्हाला एकमेकांना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारून घ्या."
'मी बोलणारच नाही आहे.' हा तिचा ठाम निर्णय ! पण घड्याळाची ५ मिनिट निःस्तब्ध शांतता !!! आणि तिही वैदेही उपस्थित असताना !!!!!! किती मोठा तो दैवदुर्विलास. तिने त्याच्याकडे एका निसटत्या नजरेने पाहिलं तर तो मिश्किल हसत होता पण ती बघतेय हे कळताच जगभरचं दुःख त्यालाच असल्यासारखा सुतकी चेहरा करून बसला. हे पाहून तर तो अगदी तिच्या डोक्यात गेला. शांतता सहनशक्तीच्या पलिकडे गेल्यावर शेवटी तिला राहवलंच नाही आणि तिने विचारलं,"तुम्ही कोणत्या प्लॅटफॉर्मवर काम करता? "
त्याच्या आईबाबांचा चेहरा अगदी अवाक् झाल्यासारखा झाला होता. तिच्या आईबाबांचा चेहरा कावराबावरा. पोरीने काय विचारलं हे भलतंच? असं अपमानजनक विचारायला नको होतं वगैरे.
"न्युजर्सी ! " उत्तर आलं आणि तो मिश्किलपणे हसला. त्याच्याचकडे बघत असलेली ती तर खळखळून हसायला लागली.
"सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म म्हणायचं होतं मला." हसू आवरत ती म्हणाली. दोन्हीकडच्या आईबाबा प्रकरणांना कळलं की प्रश्न अपमानजनक वगैरे नव्हता. परत वातावरण मूळ पदाला आलं. त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. ती स्वतःच्या मनाला बजावत होती की तुला तो पटत नाही आहे. तुला त्याला नाही म्हणायचं आहे. त्याच्याकडून नकार मिळेल यासाठी काय करावं याच्या विचारात ती असतानाच त्याने अचानक विचारलं, "या वीकेंडला काय करतेयस? "
'सर्वांसमोर विचारतोय. वाऽऽऽऽह मान गये पण सरळ एकेरी का संबोधलं त्याने मला? थांब रे. आता तुझा पोपटच करते. आता हा गप्पच बसेल.. '
"दोस्तांबरोबर महाबळेश्वरला चालले आहे."
तिच्या आईबाबांच्या चेहऱ्यावर तीव्र नापसंती दिसत होती याप्रकारच्या उत्तर देण्यावर.
"कोणकोण दोस्त? "
"शाळेतले आहेत काही.. काही कॉलेजमधले आहेत.."
"हो पण मुलामुलींचा रेश्यो काय आहे? "
'रेश्यो कशाला हवाय याला?'
"२ मुली आणि ३ मुलं.. "
"अच्छा. आम्हीही चाललो आहोत महाबळेश्वरलाच. आम्हाला तिकडचं जास्त काही माहिती नाही. तुमची हरकत नसेल तर आम्ही येऊ शकतो का तुमच्यासोबत?"
'मुलं येणार म्हटल्यावर गप्प बसायला काय झालं होतं. आम्ही नंतर उत्तर कळवू असं म्हणून कल्टी मारायला काय झालं यांना? छे बाई. अवघडच दिसतंय हे प्रकरण. आता दुसरा पैतरा खेळून बघुयात..'
"सिगारेट-दारू वगैरे घेणारे लोकं आमच्या ग्रुपमध्ये नाही चालत."
"मग तर छानच आहे. आम्हाला असाच ग्रुप हवा होता. तुझा मोबाईल नंबर काय आहे? मी तुला शनिवारी सकाळी फोन करेन. संध्याकाळी निघूयात ना आपण?"
'अरे काय चाललंय काय? हा सौ कार्यक्रम आहे की काय आहे? सरळसरळ मोबाईल नंबरच विचारून टाकला या महाशयांनी. हद्द झाली बाई. आता काय करावं?'
"पण तुमच्यासोबत आणखी कोणी येणारे का? गाडीची व्यवस्था करावी लागेल ना त्याप्रमाणे.."
"अरे हो की. मी , माझा एक मित्र आणि एक मैत्रिण. आम्ही तिघं येऊ. जागा मिळेल ना आम्हाला? आम्ही कॉन्ट्रो देऊ जो काय ठरेल तो."
'मैत्रिण??? हंऽऽऽऽऽ '
"हो चालेल पण जेव्हा सांगू तेव्हा बरोबर पोहोचावं लागेल. वेळ झालेला अजिबात चालणार नाही."
"हो. अगदी नक्की. नंबर देतेयस ना? "
तिच्याकडचे आईबाबा झालेल्या बोलण्यावर अवाक् झालेले. त्याच्या आईबाबांना चिरंजीवांचं वागणं कदाचित सवयीचं असावं किंवा त्याने पूर्वकल्पना दिलेली असावी. त्यांना काहीच विचित्र वाटलेलं नव्हतं. तिच्यात्याच्यात बरंच अंतर होतं त्यामुळे नंबर लिहिलेला कागद त्याला द्यायला ती उठून त्याच्याकडे गेली. आणि तो कागद दिला. तो घेऊन त्याने शेकहँडसाठी हात पुढे करून विचारलं,"फ़्रेंड्स?"
तिची कळी एकदम खुलली. एका खूप मोठ्या ओझ्यातून मुक्त झाल्यासारखी ती अगदी मनापासून खुदकन हसली आणि हात पुढे करून शेकहँड करत म्हणाली,"फ़्रेंड्स." आणि तो परत तेच मिश्किल हसला.

मग थोड्या गप्पा झाल्या आणि ते महाबळेश्वर कार्यक्रमानंतर उत्तर कळवतो सांगून निघून गेले. त्यांच्या या बोलण्याने वैदेहीचं मन धडधडायला लागलं. आत्तातर हा 'फ़्रेंड्स' म्हणून गेला मग आता काय उरलं आहे उत्तर देण्याचं. छे बाई. झोलच आहे सगळा.
"गोडगोजिरी.. लाजलाजरी ताईच होणार नवरी.. फुलाफुलांच्या बांधून माळा.. मंडप घाला हो दारी.. "
"साऽऽऽयलीऽऽऽ गप्प बसतेस की नाहीस आता?", असं वरवर रागवत पण आतून कुठेतरी शनिवारची वाट बघत असलेली वैदेही आईबाबांच्या रागवणीला आणि प्रश्नांना सामोरी जायला सज्ज झाली.

( क्रमशः )

- वेदश्री.

मंगळवार, १७ जानेवारी, २००६

जगन्नियंता - एक विचार

आपण का जगत असतो? आपल्या या जगण्यामागचा हेतू तो काय असतो? किडामुंगींसारखं आपल्यालाही जास्त विचार न करू शकणारं डोकं आणि तशाच प्रकारचं कूपमंडूक मन देऊन का त्या अनादी - अनंताला बनवता आलं आपल्याला? का हा आपल्याला या जीवनमरणाच्या फेर्‍यात फिरवायचा, आपल्या पापपुण्याचा हिशोब ठेवायला नाना देवांना नोकरीवर ठेवण्याचा त्याचा हा खटाटोप? मानव प्राणी, त्याचं आयुष्य, त्यातली यशापयशं वगैरे वगैरे सगळं सगळं नश्वर असूनही 'सत्य अमर आहे, चांगल्याचा नेहमीच विजय होतो आणि वाईटाचा पराभव' हे देवाला सारखं सारखं त्याच्या प्रत्येक निर्मीतीला पटवून सांगत बसण्याची गरज भासते ती का? या सर्वातून देवाला असा काय अलभ्य लाभ होणार असतो? आणि या सगळ्यात 'माणूस' नक्की असतो तो कोण आणि का? हे दुष्टचक्र सुरूच झालं ते कशासाठी आणि चालू राहाणार ते कधीपर्यंत?

आपण तर एका कठपुतलीइतकेही भाग्यवान नाही आहोत. ती जेव्हा, जिथे, जशी नाचवली जाईल तशी नाचते तसंच आपणही तर त्या जगन्नियंत्याच्या तालावर नाचत असतो पण कठपुतलीला भावना नसतात. दुसर्‍या कठपुतलींवर तिच्या भावना अडकलेल्या नसतात. कुठूनही उचलून कुठेही नेऊन ठेवलं तरीही तिचे धागे कुठेही गुंतत नाहीत पण आपले मात्र अडकतात. भावनांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करताना त्यात अधिकाधिक गुंततच जातो आपण.

लहान मुलं जसं भातुकली खेळतात तसंच देव आपल्याशी खेळत नसतो का? नविन खेळणी मिळाली की जुनी नकोशी होतात आणि अडगळीत फेकून दिली जातात. बाहुलीची इच्छा असो नसो मन मानेल तेव्हा छान छान कपडे घालून, ढोलताशे वाजवून तिचं लग्न केलं जातं आणि मूड नसला की फाटक्या लक्तरात वर्षानुवर्षे अडगळीत दिवस कंठते तीच बाहुली. मन मानेल तेव्हा बाहुलीच्या सुखांकडे नको इतकं लक्ष आणि वेळ नसेल तेव्हा 'माझ्याकडे कोणी बघेल का?' असंच जणू म्हणणारी ती बाहुली. आपणही असेच एक खेळणे नसतो का त्या आपल्या निर्मात्याच्या लेखी?

देवाला आपण विसरलो नाही, पण कुठेतरी स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून मार्गक्रमण करायला शिकायला लागलो की तो दाखवून देतो की 'माझ्याशिवाय स्वत:ला शोधायचा प्रयत्न करशील. माझं अस्तित्व थोडं जरी विस्मृतीत जाऊ देशील तरी मी तुला काहीच मदत करणार नाही. माझंच नामस्मरण करत राहा मग मी तुला मुक्ती देईन. तुझ्या आणि तुझ्या आपल्यांच्या आनंदाचा विचार करेन.." जन्मदाते आईबाबासुद्धा असं काही हातचं राखून ठेवून, त्याचा वापर करून काही करायची जबरदस्ती करत नाहीत. "तू आमची चिंता करू नकोस. पुढे पुढे जात राहा. आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. तुझ्या यशातच आमचं सुख आहे." असं म्हणतात. मग खर्‍या अर्थानी हा जगन्नियंता आपला 'निर्माता' आहे का? असा प्रश्न मनात आला तर मी 'पाप' करतेय असं होईल का? 'निष्काम कर्म करत जाणे. फळाची अपेक्षा न करणे..' हे आणि असे कित्येक, देवाच्याच मुखातून सांगितले गेलेले नियम देव स्वत:पुरते मात्र धाब्यावर बसवतो, असं म्हणायला जीभ धजली, तर चुकलं म्हणता येईल का?

विज्ञानाची कास धरावी म्हटलं तर त्याच्याकडेही सर्व प्रश्नांची उत्तरं गवसत नाहीत. इतिहासाचा इतिहास आणि वर्तमानाचं भविष्य असतंच, जे विज्ञान नाही सांगू शकत. 'सर्व शून्यातून निर्माण झालं आहे' मान्य केलं तर उभ्या राहाणार्‍या 'मग शून्याच्या आधी काय होतं?' या प्रश्नाचं उत्तर ते कुठून मिळणार? हे सर्व 'अनादी आणि अनंत आहे' हे एकदम चपखलपणे मांडलेलं असलं तरीही जिवाला जन्माला घालताना जर असेही प्रश्न पडतील असं डोकं दिलंय तर त्याची उत्तरं पण असतील याची काळजी का घेतली गेली नाही?

दिलेलं आयुष्य दिलंय म्हणून जगायचं की मरायचं धाडस नाही म्हणून जगायचं?
"अगं या विचारांमध्ये नको वेळ वाया घालवूस. मस्त खायचं, प्यायचं आणि ऐष करायची बस्स." या तत्वाने जगायचं. नविन नविन शोध लावून जगणं सुसह्य (!!!) करून जगण्याची आपली आणि इतरांचीही आसक्ती वाढवायची की या सगळ्यात काहीही अर्थ नाही, सर्व सत्ता देवाच्याच हातात आहे, असं म्हणून त्याचं आधिपत्य कबूल करून आपला सर्व स्वाभिमान, स्वत्व बाजुला ठेवून त्याच एका तत्वाचं स्तुतीगान ( मनापासून पटो वा न पटो.... ) करून 'लवकर मला या फेर्‍यातून मुक्त करव' अशी करूणा भाकायची त्याची जेव्हा की या फेर्‍यात अडकवणारा तोच असतो. मग तरीही मीच का म्हणून सुटकेसाठी त्याला आर्जवं करायची? का मला असं त्याच्या तालावर नाचण्यासाठीच प्रोग्रॅम्ड केलंय त्याने?

जग इकडचं तिकडं झालं तरीही मी जगणारे. माझ्या संस्कारांवर आणि पटलेल्या तत्वांवर विश्वास ठेवून. कदाचित माझ्याशी निगडीत माझ्या आपल्यांच्या भावनिक गुंत्यात त्यांना एकटं सोडून स्वत:चच सुख शोधण्याची इच्छा नाही म्हणून. माझ्यासारखेच तेही अडकलेत म्हणून एक समदु:खी असल्याचं त्यांचं अनामिक सुख हिरावून घ्यायचं नाही म्हणून. माझ्यासारखीच छोटी असली तरीही माझी स्वप्नं पूर्ण करण्याचं माझं स्वप्न पूर्ण करायसाठी म्हणून. देवाने न बनवलेल्या उत्तरांना बनवण्याचा प्रयत्न करण्यासाठी म्हणून पण तरीही.... खेळणी जिवंत असती आणि त्यांना भावना असत्या तर त्यांना काय वाटलं असतं ते स्वत: कोणाकडून तरी खेळणं म्हणून निर्दयपणे खेळवलं जाताना अनुभवणं किती असह्य आहे, हे समजल्यावर जो आतल्या आत जिवाचा तडफडाट होतो, जी विनाकारणची असहाय्यता जाणवते, त्यातून बाहेर पडायला मार्ग तो काय?

- वेदश्री.

माझे एक आदर्श....

जन्म १८८४..मुळचं नाव वेंकटरमण.लहानपणापासून कुशाग्र बुद्धी. १८९९ या वर्षी शालांत परीक्षा प्रथम क्रमांकानं उत्तिर्ण झाले.त्याच वर्षी संस्कृतवरील प्रभावाचा प्रत्यय येऊन मद्रास संस्कृत संघटनेनं "सरस्वती"ही पदवी त्यांना दिलेली.

१९०२ या वर्षी बी.ए. १९०४ या वर्षी "अमेरिकन इंस्टिट्युट ऑफ सायन्सेस " या संस्थेतर्फे घेतली जाणारी एम.ए. ची परीक्षा मुंबई केंद्रातून दिली. एकाच वेळी विज्ञान, तत्वज्ञान, इतिहास, इंग्रजी,गणित व संस्कृत या सर्व विषयांत प्रथम क्रमांक मिळविला की जो अजूनही मोडला न गेलेला विक्रम आहे.

त्यानंतर काही वर्षे बंगलोर येथे प्राचार्य म्हणून व नंतर स्वातंत्र्य चळवळीत कार्य केले पण मुळचा पिंड योग्याचा त्यामुळे या कार्यात मन रमेना. १९११ पासून आठ वर्षे शृंगेरीभोवतालच्या घनदाट अरण्यात, एकांतवासात अध्यात्मसाधना केली.

१९१९ या वर्षी त्यांना संन्यासदीक्षा दिली गेली आणि नाव ठेवलं गेलं "भारती कृष्ण तीर्थ ". १९२५ मध्ये ते पुरीच्या गोवर्धनमठ पीठावर शंकराचार्य म्हणून आरुढ झाले.

त्यांच्या आठ वर्षाच्या अध्यात्मसाधनेच्या काळातच त्यांनी वैदिक गणिताच्या सूत्रांची रचना केली.अथर्ववेदात विखुरलेल्या माहितीवरून ही सूत्रं त्यांनी रचली आहेत."या १६ सूत्रांच्या आधारे गणिताच्या कोणत्याही शाखेतील उदाहरणे कमीतकमी वेळात ,कमीतकमी श्रमात आणि कमीतकमी जागेत सोडवता येतात."असं त्यांनी म्हटलं आहे. ( मी अनुभवलं आहे.)म्हणून स्वामीजी वैदिक गणिताला 'अश्रू शिवायचे गणि' असे म्हणतात.या गणिताच्या प्रसारसाठी भारतात व अमेरिकेत त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली व प्रचारदौरे केले.

संस्कृतवर त्यांचे जितकं प्रभूत्व होतं, तितकंच इंग्रजी, फ्रेंच, लॅटीनसह १०-१२ भाषांवर होतं. प्राचीन भारतीय संस्कृतीचा त्यांचा जितका सखोल अभ्यास व व्यासंग होता, तितकाच आधुनिक विज्ञानाचाही होता. प्राचीन परंपरांचा अभिमान असतानाही त्यांनी आधुनिक विज्ञानाची उपेक्षा केली नाही. अमेय मोजता न येणार्‍या अशा त्या परमात्म्याची साधना करत असतानाच , गणितासारख्या ऐहिक , मेय अशा विषयाचीही ज्ञानसाधना त्यांनी केली.

"समत्वं योग उच्यते "ही व्याख्या ज्याच्याबाबतीत सर्वांशानं लागू पडते असा हा योगी, 'जगद्गुरु' ही उपाधी सार्थ ठरवून १९६० च्या २ फेब्रुवारीस महासमाधिस्थ झाला.

नाज़ , ईद मुबारक ...

मी पहिल्या बाकावर बसले होते. अचानक एक मुलगी वर्गात आली आणि अगदी धावतपळत आल्यासारखी ती धपापत होती. माझ्याजवळ आली ती एकदम आणि म्हणाली,"यहा कोई बैठा नहीं है ना? मैं बैठू?" तिचा चेहरा अजून मला दिसला नव्हता कारण ती तिच्या गोषत होती ! ती मुसलमान होती !! अभियांत्रिकीच्या जगातलं माझं पहिलं पाऊल होतं त्या दिवशी. भांबावले होते पूर्ण. कोणीतरी हवंच होतं बोलायला. ही आपणहून आलीये तर का नाही म्हणा?
"कोई नहीं बैठा है। तुम बैठो ना.."
तिने तिची बॅग माझ्याशेजारी ठेवली आणि बुरखा काढून टाकला. दिसायला बऱ्यापैकी होती पण तिची एक गोष्ट मला भारी आवडली आणि ते होता तिचा कायम हसतमुख चेहरा ! मी तिच्याशी काही बोलणार तेवढ्यात मॅडम वर्गात प्रविष्ट झाल्या. थोडंसं इकडचं तिकडचं बोलून त्या म्हणाल्या,"आज आपण पहिल्यांदाच भेटत आहोत. प्रत्येकाने स्वतःची ओळख करून द्या.."
होता होता एकेकजण स्वतःची ओळख सांगत होता/होती. मीही सांगितली आणि आता तिची पाळी होती ओळख करून देण्याची. माझे कान टवकारले गेले अनाहुतपणे. ती बोलली ,"मैं नाजिया.." पुढेही ती बोलली थोडंफार पण मी विचारात पडले होते. ही मुसलमान आहे !!! हा एकच अर्थबोध मला तीव्रतेने झाला होता. मी विचारातच होते तेवढ्यात तिने मला विचारलं,"वेदा, मैने कैसे बोला अभी? ज्यादा तो नही ना कुछ बोल गयी?"
"नाही गं. खूपच छान बोलत होतीस तू.." माझी सारवासारव.
"मुझे मराठी सिखाओगी क्या? मुझे समझती है लेकिन बोलनी नहीं आती. भैयाजान सीखने नही देते मगर मुझे बहोत प्यारी लगती है.."
पहिल्या भेटीतच ती इतकं बोलेलसं वाटलं नव्हतं पण मी खूप आतवर कुठेतरी जबरदस्त सुखावले होते, ती मला 'वेदा' म्हणाली म्हणून की तिला मराठी आवडते म्हणून की तिने न बोलता न विचारता मला मैत्रिण बनवून टाकल्याची ग्वाही दिल्याबद्दल, ते मला आजतागायत समजलेलं नाही.
"तुम बिलकुल फिक्र मत करो नाज़. मैं सिखाउंगी तुमको.."
तिचा चेहरा काय खुलला होता ! मला आवडायचा अग्गद्दी तस्साच !

"वेदा, तुला माझी पेन्सिल कुठेय पता है क्या?"
"मला कसं माहिती असेल तुझी पेन्सिल कुठेय ते? वटवट करू नकोस गं. आधीच हे ड्रॉईंग म्हणजे माझ्या डोक्याला झेंगट आहे नसतं. त्यात आणखीन त्याचा टॉप व्ह्यू, बॉटम व्ह्यू, साईड व्ह्यू... आई गं ! जीव कातावला माझा अगदीच आणि त्यात तुझी ही पेन्सिल.. आपण शोधू नंतर तुझी पेन्सिल. आत्ता माझ्याकडे आहे ती घे.."
"हाऽऽऽय अल्लाऽऽऽऽह तुझा चिडल्यावरचा व्ह्यू एकदम टॉप असतो गं वेदा.. "
"नाऽऽऽऽऽज़... ड्रॉईंग निकाल ना चुपचाप?"
ती हसत बसायची नुसती मग मी चिडून बघितलं की "अल्लाऽऽऽह" म्हणायची लाडीक. मला जाम हसू यायचं मग मी हातवारे आणि नजरेनेच तिला ड्रॉईंग काढायची विनंती करायचे आणि दोघींचे ड्रॉईंग्स पूर्ण होऊन जायचे. तिची माझी मैत्री अशीच हळुहळु गाढ होत चालली होती.

"वेदु, माहितेय का? आता आपाल्याला फक्त १२ बॉल अजून टाकायचेत.."
"वाऽऽह. झकास. आपण आज जिंकणार म्हणजे मॅच.. यूऽऽऽऽहूऽऽऽऽ"
मी आणि आमचा ग्रुप क्रिकेटबद्दल बोलत असतानाच नाज आली. सगळ्यांची तोंडं अगदी शिवल्यासारखी बंद पडली. मला हे लक्षातच नाही आलं. मी आपलं नेहमीसारखं तिच्याकडे गेले धावत आणि म्हणाले, "नाज़, माहितेय का? त्यांना आता ४५ रन्स हव्यात १२ बॉल्समध्ये. आपण ही मॅच आणि सिरीजसुद्धा जिंकणार पाकिस्तानविरुद्ध... "
"क्या कह रही है तू वेदा? आज ई.एम. का लेक्चर हो जाने के बाद आपण मॅच बघायला जाऊ या हॉस्टेलवर. हनी अनिकी बॉलींग देखनी है मुझे.. " अनिल कुंबळे हिचा हनी ! आई गं.. मी आणि अख्खा ग्रुप इतका हसला तिच्यावर की बस्स. आधी ग्रुपमधल्यांच्या तोंडावर असे भाव होते की नाज़ला नाही आवडणार आपण पाकविरुद्ध जिंकणार हे. मला मात्र असं अज्जिब्बात कुठेच वाटलं नाही आणि मी पळतपळत तिच्याकडे गेले होते आणि तिनेही भरभरून आनंद व्यक्त केला होता. आमच्या टाळ्या आणि गप्पा चालू झाल्या दोघींच्या. आमची मैत्री वाढत होती, मजबूत होत होती पण बाकीच्यांना ती आवडत नव्हती कदाचित..

"वेदा, मैं तेरेलिये क्या लायी हूं?"
"काय गं? काय आणलंयस?"
"विचार कर ना जरा.."
"नाही बाई. नाही सुचते.."
इतक्यात कोणीतरी मुलगा मोठ्यानी ओरडला, "अजून काय आणणार. आज ईद आहे ना. बकरा कापला असेल किंवा कोंबडी. मग तीच आणली असेल डब्यात खास मैत्रिणीसाठी.." हे ऐकून नाज़चा चेहरा एकदम पडला. किती खुश दिसत होती नाज़. मी अशी कशी विसरले ईद? मला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात नेहमी तीच तर पहिली असायची. आणि मी? मी तिला शुभेच्छाच नाही दिल्या? छे.. मी किती आप्पलपोटी आहे. मी विचारात गुंगले होते आणि नाज़ निघून गेली होती. एक तिरस्काराचा कटाक्ष सर्व मुलांवर टाकून मी नाज़ला शोधायला पळाले. ती पार्किंग लॉटमध्ये माझ्या आणि तिच्या गाडीशेजारी उभी होती. रडत होती.
"नाज़, तू इकडे का निघून आलीस? मुलं कशी असतात माहितेय ना तुला? कशाला लक्ष देतेस त्यांच्याकडे? तू काय आणलंयस माझ्यासाठी ते सांग ना. सांग काय. देच ते मला लवकर.." मला स्वतःहून जास्त खात्री होती नाजबद्दल की त्या व्रात्य मुलांनी म्हटल्याप्रमाणे तिने काहीही आणलेलं नसणारे माझ्यासाठी. तिने एकही शब्द न बोलता तिचा डबा माझ्या हातात ठेवला. मी उघडून पाहिलं तर त्यात शिरखुर्मा होता. साजूक तुपाचा घमघमाट माझ्या नाकात शिरून गेला. मी काही बोलणार तेवढ्यात तिच्या तोंडून रडतारडता शब्द निघाले, "मला शिरखुर्मा करता येत नाही. मी मुद्दाम शिकून घेतला. अम्मी एकीकडे ईदचा स्वयंपाक आणि एकीकडे शिरखुर्मा करणार होती. मला माहितेय तुला आवडत नाही म्हणून मी सकाळी लवकर उठून आंघोळ करून लगेच स्वच्छ पातेल्यात अगदी पूर्ण व्हेज शिरखुर्मा बनवला तुझ्यासाठी वेदा पण तू नको खाऊस. माझ्या डब्यातलं तसंही तू काही खात नाहीस.." तिचे ते शब्द, तिचा तो अवतार आणि तिच्या त्या भावना.. मला काहीच कळायच्या आत मी तिच्या डब्यातला शिरखुर्मा खायला सुरुवात केली होती आणि ती फक्त आनंदयुक्त रडवेल्या शब्दात म्हणून गेली होती, "हाऽऽऽय अल्लाऽऽऽह.." !!!

"वेदा भाऽऽऽऽग..."
मी माझ्या आवडत्या लायब्ररीत अभ्यास करत बसलेली असताना एकदम त्या गहन शांततेत नाज़चे हे शब्द माझ्या कानी पडले. मला वाटलं. खलाऽऽऽस. आता लायब्ररीयन आम्हाला ओरडणार पण बघते तर आजुबाजुला कोणीच नव्हतं. दरवाजात नाज़ आणि आतमध्ये मी अशा आम्ही दोघीच होतो आणि ती एकदम घाबरल्यासारखी दिसत होती. माझ्या नावाने ओरडून ओरडून मला भागायला सांगत होती. मला काहीच कळेना काय चाललंय ते. मी २ तासापासून तिथेच बसून होते, नाज़ही होती. ती चहा प्यायला गेली आणि परत आली ती अशी. मी सगळं सामान घाईघाईने बॅगेत कोंबलं आणि पळतपळत नाज़कडे आले. मला तिचा राग आला होता. ही काय अशी बोलवायची पध्धत असते का वगैरे मी तिला ओरडणार होते पण तोवर तिने माझा हात धरला आणि मला ओढत ओढत ती धावायला लागली. मलाही धावावंच लागलं तिच्यामागे. तिने तिची गाडी आणली होती लायब्ररीच्या बाहेर. मी तिला ओरडणार होते की इथे गाडी आणायला चालत नाही, तू का आणलीस? त्या आधी तीच माझ्यावर खेकसली,"जल्दी बैठ ना गाडीपर.."
मी यंत्रवत तिच्यामागे बसले आणि तिने भरधाव गाडी सुरु केली. कॉलेजच्यामागे स्मशान होतं थोड्याशा अंतरावर तिकडे जायला लागली गाडी. थोडा वेळ मिळाला आणि मी तिला विचारलं, "नाज़, काय झालंय मला सांगशील का? आपण कुठे चाललो आहोत आणि स्मशानाकडे का नेतीयेस गाडी?" ती जीवाच्या आकांताने ओरडली माझ्यावर, "तुला माहित तरी आहे का कॉलेजमध्ये काय झालंय ते?" माझ्या पोटात भीतीचा गोळा उठला.
"काय झालंय.."
"दंगल..."
ज्याची भीती होती तेच शब्द कानी पडले आणि सर्वांग शहारून गेलं. "पण का?"
"गावमे किसीने किसी पुतलेको चप्पलका हार पहनाया बोले.."
"अरे पण त्याचा आपल्या कॉलेजशी काय संबंध?"
"काही नाही पण आज सगळं शहर बंद पाडणार सांगितलंय त्यांनी. कॉलेज रिकामं करा नाहीतर मुडदे पाडू सांगितलंय.. "
मी नकळत वळून कॉलेजकडे पाहिलं आणि मला आमच्या वर्गांच्या खिडक्यातून काहीतरी चमकताना दिसलं आणि मला दरदरून घाम फुटला. इकडे नाज़ म्हणत होती, "भैयाजान, आप यहा?"
मागे बघणारी मी एकदम झटक्यात वळून पुढे बघायला लागले. पुढे बघते तर काय? नाज़चा भैयाजान उभा त्याच्या ४-५ दांडगट मित्रांसोबत. त्याला माझी आणि नाज़ची मैत्री खास आवडायची नाही, असं मला राहून राहून वाटायचं त्याच्या नजरेतून. तो आत्ता जसं बघत होता त्यावरून तर मला वाटलं की मी आगीतून निघून फुफाट्यातच पडलेय. मी गाडीवरून एका झटक्यात उतरले आणि त्यांच्या विरुद्ध दिशेनी पळायला लागले पण तिकडे कॉलेजमध्ये कशी जाऊ? तिकडे ते लोकं माझा खात्मा करतील आणि इकडे.... मला काहीच समजेना. मी मध्ये येऊन उभी राहिले दोन्ही रस्त्यांच्या अगदी दिग्मूढासारखी. नाज़ तिच्या भैयाशी काहीतरी बोलत होती. थोड्यावेळाने तो आला माझ्याजवळ. त्याच्या एकेका पावलासरशी माझे हार्टबीट्स वाढत चालले होते. मी दोन्ही मुठी वळत चालले होते माझ्या. तो जवळ आला आणि म्हणाला,"चलो दीदीजान, आपको भूक लगी होगी. हम आपको और आपाको हॉस्टेलतक छोडने आते है. यहा रहना खतरेसे खाली नहीं.. " !!
म्हणाल्याप्रमाणे तो आणि त्याचे दोस्त आम्हाला हॉस्टेलपर्यंत पोहोचवून आले. नाज़ एकच वाक्य बोलली,"वेदा, याद है तुम्हे तुमने मुझपे भरोसा रखा था. मैं वो कभीभी, किसीभी हालमे टूटने नही दुंगी, इसका भी भरोसा रखो.. "
मला खूप अभिमान वाटतो नाज़चा..

ई.एम. च्या सरांचं त्यांच्या मर्जीप्रमाणे लग्न ठरलं होतं आणि ते परत नेव्हीत रुजू होणार होते. वधूसंशोधनासमयी अगदीच बिनकामाचं घरी कशाला बसा म्हणून ते आम्हाला शिकवायला आलेले लेक्चरर म्हणून. खूपच सुंदर शिकवायचे म्हणून आम्हाला खूप आवडायचे. दिसायलाही सुंदर होते म्हणून बऱ्याच जणींना आवडायचे ! एकूण काय आमच्या वर्गाचे ते अगदी लाडके सर. आमचं सेमिस्टर संपलं आणि त्यांचं वधूसंशोधनही. ते जाणार म्हणून आम्हाला दुःख आणि इतके सगळे दोस्त दुरावणार याचं त्यांना दुःख. शेवटच्या लेक्चरला ते म्हणाले," मला माझी हवी ती मिळाली. तुमच्या अपेक्षा कळू देत. आम्ही दोघं शोधू तुम्हा सर्वांसाठी.. " मला त्यांच्या उदार हृदयाचं भारी कौतुक वाटलं आणि खूप हसू लोटलं. प्रत्येकाने सांगायचंच आणि तेही गाण्यातून असं म्हटल्यावर मी हळूच शेवटच्या कोपऱ्यातल्या बाकावर मोर्चा हलवला माझा. माझी कल्टी नाज़ने ओळखली. तीही माझ्यासोबत तिथे आली.
"वेदा, यहा क्यौ आयी तुम?"
"अरे यार. देख ना. गाणं वगैरे. मी आणि कुठल्या मुलाकरता म्हणणार. कधीच नाही. शक्यच नाही. "
"का शक्य नाही? तू बघच. मी तुला गायला लावणारच.. "
मी तोंडावर बोट ठेवून तिला गप्प बसायची खूण केली. सगळेजण एकेक करून गात होते. सरांचा शेवटचा दिवस म्हणून सगळा वर्ग फुलून गेलेला. माझ्यावर वेळ येईपर्यंत तास संपलेला असणार याची मला पूर्ण खात्री होती. तसा तो संपलाही. मी हुश्श केलं पण नाज़ ओरडली, " सऽऽर सऽऽर, वेदश्री एक गाना गाने वाली है. बस्स दो मिनिट.. "
मी जे चिडून तिच्याकडे पाहिलं की बस्स. सर पण भन्नाट.. जावं ना निघून पण थांबले तेही आज्ञाधारक मुलासारखे.
"वेदश्री, इकडे ये सगळ्यांसमोर आणि म्हण गाणं. तुला गाताना मी ऐकलंय लंच ब्रेकमध्ये. फक्त आता तू गाणं कोणतं म्हणतेयस ते ऐकायचं आहे.."
:( इतकी बोंबाबोंब झाली म्हटल्यावर गेले समोर. एऽऽक गाणं सुचेना. नाज़ तिकडून मला हातवारे करून एक गाणं सांगत होती जे मला भारी आवडायचं आणि मी नेहमी गुणगुणायचे. मी हसले आणि म्हणायला लागले,

दिल किसीपे जब आ जाये
दिल किसिको ज अपनाये
दिलबर ऐसा मिले तो बात बन जाये
आखें हो जिसकी जादूभरी
बाते जिसकी मस्तीभरी
जिसको देखे बसमे कर ले
ऐसी हो जिसमे जादूगरी..

म्हणता म्हणता आख्खं गाणं कधी म्हणून गेले कळलंच नाही मला नंतर माझं मलाच आश्चर्य वाटलं की मी हे कसं काय केलं. मी माझ्या जागेवर येऊन बसले आणि नाज़ माझ्याकडे बघून म्हणत होती, "हाऽऽऽय अल्लाऽऽऽह ! हम खोजेंगे हां आपकेलिये आपका दिलबर.." आणि मी लटक्या रागात तिला त्रास देऊ नकोस म्हणून दटावत होते.

कॉलेजच्या शेवटच्या दिवशी युनिफॉर्मच्या पांढऱ्या शर्टवर सगळ्यांचे संदेश आणि सह्या घेत कॉलेजभर फिरले. सरांकडून, मॅडमकडून, दोस्तांकडून. खूप मजा आली होती. मी टायटॅनिकच्या पोझमध्ये उभी होते एकदातर आणि सगळेजण कायकाय लिहित होते धपाधप. मी नाज़ला शोधत होते पण ती सापडत नव्हती. शेवटी एकदाची दिसली. मी तिच्याकडे गेले आणि, "नाज़, मला निरोप नाही लिहून देणार का? "
तिने लिहून दिलं, "नाझिया मतलब जिसपर नाझ कर सको. वेदश्री तुम नाझिया हो.. "
मीही तिच्या शर्टवर माझा पत्ता लिहून दिला आणि लिहिलं, "मला तुझ्या प्रेमाच्या शिरखुर्म्याचा नाज़ आहे, नाज़.."
मला रडू येत होतं. रोज भेटणाऱ्या आम्ही आता भेटणार नव्हतो. ती परत जाणार होती तिच्या घरी. तीही रडत होती......

आज ईद.. माझ्या नाज़ची ईद.. माझी ईद.. शिरखुर्म्याची ईद.. माझ्या हृदयात दडलेल्या या मैत्रिणीला आठवून देणारी ईद.. गणू , जिथे असेल तिथे माझी नाज़ खुश असू दे. तिला माझ्यातर्फे या ईदच्या हार्दिक शुभेच्छा कळवशील का रे?

- वेदश्री.

कृपया आम्हाला जगू द्या...

"कोणीही वर्गाच्या बाहेर जाणार नाही. पालक आले की तुम्हाला सोडण्यात येईल. तोवर कोणीही दंगा करायचा नाही.."
कितीक जणांनी भोंगा लावला होता, काही जण भेदरून गप्प बसले होते, काहीजण 'आम्ही इतक्या दूर रहातो. आमचे पालक अशा परिस्थितीत कसे येणार आम्हाला घ्यायला? आम्ही घरी कसं जायचं?' या चिंतेनी व्याकुळ झाले होते. मला काहीच कळेना काय करावं. कुठे जावं. बाबा तर नाहीच येऊ शकणार. आई.. ती कशी येईल अशा परिस्थितीत? दादा कॉलेजला. बाई गं. तो ठीक असेल ना? अक्का कोणत्या वर्गात बसते माहितीच नाही. श्री तरी ठीक आहे हे बरं आहे. पण आता मी काय करू? डोळ्यापुढे अंधारी पसरली. नक्की काय झालंय हेही कळेना. गावात काहीतरी झालंय एवढंच कळत होतं. चौथीच्या पोरीला अजून ते काय कळणार दंगलीतलं?
थोड्याच वेळात पालक यायला सुरुवात झाली. जे ते आपापल्या पाल्याला, शेजारच्यांचे ओळखीचे असतील तर त्यांना घेऊन जायला लागले. कोणाचे बाबा, कोणाचे काका, कोणाचा दादा आले आणि त्यांना घेऊन गेले. ज्यांचे पालक येऊ शकणार नव्हते त्यांना पोहोचवण्याची काहीतरी सोय शाळा करणार होती. माझ्या घराकडच्या बाअजूला वर्गातल्या उरलेल्यांपैकी कोणीच रहात नव्हतं त्यामुळे माझ्या घरी पोहोचण्याची पंचाईतच होती. "गणू, मला कोण येईल रे न्यायला?" असा प्रश्न मनात डोकावत होता. कुठून धैर्य आलं कोण जाणे पण मी बाईंना म्हणाले, "बाई, मी जाते माझी माझी घरी. माझं घर जवळच आहे तसं."
"गप्प बस. सोय करतोय आम्ही.." एवढंच त्या बोलल्या तरीही मी काही ऐकलं नाही आणि नजर चुकवून वर्गातून पोबारा केला. आणखी एकही क्षण त्या भीतीच्या सावटाखाली श्वास कोंडून बसून रहाणं मला शक्य वाटत नव्हतं. दप्तर पाठीला लटकावलं आणि मी रस्त्यावरून जायला लागले. नेहमी रमतगमत चालणारी मी, त्या दिवशी मागे वाघ लागल्यासारखी चालत होते. रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हतं. दुकानं बंद झालेली किंवा बंद होत आलेली. पटापट चालायच्या ऐवजी मी एव्हाना अनामिक भीतीने गारठून पळायला सुरुवात केली होती. जडबदक दप्तर संभाळत, भीतीने येणाऱ्या रड्याचे अश्रू दोन्ही हाताने पुसत रस्ता दिसेल इतपत सोय करतकरत मी जीव खाऊन पळत होते. घर जवळ होतं पण शॉर्टकट होता तो... आई गं.. एरवी माझ्याशी छान वागतात ते पण आज दंगलीमुळे जर तेही भंजाळले असले तर? एकेक शंका मनात येऊन अजूनच हडबडत चालले होते. पळण्याच्या शर्यतीचा वर्षभर सराव केला असता तरी पळाले नसते अशा आश्चर्यजनक वेगानी मी पळत होते. अर्ध्या रस्त्यात आले आणि वाटलं, कुठेतरी ओळखीच्यांकडे विचारुया. 'त्या' रस्त्याने जाणेच नको. एक एकदमच छान ओळखीचे काकाकाकू. आई त्या रस्त्याने येताजाताना बोलायची त्यांच्याशी. त्यांचं घर दिसलं आणि आशेचा किरण माझ्या मनात डोकावला. ते काका येतील सोडायला घरापर्यंत याचा विश्वास वाटला. मी त्यांच्या घरापर्यंत जायच्या वळणाला वळले आणि............ नको. ती तर आठवणही नको. त्या काकांच्या घरातून ३-४ चाकूधारी बाहेर पडत होते आणि त्या चाकूंवरून रक्त ओघळत होतं ! माझ्या हृदयाचे ठोके एकदम वाढले. दोन पावलं नाही तर कितीक पावलं मी मागे गेले माझं मलाच आठवत नाही. त्या लोकांनी मला बघितलं नाही हेच बरं. मलाही ते दिसले नव्हते नीट. ओझरतंच पाहिलं होतं मी त्यांना. मी अगदी सुन्न होऊन गेले होते. कुठे पळू तेच कळत नव्हतं. अंगात काही त्राणच उरले नसल्यासारखं प्रतित व्हायला लागलं. रडायला एकही अश्रू डोळ्यात उरला नसल्यासारखं वाटायला लागलं. मदतीसाठी ज्यांना विचारणार होते त्याच काकांच असं झालेलं. ते लोकं पळून गेले आणि थोड्यावेळानी तिथे पोलिसपथक आलं आणि त्या काकांना उचलून त्यांनी अँब्युलन्समध्ये घातलं आणि ती पी पी पी करत निघून गेली. मागून कशाचातरी ओरडा ऐकू आला. धावा धावा.. पळा.. मी वळून बघितलं तर लोकांचा लोंढाच्या लोंढा पळत सुटला होता आणि ओरडत होता पळा पळा... मी परत पळायला लागले जीव खाऊन. मेले तर मेले. नुसतं उभं राहून मरण्यापेक्षा घरी जातानाच्या प्रयत्नात मेले तर जास्त बरं असं वाटून गेलं. मला रस्ता असा दिसतच नव्हता. डोळे पाण्याने भरले होते की दुःखाने तेच कळत नव्हतं. विचारांचं काहूर मनात माजलं होतं, "का जगू देत नाहीत? कृपा करा. नका करू दंगली. आम्हाला जगायचं आहे. जगू द्या ना आम्हाला.... " मग अचानक वाटलं का रडायचं? का भीक मागायची जगू द्या म्हणून? मी नाही घाबरणार. मी धैर्याने तोंड देईन जे होईल त्याला. डोळे पुसले. ते परत भरून यायला पाणी उरलंच नव्हतं डोळ्यात कदाचित. पळणं बंद केलं आणि वैचित्र्यपूर्ण विरक्तीत संथपणे चालायला लागले. सुनसान रस्ता पहायचा योग आला नव्हता, तो तसा पहायला मिळणे हाच कदाचित माझ्या आयुष्यातला शेवटचा आनंद असा थरकाप उडवणारा विचार करून तो अनाकलनीय आनंद ( !! ) उपभोगायचा प्रयत्न करायला लागले आणि मला आई दिसली. आई येत होती माझ्याकडे धावत धावत, "शाळेतून का निघालीस मूर्ख. अक्कल आहे की नाही काही? चल आता लवकर घरी.."
"आई, दादा आला का गं? आणि आक्का?"
"सगळे आलेत. तुझाच पत्ता नाही फक्त. सगळ्यांचे जीव अटकले.. "
"आई, माहितेय का, त्या वळणावर ज्यांचं घर आहे ना - त्या काकांना भोसकलेलं मी ओझरतं पाहिलं.. "
आई खूपच घाबरली, रागवली. मला एक दणका घातला तिने पाठीत आणि पटापट चालणारी ती, आता मला ओढत ओढत पळायला लागली. ही माझ्या ज्ञात आयुष्यातली पहिली दंगल !

"बाबा, औ माझे सबमिशन्स आहेत हो कॉलेजमध्ये. काय जीवावर आलंय घरात राहून राहून. आम्ही जरा वरती गच्चीत जाऊन येऊ का हो? किती कंटाळा आलाय घरात बसून बसून.."
"काही गरज नाही. ऐकू येत नाही का? संचारबंदी आहे ते.. कुठेही जायचं नाही. मरण्यापेक्षा कंटाळा आलेला कधीही श्रेयस्कर कळलं का?"
"अहो पण किती दिवस? काही धरबंध आहे कि नाही त्याला? कोण ते चिमुटभर लोकं काहीतरी वेडेपणा करतात आणि सगळ्यांना भोगावं लागतं. किती दिवस चालणार हे अजून? का जगू देत नाहीत हे लोकं आपल्याला निवांतपणे? सांगा ना कोणीतरी त्यांना की कृपया आम्हाला जगू द्या हो.."
बातम्या बघण्यात गुंग बाबा माझ्या या वाक्यावर गप्प बसले.

"आज काय करू स्वयंपाक?" आईचा हा नेहमीचा प्रश्न. आजचा प्रश्न मात्र वेगळ्या परिस्थितीमुळे होता.
"आई, आज डाळ कर कुठलीतरी. भाजीच नाहीये एकही उरलेली.. "
"६ दिवस कोणती भाजी टिकणारे? भाजीचं ठीके पण दळलेलं पीठही संपत आलंय त्याचं काय? अजून किती दिवस चालणार कोण जाणे हा बंद.."
उपाशी मरणं चांगलं की दळण आणायला जाताना मरणं चांगलं कोणी सांगेल का? हा बावळट प्रश्न मनात डोकावला !

"वेदश्री, यार काय होईल गं? "
"काही होणार नाही गं. तू नको चिंता करूस. काही होणार नाही काकाकाकूंना आणि ते जम्मूला आहेत ना मग तू का काळजी करतेयस काश्मिर दंगलीने इतकी? "
"तुला माहित नाहीये वेदु, आमच्या घरात रोज दगडाने मारलेल्या चिठ्ठ्या यायच्या.."
"काय म्हणून? काय लिहिलेलं असायचं त्यात?" माझा बावळट प्रश्न.
" 'घर रिकामं करून इथून निघून जा नसता......."
"मग तुम्ही केलं रिकामं घर?"
"नाही. आम्ही शेवटपर्यंत नव्हतो गेलो पण.."
"पण काय गं इंदू?"
"मी आमचं अख्खं पुश्तैनी तीन मजली घर जळताना बघितलंय काश्मिरला. माझ्या एका काकांना भोसकलं होतं, मामांना तर मारूनच टाकलं. आमचं एकत्र कुटूंब होतं पण आता सगळेजण कुठे कुठे गेलेयत. जवळच्यांना डोळ्यासमोर भोसकलेलं पाहिलं ना मग कळेल काय वाटतं ते.."
अंगावर काटा उभा राहिला माझ्या.
"अगं पण आता तर काकाकाकू जम्मूला आहेत ना. तिथे नाहीये काही धोका. ते सुरक्षित आहेत. काही काळजी करू नकोस.."
"जम्मूलाही ते सुरक्षित नाही म्हणता येणार गं. जास्त अंतर नाही आहे जम्मू आणि काश्मिरात. आपण देवाचं दर्शन घेऊन येऊया का गं? मला कसंतरीच होतं आहे.. "
मंदिरात उभी राहून गणूलाही मी तेच विचारत होते मनातल्या मनात," का? का? का? का जगू देत नाहीत आम्हाला? आम्ही काय घोडं मारलंय कुणाचं म्हणून असं वागतायत आमच्याशी? कृपया आम्हाला जगू दे ना...."

"बाबा..."
झोपेत असलेल्या बाबांचा अस्पष्ट आवाज, "बोल रे बेट्या. सकाळी ५ ला कसा काय फोन केलास? आवाज का रडका येतोय तुझा? सगळं ठीके ना तिकडे?"
"मी ठीके. तुमचा आवाज असा का येतोय?"
"काही नाही गं. आत्ता उठतोय. काल जरा जाग्रण झालं ना म्हणून उशीर झाला जरा उठायला.. "
"आज कोणीही घराबाहेर पडायचं नाहीये कळलं का? "
"का गं काय झालं?"
"प्रश्न विचारू नका. सांगितलेलं ऐकत जा ना हो कधीतरी माझं. मला काही माहिती नाही. तुम्ही कोणीच आज घराबाहेर पडायचं नाहीये बस्स.. "
"अरे राजा, पण कसं शक्य आहे ते? मला आज क्लायंटकडे जायलाच हवं आहे. तो येणारे गाडी घेऊन.. "
"काऽऽऽऽही जायचं नाही सांगितलं ना मी तुम्हाला. काकांना सांगते मी फोन करून की काम नंतर होत राहिल म्हणून.." माझ्या रड्याचा एकदम स्फोटच झाला. मला काही बोलवेचना. मी इकडे येऊन सुरक्षित आहे पण आई-बाबा-श्री? त्यांना काही... नाही. काही होणार नाही त्यांना. तरीही मला काहीच सुचत नव्ह्तं. रडतारडता मी फोन ठेवून दिला मध्येच आणि आधीच ओल्या झालेल्या उशीत तोंड खुपसून रडत बसले.
दहा मिनिटांनी आईने फोन केला,"काय गं काय झालंय वेदल, काही सांगशील का?"
"मला काल स्वप्न पडलं की आपण सगळे गाडीतून कुठेतरी जातोय आणि मी 'एक फोन करून येते तोवर तुम्ही पुढे व्हा', असं म्हणून एका एस्टीडीपाशी उतरले आणि फोन करायला लागले. तुमची गाडी मी वळताना पाहिली डोळ्यासमोर आणि अचानक तिकडूनच १०-१५ चाकूसुरेधारी लोकं धावत आले. सगळी दुकां बंद व्हायला लागली. एस्टीडीवालीनी तिच्या घरात घेतलं मला. मी सुरक्षित होते पण... मी घरी कितीवेळची फोन करत होते पण घरी कोणीच उचलत नव्हतं फोन. मी एकदम किंचाळले आणि उठून बसले. मला कळलं मी झोपेत होते आणि जे बघितलं ते सगळं एक स्वप्नं होतं. मी तेव्हाच रात्री २ ला फोन करणार होते कसे आहात विचारायला पण तुम्ही झोपले असाल तात्पुरते रात्रभरासाठी असं वाटून सकाळ व्हायची वाट बघत बसले होते. आई, तुम्ही नका जाऊ ना गं कुठेच बाहेर. मला नाही रहावते इकडे तुम्हाला तिकडे एकटं सोडून. तुम्हीही या ना गं इकडे.. "
"काल तू काय वाचलं होतंस झोपायच्या आधी?"
"वर्तमानपत्र.."
"तरीच तुला अशी स्वप्नं पडतायत. काही काळजी करू नकोस. परिस्थिती तितकीशी हाताबाहेरची नाही आहे तरीही काही असलं तर मी स्वतःच जाऊ देणार नाही कोणाला घराबाहेर..."
मला वाटून गेलं की मीही इंदू पडली होती तशीच एकटी पडले आहे. अचानक डोळे मिटून घेतले आणि गणूला आठवलं. नकळत शब्द तोंडातून बाहेर पडले, "ही शेवटची दंगल ना रे गणू? आतातरी आम्हाला जगू देणार ना? मला सगळ्यांसोबत जगायचंय रे. कृपया आम्हाला जगू दे ना.. "

- वेदश्री.

शर्यत ससाकासवाची !

असंच एकदा ससाकासवाचं 'कोण जास्त वेगवान?' या मुद्द्यावरून भांडण होतं. आज काय तो निकाल लावायचाच या इरेला पेटून दोघं जणं शर्यत करून काय ते कळेलच असं म्हणून एक रस्ता ठरवतात आणि त्यांची शर्यत सुरू होते. ससा खूप वेगात पळत गेल्याने लवकरच खूप पुढे निघून जातो आणि मागून कासव हळूहळू चालत येत असतं. आपण खूप पुढे आहोत या विचाराने ससा थोडीशी विश्रांती घ्यायची ठरवतो आणि एका छान सावली देणाऱ्या झाडाखाली बसतो. कधी डोळा लागला हे त्याला कळत नाही आणि कळतं तेव्हा उशिर झालेला असतो कारण तोवर कासवाने शर्यत जिंकलेली असते !

तात्पर्य : ध्येयाप्रत जाण्याच्या दिशेने करण्याच्या वाटचालीत संथ असले तरीही सातत्य टिकवल्यास यश हमखास मिळते. मार्गातच टंगळमंगळ केल्यास सहजी मिळू शकणारी जीतही मिळत नाही.

शर्यत हरलो म्हणून सशाला मनस्वी दुःख होते. "आपण का हरलो?" यावर तो खूप विचार करतो, त्याला त्याची चूक उमगते आणि तो कासवाकडे जाऊन परत शर्यत होऊन जाऊ दे, अशी मागणी करतो. कासव होकार देतो आणि परत शर्यत सुरू होते. यावेळी ससा शर्यतीचे अंतिम ठिकाण गाठेपर्यंत थांबत नाही आणि शर्यतीचा निर्णय स्वतःच्या बाजूने लावून घेण्यात सहजी यशस्वी होतो.

तात्पर्य : ध्येयाने प्रेरीत घेतलेले जलद तरीही अचूक निर्णय आणि त्यानुसार योग्य दिशेने उचललेली जलद पावले ही संथ आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांपेक्षा कधीही लवकर यश संपादीत करून देतात.

आता विचार करायची वेळ कासवावर असते. पहिली शर्यत आपण जिंकलो मग ह्यावेळेस का हरलो? याचा ते विचार करते. आपल्यातला कमीपणा भरून काढण्याची एक युक्ती त्याला सुचते आणि तो शर्यतीचं आव्हान घेऊन परत सशाकडे जातो. यावेळचा शर्यतीचा मार्ग फक्त थोडासा वेगळा असतो. ससा आव्हान स्विकारतो आणि त्यांची शर्यत सुरू होते. ससा नेहमीप्रमाणे धावत सुटतो आणि कासव मंदगतीने चालत चालत मार्गक्रमण करायला लागते. ससा धावत जातो पण मध्येच नदी लागता "आता काय करायचं?" याचा दिग्मूढ होऊन विचार करायला लागतो. यथावकाश कासव तिथे येऊन पोहोचते आणि नदीतून पोहून पल्याड जाऊन अंतिम ठिकाणी आधी पोहोचून शर्यत जिंकते.

तात्पर्य : उपजत / कमावलेले गुण जोखून त्या जोरावर आपला मार्ग निश्चित केल्यास यश हमखास मिळते.

या शर्यतींमुळे ससा आणि कासव एव्हाना एकमेकांचे छान मित्र झालेले असतात. आता एकत्र बसून ते दोघे विचारमंथन करतात. शेवटच्या शर्यतीला पूर्ण व्हायला १२ तास लागलेले असतात. याहून कमी वेळेत होऊ शकलं असतं का?, यावर विचार करताकरता दोघांचं एका युक्तीवर संगनमत होतं आणि त्यादृष्टीने प्रयत्न करून बघण्यासाठी आता शेवटची शर्यत वेळ आणि एकेकट्या त्यांच्यासाठी प्रतिकूल असलेल्या परिस्थितीविरुद्ध जिंकायची असं ते दोघं ठरवतात आणि खेळायला सिद्ध होतात.

यावेळेस ससा कासवाला पाठीवर घेऊन नदीपर्यंत पळतो आणि मग पुढे कासव सशाला पाठीवर घेऊन नदी पोहून पार करते आणि अशाप्रकारे ते दोघे मिळून ही शर्यत १ तासातच पूर्ण करतात !

तात्पर्य : एकेकट्याने वेगवेगळ्या क्षेत्रात पारंगत असणं छानच पण इतरांचे गूण जोखून त्यांचेही त्याबद्दल कौतुक करून जोवर तुम्ही मिळूनमिसळून काम करत नाही तोवर तुम्ही उत्तमरित्या काम करू शकत असलात तरी ती पद्धत सर्वोत्तम ठरू शकत नाही.

ससाकासवाच्या या गोष्टीतून मिळणारं सर्वात महत्त्वाचं तात्पर्य : एकमेकांशी भांडण्यात शक्ती, बुद्धी आणि वेळ खर्ची घालून एकेकट्या लढवय्यांना शत्रू मानून शर्यती जिंकण्यापेक्षा योग्य पद्धतीने चांगल्या गुणांची सांगड घालून पराभवाला न जुमानता परिस्थितीविरुद्ध लढा पुकारतो तेव्हा आपण सर्वोत्तम कामगिरी करून दाखवू शकतो.

इंग्लिश कथाकार : अज्ञात
स्वैर अनुवाद : वेदश्री