मंगळवार, ६ मार्च, २०१२

अनुभव ज्ञानेश्वरीचा!

"आई, ज्ञानेश्वरी नाही दिसतेय लायब्ररीत. कुठे असेल काही कल्पना आहे का तुला?" घरगुती लायब्ररीची लायब्ररीयन असल्याने माझा आईला प्रश्न.

"अगं परवा कानडे आजींनी मागितली म्हणून मी दिली आहे त्यांना वाचायला. कशाला हवी होती ती तुला आत्ता?" इति आई.

"क्काय??!!! कोणालाही पुस्तकं द्यायची नाहीत असं ठरलेलं ना आपलं? मग कशी दिलीस तू अख्खी ज्ञानेश्वरी त्यांना? तू पण ना आई.. छे बाई!"

"तू उगाच आता आकांडतांडव काही करू नकोस. त्या आजी काही खाऊन नाही टाकणारेत आपली ज्ञानेश्वरी.. वाचून झाली की देतील परत! तशीही पुस्तकं साठवून ठेवून काय पूजा बांधायचीय का त्यांची? योग्य वाचकाला वाचायला देण्यात ती काय अडचण, मला कळत नाही."

"पण योग्य वाचक कळायचा कसा? तुला तर सगळेच योग्य वाटतात असे दिसतेय!"

आई काहीही म्हणाली असली आणि कानडे आजी एरवी कितीही चांगल्या वागतबोलत असल्या तरीही माझ्या मनाने मात्र "ज्ञानेश्वरी लंपास झाली!" असे नोंदवून टाकले होते आणि मनाची उलघाल काही केल्या थांबत नव्हती. "आई भलतीच बा साधी भोळी.. कोण कधी गोडगोड बोलून गंडा घालेल ना तिला पत्ताही लागणार नाही." वगैरे वगैरे घोकणे चालूच होते माझ्या मनाचे.. अर्थातच मनातल्या मनातच! कानडे आजींना अजून त्यांनी न केलेल्या दोषाबद्दल मनोमन गुन्हेगार ठरवून, रोजच्या कामांमध्ये हा विषय बाजूला कधी पडला त्याची नक्की तारीखवेळ नाही सांगता यायची मला पण तसा तो पडला खरा!

~~~

काल मी आणि आई दुपारचे असेच गप्पा मारत बागेत निघालेला कापूस निवडत आतल्या खोलीत बसलो होतो. अचानक बाहेरच्या खोलीतून बाबांचा आवाज आला,"वेदश्री, ताई आल्या बघ." कॉलनीतल्या एतद्देशीय सगळ्या काकवा या बाबांच्या ’ताई’ असतात.. त्याच नियमाला धरून होते हे!

कोण आहे ते बघायला मी उठले तर कानडे काकू (कानडे आजींची सून) बासनात बांधून काहितरी घेऊन आलेल्या! 

"ज्ञानेश्वरी द्यायला आलेय. शुक्रवारीच वाचून पूर्ण व्हायची होती आईंची पण शनिवारी झाली आणि मग शनिवारच्या शेवया रविवारी केल्या! असं करत करत आता सोमवार उजाडला ज्ञानेश्वरी द्यायला.."

"इतकी काय घाई होती? द्यायचीस की निवांत!" इति आई. माझा जीव मधल्यामध्ये धाकधूक की बासनात बांधून आणावी लागली म्हणजे न जाणो कोणत्या अवस्थेत असेल आपली नवीकोरी ज्ञानेश्वरी! :-(

"अहो आई शांत बसतील तर शपथ! त्यांची तर पाठ साथ देत नव्हती त्यांना सलग २ तास बसून ज्ञानेश्वरी वाचायला पण त्या तश्शा पट्टा बांधून बसत होत्या वाचन करायला. उतारवयात तेच त्यांचं मनोरंजन, दुसरं काय? नाही का? वाचनाची भयंकर हौस आहे माझ्या सासूबाई आणि सासरे दोघांनाही. सासऱ्यांना वयामुळे होत नाही आता वाचणे पण आई मात्र ऐंशीच्या उंबरठ्यावर असूनही वाचनाचा हट्ट सोडत नाहीत. स्वत: वाचून सासऱ्यांनाही ऐकवत असतात.. मग माझं आपोआप श्रवण होऊन जातं.."

त्या हे बोलत असताना मी न राहवून मध्येच विचारलं,"ज्ञानेश्वरी अशी बांधून का आणलीयत तुम्ही?"

"ज्ञानेश्वरी उघड्याने देत/घेत नसतात, बाळा."

"आणि हे काय? हा रुपया कसला ठेवलाय यात? चुकून तुमचा राहिलाय वाटतं! हा घ्या." असे म्हणत बासनातून ज्ञानेश्वरी काढताना माझ्या हाती आपसूक आलेले एक रुपयाचे नाणे मी त्यांना द्यायला लागले.

"चुकून नाही आलेले ते. आईंनीच ठेवलेत त्यात ५१ रुपये तुम्हाला द्यायला!"

आश्चर्याने माझ्या तोंडून शब्दच फुटेनासा झाला.

"कसले ५१ रुपये? काहीच्या काही काय?" जरा सावरल्यावर मी म्हणाले.

"अगं हे तुम्हालाच म्हणून नाही तर अगदी माझ्या भाच्याकडून घेतलेले पुस्तक परत देतानाही त्यांनी दिले होते."

"पण का द्यायचे पैसे? आईला आनंद झाला आजींना पुस्तक वाचायला देण्यात.. बस्स.. झाले पैसे वसूल!" हे शब्द माझ्या तोंडून कसे निघाले हे आजतागायत मला न उलगडलेले कोडे असेच म्हणावे लागेल..

"आईंचं मत आहे की अशी चांगली पुस्तकं घेणाऱ्यांना हीच फुलाच्या पाकळीसारखी मदत.. म्हणून! बाकी विशेष असे काही नाही."

"त्यांचे मन मोडायचे नाही म्हणून एक रुपया ठीक आहे.. पण हे पन्नास रुपये घ्या बा तुम्ही परत! आमची ज्ञानेश्वरी सुखरूप परत आली आणि वाचणाऱ्याला आनंद मिळू शकला हेच आमच्यासाठी खूप आहे."

"मोठ्यांनी प्रेमाने दिलेले पैसे परत करू नयेत असे.. आणि ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने दिलेले तर नाहीच नाही!" यावर काय बोलणार मी? शब्दच संपल्यासारखे वाटले मलातर!

"तुमच्याकडे दासबोध आहे का हो मराठीत?"

"मराठीत काय? दासबोध मराठीतच लिहिलेलाय की मूळ. मोठ्या मुलीने नेला होता तो.. परत आलाय की नाही ते बघावे लागेल. वेदा, बघते का जरा लायब्ररीत आहे का ते?"

एरवी मी काहितरी कारण सांगून पुस्तक देणे नक्कीच टाळले असते पण कानडे आजींना द्यायचे म्हणता नकार द्यायला जीवावरच आले माझ्या!

"पण आजींना सांगा की आता पैसे वगैरे द्यायचे नाहीत.. ही अट मान्य असेल तरच मिळेल दासबोध."

"मी सांगते त्यांना तसं."

इतर गोष्टींवर थोडावेळ गप्पा मारून त्या निघून गेल्या.

ज्ञानेश्वरीचे जवळजवळ प्रत्येक पान उलटून मी शहानिशा करून घेतली की बांधणी पक्की होती ते. जशी दिली होती तश्शीच होती ज्ञानेश्वरी! काही दिवसांपुर्वीच कानडे आजींना पुस्तक दिल्याच्या निमित्ताने आईशी झालेला माझा संवाद मला आठवला आणि अचानक तसे बोलणारी मीच मला संकुचित मनाची वाटायला लागले. आपसूक आईकडे जाऊन मी म्हणाले,"आई, चुकलंच माझं. कानडे आजींना पुस्तक देण्यात तू काहीच चूक केलेली नव्हतीस. मीच माझ्या इतर अनुभवांमुळे त्यांच्याबद्दल भलतेच काहितरी कल्पून ठेवले होते. माझे चुकलेच.. सॉरी! माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे.. अशी मोठी पुस्तकं वाचायला घडवंची असेल तर त्यांना पाठदुखीचा त्रास थोडा कमी होईल ना? आपण एक घ्यायची त्यांच्यासाठी?"